मुंडिगाक : अफगणिस्तानातील एक पुरातत्त्वीय अवशेषांचे स्थळ. ते आग्नेय अफगाणिस्तानात कंदाहारजवळ वसले असून अगदी छोट्या खेड्यापासून नगरापर्यंतच्या नागरी जीवनाची वाढ कशी होत गेली, याचा अद्वितीय पुरावा येथील उत्खननात मिळाला आहे. त्यामुळे नागरीकरणाची प्रक्रिया आणि तिला कारणीभूत ठरणारे घटक स्पष्ट झाले. जे एम्. कासल या प्रख्यात पुरातत्त्वज्ञाने येथे १९५१ पासून संशोधन आणि उत्खनन केले.

उत्खननात एकूण चार सांस्कृतिक कालखंडांचा पुरावा उपलब्ध झाला. पहिल्या कालखंडाच्या पूर्वार्धात कुठल्याही बांधकामाचा पुरावा मिळाला नाही तथापि याच कालखंडाच्या उत्तरार्धात कच्च्या विटांच्या वास्तू, चाकावर घडविलेली व चित्रकाम असलेली मडकी, दगडाची भांडी, गारगोटीची पाती, हाडाचे कोरके व दगडी मणी प्रचलित असल्याचे आढळले. दुसऱ्या कालखंडात वस्तीची रचना योजनाबद्ध झाली. चांगल्या बांधणीची घरे, मातीच्या चुली, दगडी बाणाग्रे व ओबडधोबड मुद्रा वापरात आल्या, तरी मडकी मात्र हातबनावटीची आणि नक्षीविरहित अशी वापरात होती. यानंतरच्या तिसऱ्या कालखंडात अनेक घरांची बांधणी झाली. चाकावर घडविलेली आणि तांबड्या पृष्ठभागावर काळ्या रंगात चित्रण केलेली मडकी वापरात आली. दगडी पाती, दांड्यासाठी भोक असलेल्या कुऱ्हाडी व राप्या ब्राँझपासून बनविल्या जाऊ लागल्या. वशिंडयुक्त बैल आणि मातृदेवतेच्या मातीच्या मूर्ती बनविल्या गेल्या, त्याचप्रमाणे चपट्या दगडी मुद्रांचा वापर सुरू झाला. मुंडिगाकचा इराणशी संपर्क आला, असे या काळातील पुरावा सुचवितो. तिसऱ्या कालखंडाच्या उत्तरकालातील कार्बन -१४ कालमापन-पद्धतीने इ. स. पू. २३६० असा काल येतो. काहींच्या मते हा काळ इ. स. पू. २७५० एवढा धरण्यात येतो. चौथ्या कालखंडात पूर्णपणे नागरीकरण झाल्याचे दिसून आले. तटबंदी, बुरूज यांची बांधणी उन्हात वाळविलेल्या विटांची होती. प्रासाद, मंदिरे यांसारख्या वास्तूंची निर्मिती झाली. तांबड्या पृष्ठभागांवर काळ्यारंगात चित्रकाम (बैल, पिंपळपान इ.) केलेली विविध आकारांची मडकी हेही या कालाचे वैशिष्ट्य होय. त्याचप्रमाणे मातृदेवतेची पूजा मोठ्या प्रमाणावर येथे प्रचलित असावी.

मुंडिगाकचा पुरावा अनेक सांस्कृतिक संपर्क सुचवितो. पहिल्या कालखंडात किली गुल मुहम्मद व राणा धुंडाई (उत्तर बलुचिस्तान) आणि त्याही नंतर हडप्पा संस्कृतीशी संपर्क झाला, असे दिसते. सर्व वस्त्या इ. स. पू. तिसरे ते दुसरे सहस्त्रक या कालात मोडतात.

संदर्भ :Casal, J. M. The Mundigak, Paris, 1961.

देव, शां. भा.