रॉदँ, फ्रांस्वा ऑग्यूस्त रने : (१२ नोव्हेंबर १८४०–१७ नोव्हेंबर १९१७). श्रेष्ठ आधुनिक फ्रेंच शिल्पकार. पॅरिस येथे एका गरीब कुटुंबात जन्म. त्याला शिल्पकलेसाठी घरून कोणतेही प्रोत्साहन नव्हते, तसेच उदरनिर्वाहासाठी लहान वयातच अर्थार्जन करावे लागल्याने खूप हालअपेष्टाही सोसाव्या लागल्या. त्याने १८५४ मध्ये ‘इंपीरिअल स्कूल ऑफ डिझाइन अँड मॅथेमॅटिक्स’ मध्ये प्रवेश घेतला. तिथे ब्वाबोंड्रमने त्याला रेखनाचे आणि कार्पोने प्रतिमानकृतीचे धडे दिले. या काळातील रॉदँच्या निर्मितीमध्ये अठराव्या शतकातील अलंकरणात्मक शैलीचा व लवचिक आकारांचा प्रभाव आढळतो.

प्रारंभीच्या काळात त्याने सर्व प्रचलित तंत्रे व पद्धती यांचा वापर करून, वास्तूंच्या प्रवेशद्वांरावरील अलंकरण, तसेच अंतर्गत सजावटीची शिल्पे घडविली. यांत काल्पनिक व्यक्तिशिल्पे, मोठी भांडी, पौराणिक व्यक्तिरेखा व प्रसंग यांचा समावेश होता. त्याच दरम्यान त्याच्या स्वतंत्र वैयक्तिक निर्मितीलाही सुरुवात झाली. १८६३-६४ या कालावधीत आल्बेअर कार्ये द बेलझ याच्या समवेत शिल्पनिर्मिती केल्यामुळे त्याला अधिक कौशल्यपूर्ण कामाचा अनुभव मिळाला. मॅन विथ द ब्रॉकन नोझ ही महत्त्वाची शिल्पनिर्मिती याच काळातील. हे शिल्प त्याच्या भावी कर्तृत्वाची जणू नांदीच ठरले. इतकी चांगली मानवाकृती करण्यात आपण पुढे कधीही यशस्वी झालो नाही, असे त्याचे मत होते. हे शिल्प ‘सालाँ’ प्रदर्शनात (१८६४) नाकारण्यात आले. १८७०-७१ च्या फ्रँको-प्रशियन युद्धात त्याला भरती व्हावे लागले पण लघुदृष्टिदोषामुळे त्यातून त्याची मुक्तता झाली. १८७१ ते ७७ या काळात ब्रूसेल्स येथील वास्तवात अनेक वास्तूंच्या व स्मारकांच्या सजावटीचे काम त्याने केले. त्याने १८७५ इटलीचा प्रवास व तेथील वास्तवात मायकेलअँजेलोच्या शिल्पांचा अभ्यास केला. त्याचा फार मोठा प्रभाव रॉदँच्या उत्तरकालीन शिल्पांवर आढळतो. मायकेलअँजेलोच्या शैलीपासून स्पूर्ती घेऊन केलेल्या वॉकिंग मॅन, सेंट जॉन द बाप्टिस्ट प्रीचिंग, बेलोना इ. शिल्पांतून प्रबोधनकालीन वैभवशाली कलापरंपरेशी रॉदँचे असलेले नाते जाणवते. या शिल्पांतून मानवी शारीर रचनेचा त्याचा अभ्यास, त्याची विशुद्ध हाताळणी व छायाप्रकाशाचा मनोहर दृकचमत्कार, तसेच तंत्र व माध्यम यांवरील प्रभुत्व व भावाभिव्यक्तीतील सामर्थ्य जाणवते. त्याचे एज ऑफ ब्राँझ (१८७७) हे शिल्प ब्रूसेल्स, पॅरिस येथे प्रदर्शित झाले, त्यावर प्रत्यक्ष जिवंत प्रतिमानावरून (मॉडेल) ओतकाम (कास्टिंग) केल्याचा आरोप करण्यात आला. या संदर्भात, रॉदँच्या बाजूने व विरूद्ध वाद झाले. त्यावर निर्णय घेण्यासाठी नेमलेल्या समितीने शेवटी रॉदँच्या बाजूने निर्णय दिला. फ्रेंच सहरकारतर्फे त्याला १८८० मध्ये ‘म्यूसे दे आर्तस देकोरेतिफ्स’ या संग्रहालयाच्या प्रवेशद्वाराच्या सजावटीचे काम मिळाले ही शिल्पे द गेटस ऑफ हेल या नावाने प्रसिद्ध आहेत (१८८२−१९१७). दान्तेच्या ‘इन्फर्नो’ वरून त्याला या शिल्पांची कल्पना सुचली. या शिल्पनिर्मितीतील कल्पनावैभव व व्यासंग यांतूनच पुढे अनेक स्वतंत्र कलाकृती विकसित झाल्या. उदा., थिंकर, आदम, टू शॅडोज, द किस इत्यादी. हा दरवाजा म्हणजे केवळ चर्चच्या दरवाज्यांची आठवण वा तुलना नव्हती, तर सघन अशा शिल्पमाध्यमातून मांडलेला कलावंताचा जीवनविषयक दृष्टिकोन होता. यात मानवी जीवनातील दुःख, आनंद, आशा, निराशा, राग, लोभ, वेदना यांसारख्या मानवी भावभावनांचे अंतर्मुख वृत्तीने केलेले चित्रण असून, हे शिल्प त्यातील छाया-प्रकाश व पातळ्या यांच्या खेळांतून एका वेगळ्याच विश्वाचा अनुभव देते.

