यक्ष–यक्षी : उपदेव मानली गेलेली भारतीय पुराणकथांमधील एक अतिमानवी योनी. या योनीतील पुरुषास यक्ष व स्त्रीस यक्षी वा यक्षिणी म्हणतात. ब्रह्मदेव, पुलस्त्य, पुलह वा कश्यप हा यक्षपिता होय कश्यपाला रवसा, क्रोधा, मुनी वा विश्वा या पत्नींपासून यक्ष झाले राक्षस व गंधर्व हे त्यांचे भाऊ होत इ. कथा आढळतात. ‘यक्ष’ (पूजा करणे) या संस्कृत धातूपासून ‘यक्ष’ हा शब्द बनला, असे एक स्पष्टीकरण आढळत असले, तरी ‘यक्ष’ हे एखाद्या संस्कृतेतर भाषेतील शब्दाचे संस्कृतीकरण असावे, असे काही अभ्यासकांना वाटते. आर्यांनी यक्षपूजा आर्येतरांकडून घेतली, हेही त्यातून सूचित होते.

सुदर्शना यक्षी व सुपवसू यक्ष : भारहूत येथील स्तंभशिल्पे, इ. स. पू. दुसरे ते इ. स. पहिले शतक. सुदर्शना यक्षी व सुपवसू यक्ष : भारहूत येथील स्तंभशिल्पे, इ. स. पू. दुसरे ते इ. स. पहिले शतक.

यक्षपूजा वेदपूर्व काळापासून चालू आहे यक्षपूजेचा ऱ्हास झाल्यानंतर यक्षांची क्षुद्रदेवतांमध्ये गणना झाली वीर व ब्रह्म हे शब्द यक्षाचे पर्याय असून ‘वीरब्रह्म’ या देवतेची पूजा हा यक्षपूजेचाच अवशेष होय वैदिक संस्कृतीतील ब्रह्मकल्पना व ब्रह्म हा शब्द ही यक्षसंस्कृतीचीच देणगी आहे धूलिवंदनाच्या दिवशी वीरवेशात ग्रामदेवतेच्या वा मारुतीच्या दर्शनाला जाण्याची प्रथा ही प्राचीन यक्षपूजेचाच अवशेष असावा इ. मते रा. चिं. ढेरे यांनी मांडली आहेत. तसेच, महाराष्ट्रातील मारुतीच्या दासमारुती व वीरमारुती या दोन रूपांपैकी वीरमारुती हे यक्षाचेच स्वरुप होय मारुतीला महावीर वा महायक्ष मानण्यात आले आहे कामसूत्रात दिवाळीच्या रात्रीला यक्षरात्र मानले असून उत्तर प्रदेशात ती महावीराची जन्मतिथी असल्यामुळे त्या दिवशी त्याची केली जाणारी पूजा ही यक्षपूजा होय इ. मते अभ्यासकांनी मांडली आहेत. महाराष्ट्रात शेंदूर फासलेले दगड यक्ष म्हणून दाखविले जातात. जाखोबा, बरमदेव, वीरदेव, जाखाई, जाखीण इ. नावांनी यक्षयक्षिणींचा निर्देश केला जातो. त्यांना पुण्यजन व इतरजन अशीही नावे आहेत.

पुराणकथांतील वर्णनानुसार यक्ष हे ⇨कुबेराचे सेवक असून त्याच्या उद्यानांचे व निधींचे रक्षण करतात. हिमालयातील अलका नगरीमध्ये त्यांचे वास्तव्य असते. कालिदासाच्या विख्यात मेघदूताचा नायक एक यक्षच आहे. काही यक्ष–यक्षी सुंदर, नित्यतरुण व विलासी, तर काही कुरुप व भीषण असतात. उंच व खुजी अशा त्यांच्या दोन जाती आहेत. त्यांच्याजवळ अमृत असते. ते स्मशानात, जलाशयाजवळ वा वृक्षावर राहतात. लोकांना मारून खातात. पाणी प्यावयास आलेल्या पांडवांना विचारले तसे कूट प्रश्न विचारतात व उत्तरे मिळाली नाहीत, तर लोकांना मारून टाकतात. पिशाचांप्रमाणे झपाटतात. पाऊस पाडतात. वांझपणा घालवतात. सूक्ष्मरूपाने संचार करू शकतात. कलावंत असतात. वामाचारी लोक यक्षिणींची उपासना करतात. काही यक्षिणी साधकांकडून कामतृप्ती अपेक्षितात आणि प्रसन्न होऊन त्यांना सिद्धी देतात. यक्षांची विशालक, हरिकेश इ. आणि यक्षींची विद्युन्माला, चंद्रलेखा इ. नावे आढळतात.

