‘प्रोजेक्ट फॉर अ मॉन्युमेंट टु द’ अन्नोन पोलिटिकल प्रिझ्नर : शिलाधिष्ठित ब्राँझ-तरांचे शिल्प, १९५२.बटलर, रेग : (२८ एप्रिल १९१३− ). आधुनिक इंग्लिश मूर्तिकार व वास्तुकार. पूर्ण नाव रेजिनल्ड कॉटरेल बटलर. हार्टफर्डशर परगण्यातील बंटिंगफर्ड येथे जन्म. त्याने १९३७ मध्ये वास्तुशास्त्राची पदवी घेतली व १९३७-३९ या काळात ‘लंडन आर्किटेक्चरल असोशिएश स्कूल’ येथे अध्यापन केले. १९३९-५० पर्यंत त्याने तंत्रज्ञ म्हणून काम केले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्याने ससेक्समधील एका खेड्यात लोहारकाम केले. १९४६-५० च्या दरम्यान तो आर्किटेक्चरल जर्नल या नियतकालिकाचा तांत्रिक संपादक होता. १९५० मध्ये लीड्स विद्यापीठात त्याची अधिछात्र म्हणून नियुक्ती झाली.

१९४७ मध्ये ⇨हेन्री मुरचा साहाय्यक या नात्याने तो शिल्पाकती तयार करू लागला. १९४९साली त्याच्या स्वतःच्या कलाकृतीचे पहिले प्रदर्शन हॅनोव्हर गॅलरी, लंडन येथे भरले. १९५३ मध्ये व्हेनिस येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात त्याच्या प्रोजेक्ट फॉर अ मॉन्युमेंट टु द अन्नोज पोलिटिकल प्रिझनर या शिल्पाकृतीस पहिले पारितोषिक मिळाले. १९५४ मध्ये त्याने हॅटफिल्ड ट्रेनिंग कॉलेजसाठी द ऑरकल हे प्रसिध्द शिल्प तयार केले. ह्या शिल्पात त्याने आर्ष व आधुनिक आकृतिबंधाचा−उदा., किटकासारख्या सेंद्रिय आणि विमानासारख्या तांत्रिक प्रतिमानांचा−मेळ घातलेला दिसतो. त्याने लोह, पोलाद, बाँझ, इ. माध्यमांचा वापर करून अनेक शिल्पाकृती तयार केल्या. त्याची सुरूवातीची शिल्पे अमूर्त, रचनावादी आहेत या शिल्पांतील मानवाकृती सडसडीत व रेषात्मक दिसतात, उदा., बॉय अँड गर्ल (१९५०). त्याच्या उत्तरकालीन शिल्पांमध्ये अधिक सघनता व सौष्ठव आढळते, उदा., गर्ल (१९५६-५७) त्याने लिहिलेले क्रिएटिव्ह डिव्हेलप्मेंट हे पुस्तक १९६२ मध्ये प्रकाशित झाले.

जगताप, नंदा