'लिनिअर कन्स्ट्रक्शन नंबर फोर, व्हेरिएशन टू ' (१९६२ - ६४) - नायूम गाव.

गाब, नायूम : (५ ऑगस्ट १८९०–  ). रशियन मूर्तिकार व चित्रकार. ब्रिअँन्स्क येथे जन्म. त्याने निसर्गविज्ञानाचा अभ्यास केला व त्यानंतर  स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. १९१५ मध्ये त्याने आपल्या पहिल्या शिल्परचना [‘कन्स्ट्रक्शन्स’ : प्लॅस्टिक, काच, तारा, धातू  यांसारख्या  माध्यमांतून केलेल्या अप्रतिरूप भौमितिक रचना. → रचनावाद] पूर्ण केल्या. राजकीय साध्याचे एक साधन म्हणून आपली कला राबविण्यास तो आणि त्याचा भाऊ अँटवान प्येव्हस्‍न्यर यांचा विरोध होता. १९२० मध्ये त्यांनी मॉस्कोमध्ये आपला जाहीरनामा प्रसिद्ध करून त्यात आपल्या विचारांची रूपरेषा मांडली. कालाचे यथार्थ  दर्शन व्यक्त करण्यासाठी कलेमध्ये गतिशील घटकांचा आविष्कार कसा व्हावा, ह्याचे प्रात्यक्षिक म्हणून त्याने शुद्धगतिकी (कायनेटिक) शिल्पाची निर्मिती केली. १९२२ मध्ये गाबने रशिया सोडला. आपल्या भावाबरोबर त्याने द्याग्यिल्येफ ह्या प्रख्यात बॅले नर्तकासाठी नेपथ्यरचना तयार केल्या. काही काळ देसौ येथील ‘बौहाउस’ प्रशाळेत त्याने अध्यापन केले. त्यानंतर तो लंडनला गेला व अखेरीस अमेरिकेत स्थायिक झाला. १९५२ मध्ये  त्याने अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले. गाबच्या शिल्पकलेत आधुनिक वळणाचा नजरेत भरेल असा डौल आहे. वैज्ञानिक द्दष्टीचा काटेकोरपणा तिच्यात भासतो व आजच्या तंत्रविद्यात्मक वातावरणाच्या चौकटीत ती चपखल बसते. कारण या शतकात नव्याने निर्माण झालेल्या पुष्कळशा संश्लेषित द्रव्यांचा वापर गाबने मुक्तहस्ताने केला आहे.

मेहता, कुमुद (इं.)  इनामदार, श्री.  दे.  (म.)

Close Menu
Skip to content