मुर, जॉर्ज एडवर्ड : (४ नोव्हेंबर १८७३–२४ ऑक्टोबर १९५८). आपल्या काळातील अत्यंत प्रभावशाली ब्रिटिश तत्त्ववेत्ते. मुर व ⇨ बर्ट्रंड रसेल ह्या दोघा तत्त्ववेत्त्यांनी सहकार्याने त्याकाळी प्रतिष्ठित असलेल्या ⇨ एफ्. एच. ब्रॅड्‌ली व ⇨ बर्नार्ड बोझांकेट यांच्या चिद्‌वादी, हेगेलिअन वळणाच्या तत्त्वज्ञानाचे खंडन करून विश्लेषणात्मक तत्त्वज्ञान रूढ केले. मुर यांचे उच्च शिक्षण केंब्रिज विद्यापीठात, ट्रिनिटी कॉलेज येथे झाले. १८९२ पासून १९३९ मध्ये केंब्रिज विद्यापीठातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून निवृत्त होईपर्यंत, १९०४ ते १९११ ही वर्षे सोडली तर, ते केंब्रिज विद्यापीठाशीच संबंधित होते. तत्त्वज्ञानावरील त्यांची उत्कट आणि आत्यंतिक निष्ठा, पराकाष्ठेची बौद्धिक सचोटी आणि वैयक्तिक आचरणातील नेकी ह्या गुणांमुळे समकालीन तत्त्ववेत्त्यांमध्ये त्यांच्याविषयी पराकाष्ठेच्या आदराची भावना वसत होती. माइंड ह्या तत्त्वज्ञानाला वाहिलेल्या प्रतिष्ठित इंग्रजी नियतकालिकाचे १९२१ ते १९४७ पर्यंत ते संपादक होते.

  मुर यांच्या तत्त्वज्ञानात्मक चिंतनाचे आणि विश्लेषणाचे तीन प्रमुख विषय (१) तत्त्वज्ञानाची पद्धती, (२) बाह्य वस्तूंच्या आपल्याला होणाऱ्या प्रत्यक्षज्ञानाची समस्या आणि (३) नीतिशास्त्र हे होत.

मुर ह्यांनी अनुसरलेल्या तत्त्वज्ञानाच्या पद्धतीचे थोडक्यात वर्णन असे : व्यवहारात आपण अनेक समजुती किंवा विश्वास सत्य म्हणून स्वीकारतो. उदा., प्रत्यक्षज्ञानाने आपल्याला ज्या वस्तू अवगत होतात त्या बाह्य वस्तू असतात. उदा., टेबल किंवा झाड. आपली व्यवहारबुद्धी (कॉमनसेन्स)स्वीकारीत असलेल्या अशा समजुतींचे खंडन करण्यासाठी तत्त्ववेत्ते ज्या युक्तिवादांचा उपयोग करतात ते आत्मविसंगत असतात असे दाखवून देता येते. तेव्हा त्यांची सत्यता नाकारायला पुरेसे आणि योग्य कारण नसते. पण ह्या समजुती सत्य म्हणून स्वीकारल्या तरी त्यांचा नेमका आशय काय आहे, ह्याचे स्पष्ट ज्ञान आपल्याला नसते. ह्या समजुतींचे (म्हणजे त्यांच्या आशयाचे) विश्लेषण करणे हे तत्त्वज्ञानाचे एक महत्त्वाचे कार्य असते. विश्लेषण करणे म्हणजे ज्या गोष्टीचे विश्लेषण करायचे तिचे कोणते घटक आहेत आणि हे घटक कोणत्या संबंधांनी परस्परांशी संबंधित झाल्याने विश्लेषण गोष्टीचे स्वरूप सिद्ध होते, हे स्पष्ट करणे. उदा.,‘बाह्य वस्तूचे प्रत्यक्षज्ञान’हा अनुभव घेतला तर ह्या अनुभवाचे घटक कोणते असतात आणि अशा अनुभवात ह्या घटकांचे एकमेकांशी काय संबंध असतात, हे दाखवून देऊन आपण त्याचे विश्लेषण करतो. असे विश्लेषण करताना आपण व्यवहारात जे शब्दप्रयोग वापरतो त्यांच्या अर्थाचेही विश्लेषण, ह्याच पद्धतीने मुर करतात. म्हणून पुढे तत्त्वज्ञानात रूढ झालेली ⇨ भाषिक विश्लेषणाची पद्धती आणि मुर ह्यांनी अनुसरलेली पद्धती ह्यांत भेद असला, तरी महत्त्वाचे साम्यही आहे.