रॉदँच्या कलाजीवनातील स्मारकशिल्पांचा कालखंड हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीला लोकमान्यता मिळवण्याच्या दृष्टीने रॉदँने स्मारकशिल्पांची कामे मिळवण्यासाठी प्रयत्न केले पण पुढे यश आणि लोकप्रियता लाभल्यावर अशी कामे रॉदँकडे आपोआप येऊ लागली. स्वतःच्या स्वतंत्र सृजनशीलतेची क्षमता दाखविण्यासाठी ही कामे त्याने स्वीकारली परंतु कलेची असामान्यता सिद्ध करण्याच्या व परिपूर्ण अभिव्यक्तीच्या अट्टाहासामुळे ती बऱ्याच वेळा अपूर्ण राहिली. कलावंताची वृत्ती व सर्वमान्य अशा स्मारकाच्या रुढ कल्पकनेत न बसणारी झेप, यांमुळे अत्यंत उच्च दर्जाची कलामुल्ये असूनही, त्यांना त्या काळात म्हणावी तशी लोकमान्यता मिळाली नाही. द बर्गर्स ऑफ कॅले, व्हिक्टर ह्यूगो, बाल्झक ही त्यांतील काही महत्त्वाची स्मारकशिल्पे होत. त्यांतील द बर्गर्स ऑफ कॅले  हे फार प्रसिद्ध शिल्प असून फ्रेंचांचे धैर्य, त्याग हे गुण व इंग्रजांचे औदार्य दर्शविणाऱ्या घटनेचे ते स्मारक आहे. १३४६ च्या युद्धात इंग्लंडच्या तिसऱ्या एडवर्डने कॅले शहराला वेढा दिला होता तो उठविण्यासाठी त्याने अट घातली की, सहा मान्यवर नागरिकांनी फासावर जाण्याची तयारी दर्शवल्यास उरललेल्यांची मुक्तता होईल. त्यासाठी स्वखुशीने सहाजण तयार झाले परंतु नंतर एडवर्डने त्यांची मुक्तता केली. ह्या घटनेचे स्मारकशिल्प करण्याचे काम १८८४ मध्ये रॉदँकडे सोपविण्यात आले व १८९५ मध्ये त्या स्मारकाचे उद्घाटन झाले. या शिल्पातील सहाही व्यक्ती अलगपणे उभ्या असल्या, तरी त्यांच्या हालचालींतून व दोरखंडांतून एकमेकांशी सुसूत्रता ठेवण्यात आली आहे. यातील प्रत्येकाचा आविर्भाव व शरीरावस्था, चेहर्यांवरील भाव, एकूण समूहरचनेतून व्यक्त होणारी अगतिकता, प्रसंगाची अपरिहार्यता व गांभीर्य यांसारखे शिल्पातले घटक स्मारकशिल्पाच्या विषयाच्या रूढ कल्पनेपेक्षाही अधिक वास्तव व प्रत्ययकारी भासतात.

