मुखवटे : मानवी चेहऱ्यावर चढविण्याचे विशिष्ट आवरण. मुखवट्यांचा वापर मनोरंजनार्थ तसेच संरक्षणासाठीही होतो. उदा., वायुमुखवटे. देवदेवतांचे, पशुपक्ष्यांचे, राक्षसांचे आणि अन्य विविध प्रकारचे मुखवटे करण्याची रीत असून त्यांचे क्षेत्र नृत्यनाट्यांपासून ते कारखानदारी व रणांगणापर्यंत विस्तारलेले आढळते.

मुखवट्यांचे प्रकार : मानवी चेहऱ्यांची प्रतिकृती असलेला हा मुखवटा म्हणजे माणसाचा मूळ चेहरा बदलून टाकणारे एक साधनच होय. संरक्षणात्यक मुखवटे सोडून अन्य क्षेत्रांतील मुखवट्यांचे त्यांच्या उपयुक्ततेवरून पुढील प्रकार करता येतात : (१) समारंभ-प्रसंगीचे, (२) नाट्य-प्रसंगीचे, (३) अंत्येष्टि-प्रसंगीचे व (४) सण-उत्सव-प्रसंगीचे.

यांपैकी उत्सव प्रसंगीच्या मुखवट्यांचा वापर प्रायः जगातील सर्वच आदिम जमातींमध्ये करण्याची प्रथा आहे. निसर्गावर ईश्वरी सत्ता असल्यामुळे त्या त्या देवतेचा मुखवटा धारण केला असता ती ती देवता प्रसन्न होते व आपल्यावरील आपत्ती टळते, अशी त्यांची धारणा असते. म्हणून ते लोक नृत्यप्रसंगी विशिष्ट देवतांचे मुखवटे धारण करतात. हे मुखवटे धारण करणाऱ्याला कोणी ओळखू शकत नाही कारण त्या धारकांच्या ठिकाणी ती देवताच संचारलेली आहे, असे प्रेक्षकांना वाटत असते. मुखवटा धारण करणारी व्यक्ती निधन पावली तर तिच्या जागी दुसरी व्यक्ती येते व ती तो मुखवटा धारण करते. उत्तर अमेरिका तसेच उत्तर-पश्चिम पॅसिफिक किनाऱ्यावरील इंडियन, गियाना, पश्चिम आफ्रिका, दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन खोरे व उत्तर-दक्षिण-पश्चिम अमेरिका इ. ठिकाणच्या आदिम जमातींत आजही मुखवटे धारण करण्याची प्रथा टिकून आहे. मुखवटे धारण करून हे लोक नृत्य करतात व आपल्या पितरांना तसेच ‘काचिनास’ नामक पर्जन्य आणि धान्य देणाऱ्या देवतेला ते संतुष्ट करतात.

नाट्यप्रसंगीच्या मुखवट्यांचा प्रादुर्भाव मुख्यतः ग्रीकांमध्ये झाला. तेथे प्राचीन काळी मुखवटे घालूनच धार्मिक समारंभ साजरा करण्यात येई. मुखवटाधारक गायक व नृत्यकार हे पुराणकथांतील व्यक्तिरेखा उत्कृष्टपणे उभ्या करून चेहऱ्यावरील रागद्वेषादी व प्रेमानंदादी भावभावनांचे वेधक प्रकटीकरण करीत असत त्यामुळे प्रेक्षकांना नाट्यानंदाचा उपभोग सढळपणे घेता येई. चिनी नाटकातूनही प्राचीन काळी मुखवट्यांचा वापर होई. त्यांच्या व्यक्तिरेखा उठावदार असत. भावभावनांच्या प्रदर्शनापेक्षा त्यांच्या मुखवट्यांवरील रंगकलापच विशेष कार्यभाग उरकवीत असे. उदा. लाल रंग हा सज्जनतेचे, तर पांढरा रंग दुष्टपणाचे प्रतीक मानली जाई. जपानमधील अशा नाट्यप्रकाराला ‘मात्सु’ म्हणत. तेथे ⇨ नो नाट्यामध्येही मुखवट्यांचा वापर करण्याची परंपरागत रूढी आहे.

