म’अर्री, अल् : (? डिसेंबर ९७३–? मे १०५७). थोर अरबी कवी. सिरियातील आलेप्पोजवळील मार्रत अन्-नूमान येथे जन्मला. बालपणीच देवी येऊन तो अंध झाला होता. आलेप्पो, अँटिऑक आणि ट्रिपोली येथे त्यानी शिक्षण घेतले. (द टिंडर स्पार्क ई. शी.) ह्या नावाने त्याच्या आरंभीच्या कविता संगृहीत आहेत.

काही काळ त्याचे वास्तव्य बगदाद शहरात होते. तेथे असताना त्याच्यात संन्यस्त वृत्ती निर्माण झाली आणि त्याने एकांतवास स्वीकारला. मांसहाराचा तसेच अन्य प्राणीज भ्रन्नाचाही त्याने त्याग केला होता.

लुझुमियात (इं. शी. अन्नेसेसरी नेसेसिटी) आणि रिसालत अल् घुफ्रान (इं. भा. रिसालत अल्‌ घुफ्रान, ए डिव्हाइन कॉमेडी १९४३) हे त्याचे अन्य उल्लेखनीय काव्यग्रंथ होत. लुझुमियात मध्ये काव्यातील यमकयोजनेच्या अनावश्यक संकुलपणावर त्याने टीका केलेली असून रिसालत अल् धुफ्रानमध्ये कवीच्या स्वर्ग व नरकभेटीचे वर्णन आहे. आपल्या पूर्वजांना तसेच काही प्राचीन कवींना भेटण्यासाठी कवी स्वर्ग नरकांत जातो, असे ह्या काव्यात दाखविले आहे.

अल् म’अर्री तत्त्वचिंतक वृत्तीचा कवी असून संदेहवादी होता. त्याच्या संदेहवादाचे पडसाद त्याच्या कवितेत अपरिहार्यपणे उमटलेले आहेत. लुझुमियातचा काही भाग आर्‌. ए. निकोलसन ह्यांनी अनुवादिला आहे (स्टडीज इन इस्लामिक पोएट्री), १९२१).

मार्रत अन्-नूमान येथेच त्याचे निधन झाले.

कुलकर्णी, अ. र.