अबु – अल् ‘अला’ – अलम ‘अर्री’ : (९७३-१०५७). अरबी कवी व तत्त्वज्ञ. सिरियातील अलेप्पोजवळील मा आर्रेत एल् नूमॅन या गावी त्याचा जन्म झाला. चार वर्षांचा असतानाच देवीच्या साथीत त्याला अंधत्व आले. अलेप्पो, ट्रिपोली इ. ठिकाणी शिक्षण घेऊन ९९३ मध्ये तो आपल्या गावी परत आला. तेथे पंधरा वर्षे त्याने अरबी साहित्य आणि भाषा यांवर व्याख्याने दिली. या काळात कवी व विचारवंत म्हणून त्याची कीर्ती पसरली. १००७ मध्ये तो बगदादला गेला. तेथे अनेक कवींशी व विद्वानांशी त्याचा परिचय झाला. दीड-दोन वर्षे तो तेथे होता. बगदाद येथील वास्तव्यात त्याची मते परिपक्व झाली. तो बुद्धिवादी व संशयवादी होता. त्याची जीवनविषयक दृष्टी निराशावादी होती. परंपरा, कर्मकांड व धर्मवेड यांस त्याच्या विचारसरणीत स्थान नव्हते. त्या काळाच्या मानाने त्याचे धार्मिक विचार फारच प्रगत होते. बगदादवरून तो स्वग्रामी परत आला आणि शेवटपर्यंत तेथेच राहिला. आईचा आजार आणि मृत्यु यांमुळे तो एकाकी व विरक्त बनला. तथापि तो शेवटपर्यंत लेखन व अध्यापन करीत होता.

सकतुल्‌जनद (सिक्त-अल्-ज्‍जंद) आणिलुजूमीयात हे त्याचे दोन कवितासंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत. सकतुल्‌जनदमध्ये त्याच्या बगदादला जाण्यापूर्वीच्या कविता असून, त्या पारंपारिक स्वरूपाच्या आहेत. तो अल्-मुतनब्बीचा अनुयायी होता. मुतनब्बीचा प्रभाव त्याच्या कवितांवर दिसून येतो. लुजूमीयात मध्ये बगदादहून परत आल्यानंतरच्या कविता असून त्या सर्वस्वी वेगळ्या आहेत. स्वतंत्र शैली, विचारांची परिपक्वता, गांभीर्य, निर्भयता, मानवतेचा पुरस्कार व निराशावाद हे विशेष त्यात दिसून येतात. त्याचे काही गद्य लेखनही अलीकडे उजेडात आले आहे.मुकताबात हा पत्रांचा संग्रहअल्-फुसूल वा ल्-घयात हे कुराणाच्या शैलीची नक्कलकरून लिहिलेले विडंबन आणि रिसालत अल्-घुफ्रान हा वाङ्मयीन टीकाग्रंथ यांचा त्यात अंतर्भाव होतो.रिसालत अल्-घुफ्रान हा ग्रंथ आगळ्या पद्धतीने लिहिलेला आहे. कवी स्वर्गात जाऊन तेथील कवींचे उपरोधपूर्ण शैलीत वर्णन करतो, अशी या ग्रंथाची पार्श्वभूमी आहे. अरबी साहित्यात एक श्रेष्ठ कवी व तत्त्वज्ञ  म्हणून अल्-म ‘अर्रीला मानाचे स्थान आहे.

सुर्वे, भा. ग.