सूत्रधार, रंगमंचावरील : नाटकासंबंधी माहिती करुन देणारे प्रमुख पात्र वा नट, नाटकाध्यक्ष, निवेदक तसेच मंडळ, समाज, संघ इत्यादींचा चालक वा नेता असे अनेकविध अर्थ ‘सूत्रधार’ या संकल्पनेला प्राप्त झाले आहेत. पूर्वीच्या काळी रंगमंचावर ⇨ कळसूत्री बाहुल्यांचे  खेळ होत असत या खेळांत बाहुल्यांच्या हालचालींची सूत्रे वा दोऱ्या ज्याच्या हाती असत, त्याला सूत्रधार म्हटले जाई. हा सूत्रधार स्वत: अदृश्य राहून बाहुल्या रंगमंचावर जणू स्वयंप्रेरणेने हालचाली करीत आहेत, असे भासवत असे. कळसूत्री बाहुल्यांच्या खेळातील हा सूत्रधारच पुढे भारतीय नाटकांच्या रंगमंचावर अवतीर्ण झाला, असे म्हटले जाते. त्यावरुन नाट्यप्रयोगाची सारी सूत्रे ज्याच्या हातात असत, त्याला सूत्रधार म्हटले जाऊ लागले. सूत्रधार होण्यासाठी आकर्षक व्यक्तिमत्त्व, स्पष्टोच्चार, गायन, वादन, तालस्वरांचे ज्ञान इ. गुणवैशिष्ट्ये संबंधित व्यक्तीत असणे आवश्यक असे. सूत्रधार नाटकाची निवड, प्रयोगदिग्दर्शन, नाट्यप्रयोगातील पूर्वरंग, नांदीपठन इ. गोष्टी करीत असे. त्यामुळे नाट्यप्रयोगाची सारी सूत्रे त्याच्याच हातात असत. भरताच्या ⇨ नाट्यशास्त्रा नुसार नाट्यप्रयोग एखाद्या ठिकाणी करावयाचा ठरल्यानंतर नाट्यगृह उभारण्याकरता जागेची निवड करणे, अभिप्रेत असलेल्या प्रकारचे नाट्यगृह बांधणे, ही कामे सूत्रधार करीत असे, तसेच भूमी मोजण्याच्या वेळी आवश्यक असलेले सूत्र तोच हातात धरतो, म्हणून तो सूत्रधार होय. ⇨ नांदी  गाऊन प्रयोगसिद्घीचा मार्ग सुकर करण्याचे काम तसेच नांदीचे पठन करुन प्रेक्षकांच्या मनातनाटकाविषयी उत्कंठा निर्माण करण्याची जबाबदारी सूत्रधाराचीच असे. प्रयोग करीत असलेल्या नाटकाचा प्रस्ताव, प्रेक्षकांना आवाहन, नाटककाराची ओळख आणि नाट्यवस्तूची सूचना प्रेक्षकांना सूत्रधाराकरवी केली जाई. सूत्रधार व विदूषक यांच्या प्रश्नोत्तरांतून प्रेक्षकांना नाटकाचा परिचय होत असे.

संस्कृत नाटकात सूत्रधार हा प्रयोगाचा संचालक असे. धार्मिक विधिपूर्वक नेपथ्यातून नांदी झाल्यानंतर सूत्रधार आणि नटी प्रेक्षकांपुढे येऊन नाटकाच्या कथानकाचा प्रस्ताव करीत. या प्रस्तावात पुढील नाट्यप्रयोगाचे सूत्र ग्रथित झालेले असे. प्रस्तावातील वाक्य अथवा शब्द उचलून घेऊन नाटकातील एखादी भूमिका, एखादे पात्र त्याला अनुलक्षून स्वत:च्या संदर्भात नेपथ्यातून प्रतिसाद देई. सूत्रधार आणि नटी त्या आवाजाच्या विरुद्घ दिशेने नेपथ्यात निघून जात आणि ते पात्र रंगभूमीवर प्रवेश करुन प्रयोगाला प्रारंभ होई. सूत्रधार-परिपार्श्वक वा नटी-सूत्रधार यांच्या संवादाने नाटकाचा प्रारंभ करण्याचा संकेत तंजावरी नाट्यसृष्टीतही आढळतो.

