हेप्‌वर्थ, बार्बरा : (१० जानेवारी १९०३ – २० मे १९७५). प्रसिद्ध ब्रिटिश चित्रकर्त्री व शिल्पकर्त्री. अमूर्त शिल्पकलेच्या प्रणेत्या. 

 

त्यांचा जन्म हर्बर्ट व गटर्र्ड (जॉन्सन) या दांपत्यापोटी वेकफील्ड (यॉर्कशर) येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेम जोसेलिन बार्बरा हेप्वर्थ.त्यांचे वडील स्थापत्य अभियंता होते. त्यांची भूमी-निरीक्षकपदी नेमणूक झाल्यावर नोकरीनिमित्ताने यॉर्कशर परगण्यात फिरताना ते बार्बरा यांना बरोबर घेऊन जात असत. बार्बरा यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण यॉर्कशरच्या मुलींच्या शाळेतून पूर्ण केले. त्यांना १९१५ मध्ये संगीत शिष्यवृत्ती व १९१७ मध्ये मुक्त शिष्यवृत्ती मिळाली होती. बालपणापासूनच त्यांना नैसर्गिक आकार आणि पोत यांबद्दल विलक्षण कुतूहल होते. त्यातून त्यांची शिल्पाभिरुची घडत गेली. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी शिल्पकार होण्याचे ठरवले. 

 

 बार्बरा हेप्‌वर्थ
 

बार्बरा यांनी ‘लीड्स स्कूल ऑफ आर्ट’ मध्ये प्रवेश घेतला (१९१९). तेथे त्यांचे सहाध्यायी प्रसिद्ध शिल्पकार हेन्री मुर होते. त्यांचा स्नेह अखेरपर्यंत टिकूनहोता. त्यांचा परस्परांवरील प्रभाव त्यांच्या भावी कारकीर्दीच्या जडण-घडणीत महत्त्वाचा ठरला. मुर यांच्या बरोबरीने त्यांनी ‘रॉयल कॉलेज ऑफ आर्ट ‘मध्ये (लंडन) प्रवेश घेतला. १९२३ मध्ये त्यांनी कलेतील पदविका प्राप्त केली. लंडनच्या वास्तव्यात त्यांनी तेथील विविध कलासंग्रहालयांतील शिल्पाकृतींचा अभ्यास करून त्यांतील सौंदर्यतत्त्वे आत्मसात केली. बार्बरा इटली येथील १९२४ च्या ‘प्रिक्स दी रोम’ स्पर्धेत दुसऱ्या आल्या पण या बक्षिसाच्या ऐवजी त्यांनी प्रवासी शिष्यवृत्ती स्वीकारली. त्यानंतर त्यांनी सिएना व रोम येथे जाऊन ‘प्रिक्स दी रोम’ स्पर्धेचा विजेता व शिल्पकार जॉन स्किपींग यांच्यासह तेथील शिल्पे आणि चित्रे यांचा प्रत्यक्ष अभ्यास केला. जॉन स्किपींग यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या (१९२५).

 

बार्बरा यांच्या प्रारंभीच्या शिल्पांत मुख्यतः आभासी नैसर्गिक आकारांद्वारे नैसर्गिक आकारांचे सुलभीकरण, तसेच मुर यांच्या शैलीशी साधर्म्य जाणवते. शिल्पांकनात लहानसहान, बारीकसारीक तपशील टाळून सहजसुलभता आणता आणता त्या कळत-नकळत अमूर्ततेकडे वळल्या. दगड आणि लाकूड या माध्यमांवर त्या काम करत होत्या. ‘दगडांवर कोरीव काम तसेच लाकूड व दगड या माध्यमांत प्रत्यक्ष खोदकाम करण्यात एक विलक्षण आनंद-रोमहर्षकता आहे’, असे त्या म्हणत. शिल्पासाठी निवडलेल्या माध्यमात प्रत्यक्ष कोरून शिल्पांकन करण्यात त्या हेन्री मुर यांच्याइतक्याच सक्षम होत्या पण त्यांची शिल्पकृती मात्र भिन्न स्वरूप धारण करीत असे. मुर यांच्या कामात अमूर्ततेला नैसर्गिक मूळ आकाराचा पाया असे तर बार्बरा यांची शिल्पे अमूर्त, पण कोणत्याही पूर्व संदर्भांशी जोडलेली नसत. त्यांची शिल्पे केवल वा विशुद्ध आकाररचनेसाठी प्रसिद्ध होती. 

