जिब्रान, खलील : (६ जानेवारी १८८३–१० एप्रिल १९३१). जगद्विख्यात अरबी कवी, विचारवंत आणि चित्रकार. पूर्ण अरबी नाव जिब्रान (जुब्रान) खलील जिब्रान. बिशार्री, लेबानन येथे जन्म. बेरूतच्या ‘मदरसतुल हिकमत’ मध्ये त्याने चार वर्षे अरबी साहित्याचे अध्ययन केले. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त त्याने धर्मेतिहास, आंतरराष्ट्रीय कायदा, संगीत, वैद्यक आदी विविध विषयांचा व्यासंग केला. पॅरिसमध्ये चित्रकलेचेही अध्ययन केले (१९०१–०३). १९०३ मध्ये तो अमेरिकेला गेला. १९०८ साली त्याने पुन्हा पॅरिसला भेट दिली. तत्पूर्वीच त्याने लिहिलेला स्पिरिट्स रिबेल्यिस हा ग्रंथ ‘युवकांना विषवल्लीप्रमाणे, क्रांतिकारक आणि अपायकारी’ ठरविण्यात येऊन तो बेरूत येथे जाळण्यात आला व जिब्रानला हद्दपारीची व चर्चप्रवेशबंदीची शिक्षा देण्यात आली. या ग्रंथात तथाकथित धर्ममार्तंड व लोकतंत्रविरोधी, क्रूर व निबर हुकूमशहा यांच्या विरुद्ध टीका असून स्त्रीस्वातंत्र्य, समता आणि व्यक्तिप्रतिष्ठा यांचा प्रभावीपणे पुरस्कार केलेला आहे.
वयाच्या पंधराव्या वर्षीच जिब्रानने द प्रॉफिट हा आपला ग्रंथराज लिहावयास सुरुवात केली. अल्-हकिकत या मासिकाचे वयाच्या सोळव्या वर्षी त्याने संपादन केले. त्याने रेखाटलेल्या प्रसिद्ध व्यक्तिचित्रांचे न्यूयॉर्क व बॉस्टन येथे प्रदर्शन भरविण्यात आले होते. १९१० पासून त्याने न्यूयॉर्क येथे वास्तव्य केले. तेथेच त्याचे निधन झाले.
जिब्रानने अरबी व इंग्रजी या दोन्ही भाषांत विपुल ग्रंथनिर्मिती केली. त्याचे प्रमुख अरबी ग्रंथ पुढीलप्रमाणे होत : अराइस उल मुरूज (१९१०, इं. भा. निम्फ्स ऑफ द व्हॅली, १९४८), दमह व इब्सिसामह (१९१४, इं. भा. टिअर्स अँड लाफ्टर, १९४९), अल्- अरवाह अल् मुतमर्रिद (१९२०, इं. भा. स्पिरिट्स रिबेल्यिस, १९४९), अल अजिन्नहत् अल् मुतकस्सिरह (१९२२, इं. भा. ब्रोकन विंग्ज, १९५७), अल् अवासिफ (१९२३, इं. शी. द स्टॉर्म्स), अल् मवाकिब (१९२३, इं. भा. द. प्रोसेशन्स, १९५८). यांखेरीज त्याचा अल् बदाये वल तरायिफ हा अरबी ग्रंथ असून त्यात त्याने आद्य इस्लामी कवी-लेखकांची चित्रे केवळ कल्पनेने रेखाटली आहे. त्याने इंग्रजीमध्ये लिहिलेल्या ग्रंथांत द मॅडमन (१९१८), द फोररनर (१९२०), द प्रॉफिट (१९२३), सँड अँड फोम (१९२६) आणि जीझस, द सन ऑफ मॅन (१९२८) या ग्रंथांचा अंतर्भाव होतो.
जिब्रानच्या ग्रंथांचे जगातील अनेक भाषांत अनुवाद झाले आहेत. मराठीत तो विशेष लोकप्रिय आहे. मराठी भाषेतील त्याचे काही प्रमुख अनुवादित ग्रंथ पुढीलप्रमाणे होत : वि. स. खांडेकरकृत वेचलेली फुले (फोररनरवरून, १९४८) व सुवर्णकण (द मॅडमन, १९४८) र. ग. जोशी यांची प्रवासी (द वाँडरर, १९४८) व जीवन-दर्शन (द प्रॉफिट, १९४७) श्रीपाद जोशीकृत मानवतेचे राखणदार (बंडखोर आत्मे स्पिरिट्स रिबेल्यिसच्या सरकश रूहे या उर्दू अनुवादावरून, १९४७) व वेडा (द मॅडमन, १९५०) ना. ग. जोशीकृत पैगंबराचा बगीचा (गार्डन ऑफ द प्रॉफिट, १९४९) ना. गो. नांदापूरकर यांचे हसू आणि आसू (टिअर्स अँड लाफ्टर, १९६५) वसंत शहाणेकृत तुटलेले पंख (कथासंग्रह, १९४९) काकासाहेब कालेलकरकृत मृगजळातील मोती (१९५१) व रा. वा. चिटणीस यांचे भूदेव व काही रूपककथा (१९६०).
जिब्रानचे वास्तव्य अमेरिकेत असले, तरी त्याला पूर्वेचा, विशेषतः स्वदेशाचा, फार अभिमान होता. संपूर्ण राजकीय व आर्थिक स्वातंत्र्यासह लेबाननचा परमोत्कर्ष व्हावा, अशी त्याची तळमळ होती. कार्यप्रवणता, प्रीती, स्वातंत्र्य आणि सौंदर्य यांविषयीची अनावर आसक्ती त्याच्या साहित्यात आढळते. त्याचा जीवनविषयक दृष्टिकोन मूलतः अध्यात्मप्रधान होता. कर्मकांडप्रधान धर्मसंस्थेवर त्याचा विश्वास नसला, तरी मानवताधर्माची व विश्वात्मक धर्मकल्पनेची निष्ठा त्याच्या ठिकाणी दिसून येते. मात्र यंत्रप्रधान औद्योगिक संस्कृतीविषयी त्याला अनास्थाच होती.
भारत देश, भारतीय संस्कृती आणि विचारपरंपरा यांबद्दल जिब्रानला असीम आदरभाव होता. ब्रह्म, बुद्ध, निर्वाण इत्यादींचे संदर्भ त्याच्या लेखनात आढळतात. आपल्या स्पिरिच्युअल सेइंग्जमध्ये ‘शुभाशुभविवेकशीलता हे भारतीयांचे वैशिष्ट्य होय’, असे म्हणून त्याने त्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.
संदर्भ : 1. Naimy, Mikhail, Kahlil Gibran, New York, 1950.
2. Otto, Annie S. The Parables of Kahlil Gibran, New York, 1963.
3. Young, Barbara, This Man from Lebanon, New York, 1945.
नईमुद्दीन, सैय्यद
“