संस्कृत नाटकातील सूत्रधाराची परंपरा आरंभीच्या काळातील मराठी नाटकांनीही उचललेली दिसून येते. १८५० ते १९२० या काळात लिहिल्या गेलेल्या बहुसंख्य मराठी नाटकांत सूत्रधाराची योजना झालेली दिसते. अण्णासाहेब किर्लोस्कर (संगीत शाकुंतल १८८० संगीत सौभद्र  १८८२) गो. ब. देवल (झुंजारराव, १८९० शारदा,१८९९ संशयकल्लोळ  १९१६) कृ. प. खाडिलकर (कीचकवध  १९०७ संगीत मानापमान, १९११) यांच्या बहुतेक सर्व नाटकांत सूत्रधाराकरवी नांदीगायन व नंतर सूत्रधार-नटी यांचा संवाद असा क्रम असल्याचे दिसून येते. राम गणेश गडकरी यांनी आपल्या नाटकांतून मात्र सूत्रधाराचा संकेत पाळला नाही. आधुनिक काळातील व्यंकटेश माडगूळकरांच्या पति गेले ग काठेवाडी  (१९७०) या नाटकात सूत्रधार हे पात्र आहे. विजय तेंडुलकरांच्या घाशीराम कोतवाल  (१९७३) या नाटकातील ब्राह्मणवृंद हा सूत्रधारच म्हणता येईल. हा सूत्रधार सत्ताधारी व सत्ताकांक्षी यांच्यातील स्वार्थी वृत्ती, त्यासाठी कोणाचाही बळी देताना मुलाहिजा न बाळगण्याचा त्यांचा बेगुमानपणा, रंगेल, विलासी व सत्तेचा वापर करणाऱ्यांमुळे होणारे समाजाचे, कुटुंबसंस्थेचे अधःपतन, स्त्रीकडे पाहण्याची वृत्ती, माणसांमधील विषयासक्ती, नीतिबधीरता, सूडबुद्घी इ. गोष्टी आपल्या निवेदनातून प्रेक्षकांपुढे आणतो.

सूत्रधाराचे वेगवेगळे रुपाविष्कार पारंपरिक रंगमंचावरही पहावयास मिळतात. उदा., भारुड सादर करत असताना भारुडी ते सरळ नुसते गाऊन दाखविण्याऐवजी पद्याचा भाव प्रेक्षकांच्या मनावर ठसवण्यासाठी, तसेच त्यात अधिक नाट्यपूर्ण रंग भरण्यासाठी मधूनमधून आपल्या शब्दांत त्याला पुष्टी देणारी वाक्ये म्हणतो. हाही एक प्रकारे सूत्र-कथनाचा भाग म्हणता येईल. उदा., ‘विंचू चावला वृश्चिक चावला । कामक्रोध विंचू चावला ।’ ही ओळ म्हटल्यावर लगेच ‘अहो, विंचू चावला म्हणता, पण हा विंचू कोण? कुठं चावला?’ म्हणत या ओळी-मागील गर्भितार्थ सूत्रधार कथन करतो. रंगमंचीय सादरीकरणाप्रमाणेच व्यासपीठावर सादर होणाऱ्या कोणत्याही समारंभाचे सूत्रसंचालन करणारी व्यक्ती हीदेखील सूत्रधार वा सूत्रसंचालक म्हणता येईल कारण संपूर्ण समारंभांतर्गत सादर होणाऱ्या कार्यक्रमांचा क्रम लावण्याचे व त्यानुसार ते सादर होत आहेत, हे पाहण्याचे, तसेच निवेदकाचे काम सूत्रधार करीत असतो.

