चित्रपट पार्श्वगायक मुकेशमुकेश : (२६ जुलै १९२३–२८ ऑगस्ट १९७६). पूर्ण नाव मुकेशचंद माथूर. जन्म व शिक्षण दिल्ली येथे. १९३९ साली मॅट्रिक झाल्यानंतर काही दिवस दिल्लीच्या बांधकाम खात्यात नोकरी. योगायोगाने एकदा दिग्दर्शक हरिष यांनी दिल्लीला मुकेशचे गाणे ऐकले व त्या देखण्या व गाणाऱ्या तरुणाला त्यांनी लगेच मुंबईला बोलावून घेतले. मुकेशला पहिली भूमिका मिळाली ती निर्दोष (१९४१) या बोलपटात. दुखसुख (१९४२) आणि आदाब अर्ज (१९४३) या चित्रपटातही मुकेशने भूमिका केल्या. पुढे १९५१ साली मल्हार, १९५३ साली माषुका आणि १९५६ साली अनुराग हे तीन चित्रपट मुकेशने स्वतः निर्माण करून चित्रपटसृष्टीत पाय रोवण्याचा प्रयत्न केला परंतु नट म्हणून मुकेशचा पडद्यावर प्रभाव कधीच पडला नाही. दरम्यान मुकेशने आपला ‘उसना आवाज’ मूर्ती (१९४५) या चित्रपटाला प्रथमच दिला असला, तरी पार्श्वगायक म्हणून तो पहिली नजर (१९४५) या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आला. अनिल विश्वास यांनी स्वरबद्ध केलेले ‘दिल जलता है तो जलने दो’ हे त्यातील सैगल-शैलीचे गाणे प्रेक्षकांना विशेष आवडले. तेव्हापासून मुकेश चित्रपटसृष्टीत वावरला तो मुख्यतः पार्श्वगायक म्हणूनच. राजकपूर आणि मुकेश यांची दोस्तीही तेव्हापासूनच जडली. राज आणि मुकेश हे दोघेही त्यावेळी पंडित जगन्नाथ प्रसाद यांच्याकडे गाणे शिकायला जात असत. मुकेशने आपला ‘उसना आवाज’ मोतीलाल, दिलीपकुमार, करण दिवाण, भारतभूषण, देव आनंद, जयराज अशा कितीतरी ख्यातनाम अभिनेत्यांना दिला आहे तथापि मुकेश म्हटले की प्रेक्षकांच्या मनात प्रतिमा उभी राहते ती राजकपूरची. राजकपूरच्या नीलकमल (१९४७) या अगदी पहिल्या चित्रपटांपासून आणि आर्. के. स्टुडिओमधील राजकपूरच्या बव्हंशी चित्रपटांमध्ये राजला ‘उसना आवाज’ दिला आहे तो मुकेशनेच. अनिल विश्वास, नौशाद, एस्. डी. बर्मन, रोशन, गुलाम हैदर, खैयाम, लक्ष्मीकांत-प्यारेलाल अशा अनेक जुन्या नव्या संगीतकारांसाठी मुकेश गायला असला, तरी त्याला पहिल्या प्रतीचा पार्श्वगायक बनविण्यात शंकर-जयकिशन यांचा वाटा निर्विवाद मोठा आहे. आवारा (१९५१), अनाडी (१९५९) आणि पहेचान (१९७०) या चित्रपटांतील पार्श्वगायनाबद्दल मुकेशला ‘फिल्मफेअर’ पारितोषिक मिळाली होती. त्यांतील सर्व गाणी शंकर-जयकिशन यांनी स्वरबद्ध केली होती. हिंदीखेरीज मराठी, गुजराती, पंजाबी, बंगाली वगैरे भाषांतील गाणीही मुकेशने म्हटली आहेत. आपल्या ३० वर्षांच्या कारकीर्दीत मुकेशने ५०० पेक्षा अधिक बोलपटांत ७,००० च्यावर गीते गायली आहेत. मुकेशच्या आवाजात संत तुलसीदासकृत रामचरितमानसच्या ८ एल. पी. ध्वनीमुद्रिकाही निघाल्या आहेत. रजनीगंधा (१९७४) या चित्रपटातील पार्श्वगायनाबद्दल मुकेशला राष्ट्रीय पारितोषिक मिळाले होते. भावनेत भिजलेली करुणरसप्रधान गीते सरळ, सुबोध स्वरात म्हणणे हे मुकेशच्या गाण्याचे वैशिष्ट्य आहे. असा हा लोकप्रिय पार्श्वगायक ⇨ लता मंगेशकर यांच्याबरोबर गायनाच्या कार्यक्रमासाठी अमेरिकेत गेला असता हृदयविकाराने डिट्रॉइट येथे एकाएकी निधन पावला.

धारप, भा. वि.