'चॅरिअट' ब्राँझशिल्प (१९५०).जाकोमात्ती, आल्बेर्तो : (१० ऑक्टोबर १९०१–११ जानेवारी १९६६). आधुनिक स्विस शिल्पकार. स्वित्झर्लंडमधील स्टँपा येथे जन्म. त्याचे वडील एक प्रख्यात चित्रकार असल्याने, लहानपणापासून कलेच्या वातावरणात तो वाढला. वयाच्या तेराव्या वर्षीच त्याने पहिले शिल्प घडविले. जिनीव्हा येथे त्याने कलाशिक्षण घेतले (१९१९) व पुढील दोन वर्षे इटलीचा प्रवास केला. १९२२ मध्ये तो पॅरिस येथे स्थायिक झाला व व आंत्वान बूर्देलच्या हाताखाली शिल्पकलेचे शिक्षण घेतले (१९२२–२५). १९३० च्या दरम्यान त्याच्यावर अतिवास्तववादी पंथाचा प्रभाव होता. द पॅलेस ॲट फोर ए.एम्. (१९३२–३३) ही त्याची या काळातील प्रख्यात शिल्पकृती. १९४० नंतर तो अतिवास्तववादी प्रभावातून मुक्त झाला व त्याने स्वत:ची अशी खास व्यक्तिविशिष्ट व विरूपणात्मक शैली निर्माण केली. मॅन पॉइंटिंग (१९४७), चॅरिअट (१९५०), सिटी स्क्वेअर (१९४८) ही त्याच्या स्वतंत्र शैलीतील काही उल्लेखनीय शिल्पे होत. त्याने निर्मिलेली खडबडीत पृष्ठभागाची उंच, कृश व सडसडीत मानवशिल्पे आधुनिक मूर्तिकलेत वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहेत. या मानवप्रतिमांचे वर्णन झां पॉल सार्त्रने ‘अस्तित्व आणि अनस्तित्व यांच्या मध्ये कुठे तरी असणाऱ्या प्रवाही बाह्यरेषा’  असे केले आहे. ही मानवशिल्पे व त्यांच्या भोवतीची अवकाशाची पोकळी यांच्या सहसंबंधांतून आधुनिक मानवाच्या एकाकीपणाचा आणि असुरक्षिततेचाच प्रत्यय येतो. व्हेनिसच्या द्वैवार्षिक प्रदर्शनात त्याला शिल्पनिर्मितीचे पहिले पारितोषिक मिळाले (१९६२). त्याची चित्रे व रेखनेही लक्षणीय आहेत. कुर येथे त्याचे निधन झाले.

संदर्भ : Sylvester, David, Alberto Giacometti, London, 1965.

इनामदार, श्री. दे.