अन्त्येष्टि-प्रसंगीच्या मुखवट्यांत प्रादेशिकता बरीच असते. प्राचीन ईजिप्त ममी (संरक्षित मृतदेहा) च्या तोंडावर मुखवटा बसविण्याची प्रथा होती. कधी कधी तर ममीच्या शवपेटीकेलाच मुखवट्याचा आकार देण्यात येई. मृतात्मा आपल्या शवाभोवती घुटमळत राहत असल्यामुळे त्या पेटीतील शवाची त्याला ओळख पटावी हा त्या मुखवट्यामागील हेतू. अजूनही मृत व्यक्तीसाठी मुखवटे करण्याची प्रथा अनेक देशांत दिसून येते. आयर्लंड (न्यू गिनीच्या उत्तरेस), आइसलँड इत्यादींचा या दृष्टीने निर्देश करता येईल. येथे मृताच्या तोंडवळासदृश मुखवटा धारण करून विशेष प्रसंगी नृत्यकार नृत्य करतात तर अलास्का येथे मृतांवर मुखवट्याच्या आच्छादनामुळे मृताचे भुताखेतापासून संरक्षण होते, असे मानतात. प्राचीन काळी पाश्चिमात्य जगात मृतांचे अवयव सुरक्षित राखण्यासाठीही मृतांवर मुखवटे चढविण्यात येत. हे मुखवटे मेण, धातू वा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा साचा तयार करून त्यावरून ढाळतात. या दृष्टीने लूट्‌व्हिख व्हान बेथोव्हन व नेपोलियन बोनापार्ट ही जगप्रसिद्ध उदाहरणे होत. पुढील काळात मात्र असे मुखवटे घराच्या ओटीवर ठेवून त्यांच्या शिरोभागी पर्णसंभारयुक्त डहाळ्यांचे आच्छादन करण्यात येई व नंतर त्यांची त्यानंतरच्या एखाद्या मृत व्यक्तीच्या शवाबरोबर मिरवणूक काढली जाई.

सणसंमारंभ-प्रसंगीच्या मुखवट्यांचा वापर अमेरिकेमधील अरियन जमातीत सुगीहंगामाच्या वेळी करतात. विशेषतः ‘मार्दी ग्रास’ या सणाच्या वेळी असे मुखवटे धारण करण्याची तेथे विशेष प्रथा दिसून येते. याशिवाय चीन व भारत येथेही ही प्रथा आढळून येते.

अलास्काचे एस्किमोही आपल्या धार्मिक नृत्य-प्रसंगी मुखवटे धारण करतात. त्या मुखवट्यांवरील भाव खिन्नतेचे असतात. वसंताचा चेतोहर लोकमानसात उद्‌भुत व्हावा हे या मागचे कारण. हे मुखवटे समुद्रात वाहत आलेल्या अतिदुर्मिळ लाकडांचे करीत असले, तरी दरवर्षी धार्मिक विधिसमाप्तीनंतर ते दग्ध करण्यात येतात. ‘कु क्लक्स क्लॅन’ (के के के) या अमेरिकेतील अतिरेकी ‘निग्रो-बेटिंग’ (निग्रो लोकांना ठार मारणाऱ्या संस्थे) चे सदस्य आपल्या पांढऱ्या शुभ्र पोशाखावर पांढराच मुखवटा धारण करतात. त्या मुखवट्याचा आकार वेगळ्याच प्रकारचा असतो. भारतातील अतिरेक्यांनीही हत्याकांडसमयी पंजाबमध्ये मुखवट्यांचा वापर केल्याचे पुरावे सापडले आहेत.