पाटील, क्रांती


 भारतीय रंगभूमीवरील पारंपरिक सूत्रधाराशी, भूमिका व कार्य या दृष्टींनी मिळतीजुळती अशी सूत्रधाराची संकल्पना पाश्चात्त्य रंगभूमीवर प्राचीन काळापासून प्रचलित असल्याचे दिसून येते. प्राचीन ग्रीक नाटकांत गायकवृंद (कोरस) हा सूत्रधाराची भूमिका व विविध कार्ये पार पाडित असे. हा गायकवृंद नाट्यप्रयोगात प्रत्यक्ष भाग घेत असला, तरी नाटकातील प्रमुख व्यक्तिरेखांपासून तो वेगळा असे. मुखवटे लावलेल्या बारा ते पंधरा गायकांचा हा समूह वा वृंद रंगमंचावर आरंभापासून अखेरपर्यंत वावरत असे. एका अर्थी ‘वृंद’ वा कोरस हाच नाटकाचा सूत्रधार असे. त्याची भाषा काव्यात्म असे. नाटकातल्या व्यक्तिरेखांचा त्यांच्या पार्श्वभूमीसह परिचय करुन देणे, नाटकातील घटनाक्रमाची साखळी जोडणे व नाट्यगत घटनांचा अन्वयार्थ लावून त्यांवर चिंतनशील भाष्य करणे, नाटककाराचा प्रवक्ता बनून प्रेक्षकांशी थेट संवाद साधणे, तसेच प्रेक्षकांच्या भाव-भावनांचे प्रकटीकरण व प्रेक्षकवर्गाच्या सामूहिक जाणिवांचे प्रतिनिधित्व करणे, अशी अनेकविध कार्ये सूत्रधार ह्या नात्याने हा वृंद पार पाडत असे. ग्रीक रंगभूमीवरील वृंद व भारतीय रंगभूमीवरील सूत्रधार ह्यांतील महत्त्वाचा फरक गो. के. भट यांनी पुढीलप्रमाणे स्पष्ट केला आहे : ‘कोरसची योजना नाट्याच्या आरंभी आणि नाटकात महत्त्वाच्या प्रसंगांच्या आधी करण्याची प्रथा ग्रीक नाट्यात आहे. कोरसमधून नाटकीय घटनांवर, पात्रांच्या क्रिया व मनोगते यांवर भाष्य करण्याचा संकेत आहे. या भाष्याने घटनांचा तात्त्विक अर्थ समजायला मदत होते. संस्कृत नाटकांत असे सूचक भाष्य कुठे आले तर ते पात्रांच्या नाटकीय उद्‌गारातच असते. नाटक व नाटकीय पात्र यांच्याहून कोरस अलग आहे. एखाद्या तटस्थ जाणत्या निरीक्षकासारखा तो आहे’. याउलट संस्कृत रंगभूमीवरील सूत्रधार नाटकाचा –नाट्यप्रयोगाचाच – एक अविभाज्य भाग असल्यासारखा वावरतो व नाट्यप्रयोगात दुसरी एखादी स्वतंत्र भूमिकाही निभावतो. ‘जात्रा’ ह्या बंगाली लोकरंगभूमीवरील प्रकारात ‘विवेक’ हे पात्र कोरस व सूत्रधारअशा दोन्ही भूमिका पार पाडते.

पाश्चात्त्य रंगभूमीवर ‘वृंद’ हे पात्र पुढील काळातही अधूनमधून अवतरत राहिले. सूत्रधाराची भूमिका व कार्ये या ना त्या रुपात ते पार पाडत असल्याचेही दिसून येते. एलिझाबेथ युगात नाटकाचा उपोद्‌घात व उपसंहार करणे, कधीकधी प्रत्येक अंकापूर्वी प्रस्तावना करणे, अशी कामे वृंद हे पात्र करीत असे. मात्र ती समूह नसून एक व्यक्ती असे. नाटकावर भाष्य करणे, विषय, काळ व स्थळ यांविषयीची सूचना करणे, ही या वृंदाची कामे सूत्रधाराच्या भूमिकेशी जुळणारी होती. शेक्सपिअरच्या नाटकांतूनही असे वृंदात्म पात्र असते. घडणाऱ्या घटनांकडे तटस्थपणे पाहणारे व त्यावर भाष्य करणारे हे पात्र एका परीने सूत्रधाराचेच कार्य करते. एखाद्या समाजगटाचा अथवा सांस्कृतिक गटाचा दृष्टिकोण व्यक्त करणाऱ्या एका वा अधिक व्यक्तींनाही वृंदात्मक पात्र म्हटले जाते. सूत्रधाराची भाष्यकार ही भूमिका हे पात्र पार पाडते. उदा., घाशीराम कोतवाल  मधील ब्राह्मणवृंद.