 

सुरुवातीच्या बार्बरा यांच्या कलाकृती नैसर्गिक रचनाबंधांतून छिन्नी-हातोड्याचा अत्यल्प उपयोग करून साकारलेल्या होत्या. जॉन स्किपींग यांच्याकडून त्यांनी संगमरवरावरील शिल्पकला आत्मसात केली. त्यांच्याशी घटस्फोट झाल्यावर, बेन निकोल्सन या अमूर्ततावादी चित्रकाराशी त्यांनी विवाह केला (१९३८). त्यांच्या प्रभावातून त्याअमूर्त शिल्पांकनाकडे वळल्या. त्यांच्या शिल्परचनांतील धारदार कडा, स्वच्छ नितळ पृष्ठभाग असलेले रेखीव भौमितिक आकार हा निकोल्सन यांच्या प्रभावाचा परिणाम होता. 

 

अभ्यास आणि चिंतनातून त्यांची शिल्पकला अधिक समृद्ध झाली. रिक्लाइनिंग फिगर (१९३२) या शिल्पकृतीतून त्याचा प्रत्यय येतो. १९३०–४० च्या दशकातील त्यांच्या कामात अवकाश आणि वस्तुमान यांचा अन्योन्यसंबंध आढळतो. त्यांचे परस्पर नातेसंबंध शोधण्यावर या काळातील त्यांची शिल्पनिर्मिती केंद्रित झालेली दिसते. या काळातील त्यांची प्रयोगशीलता नव्या सर्जनशील रूपात आविष्कृतझाली आहे. अंतर्गत अवकाशाचा परिणाम साकारण्यासाठी त्यांनी आपल्या शिल्पकृतीत खुल्या पृष्ठभागावर तारा घट्ट ताणून व बांधून प्रयोग केला. यापुढचे त्यांचे प्रायोगिक शिल्पांकन १९५० च्या दशकात त्यांनी सादर केलेल्या ग्रूप्स या कामात दिसते. अतिशय तलम, झिरझिरीत संगमरवराचे माध्यम वापरून केलेले व मानवाकृतीशी साधर्म्यदर्शी नैसर्गिक पारदर्शी आकाराच्या रचनेतून साकारलेले हे शिल्प अत्यंत वेधक आहे. पाषाण, लाकूड व विशेषतः संगमरवर या माध्यमांबरोबरीनेच त्या धातुमाध्यमाकडे वळल्या. १९६० नंतर त्यांच्याकडे भव्य ६ मी. उंचीची शिल्पे उभारण्याची कामे आली. फोर स्क्वेअर वॉक थ्रू (१९६६) हे त्यांपैकी गाजलेले भौमितिक आकारातील शिल्प होय. 

 

यूरोपात त्या काळी नवकलेच्या संदर्भात चाललेल्या विविध चळवळींत त्यांचा सक्रिय सहभाग होता. नाझी-फॅसिझमविरोधातही त्यांनी हिरिरीने भाग घेतला होता. 

 

एकल प्रदर्शनांबरोबरच समूहप्रदर्शनांतूनही बार्बरा यांचा सहभाग असे. ब्रिटनबाहेर–विशेषतः अन्य यूरोपीय देशांत आणि अमेरिकेत – त्यांची चित्रप्रदर्शने आयोजित करण्यात आली. द्वैवार्षिक प्रदर्शनांत त्यांच्या कलाकृतींना पारितोषिकेही लाभली. दुसऱ्या एलिझाबेथ राणीने त्यांना सरदारकी बहाल केली (१९६५). मदर अँड चाइल्ड (पिअर्स्ड फॉर्म व मॉन्युमेंटल स्टेला ही शिल्पे बाँबहल्ल्यात नष्ट झाली), कॉन्ट्राप्युन्टल फॉर्म्स, टर्निंग फॉर्म्स, व्हर्टिकल फॉर्म्स, मोनोलिथ, मेरिडीअन, विंग्ड फिगर, द फॅमिली ऑफ मॅन, थीम अँड व्हेरिएशन इ. त्यांच्या प्रसिद्ध शिल्पकृती होत.

 

विमान अपघातात मरण पावलेल्या आपल्या वैमानिक मुलाच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी मॅडोना अँड चाइल्ड (१९५३) हे शिल्प केले. 

 

न्यूयॉर्क येथील म्यूझीयम ऑफ मॉडर्न आर्ट तसेच टेट गॅलरी ( लंडन) अशा प्रतिष्ठित कलासंग्रहालयांतून त्यांची शिल्पे जतन केली आहेत. दुसऱ्या महायुद्धातील बाँबहल्ल्यात त्यांच्या काही कलाकृती नष्ट झाल्या. 

 

सेंट ईव्हज (कॉर्नवॉल) येथील राहत्या घरात (तिथे त्यांचा स्टुडिओ होता) लागलेल्या आगीत त्यांचे देहावसान झाले. त्यांच्या मुलांनी पुढे त्या घराचे बार्बरा हेप्वर्थ संग्रहालयात रूपांतर केले. 

 

संदर्भ : Read, Herbert, Barbara Hepworth Carvings and Drawings, London, 1952. 

  

देशपांडे, जयंत