बाह्य वस्तूंच्या आपल्याला होणाऱ्या प्रत्यक्षज्ञानाशी ज्या तत्त्वज्ञानात्मक समस्या संबंधित आहेत, त्यांच्याविषयी मुर ह्यांनी विपूल विवेचन केले आहे. त्यांचा एकंदर निष्कर्ष असा, की प्रत्यक्षज्ञानात बाह्य वस्तूंचे आपल्याला साक्षात् ज्ञान होत नाही आपल्याला ज्याचे साक्षात् ज्ञान होते ते. एक वेदनदत्त किंवा इंद्रियदत्त (सेन्स-डेटम) असते आणि हे इंद्रियदत्त कोणत्यातरी अर्थाने त्या बाह्य वस्तूचे असते, त्या बाह्य वस्तूंशी संबंधित असते. पण ह्या संबंधाचे सुसंगत व समाधानकारक वर्णन करण्यात मुर यांना अखेरपर्यंत अपयश आले.

प्रिन्सिपिया एथिका हा १९०३ मध्ये प्रसिद्ध झालेला मुर यांचा नीतिशास्त्रावरील ग्रंथ एक अभिजात ग्रंथ म्हणून मान्यता पावला आहे. मुर यांच्या मते नीतिशास्त्राचे तीने प्रमुख प्रश्न आहेत : (१) ‘चांगले’ (किंवा ‘वाईट’) ह्या विशेषणांचा नेमका अर्थ मुकर करणे किंवा त्यांच्या अर्थांची व्याख्या करणे. ह्या बाबतीत मुर यांचे मत असे आहे, की ‘चांगले’ ह्या पदाच्या अर्थाची व्याख्या करता येत नाही. ‘चांगले’ ह्या पदाने एक साधा (म्हणजे निरवयव व म्हणून अव्याख्येय असा) गुण व्यक्त होतो. हा गुण इंद्रियगोचर नसतो. त्याचे ज्ञान आपल्याला बौद्धिक प्रतिभानाने (इंट्युइशन) होते. (२) दुसरा प्रश्न असा, की स्वतःच चांगल्या असलेल्या म्हणजे चांगुलपणा हा गुण ज्यांच्या स्वतःच्या ठिकाणी आहे अशा वस्तू कोणत्या? एखाद्या प्रकारच्या वस्तूच्या ठिकाणी, उदा., प्रेम ह्या अनुभवाच्या ठिकाणी, चांगुलपणा हा गुण आहे की नाही, ह्याचे ज्ञान आपल्याला असेच साक्षात् प्रतिभानाने होते. अशा स्वतःच चांगल्या असलेल्या वस्तू ही नैतिक साध्ये असतात. (३) नैतिक कृत्ये किंवा आपली कर्तव्ये कोणती? ह्याचे उत्तर असे, की ज्या प्रकारची कृत्ये किंवा जी कृत्ये केल्याने नैतिक साध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सिद्ध होतात, म्हणजे स्वतःच चांगल्या असलेल्या वस्तू जास्तीत जास्त प्रमाणात अस्तित्वात येतात, ती कृत्ये नैतिक कृत्ये किंवा कर्तव्ये होत.

पहा : नीतिशास्त्र.

संदर्भ : 1. Schilpp. P. A. Ed. The Philosophy of G. E. Moore (2nd Ed.) New York, 1952.

             2. White, A. R. G. E. Moore: A Critical Exposition, Oxford, 1958.

रेगे, मे. पुं.