पाश्चात्त्य रंगभूमीवरील सूत्रधाराची ही परंपरा काही प्रमाणात पुढील काळातही चालू राहिली. मात्र त्याची नावरुपे व कार्याचे स्वरुप काळाच्या ओघात बदलत गेले. अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत इंग्लंड, अमेरिकेत ‘नट-व्यवस्थापक पद्घती’ (ॲक्टर-मॅनेजर सिस्टिम) रुढ होती. हे नट-व्यवस्थापक नाट्यप्रयोगनिर्मितीची पडद्यावरील व पडद्यामागील सारी सूत्रे सांभाळत असत. इंग्लंड, अमेरिकेतील नाट्यनिर्मिती करणाऱ्या अनेक संस्था ह्या प्रमुख नटांनी स्थापन केलेल्या होत्या. हे नट रंगमंचावर नाटकातील पात्राची भूमिका तर पार पाडतच पण त्याशिवाय नाट्यप्रयोग निर्मितीमध्ये सूत्रधार म्हणून नाटकांची निवड करणे, त्यांतील प्रमुख भूमिका ठरवणे रंगमंचीय व्यवस्थापन, आर्थिक व्यवहारांचे नियंत्रण अशा अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या ते पार पाडत. थोडक्यात, हे नट-व्यवस्थापक नाट्यप्रयोगनिर्मितीचे सर्वांगीण सूत्रसंचालन करणारे सूत्रधारच असत. ह्या नट-व्यवस्थापक पद्घतीचे फायदे अठराव्या शतकापासूनच लक्षात येऊ लागले होते. कॉली सीबर (१६७१–१७५७) व ⇨ डेव्हिड गॅरिक (१७१७– ७९) ह्या अठराव्या शतकातील यशस्वी नट-व्यवस्थापकांनी नाट्यप्रयोगाची रंगमंचीय तांत्रिक साधनसुविधा व निर्मितिमूल्ये विकसित करुन नाट्यप्रयोगनिर्मितीचे मानदंड प्रस्थापित केले. एकोणिसाव्या शतकातील नट-व्यवस्थापकांमध्ये विल्यम चार्ल्स मक्‌रीडी (१७९३–१८७३), ⇨ सर हेन्री अर्व्हिंग  (१८७३–१९०५), मादाम व्हेस्ट्रीस (१७९७ –१८५६), सर हर्बर्ट बीअरबोम ट्री (१८५३–१९१७), डेव्हिड बेलास्को (१८५३–१९३१) हे श्रेष्ठ प्रतीचे नट-व्यवस्थापक वा नाट्यनिर्मितीचे सूत्रसंचालक होत. त्यांनी रंगमंचीय नेपथ्य, प्रकाशयोजना इ. तांत्रिक साधनसुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा घडवून आणल्या व नाट्यप्रयोगाची निर्मितिमूल्ये उच्चतम पातळीवर नेऊन ठेवली. शेक्सपिअरची नाटके ही या काळातली लोकप्रिय व प्रमुख अशी नाट्यप्रयोगाची साधनसामग्री होती. त्यामुळे शेक्सपिअरच्या नाटकांचे जास्तीत जास्त व वैविध्यपूर्ण प्रयोग या काळात झाले.