खोटे मुखवटे :‘आभासी चर्या’ (फॉल्स फेस) हादेखील एक मुखवट्याचाच प्रकार होय. उत्तर अमेरिकेतील ‘शामन’ नामक रोगनिवारकांच्या संस्थेचे सभासद अशा आभासी चर्येचा (खोट्या चेहऱ्याचा) वापर करून आजाऱ्यांचा रोग दूर करतात. ही आभासी चर्या मूलभूत अशा बारा प्रकारची असून ती लाकडाची केलेली असते. याला मुखवटे न म्हणता ‘चर्या’ म्हणण्याचे कारण असे की तो केवळ मुखवटा नसतो, तर त्यातून ‘शामन’ ला एका विशिष्ट दैवी व्यक्तीचा आभास होतो. शामन अशा चेहऱ्याचा वेध झाडांच्या बुंध्यात घेतो आणि मग तेथेच तो चेहरा कोरतो. नंतर त्या झाडातून तो वेगळा काढतो व त्याला प्रातःसमयी तांबड्या किंवा माध्यान्हसमयी काळ्या रंगाने तो रंगवितो. या ‘आभासी चर्या औषधोपचार संस्थे’ चे मूळ नाव ‘हांडिगोंसा शानो’ असे असून हे सर्व सभासद सामूहिकरित्याच रोगनिवारण-विधी पार पाडतात. त्यासाठी ते प्रथम आजाऱ्याच्या घराकडे चित्रविचित्र हातवारे करीत, ललकाऱ्या देत व अंगविक्षेप करीत जाऊ लागतात. तेथे पोहोचल्यावर मग हातातील राख आजाऱ्यावर उधळतात आणि त्याच वेळी ते कासवाच्या कवचीचा खडखडाट आणि तोंडाने मंत्रोच्चार करीत सुटतात.

ग्रामदेवतेचा पालखीतील पितळी मुखवटा, महाराष्ट्र.भारतीय मुखवटे : भारतातील मुखवट्यांचे खरेखुरे क्षेत्र म्हणजे परंपरागत लोकनाट्य. त्यासाठी बनविण्यात येणारे मुखवटे बहुधा लाकूड, कागदलगदा, पत्रा, भेंडलाकूड व कापड या जिनसांपासून तयार करतात. प्रायः पुराणकथांतील विविध व्यक्तिरेखा, उदा., उग्रस्वरूपी नरसिंह, अक्राळविक्राळ राक्षस, दशमुखी रावण, चित्रविचित्र भुतेखेते असे त्यांचे विषय असतात. यांखेरीज मानवी व्यक्ती व पशुपक्षी यांच्या मुखवट्यांचाही वापर उत्तर व मध्यप्रदेशांतील ⇨ रामलीला, बिहार व बंगालमधील छाऊ नृत्य-नाट्य, ओरिसातील शाहीयात्रा, केरळमधील ⇨ कथकळि नृत्य व कृष्णनाट्टकम्‌, काश्मीरमधील भांडपाथेर वगैरे लोकनाट्यांमधून करण्यात येतो. [⟶ नृत्य (भारतीय अभिजात नृत्य भारतीय लोकनृत्य)].

रावणाचा रंगीत लाकडी मुखवटा, जगन्नाथपुरी.

