मुतनब्बी अल् : (दहावे शतक) श्रेष्ठ अरबी कवी. जन्म कूफा येथे. काही बंडखोर बदाऊनी लोकांचा नेता होण्याचा अयशस्वी प्रयत्न त्याने एकदा केला होता. त्यावरून ‘अल् मुतनब्बी’ (भावी प्रेषित) हे नाव त्याला पडले, असे म्हटले जाते. ‘प्रेषिताचा आव आणणारा’ असाही ‘अल् मुतनब्बी’ चा अर्थ केला जातो. अलेप्पोचा राजा सैफ-अल् दावला ह्याने त्याला आश्रय दिला होता परंतु पुढे तो ईजिप्तच्या काफूरच्या दरबारी राहिला. काफूरशी त्याचे भांडण झाल्यामुळे तो नंतर इराणला पळून आला व तेथे राहून काफूरवर त्याने उपरोधप्रचुर कविता लिहिल्या. इराककडे जात असता काही बदाऊनी लोकांनी बगदादजवळ त्याला ठार मारले.

अल् मुतनब्बीच्या कवितांतून (त्याने कसिदा रचिल्या) त्याचे स्वाभिमानी व्यक्तिमत्त्व प्रत्ययास येते. त्याची शैलीही ह्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी, जोरकस अशी आहे. प्राचीन अरबांच्या उच्च जीवनमुल्यांचे प्रतिबिंबि त्याच्या कवितेत दिसते. अनेक समीक्षकांच्या मते मुतनब्बी हा सर्वश्रेष्ठ अरबी कवी होय. अरबी साहित्यात त्याच्या कवितांच्या ओळी अनेकदा उद्‌धृत केल्या जातात.

कुलकर्णी, अ. र.