पाश्चात्त्य रंगभूमीवर या नट-व्यवस्थापकाची जागा पुढील काळात रंगमंच-व्यवस्थापकाने (स्टेज मॅनेजर) घेतली. नाट्यप्रयोगाची तांत्रिक स्वरुपाची व व्यवस्थापकीय सूत्रे सांभाळण्याचे काम तो करीत असे. अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना इ. विविध निर्मितिघटकांमध्ये यथायोग्य समन्वय साधून नाट्यप्रयोगाची प्रेक्षकाच्या दृष्टिकोणातून परिणामकारकता वाढवणे, हे नाट्यप्रयोगनिर्मितीचा सूत्रधार ह्या नात्याने त्याचे अंगीकृत कार्य होते. ह्यातूनच पुढे आधुनिक काळात नाट्यनिर्माता (प्रोड्यूसर), नाट्यदिग्दर्शक (डिरेक्टर) वा नाट्यव्यवस्थापक (रेझिसॉर) अशा संकल्पना रंगभूमीवर दृढमूल झाल्या. नंतरच्या काळात अधिक सर्जनशील नाट्यदिग्दर्शक (क्रिएटिव्ह डिरेक्टर) सूत्रधार या नात्याने पुढे आले व आपल्याला गवसलेला नाट्यसंहितेचा अर्थाविष्कार वा नवे आकलन (इंटरप्रिटेशन) प्रभावीपणे रंगमंचावर मांडण्यासाठी नाट्यप्रयोगनिर्मितीची सारी सूत्रे ते स्वतःच्या पद्घतीने हाताळू लागले.

आधुनिक काळात आकाशवाणी, दूरदर्शन यांसारख्या दृक्‌श्राव्य माध्यमांतील अनेक कार्यक्रमांमध्ये त्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करणारा सूत्रसंचालक (अँकर पर्सन) वा निवेदक (कॉम्पिअर) याची भूमिका महत्त्वाची ठरते. दूरदर्शनवरील चर्चा, परिसंवाद, प्रश्नोत्तरे-स्पर्धा, वास्तवदर्शी कार्यक्रम (रिॲलिटी शो), तसेच दर्शकांशी थेट संवाद साधणारे संभाषणात्मक कार्यक्रम (टॉक शो) ह्यांसारखे बौद्घिक स्वरुपाचे कार्यक्रम असोत, की नृत्य-गाण्यांचे कार्यक्रम वा स्पर्धा, कलावंतांच्या मुलाखती, विविधरंगी मनोरंजनाचे कार्यक्रम यांसारखी रंजनात्मक सादरीकरणे असोत त्यांमध्ये सूत्रसंचालकाची वा निवेदकाची भूमिका प्रमुख व कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी असते. कार्यक्रमात भाग घेणाऱ्या व्यक्तींची ओळख करुन देणे, कार्यक्रमात एकसूत्रीपणा व सुसंवादित्व राखणे, चर्चा-परिसंवादात्मक कार्यक्रमात आशय-विषयानुसार सुसूत्रता राखण्याच्या दृष्टीने चर्चा इतस्ततः स्वैर भरकटू नये, विस्कळित होऊ नये म्हणून त्यावर नियंत्रण राखणे, नवनवे मुद्दे उपस्थित करुन चर्चा-विषयाला गती देणे, प्रसंगी टीका- टिप्पणी व मार्मिक भाष्य करणे, तसेच रंजनात्मक कार्यक्रमांत मिस्किल, विनोदी, चुरचुरीत व हलकेफुलके निवेदन करुन कार्यक्रमाची रंगत वाढवणे, यांसारखी अनेकविध प्रकारची कार्ये व जबाबदाऱ्या सूत्रसंचालकाला वा निवेदकाला पार पाडाव्या लागतात. एका दृष्टीने अशा कार्यक्रमांची यशस्वीता सूत्रसंचालकाच्या वा निवेदकाच्या सादरीकरणावरच (पर्र्फॉर्मन्स) बव्हंशी अवलंबून असते, असे म्हणता येईल. सूत्रसंचालकाचे व्यक्तिमत्त्व प्रभावी, आकर्षक तसेच वाणी स्वच्छ, शुद्घ, ओघवती व आवाज भरदार, धीरगंभीर वा नादमधुर असेल, तर हे कार्यक्रम यशस्वी व लोकप्रिय करणे सहजसाध्य होते. दूरदर्शन व्यतिरिक्त अन्यत्र रंगमंचावर सादर होणाऱ्या विविधरंजन कार्यक्रमांतही (व्हरायटी शो) सूत्रसंचालक वा निवेदक यांची भूमिकाव कार्ये अशाच प्रकारची असतात. विविध समारंभांमध्ये सूत्रसंचालन व निवेदन करणारी व्यक्ती म्हणजे ‘समारंभ-अधिकारी’ (मास्टर ऑफ सेरिमनीज/एम्‌सी/Emcee) होय.

इनामदार, श्री. दे.