यांपैकी रामलीलेतील मुखवटे बरेच लोकप्रिय आहेत तथापि प्रदेशपरत्वे त्यांच्या बनावटीत वेगळेपणा असतो. स्थानिक वैशिष्ट्यांमुळे रामनगर व चित्रकूट या उत्तर प्रदेशातील गावांच्या मुखवट्यांची बनावट भिन्न वाटते. चित्रकूटच्या मुखवट्यांत जरीकामावर विशेष भर असतो. सपाट व एकाच पुठ्ठ्यावर तयार केलेल्या दशमुखी रावणाच्या मुखवट्यावर कटाक्षाने जरीकाम करण्यात येते. जिवणीच्या ठिकाणी एक आडवा चिरा देऊन मुखविवर, तर दोन चिरे देऊन डोळे व मुखातून दाहक ज्वाला बाहेर पडत असलेल्या दाखविण्यात येतात त्यामुळे तो मुखवटा भयानक वाटतो. दुर्गा व हनुमान यांचे मुखवटे त्यामानाने देखणे व वास्तवपूर्ण असून ते पितळी असतात. काश्मीरातील भांडपाथेर या खेळातील लाकडी मुखवट्यांची ढबच वेगळी असते. त्यांच्यातील वास्तवता प्राचीन ग्रीक मुखवट्यांची आठवण करून देते. जयपुरी मुखवटे कागदी लगद्यापासून बनवितात व त्यावर वेधक रंगरंगोटी करतात. त्यांचा वापर प्रायः लोकनाट्यासाठी होतो. विशेषतः विष्णुअवतारातील वराह, नृसिंह इत्यादींसाठी आणि गौण पात्रांसाठीही याच मुखवट्यांचा वापर करण्यात येतो. याशिवाय येथे विविध पशुपक्षी, प्रायः हत्ती, मोर, उंट, मगर इत्यादींचे मुखवटे बनवून ते उत्तमप्रकारे रंगविण्यात येतात. ओरिसातील मुखवटे लाकूड कोरून बनविण्यात येत असून त्यांना नंतर चकचकीत रंगलेपन करण्यात येते. कधीकधी त्यांवर ओरिसा शैलीतील मंदीर-शिल्पाचा प्रभाव दिसून येतो. या मुखवट्यांचा वापर बहुधा रामायणातील पात्रांसाठी होतो तर शाहीयात्रेसाठी वापरण्यात येणारे मुखवटे भेंडाचे लाकूड किंवा तत्सम वस्तूंपासून व काही मुखवटे साच्याच्या साहाय्याने कागदी लगद्यापासून बनविण्यात येतात. त्यांवरील रंगमेळ वेधक आणि आल्हाददायक असतो.

पश्चिम बंगालमधील पुरूलिया येथील छाऊ नाट्यातील मुखवट्यांच्या दर्शनाने तर महाकाव्यातील भावमाधुर्याचाच प्रत्यय येतो, इतके ते सरस व वेधक असतात. हे साधेसुधे मुखवटे कागदी लगद्यापासून तयार करण्यात येत असून त्यांवर मातीचा पातळसा थर देण्यात येतो व नंतर रंगलेपन करण्यात येते तर बिहारमधील सराईकेला (सिंगभूम जिल्ह्यात) येथील छाऊ नृत्यासाठीही मुखवट्यांचाच वापर करण्यात येतो. हे मुखवटे अतिप्राचीन अशा देवतांची प्रतिकेच असतात. त्यांची बनावट शैलीपूर्ण असून त्यांवरील रंगलेपन भित्तिचित्रसृश व नाजूक हाताने केलेले असते. त्यांवर प्रायः निळसर झाक दिलेली धनुष्याकृती भुवया. वैशिष्ट्यपूर्ण ओठ आणि भावदर्शक डोळे यांमुळे त्यांचे वेगळेपण चटकन डोळ्यात भरते. पूर्वी सराईकेला हे संस्थान असल्यामुळे तेथील राजाने छाऊनृत्य पथक परदेशात नेले होते. येथील आदिम जमातीतील लोक हे छाऊनृत्य करताना जे मुखवटे धारण करतात, ते सराईकेला या नदीकाठच्या आणि नदीपात्रातील काळ्या मातीपासून तयार करतात. ज्या व्यक्तिरेखेचा मुखवटा तयार करावयाचा असेल, त्याला अनुसरून प्रथम ते मातीचा नमुना तयार करतात व तो एका लहानशा लाकडी फळीवर बसवून वाळवितात. नंतर त्यावर मलमलसदृश पातळ कापडाचे आवरण चढवितात व मग दोन-तीन कागदी व कापडी आवरणे एकावर एक आळीपाळीने लावतात. शेवटी पुन्हा त्यावर मातीचा जाडसर थर देऊन तो पूर्ण करतात. त्यावर मग नाक, कान डोळे कोरून त्याला नीटनेटकेपणा आणतात. अशाप्रकारे मुखवटा पूर्ण झाला की त्यावर हवी ती भावमुद्रा उदा., देव, राक्षस इ. उमटविण्यासाठी रंगाचा वापर करतात. त्या त्या मुखवट्यावरील हे भावदर्शक वेधक व कलापूर्ण असते. इष्ट तोच भाव त्यावर उमटलेला असतो. सराईकेला प्रमाणेच बुंदू व तमार (ताणस) ही गावेदेखील या मुखवट्यांच्या उत्कृष्ट निर्मितीसाठी विख्यात आहेत. छाऊखेरीज अन्य नृत्यांसाठी या मुखवट्यांचा वापर करण्यात येतो. कधीकधी हौशी लोक शोभेसाठी राक्षसी मुखवटे घरात टांगून ठेवतात. त्यांची विक्री स्थानिक स्वरूपात तसेच इतरत्रही करण्यात येते.


