उत्थित शिल्प : कोणत्याही सपाट पृष्ठभागावरील शिल्पाचे त्रिमितीय प्रक्षेपण म्हणजे उत्थित शिल्प होय. उत्थित शिल्पाचे तीन प्रकार आढळतात : प्रोत्थित (आल्टो) शिल्पात पृष्ठभागापासून पुढे प्रक्षेपित केलेला शिल्पाकृतीचा भाग अधिक ठसठशीत, अधिक उठावदार असतो. याची उत्कृष्ट उदाहरणे म्हणजे अथेन्समधील पार्थनॉन मंदिराच्या डोरिक स्तंभावरील चित्रपट्टातील चौकोनी अवकाशछेद (मेटोप) हे होत (इ. स. पू. पाचवे शतक). अपोत्थित (बासो किंवा बा) शिल्पात पृष्ठभागापासून पुढे आलेला भाग थोडासाच उठावदार असतो. प्राचीन ॲसिरियातील असुरबनिपालच्या सिंहाच्या शिकारीचे उत्थित शिल्पांकन या प्रकारचे आहे (इ. स. पू. आठवे शतक). पुष्कळदा प्रोत्थित व अपोत्थित या दोन्ही प्रकारांचे मिश्रणही करण्यात येते. उदा., ‘मेझो’ या प्रकारच्या उत्थित शिल्पात शिल्पाकृतीचा जवळजवळ अर्धा भाग पृष्ठभागापासून वर कोरलेला असतो. तिसरा प्रकार निमग्न (इन्साइज्ड किंवा संकन) उत्थित शिल्पाचा. त्यात शिल्पांकनाची प्रक्रिया वरील प्रकारांच्या उलट असते. म्हणजे शिल्पाकृती पृष्ठभागाच्या वर न उठविता पृष्ठभागाच्या आत कोरली जाते. प्राचीन ईजिप्तमधील काही मंदिरांच्या भित्तिशिल्पांकनात ही पद्धती वापरल्याचे दिसून येते.

त्रिमिती साधून अवकाशाच्या निमोन्नत छटांचा प्रत्यय यावा म्हणून उत्थित शिल्पाचा उपयोग करण्यात येतो. चित्रकलेमध्ये मात्र रंगरेखांनी अशा प्रक्षेपणाचा केवळ आभास निर्माण केला जातो. (चित्रपत्र ७०).

मेहता, कुमुद (इं); गोखले, विमल (म.)

उत्थित शिल्प : पार्श्वनाथ मंदिर, खजुराहो.
निमग्न उत्थित शिल्प : थडग्यातील एक स्त्रीप्रतिमा, ईजिप्त, इ.स.पू. ३ रे – २ रे सहस्रक.