बाल्झॅक (१८९३) या कादंबरीकाराचे शिल्प घडवण्याचे काम स्वीकारल्यावर, रॉदँने त्याचा सूक्ष्म अभ्यास केला व बाल्झॅक लिखाणाच्या वेळी वापरत असलेल्या सैलसर अंगरख्यात (गाउन) लपेटलेले त्याचे व्यक्तिशिल्प घडवले. १८९८ च्या ‘नॅशनल सोसायटी ऑफ फाइन आर्ट्‌स’च्या प्रदर्शनात त्याने बाल्झॅकची प्लॅस्टर प्रतिकृती प्रदर्शित केली. रूढ स्मारकशिल्पाच्या कल्पनेप्रमाणे लोकांना बाल्झॅरचे गुणगौरव करणारे व्यक्तिशिल्प अपेक्षित होते. रॉदँच्या जोरकस व अपारंपरिक आविष्काराचा अर्थ लोकांनी, ‘अभ्यासासाठी केलेला नमुना’ असा घेतला. त्याची तुलना कोळशाचे पोते, पेंग्विन पक्षी किंवा आकारविहीन लाव्हा यांच्याशी केली गेली. स्मारकसमितीने सदर काम अपूर्ण आहे, असे जाहीर करून ते रद्दबातल ठरवले. मॉने, सीन्याक, तूलूझ-लोत्रेक इ. तत्कालीन मान्यवर कलावंतांचा रॉदँच्या शिल्पाला पाठिंबा मिळूनही, समितीने ते नाकारले. नंतरच्या काळात हे शिल्प नव्या कलाविषयक विचारप्रणालीचे उदाहरण ठरले. यातील ठसठशीत साधेपणा, असांकेतिक नावीन्यपूर्ण दृष्टी व तडजोड न करण्याची वृत्ती यांमुळे हे शिल्प विसाव्या शतकातील अभिव्यक्तिवादी शिल्पांचे उगमस्थान ठरले.

जगप्रसिद्ध नर्तकी इझाडोरा डंकन हिने व्हेलीझी जंगलात, रॉदँसाठी नृत्य केले आणि त्यावरून रॉदँने काही शिल्पे घडविली (१९००) यांव्यतिरिक्त, रॉदँने केलेली युग्मशिल्पे व खंडित शिल्पमालिका ह्या विषयाची कोवळीक, आवेग व भावसंवेदना व्यक्त करणाऱ्या आहेत. यात लयबद्धता, विषय हाताळणीतील धिटाई, तसेच जोरकसपणा जाणवतो. द गेटस ऑफ हेल तसेच अन्य व्यावसायिक स्वरूपाच्या निर्मितीतून यांतील अनेक शिल्पे निर्माण झाली आहेत. उदा., इटर्नल स्प्रिंग, द किस, द इटर्नल आयडॉल इत्यादी.

रॉदँने समकालीनांची केलेली व्यक्तिशिल्पेही प्रसिद्ध आहेत. यांत त्याचे समकालीन मित्र, कलावंत, पत्रकार, त्याला आवडलेल्या सुंदर व संवेदनाक्षम स्त्रिया इत्यादींचा समावेश होतो. व्हिक्टर ह्यूगो, दालू, मीन्याँ, बर्नार्ड र्शा इ. व्यक्तिशिल्पे विशेष प्रसिद्ध आहेत. व्यक्तिशिल्पकार म्हणून त्याची प्रतिभा अपूर्व होती. शारीरिक तपशील देण्याची विशिष्ट पद्धत व मानसशास्त्रीय बैठक ही त्याची वैशिष्ट्ये विशेषत्वाने नजरेत भरतात.