बिहारमधील मुखवटे कागदलगद्यापासून तयार करण्यात येतात. व्यक्तिचित्रणाबरोबरच आकर्षक स्त्री-मुखडा, अलंकृत मुकुट, मत्स्याकार कर्णकुंडले, मोठ्या आकाराची वर्तुळाकार नथ ही त्याची वैशिष्ट्ये असली, तरी त्या सर्वांत त्यांच्या वक्राकार भुवया आणि नेत्र कडा शैलीपूर्ण वाटतात. वास्तविक हा चेहरा-मुखवटा संपूर्ण नसून सीमाचित्राच्या (प्रोफाईल) स्वरूपाचा असतो, तरी तो पूर्णत्वाची आभास निर्मिती उत्कृष्ट प्रकारे करू शकतो. बिहारमधील काही नृत्यांमध्ये अशा मुखवट्यांचा वापर अत्यावश्यक असतो त्यामुळे ते निर्माण करणारी व्यवसायिक कारागीर मंडळी असे मुखवटे पिढ्यानपिढ्या करीत असतात. जे लोक स्वतः नृत्य करीत असतात, तेही अशा मुखवट्यांची निर्मिती स्वतःच करीत असतात. हे मुखवटे प्रारंभी लाकडी असले, तरी उत्तरोत्तर त्यात सुधारणा होऊन ते वेळूचे (बांबूचे) आणि त्यानंतर ते भोपळ्याचेही बनविण्यात येऊ लागले. सांप्रत मात्र कागदी लगद्याचाच वापर त्यासाठी अधिक होत आहे.

छोटा नागपूर भागातील मुखवटानिर्मितीची तऱ्हा जरा अवघड असते. हे मुखवटे प्राथमिक स्वरूपाचे , ओबडधोबड आणि भयकारक वाटतात. त्यांवरील भावनांचे प्रदर्शन अतिशयोक्तीपूर्ण आणि तामसी वृत्तीचे असते.

हिमाचल प्रदेशातील मुखवट्यांवर बुद्ध पंथीयांचा प्रभाव बराच जाणवतो. तिबेटी राक्षसाचा मुखवटा हा त्याची उत्कृष्ट साक्ष आहे तथापि काही मुखवटे अतिशय साधे असतात. त्यांच्या डोक्यावर सूचक किरीट असून डोळे व मुखविवराच्या ठिकाणी केवळ खाचा खळगेच केलेले असतात त्यामुळे एकूण मुखवट्यांची ढब ग्रीक मुखवट्यांसारखी वाटते. काही मुखवट्यांवर लांबसडक रम्य केशकलाप असून प्रदीर्घ कर्ण, मोठे दात व शिंगे यांनी ते शृंगारलेले असतात. त्यांची ती शिंगे सामर्थ्याचे निदर्शक वाटतात.

केरळमधील कृष्णनाट्टम् या नृत्यनाट्यातील पात्रांचे मुखवटे मात्र पूर्वेकडील मुखवट्यांपेक्षा भिन्न धर्तीचे असतात. ते आकाराने मोठे व रंगीत असून त्या त्या पात्रांचे स्वभावदर्शन त्यांतून होईल अशीच त्यांची घडण असते. उदा.,यम (गुलिकन) इ. व्यक्तिरेखांचे मुखवटे.