गौतम बुद्धाच्या शाक्यकुलाचा कुलदेव शाक्यवर्धन नावाचा एक यक्षच होता, स्वत: बुद्धाला यक्ष म्हटले जाई, आलवक व गर्दभ या यक्षांना आणि हारीती या यक्षीला बुद्धाने नरभक्षणापासून परावृत्त केले, महायान संप्रदायात यक्षपूजा चालत होती इ. निर्देशांवरून बौद्धयक्षांचे स्थान स्पष्ट होते. जैन लोकांनी यक्षयक्षींना तीर्थंकरांचे सेवक मानले आहे त्याचप्रमाणे वरुणादी देवांना यक्ष तसेच गौरी वगैरे देवींना यक्षी मानले आहे. व्यापारात यश व्हावे म्हणून ते मणिभद्र नावाच्या यक्षाची उपासना करतात.

साळुंखे, आ. ह.

मूर्तिकला : प्राचीन भारतीय शिल्पकलेमध्ये, विशेषत: मंदिर-वास्तूंमध्ये यक्ष आणि यक्षी यांच्या अनेक मूर्ती आढळतात. विशेषतः बौद्ध कलेमध्ये त्यांची संख्या फारच मोठी आहे. द्रविड संस्कृतीत ज्या अनेक गोष्टी पूज्य किंवा उपास्य मानण्यात आल्या होत्या, त्यांत हरप्रकारच्या निसर्गदेवता व उपदेवता होत्या. आर्यांनी या देवतांचा स्वीकार केला. सर्वांत प्राचीन ज्ञात आर्य शिल्पांत-बौद्ध शिल्पांत-त्यांच्या मूर्ती आढळतात. अशा देवतांत यक्ष व यक्षी यांचा समावेश होतो. यक्ष हे मुख्यत: वृक्ष व वनसृष्टीचे अधिष्ठाते मानले जात. नंतर संपत्ती व समृद्धी प्राप्त करून घेण्यासाठी त्यांची पूजा होऊ लागली, तसेच एखादी दिशा व कल्पना यांचे ते रक्षकही बनले. यक्षी या जलाच्या तसेच वनस्पती-सृष्टीतील सुपीकतेच्या देवता असून झाडे, वेली यांत त्यांचा वास असे. बौद्ध काळात यक्ष-यक्षींकडे संरक्षक, सेवक अशीही कामे आली. प्रतिमाविद्यादृष्ट्या त्यांची लक्षणे कोठे निश्चित केलेली दिसत नसली, तरी त्यांची वर्गवारी केलेली मात्र दिसून येते. त्यांची कर्तव्ये, स्थाने, नावे (उदा., वृक्षिका, आलस्यकन्या, शालभंजिका इ.) अशा प्रकारची माहिती दीघनिकायच्या ‘आटीनाटीय सुत्ता’त व ‘महामयूरी’ या प्रकरणांत सापडते. तसेच अपराजितपृच्छा, रूपमण्डन यांसारख्या शिल्पशास्त्रावरील ग्रंथांत यक्षींची लक्षणे व माहिती दिलेली आहे. सामान्यपणे, यक्ष-यक्षी या अतिमानुषी शक्तींच्या पण सौम्य व अनुकूल देवता समजण्यात येत. यक्ष मूर्तींकडे पाहिले, तर ते अंगाने स्थूल, ठेंगणे पण प्रसन्न मुद्रेचे दिसतात. यक्षी साधारणपणे वृ क्षांना बिलगणाऱ्या अथवा लोंबकळणाऱ्या दाखविण्यात आल्या आहेत. या यक्षी अंगापिंडाने चांगल्या भरलेल्या, सुदृढ असून त्यांची वक्षस्थळे व नितंब जास्त पुष्ट आहेत. हातात कोपरापर्यंत बांगड्या, कर्णभूषणे, गळ्यात माळा, व पायात चांगल्या जडशीळ तोरड्या आहेत. मात्र जवळपास सर्व यक्षीमूर्ती या वस्त्रहीन आहेत. जननशक्तीच्या कल्पनेवर भर देण्यासाठी की काय, स्तन प्रमाणाबाहेर मोठे दाखविण्याची प्रवृत्ती दिसते. यक्ष-यक्षी यांच्या मूर्ती मृत्तिका, तसेच पाषाण माध्यमांत आहेत व दोन्हींच्या आकारांत फार मोठा फरक असला, तरी वरील वैशिष्ट्ये दोहोंतही कायम आहेत. ओरिसामध्ये तसेच तमिळनाडूत काष्ठशिल्पांतून यक्षींच्या मूर्ती आढळतात (१७वे–१८वे शतक). गुप्त काळात, कदाचित त्याही पेक्षा थोडे आधी या मूर्तींमध्ये स्थित्यंतर झाले आणि त्या आता द्वारपालांच्या, दिक्‌पालांच्या किंवा गंगा-यमुना यांच्या रूपांत दिसू लागल्या. जैन तीर्थंकरांच्या मूर्तींचे सहचर म्हणून यक्ष-यक्षी सर्वत्र दिसतात. संस्कृत साहित्यात यक्ष हा अतिमानुषवर्ग कोठेकोठे दिसत असला, तरी देवता म्हणून त्यांना पौराणिक वाङ्‌मयात फारसे महत्त्व मिळाले नाही. किंबहुना हा वर्ग लुप्तच झाला.

