मुतवल्ली : वक्फ-संपत्तीच्या उद्दिष्टांची पूर्ती व समर्पणसमयीच्या निदेशांचे पालन ज्या व्यक्तीकडे सोपविले असते, त्या व्यक्तीस मुसलमानी विधीत सामान्यपणे ‘मुतवल्ली’ अशी संज्ञा आहे. मुतवल्ली केवळ व्यवस्थापक असून विश्वस्त नसल्यामुळे वक्फ-संपत्ती त्याच्यामध्ये निहित होत नाही [⟶ वक्फ].

मुतवल्लीची नियुक्ती वक्फ-संस्थापक, तो नसल्यास मृत्युशय्येवरील मुतवल्ली अगर न्यायालय करू शकतात. धर्मकृत्ये करण्याची आवश्यकता नसल्यास स्त्रिया किंवा मुसलमानेतरसुद्धा मुतवल्ली होऊ शकतात. सर्वसाधारणपणे मुतवल्लीचे पद वंशपरंपरेने जात नाही ते हस्तांतरित करता येत नाही अगर जप्तही करता येत नाही. मात्र मुतवल्ली प्रतिनिधी नेमू शकतो. धनकोने मुतवल्लीला उद्दिष्टपूर्तीसाठी दिलेले पैसेही तो वक्फ-संपत्तीतून मागू शकत नाही. मुतवल्लीविरुद्ध वक्फ-संपत्ती अगर हिशेब यांसाठी दाखल करावयाच्या वादाला मुदती प्रतिबंध असत नाही. अपकार्य किंवा विश्वासघात केल्यास न्यायालय त्याला पदावरून दूर करू शकते.

श्रीखंडे, ना. स.