मुडदी : (रेणवी). बोय, मांगण या माशांप्रमाणेच खाडीच्या तोंडाजवळ मचूळ पाण्यात सापडणारा हा मासा होय. याचे शास्त्रीय नाव सिलॅगो सिहमा असे आहे. ही जाती सिलॅजिनिडी या कुलात मोडते. या कुलातील माशांना इंग्रजीत सॅन्ड व्हायटिंग्ज किंवा लेडीफिश असेही म्हणतात. कोकण किनाऱ्यावर नगली अथवा रेणवी व मुंबईत टोकी या नावानेही हा ओळखला जातो. भारताच्या पूर्व किनाऱ्यावर व भारत ते चीन दरम्यानच्या समुद्रातही हा आढळतो. याच्या पाठीचा रंग फिकट हिरवा किंवा तपकिरी पिवळा असून तो पोटाकडे फिक्कट होतो. शरीराच्या कातड्यावर जांभळ्या रंगाची झाक दिसते.

मुडदी

या माशाची लांबी २८ ते ३० सेंमी. असते. याचे शरीर सडपातळ व लांबट असून डोके निमुळते असते. चिखलातील पॉलिकीट अळ्या व लहान झिंगे हे याचे भक्ष्य होय. कमी काटे व रूचकर मांस यांमुळे खाद्य मासा म्हणून हा प्रसिद्ध आहे. धोक्याची सूचना मिळताच हा रेती पोखरून आत लपून बसतो. बाळंत स्त्रीस अंगावरच्या दुधात जास्त वाढ होण्याच्या दृष्टीने ह्या माशाचा आहारात जास्त प्रमाणात उपयोग केला जातो. याचा विणीचा हंगाम पावसाळ्यात असतो व पिले ऑक्टोबरच्या सुमारास आढळतात. यांत नरांचे प्रमाण थोडे जास्त असते. भारताच्या पूर्व किनाऱ्यावर कोरोमंडलजवळ या माशांचे संवर्धन केंद्र आहे.

कुलकर्णी, चं. वि.