'ॲलाबॅमा मून', १९५७.

चॅडविक, लिन : (२४ नोव्हेंबर १९१४–    ) आधुनिक ब्रिटिश शिल्पकार, जन्म लंडन येथे. त्याने १९३३ मध्ये वास्तुकलेची पदवी घेतली व १९३३–३९ या काळात वास्तुआरेखक म्हणून काम केले. दुसऱ्या महायुद्धात तो वैमानिक होता. १९४५ पासून त्याने शिल्पनिर्मितीस प्रारंभ केला. त्याच्या शिल्पकृतींचे पहिले प्रदर्शन १९५० मध्ये भरले व तेव्हापासून त्याला यूरोप-अमेरिकेमध्ये प्रसिद्धी लाभली. ‘द अन्‌नोन पोलिटिकल प्रिझनर’ या स्मारक-स्पर्धेमध्ये त्याला १९५१ मध्ये पारितोषिक मिळाले तसेच व्हेनिसच्या द्वैवार्षिक प्रदर्शनात शिल्पकलेचे आंतरराष्ट्रीय पारितोषिकही त्यास लाभले (१९५६).

त्याच्या द इनर आय (१९५२), ॲलाबॅमा मून (१९५७), एनकाउंटर VI (१९५७), द वॉचर्स (१९६०), विंग्ड फिगर्स (१९६२) इ. शिल्पाकृती उल्लेखनीय आहेत. लोखंड, पोलाद, पितळ, ब्राँझ, प्लॅस्टर, काच आदी आध्यमांचा उपयोग करून त्याने विविध शिल्परचना घडविल्या. त्यांतील कोनाकृती रचना व आगळा रेखीवपणा ह्यांतून युद्धोत्तर पश्चिमी कलाशैलीची वैशिष्ट्ये प्रकट होतात. चॅडविकच्या प्रारंभीच्या चलशिल्पांवर अलेक्झांडर कॉल्डर ह्या प्रख्यात शिल्पकाराचा प्रभाव दिसून येतो. मात्र १९५०-५१ पासूनच्या त्याच्या शिल्पाकृती स्वतंत्र दृष्टिकोन व प्रभावी लयबद्धता यांचे दर्शन घडवितात. ह्या काळात विविध धातुमाध्यमांद्वारा त्याने अप्रतिरूप शिल्पे घडविली. त्यानंतरच्या त्याच्या मानवमूर्तींवर आंग्ल परंपरेतील नवस्वच्छंदतावादाचा प्रभाव दिसून येतो. आशयाची सुस्पष्ट अशी पूर्वकल्पना व आधुनिक तंत्रकौशल्य यांमुळे ही शिल्पे वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहेत.

संदर्भ : Hodin, J. P. Chadwick, 1961.

करंजकर, वा. व्यं.