‘इन्टीरिअर- एक्‌स्टीरिअर रिक्लायनिंग फिगर’, ब्राँझशिल्प, १९५१.

मुर, हेन्‍री : (३० जुलै १८९८–३१ ऑगस्ट १९८६). प्रख्यात आधुनिक इंग्लिश शिल्पकार. कॅसलफर्ड येथे जन्म. त्याचे वडील कोळसा खाणीत कामगार होते. १९१७ मध्ये तो सैन्यात भरती झाला. त्यानंर १९१९ मध्ये लीड्‌स येथील कलाविद्यालयात त्याने प्रवेश घेतला. तेथे दोन वर्षे शिक्षण घेऊन आणि ‘रॉयल एक्झिबिशन’ शिष्यवृत्ती संपादन करून (१९२१) त्याने पुढे ‘रॉयल कॉलेज ऑफ आर्ट’, लंडन येथे शिल्पकलेचा तीन वर्षे अभ्यास केला. ह्याच काळात त्याने लंडनमधील विविध कलासंग्रहालयातील प्राचीन, आदिम शिल्पाकृतींचा अभ्यास करून त्यांतील सौंदर्यतत्त्वे आत्मसात केली. १९२४ मध्ये त्याला ‘रॉयल कॉलेज ऑफ आर्ट’ मध्ये सात वर्षांच्या करारावर अर्धवेळ अधिव्याख्यात्याची नोकरी मिळाली. १९२५ मध्ये प्रवासशिष्यवृत्ती मिळवून त्याने फ्रान्स व इटली ह्या देशांचा प्रवास केला. १९२६ मध्ये इंग्लंडला परतल्यावर त्याने पहुडलेल्या स्त्री-प्रतिमांच्या विषयावरील शिल्पे घडविण्यास सुरुवात केली. ह्या विषयावर त्याने अनेक शिल्पे घडवली असून, त्यांसाठी तो विख्यात आहे. उदा., रिक्लायनिंग फिगर (१९३५ पहा : मराठी विश्वकोश : खंड २ चित्रपत्र ९). नंतरच्या काळात हेन्री मुरने काही विशिष्ट विषय घेऊन त्यांतून विविध भावाविष्कार दाखविणारी निरनिराळी शिल्पे घडविली. १९३२ ते ३९ या काळात त्याने ‘चेल्सी स्कूल ऑफ आर्ट’ मध्ये अध्यापन केले.

