जरीर: (६५०–७२८). उमय्या कालखंडातील एक श्रेष्ठ अरबी कवी. पूर्ण नाव इब्न अतिय्या इब्न अल्- खतफा. जन्म उथायफीया येथे. औपरोधिक लेखन करण्यात विशेष प्रख्यात असलेले अल्-अखतल आणि अल्-फरजदाक हे दोघेही त्याचे विरोधक होते. अल्-फरजदाक याच्याशी तर त्याचा चाळीस वर्षे प्रदीर्घ संघर्ष होता.

इराकचे राज्यपाल अल्-हज्जाज यांच्यावरील स्तुतिपर कवनांनी त्याला लोकप्रियता मिळवून दिली. ‘नसीब’ – स्तुतिपर कवनांचा प्रास्ताविक भाग–लिहिण्यातील त्याचे प्रभुत्व आणि उपमाकौशल्य अल्-अखतलनेही वाखाणले आहे. जरीर काही काळ दमास्कस येथे खलीफा अब्दुल मलिक याच्या दरबारी होता त्याच्यावरही त्याने अनेक स्तुतिपर कवने केली आहेत. राजदरबारातील स्त्रियांबद्दल औपरोधिक लेखन केल्यामुळे अब्दुल मलिकचा वारस अल्-वलीद याची मात्र त्याच्यावर विशेष मर्जी नव्हती.

जरीरचे औपरोधिक लेखन तत्कालीन चाळिसांहून अधिक कवींच्या विरोधातच आहे. त्यांपैकी बहुतेक कविता अल्-फरजदाकच्या विरोधी आहेत. त्याची लेखनशैली प्रभावी व ओघवती असून तीबाबत अरबी समीक्षकांचेही एकमत दिसून येते. त्याच्या बहुतेक उपरोधिका आणि स्तुतिगीते ‘कसीदां’ मध्ये रचलेल्या आहेत. त्याने काही विलापिका आणि चतुरोक्तीही लिहिल्या आहेत. त्याचे लेखनसार्मथ्य व त्यातील उणिवाही लक्षात घेता तो प्राचीन बेदूइन कवींचा वारसच म्हणता येईल. ए. ए. बेव्हनने त्याचे कवितासंग्रह प्रकाशित केले आहेत (१९०५–१२). यमामा येथे तो निधन पावला.

नईमुद्दीन, सैय्यद