महाराष्ट्रातील गौरीचा शाडूचा मुखवटा.महाराष्ट्रातील काही मंदिरांत देवीची संपूर्ण मूर्ती न बनविता केवळ मुखवटा बसविण्यात येतो. त्याला ‘तांदळा’ म्हणतात, हे बहुतेक दगडांचे केलेले असतात याशिवाय ठिकठिकाणच्या मंदिरांतील उत्सवप्रसंगी त्या त्या देवतांना घालावयाचे मुखवटे पितळ, रूपे, सोने इ. धातूंचे असतात तर गौरीगणपतीच्या वेळी वापरावयाचे गौरीचे मुखवटे प्रायः शाडूचे बनविलेले असतात. क्वचित पितळी वा कापडी मुखवट्यांचाही वापर करण्यात येतो तथापि राजस्थानचे खापरी मुखवटे आणि महाराष्ट्रातील शाडूचे मुखवटे अधिक वेधक असतात.

गोंड जमातीतील एक लाकडी मुखवटा, मध्य प्रदेश.आदिवासींचे मुखवटे : भारतातील आदिवासींमध्येही मुखवटे धारण करून सणसमारंभप्रसंगी नृत्य करण्याची प्रथा आहे. बहुधा गोंड, प्रधान, आगरिया, बैगा, कोंढ, भुईया व माडिया अशा मध्य प्रदेश, ओरिसा, बस्तर इ. ठिकाणच्या जमातींमध्ये ती विशेषत्वाने दिसून येते. या मुखवट्यांची बनावट सर्वसाधारणतः विशिष्ट प्रकारची असली, तरी प्रसंगानुरूप व प्रदेशपरत्वे त्यात बदल आढळून येतो, बहुधा त्यासाठी ते लाकूड, भोपळा वा शिंगे यांचा वापर करतात. दोन पितळी वर्तुळाकार कड्यांचे डोळे, मधमाशीच्या मेणाचे नाक, तांदळाच्या दाण्याचे दात, बोकड किंवा अस्वल त्यांच्या केसांची दाढी करून व डोक्यावर मोरपिसे खोचून हे मुखवटे बनविण्यात येतात. याशिवाय रानरेड्याच्या शिंगापासूनही मुखवटे तयार करण्याची पद्धत माडियांमध्ये आढळते. त्यांना लाल आणि काळ्या रंगाने रंगवून व अस्वलाच्या केसांची दाढी लावून शोभा आणतात आणि त्यांचा वापर ‘नाकता’ या नाट्यप्रसंगी करतात तर बैगा जमातीत मुलांच्या ‘छेरता’ नामक सणप्रसंगी मुखवट्यांचा वापर करण्याची चाल दिसून येते. गोंड व वैगा जमातींतील काही मुखवटे प्रायः लाकडी असून ते वजनी व बऱ्याच मोठ्या आकाराचे असतात. प्रथम हे लाकडी मुखवटे पांढऱ्या मातीने रंगवून सुकवितात व नंतर त्यांवर लाल व काळ्या रंगाच्या रेषा ते सुशोभित करतात दातांसाठी तांदळाच्या दाण्यांबरोबरच भोपळ्याच्या बिया, बारीक काड्या किंवा काचतुकडे यांचाही उपयोग करण्यात येतो तर दाढीसाठी बोकड वा अस्वल यांचे केस मेणाने चिकटतात आणि मिशा व डोक्यावरील केस मात्र रंगवितात. मध्य प्रदेशाच्या मंडला जिल्ह्यात मुखवट्यावर गाल व मस्तकाच्या ठिकाणी नाग, वाघ, सरपटणारे प्राणी तसेच पशुपक्षी चितारण्याची चाल आहे. यांखेरीज तुंब्याचेही मुखवटे करण्यात येत असून त्यांचा वापर गमतीदार नाट्यप्रसंगी होतो. उदा., ‘बायकोला बडविणारा नवरा’, ‘म्हातारीच्या बागेची चोरी’ इत्यादी. भुईंयांमध्ये शिकारीच्या वेळी तसेच चैत्र पौर्णिमेच्या समयी विविध नाट्यांतून मुखवटे वापरतात तर गोंडांमध्ये ते राक्षसांच्या पात्रांसाठी वापरण्यात येतात. रासलीलेच्या प्रसंगी श्रीकृष्णाला नामोहरम करणारा कंसाने पाठविलेला राक्षस, हे त्यातले मुख्य पात्र असून त्याने अक्राळविक्राळ मुखवटा धारण केलेला असतो. तो राक्षस स्वतःही गोपीसोबत फेर धरून नाचू लागतो. त्यावेळी श्रीकृष्ण त्याचे शिरच्छेदन करतो. तो तसाच परततो तेव्हा कंस दुसऱ्या राक्षसाला पाठवितो. असे अनेक राक्षस येतात आणि पराभूत होतात व त्यातूनच श्रीकृष्णाचे माहात्म्य प्रकट होते. या प्रसंगाची स्मृती म्हणून सांप्रतही लहान मुले असे मुखवटे धारण करून हा खेळ खेळत असतात.