हेन्री मुरच्या प्रारंभीच्या शिल्पाकृती प्राचीन मेक्सिकन व आफ्रिकन शिल्पांतील साधेपणा व भव्यता या गुणांनी भारावलेल्या दिसतात. उदा., रिक्लायनिंग फिगर (१९२९) हे लीड्सच्या ‘सिटी आर्ट गॅलरी’ मधील एकाश्म शिल्प. त्यानंतर त्याने शिल्पाच्या त्रिमितीय वैशिष्ट्यावर भर देऊन त्यात खोलगटपणा दाखविण्याचे तंत्र अवलंबले आणि शिल्पाच्या आकृतिबंधात उठावाबरोबरच खोलगटपणाचे आकार व सघनता यांची अभिव्यक्ती साधली. ह्या संदर्भात त्याने शिल्पातील उठाव व खोलगटपणा ह्यांचे नाते निसर्गातील टेकड्या, खडक व गुंफा यांच्याशी कल्पिले. उदा., रिक्लायनिंग फिगर (१९३४) ही त्याची, न्यूयॉर्कमधील ‘म्यूझियम ऑफ मॉडर्न आर्ट’च्या संग्रही असलेली सिलखडी माध्यमातील शिल्पाकृती. इंटर्नल अँड एक्स्टर्नल फॉर्म्स (१९५३–५४ पहा : मराठी विश्वकोश : खंड १ चित्रपत्र २४) या काष्ठशिल्पाचाही या संदर्भात निर्देश करता येईल. दुसऱ्या महायुद्धात बॉबहल्ल्याच्या वेळी खंदकात आश्रय घेणाऱ्या लंडनच्या नागरिकांची अनेक शीघ्र-चित्रे त्याने काढली व त्यांची रंग-रेखांकने केली. ती फारच लोकप्रिय ठरली. त्यांतून त्या व्यक्तींच्या सहनशीलतेचा व मनोधैर्याचा प्रत्यय येतो. ही मानवतावादी संवेदना त्याच्या पुढील शिल्पांना प्रेरक ठरली. उदा., ‘म्यूझियम ऑफ मॉडर्न आर्ट’ संग्रहालयातील फॅमिली ग्रूप (१९४५–४९), द फॉलिंग वॉरियर (१९५६) व सीटेड वुमन (१९५७). यानंतरच्या काळात मुरच्या शिल्पांनी नवीन वळण घेतले. या शिल्पांतून त्याची प्रयोगशीलता नव्या सर्जनशील रूपात आविष्कृत झाली आहे. या शिल्पांत मानवाकृतींची एकमेकांच्या सान्निध्यातील लयबद्ध रचना, तसेच आकृतिबंधातील उठाव व खोलगटपणा ह्यांच्या परस्परसंबंधातून साधलेला छायाप्रकाशातील विरोधाभास व त्यातून येणारा भावपूर्ण प्रत्यय ही वैशिष्ट्ये जाणवतात. उदा., फॅमिली ग्रूप (१९५५). १९६० व ७० या दशकांत हेन्री मुरने आपल्या कारकीर्दीतील काही अप्रतिम शिल्पे घडवली. हाडांच्या सांध्यांच्या व कूर्चाच्या वैविध्यपूर्ण रचनांशी साधर्म्य असलेले आकार कल्पून त्याने अनेकविध शिल्पे निर्माण केली. उदा., लॉकिंग पीस (१९६२) ह्या प्रकारातील विविध शिल्पे. ह्याच सुमारास न्यूयॉर्क येथील ‘लिंकन सेंटर’साठी केलेले रिक्लायनिंग फिगर (१९६३–६५) व शिकागो विद्यापीठासाठी निर्मिलेले न्यूक्लिअर एनर्जी (१९६५–६६) ही ब्राँझशिल्पे त्या त्या वास्तूंच्या खुल्या परिसरात ठेवली आहेत.

त्याला अनेक मानसन्मान लाभले. व्हेनिसच्या द्वैवार्षिक प्रदर्शनात (१९४८) आंतरराष्ट्रीय शिल्प पारितोषिक केंब्रिज, हार्व्हर्ड, ऑक्सफर्ड विद्यापीठांकडून सन्मान्य पदव्या ‘द कंपॅनियन ऑफ ऑनर’ (१९५५) आणि ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ (१९६३) हे उच्च किताब इत्यादी.

हेन्री मुरने प्रायः अमूर्त, जीवरूपीय (सजीव प्राणीमात्रांच्या आकारंपासून प्रेरणा घेऊन घडविलेले अमूर्त आकार) धाटणीची अनेक शिल्पे निर्माण केली. निसर्गातील विविध आकारांचे सखोल निरीक्षण, लाकूड व दगड या माध्यमांत प्रत्यक्ष खोदाई व माध्यमाशी इमान या गोष्टींवर त्याने विशेषत्वाने भर दिला. माध्यमाशी इमान राखणे म्हणजे त्या त्या माध्यमाचे अंगभूत घडणयुक्त गुणधर्म शिल्पनिर्मितीत अबाधित राखणे त्यावर गुळगुळीत सफाई केल्याने त्यांमध्ये एक प्रकारे कृतकपणा निर्माण होतो, असे त्याचे मत होते. या माध्यमनिष्ठेचा प्रत्यय बार्बारा हेप्‌वर्थ, नायूम गाब, रेग बटलर इ. आधुनिक शिल्पकारांतही येतो. मुरच्या शिल्पकलेवरील लिखाणाचा, फिलिप जेम्झ संपादित हेन्री मुर ऑन स्कल्प्चर (१९६६) हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. मच हॅडम (हार्टफर्डशर) येथे निधन.

संदर्भ : 1. Finn, David, Henry Moore, Sculpture and Environment, New York, 1977.

             2. Russell, John, Henry Moore, London, 1968.

करंजकर, वा. व्यं.