त्याच्या अखेरच्या कालखंडात नृत्यावर आधारित छोट्या शिल्पांची मालिका, त्याने लयीच्या अंगाने विकसित केलेली आढळते. त्यांत रॉदँने वाङ्‌मयीन किंवा प्रतीकात्मक शिल्पे घडविण्याची पद्धती अव्हेरून पूर्णतः स्वतंत्र व नवीन अशा शिल्पतत्वांची मांडणी केलेली आढळते.

पॅरिस येथे १९०० मध्ये भरविलेल्या, जागतिक प्रदर्शनातील ‘रॉदँ पॅव्हेलिन’ या कलादालनातील त्याच्या शिल्पांच्या व रेखांकनांच्या समग्र प्रदर्शनामुळे (रिट्रोस्पेक्टिव्ह) त्याला अमाप प्रसिद्धी मिळाली. त्याची शिल्पनिर्मिती कोणत्याही एका विशिष्ट पंथात वा संप्रदायात सामावण्याजोगी नव्हती. दृक्प्रत्ययवादी, निसर्गवादी, प्रतीकवादी अशा सर्व संप्रदायांची वैशिष्ट्ये त्यात एकवटली आहेत.

प्रबोधनकाळानंतर, विशेषतः मायकेलअँजेलोच्या मृत्यूनंतर, सु. तीन शतके शिल्पकलेचा आविष्कार हा अलंकरणात्मक बेगडीपणा, काटेकोर नियमबद्धता, रीतिलाघववाद अशा बाद्य अवडंबरात गुंतला होता. अलंकरण व आदर्शवादाच्या अनुकरणातून आलेली कारागिरीसंपन्न धाटणी यांपासून सर्वस्वी मुक्त अशी वेगळे संवेदनाक्षम अभिव्यक्ती व स्वायत्तता रॉदँने शिल्पकलेला दिली. त्यातून भावनिक आदर्शवादाची शिल्पकलेत निर्मिती झाली. रॉदँचा निर्मितिकाळ हा दृकप्रत्ययवादाच्या प्रभावाचा कालखंड होता. रॉदँ प्रकाशाचा विचार करायचा तो त्यात आकार प्रकट होतो म्हणून. जीवनातील क्षणिक चैतन्यस्पंदनाचा आविष्कार जड अशा शिल्पमाध्यमातून घडवायचा तर गतीचा, हालचालींचा आभास निर्माण करावा लागेल, हालचालींतून निर्माण होणारी गती, एकातून दुसऱ्यात अशी संक्रमित होत असते ती प्रत्ययकारी रीतीने, स्थिर असलेल्या शिल्पकृतीतून व्यक्त होणे असंभव आहे हे जाणून त्यासाठी पर्याय म्हणून मानवी देहाकृतीचे विशिष्ट आविर्भाव आणि अवस्था (पोझेस) रॉदँने अतिशय प्रत्ययकारी रीत्या दाखवल्या व त्यांतून भाव, संवेदना, गती यांचा प्रत्यय दिला. जीवनातील प्रवाही क्षणिकता पकडून, त्या क्षणिकतेलाच चिरस्थाणी करण्याची क्षमता रॉदँमध्ये होती.