 मुखवटानिर्मितीची कला : सर्वसाधारण मुखवट्यांची बनावट अनेक प्रकारची असते. साध्यासुध्या मुखवट्यापासून ते अत्यंत बेढब व क्रूर मुखवट्यांची निर्मिती कारागीर लोक करीत असतात. त्यासाठी नाना वस्तूंचा वापर करण्यात येत असला, तरी बहुधा लाकूड, धातू, शंखशिंपले, धागे, हस्तिदंत, माती, शाडू, शिंगे, शिळा, पिसे, चर्म, मृदुलोम (फर), कागद, चिंध्या, कापड व कणसावरील तूस वगैरेंचाही वापर होतो. कागदी मुखवटे तयार करताना प्रथम कागदाचे सहा ते सात थर एकावर एक असे एका लाकडी ठोकळ्यावर चिकटवितात. नंतर ते वाळले की त्यांच्या मागील बाजूस उभा चिरा देऊन ते त्या ठोकळ्यापासून अलग करतात आणि बाहेर काढून पुन्हा ते भाग परस्परांना चिकटवितात. नंतर माणसाच्या डोक्यात बसू शकेल अशा आकाराच्या एखाद्या टोपलीवर तो मुखवटा बसवितात. त्यानंतर माती व बारीक गवताचे तुकडे एकत्र कालवून आणि त्याचे नाक, कान, डोळे, ओठ बनवून ते पुन्हा त्या मुखवट्याला चिकटवतात आणि शेवटी त्यावर कागदाचे तुकडे चिटकवून रंगरंगोटी करतात. पाश्चात्यांच्या तुलनेने ब्रह्मदेशातील मुखवटे आकाराने जरा मोठेच असतात.

कागदी लगद्याचा सूर्य-मुखवटा, बिहार.

मुखवटानिर्मितीची कला ही एक कसाला लागणारी हस्तकला आहे. हस्तकौशल्यापेक्षा त्यात जिवंत व्यक्तिरेखानिर्मितीचे तंत्र अधिक सांभाळावे लागते. मुखवट्यांमधून विशिष्ट स्वभाववैशिष्ट्ये प्रकट व्हावी लागतात मग तो मुखवटा मानवी व्यक्तीचा असो की पशुपक्षांचा असो, त्यातून संबंधित व्यक्तिस्वभावाची अभिव्यक्ती होणे आवश्यक असते, किंबहुना तो मुखवटानिर्मितीमधील एक अतिमहत्त्वाचा भाग  ठरतो कारण मुखवट्यामुळेच ⇨ मूकनाट्यातील कथानकाला उठावा मिळतो आणि ते अर्थपूर्ण वाटते.

मुखवटा धारण करताना काही वेळा त्याबरोबर पोशाखही घालण्यात येतो. पोशाखामुळे मुखवटाधारकांचे संपूर्ण शरीर झाकले जाऊन त्याच्या व्यक्तिमत्त्वात हवा तो बदल घडून येण्यास साहाय्य होते.

एखाद्या रेखीव पशुपक्षात गोडवा आणावयाचा असेल, तर त्यात कला ओतावी लागते. उदा., मोराचे नर्तन त्याच्या पिसाऱ्यामुळे वेधक ठरते, तर शरीरात बाण घुसल्यामुळे अस्वस्थ झालेले हरीण आपले दुःख डोळ्यांभोवतीच्या सुरकुत्यांनी व्यक्त करीत असते. तसेच ऋतु-दिवसांच्या अवस्थाही मुखवट्यांच्या द्वारे उत्तम  रीतीने आविष्कृत करण्यात येतात. उदा., रात्रीचा आभास अर्धोन्मिलित पापण्यांनी व पेंगलेल्या मानवी चेहऱ्याने दर्शविता येतो.