भारतीय शिल्पकलेतील काही प्रसिद्ध यक्ष-यक्षी मूर्तींची उदाहरणे पुढे दिली आहेत : (१) परखम येथील यक्षमूर्ती (मथुरा संग्रहालय) : इ. स. पू. चवथे–तिसरे शतक. या मूर्तीवरील लेखावरून ही शिशुनाग वंशाच्या अजातशत्रू याची असावी, असा समज झाला होता. लेखाच्या पुनर्वाचनामुळे ही समजूत दूर झाली. ही यक्षमूर्ती असावी, असे आता समजण्यात येते. शिल्पदृष्ट्या साम्य असणाऱ्या आणखी काही मूर्ती उपलब्ध झाल्या आहेत व त्यांवर यक्षांची ‘मणिभद्र’, ‘शंकरिन’ अशी नावे आहेत. (२) सांची स्तूपाच्या तोरणावरील यक्षी-वृक्षा : इ. स. चा प्रारंभ काळ. या यक्षीचे काहीसे बोजड शरीर आणि त्यावरील अवजड अलंकार भारहूत वेदिकेवरील यक्षींसारखे असले, तरी उभे राहण्याच्या पद्धतीमुळे या मूर्तीला खास लालित्य प्राप्त झाले आहे. वृक्षाला लपेटलेल्या यक्षी पूर्णपणे वस्त्रहीन असतात, हे वर सांगितलेच आहे. (३) पितळखोरे यक्षमूर्ती : इ. स. पू. पहिले शतक. डोक्यावर पाटी घेऊन जात असलेला स्थूल पण अत्यंत प्रसन्न वदनाचा यक्ष. मूर्तीवर ‘कृष्णदास सोनाराने केली’, असा लेख आहे. (४) दीदारगंज यक्षी (पाटणा संग्रहालय) : इ. स. पू. तिसरे–दुसरे शतक. मौर्य शिल्पाची विशेष अशी चकाकी असलेले शिल्प. हातापायांतील दागिन्या-तोरड्यांची संख्या व आकार तसेच देहाचा आकार व जडणघडण यांत मृत्तिकाशिल्पातील मूर्तीशी साम्य आढळते. चवरी ढाळणारी ही मूर्ती यक्षीची आहे, असे समजतात.

माटे, म. श्री.

संदर्भ: १. जोशी, महादेवशास्त्री, गाजती दैवते, पुणे, १९६२.

२. देशपांडे, सु. र. भारतीय कामशिल्प, पुणे, १९८६.