मध्ययुगीन कला, प्रबोधनकालीन मायकेलअँजेलोच्या शिल्पकृतींचा अभ्यास व निसर्गाचे सूक्ष्म अवलोकन यांतून रॉदँची शैली विकसित झाली. त्या शैलीत अभिजातता व आधुनिकता यांचा अपूर्व संगाम होता. आधुनिक शिल्पकलेला पारंपरिक शिल्पकलेच्या कारागिरीपासून मुक्त करून नवी दिशा देण्याचे कार्य रॉदँच्या शिल्पांनी केले. परंपरागत मानवाकृती हाच विषय घेऊन त्याने त्यातून अगदी वेगळ्या स्वरूपाची नवनिर्मिती घडवली. शिल्पकाराचे प्रश्न व त्याच्यापुढील आव्हाने एकोणिसाव्या शतकात रॉदँइतक्या सामर्थ्याने व कल्पकतेने इतर कोणाही शिल्पकाराने पेललेली दिसत नाहीत. विषयाची मांडणी, हाताळणी, अवकाश, गती, प्रकाश व वस्तुजात द्रव्य-माध्यम यांतून निर्माण होणाऱ्या  आव्हानांना सामोरे जाण्याचे अद्‌भुत सामर्थ्य रॉदँने दाखविले दिसून येते. पारंपरिक विचार व यंत्रे त्याने आत्मसात तर केलीच पण त्यापेक्षाही वेगळा असा स्पर्श शिल्पकलेच्या इतिहासातील मोठे कार्य मानाने लागेल. तरल काव्यात्मक, अत्यंत जोरकस व अचूक वास्तवादी शिल्पकामाचे आधुनिक कालखंडातील हे एक मेव उदाहऱण होय. रॉदँच्या शिल्पकलेचा एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्ध व विसाव्या शतकाचा पूर्वार्ध या कालखंडातील निर्मितीवर फार मोठा प्रभाव आहे. रॉदँची कला ही वैश्विक जाणिवेचा एक उत्कट शिल्पाविष्कार आहे. त्याच्या निर्मितीमध्ये खडतर परिस्थिती वा लौकिक यश यामुंळे कधी फरक पडला नाही. शिल्पनिर्मिती ही जणू त्याची श्वासोच्छ्‌वासाइतकी मूलभूत व अनिवार्य गरजच होती. कला म्हणजे एक निदिध्यास आहे. सर्व सृष्टीचे अवलोकन करून व त्याची मनोदेवतेचा स्मरून पुनर्रचना करणे बुद्धीला आनंददायी वाटते कला हे मानवाचे उदात्त असे प्रेरक कार्य आहे कारण विश्वाला समजून घेण्याच्या विचारांची ती एक कृती असते शिल्पातून एखादी कल्पना आकाराद्वारे व्यक्त करावयाची नसते तर आधी एखादा आकार निमार्ण करावयाचा कल्पना मग आपसूक त्यामागून येते माझ्या स्मृतीत सुवावस्थेत असलेली कल्पना मी मातीमध्ये हात घालतातच माझ्यासमोर मूर्त रूप धारण करते व निसर्गातून पूर्वी मला कधीतरी ज्ञात झालेली आकार व ती कल्पना यांचा मिफाल घडतो यासांरखे कलाविषयक मौलिक विचार त्याने वेळोवेळी प्रकट केले आहेत.

या अद्वितीय शिल्पाकाराने आपली सर्व शिल्पकाराने आपली सर्व शिल्कसंपत्ती १९१६ मध्ये फ्रान्स राष्ट्राला अर्पण केली. मदाँ येथे या महान कलाकारांचा अंत झाला. (चित्रपत्र ३७).

संदर्भ :

  • Champigneulie, Bernard, Rodin, London, 1967.
  • National Centre for the Performing Arts. Pub., Rodin, Bombay.
  • Phadion Press Pub, Rodin Sculptures, London 1966.

लेखक : खडपेकर-बहुलकर, साधना

बाल्झॅक, प्लॅस्टर, १८९७
द किस, संगमरवर, १८८६
द थिंकर, ब्राँझ, १८८० – १९००
द मॅन विथ द ब्रोकन नोज, ब्राँझ, १८६४
द हँड ऑफ गॉड, संगमरवर, १८९७-९८
द कॅथीड्रल, पाषाणशिल्प, १९०८
डॅनेइड, संगमरवर, १८८५