नंदीचा ताम्र मुखवटा, द. भारत, १९ वे शतकप्राय : प्रत्येक मुखवटा हा मानवी चेहऱ्याचाच असला, तरी कधी कधी त्यात अन्य प्राण्यांच्या शरीराचाही वापर करण्यात येतो. उदा., मोर वा हंस. शरीर त्या त्या प्राण्याचे व चेहरा मात्र मानवी असेल, तर त्याच्या भावनाविष्काराला अधिक वाव मिळतो व त्याचा एकसंघ परिणामही घडून येतो.

छाऊ नृत्यात तर एकूण संपूर्ण वातावरणनिर्मिती करणारा व ते वातावरण टिकवून ठेवणारा  मुखवटा हाच एक केंद्रबिंदू असतो. निळसर झाक दिलेले हे मुखवटे मोठे आकर्षक व बोलके वाटतात. त्यांच्या त्या वक्राकार भुवया, ओठाची ठेवण आणि भावपूर्ण दृष्टी या प्रत्येकाचे एक वेगळेपण असते व त्यामुळेच वातावरणनिर्मितीला हे सर्व पोषक ठरते.

मुखवट्यांचा वापर जसा राक्षस व सैतानासारख्या पात्रांसाठी होतो, तसाच तो ब्रह्मदेवासारखा चतुर्मुख पात्राकरितादेखील करण्यात येतो. मात्र अशा मुखवट्यात गोडवा, मार्दव व सौंदर्य राखण्यात येते. काही मुखवटे मात्र बरेच गुंतागुंतीचे असतात. त्यांची बहुविध तोंडे दाखविण्यासाठी विविध रंगांचा वापर करण्यात येतो तर कधी विविधरंगी वक्राकार रेषांद्वारे एखाद्या राक्षसाच्या तोंडाचे आकार दर्शविण्यात येतात. उदा., मुरासुराची पाच तोंडे एकदा लाल-हिरव्या, तर दुसऱ्यांदा लाल-काळ्या रंगांनी दाखवितात. पूतना मावशीच्या मुखवट्यावर मात्र पूर्णतः काळा रंग फासून गालावर पांढऱ्या किंवा लाल रंगाचे ठिपके देतात त्यामुळे तो वैशिष्ट्यपूर्ण वाटतो.

पहा : मुखवटा-नृत्य रंगभूमि लोकनाट्य हस्तव्यवसाय. 

संदर्भ : 1. Chattopadhyay. Kamaladevi, Handicrafts of India. New Delhi, 1975.

             2. Dhamija. Jasleen, Indian Folk Arts and Crafts, New Delhi, 1970.

             3. Disselhoff, Hans Dietrich Linne, Sigvald, Ancient America, London, 1961.

             4. Elwin, Verrier, The Tribal Art of Middle India, London, 1951.

             5. Roy Chaudhury, P. C. Folklore of Bihar, New Delhi, 1976.

             6. Westerndorf, Wolfhart, Ancient Egypt, New York, 1968.

 


सेराइकेला छाऊ नृत्यातील मुखवटाधारी शिव, बिहार.                   

            ‘कृष्णनाट्ट्म’ नृत्यातील मुखवटाधारी पंचमुख मुरासुर, केरळ

श्रीगणेशाचा कागदलगद्याचा मुखवटा, मथुरा (उ.प्र.), २० वे शतक. हनुमंताचा परंपरागत पितळी मुखवटा, वाराणसी (उ.प्र.). कळसूत्री बाहुलीचा मुखवटा, आंध्र प्रदेश, २० वे शतक.
नाटकातील दानवाचा शंक्वाकृती मुखवटा, वाराणसी (उ.प्र.). ‘निमान काचिना’ या वासंतिक महोत्सवातील नृत्यमुखवटा, ॲरिझोना. जपानी नो नाटकातील रंगीत लाकडी मुखवटा, टोकिओ, १५वे शतक.