मुंबई विद्यापीठ : भारतातील सर्वांत जुन्यांपैकी एक अग्रेसर विद्यापीठ. १८५७ च्या कायद्यानुसार मुंबई, कलकत्ता व मद्रास ही तीन विद्यापीठे स्थापन करण्यात आली. भारत सरकारने सर जॉन कॉलव्हिल यांच्या अध्यक्षतेखाली या विद्यापीठांसाठी एक समिती नेमली होती. १२ डिसेंबर १८५६ च्या भारत सरकारच्या ठरावान्वये या समितीच्या शिफारसी स्वीकारल्या गेल्या व या विद्यापीठांची विधेयके मध्यवर्ती कायदे मंडळाने मंजूर केली. १८ जुलै १८५७ रोजी मुंबई विद्यापीठांची स्थापना झाली. सर जॉन कॉलव्हिल यांच्या समितीने ज्या शिफारसी केल्या होत्या. त्या १८५४ साली चार्ल्‌स वुड याने भारतीय शिक्षणपद्धतीवर जो सर्वंकष अहवाल तयार केला होता व जो ब्रिटिश पार्लमेंटने स्वीकारला होता, त्यावर आधारित होत्या.

विद्यापीठाचे आरंभीचे स्वरूप, वेगवेगळे अभ्यासक्रम तयार करून परीक्षा घेणारी व पदवी देणारी संस्था, असे होते. त्यावेळचे मुंबई राज्याचे गव्हर्नर हे विद्यापीठाचे कुलपती होते. मुंबई विद्यापीठाच्या कक्षेत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि सिंध यांचा समावेश होता. परंतु संलग्न महाविद्यालये केवळ चारपाचच होती. मुंबईचे पहिले गव्हर्नर लॉर्ड जॉन एल्फिन्स्टन हे मुंबई विद्यापीठाचे प्रथम कुलपती, तर मुंबई सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश सर विल्यम यार्डले हे पहिले कुलगूरू झाले. १८५७ च्या कायद्यानुसार कुलसचिवाची नेमणूक सिनेट फक्त दोन वर्षांसाठी करीत असे. १९०२ साली प्रथम फर्दुनजी दस्तुर या एल्फिन्स्टन महाविद्यालयातील गणिताच्या प्राध्यापकाची अर्धवेळ कुलसचिव म्हणून नेमणूक झाली. हे पद त्यांनी १९३० पर्यंत भूषविले. त्यानंतर एस्. आर्. डोंगरकेरी, टी. व्ही. चिदंबरन व का. स. कोलगे हे कायम स्वरूपाचे कुलसचिव होते. मुंबईमध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया घालणारे डॉ. जॉन विल्सन-ज्यांचे नाव एका महाविदयालयाला दिलेले आहे-ते मुंबई विद्यापीठाच्या सीनेटचे पहिले सभासद होते. १९४८ चा माध्यमिक शालान्त परीक्षा कायदा होईपर्यंत मॅट्रिकच्या परीक्षा घेण्याचे काम मुंबई विद्यापीठाकडे होते. मॅट्रिकचा निकाल कडक लागत असे. १८५९ साली पहिली मॅट्रिक्युलेशन परीक्षा झाली. त्यावेळी १३२ मुलांपैकी फक्त २२ मुलेच उत्तीर्ण झाली. पहिली प्रथम वर्ष (कला) परीक्षा १८८१ मध्ये झाली. त्यात पहिल्या मॅट्रिकच्या तुकडीतील १५ विद्यार्थी बसले होते. त्यांपैकी सातच उत्तीर्ण झाले. या सातांपैकी पहिल्या पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षात सहा विद्यार्थी बसले, त्यांपैकी चार उत्तीर्ण झाले. मुंबई विद्यापीठाचे ते पहिले चार पदवीधर असे : (१) महादेव गोविंद रानडे, (२) रामकृष्ण गोपाळ भांडारकर (दोघे प्रथम वर्ग), (३) बाळ मंगेश वागळे आणि (४) वामन आबाजी मोडक.

भारतीय विदयापीठ अधिनियम १९०४ मध्ये मंजूर होऊन विद्यापीठाचे स्वरूप बदलेले. १९१३ सालापासून पदव्युत्तर शिक्षण देण्याचे कार्य सुरू झाले. महाविद्यालयासाठी लागणारी क्रमिक व अन्य पुस्तके तयार करणे ही कार्येही विद्यापीठाकडे आली. १९२८ च्या अधिनियमानुसार विद्यापीठाच्या सीनेटची पुनर्रचना अधिक प्रातिनिधिक स्वरूपाची झाली. पदव्युत्तर शिक्षण व संशोधन हे विद्यापीठाच्या कक्षेत आले व त्यानुसार संलग्न महाविद्यालयांतील अध्यापकांना विद्यापीठाचे अध्यापक म्हणून मान्यता देणे इ. तरतुदी करण्यात आल्या. पदवी पर्यंत शिक्षण संलग्न महाविद्यालयात व पदव्युत्तर शिक्षण विद्यापीठाच्या विभागांद्वारे देण्यास प्रारंभ झाला. यामुळे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

मुंबई विद्यापीठाच्या १९५३ च्या अधिनियमानुसार विद्यापीठाची पुनर्रचना झाल्याने सर्व संलग्न महाविद्यालये घटक-संस्था होऊन विद्यापीठाचे स्वरूप संघात्मक (फेडरल) झाले. संलग्न महाविद्यालये व मान्यताप्राप्त संशोधन संस्था यांमधील पदवीपूर्व व पदव्युत्तर शिक्षणावर नियंत्रण ठेवता येऊन त्यासंबंधी कार्यकारी मंडळात शिफारसी करता येतील, अशा शैक्षणिक विभागांची निर्मिती झाली. बहिःशाल शिक्षण, निरंतर शिक्षण, विद्यापीठ व्याख्यानमाला, विद्यापीठेतर शिक्षणक्रम, विद्यार्थी कल्याण केंद्र, पत्रद्वारा शिक्षण, पाठनिदेश पद्धती, आरोग्य केंद्र, माहिती संचालनालय, रोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र इत्यादींची विद्यापीठीय कार्यात भर पडली. संलग्न महाविद्यालये व मान्यताप्राप्त संस्था यांच्या कार्याची तपासणी करणे, अध्यापक व सेवक यांच्या कार्याची तपासणी करणे, अध्यापक व सेवक यांच्या नेमणुका करणे, त्यांच्या सेवेच्या शर्ती ठरविणे, पदव्युत्तर शिक्षणकेंद्रावर नियंत्रण ठेवणे या स्वरूपाचे अधिकारही विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळास प्राप्त झाले.

महाराष्ट्र शासनाने १९७४ मध्ये राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कार्यप्रणालीत एकसूत्रता आणण्यासाठी कायदा केला. यामुळे मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात वाढ झाली. मुंबई आणि उपनगरे यांखेरीज ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हे आणि केंद्रशासित गोवा प्रदेशातील सर्व महाविद्यालये मुंबई विद्यापीठाशी संलग्न झाली. अलीकडे विद्यापीठाची स्वायत्तता कमी होऊन कारभाराच्या सर्वच क्षेत्रांवर, विशेषतः आर्थिक क्षेत्रावर, शासनाचे नियंत्रण आले. विशेष अधिकाऱ्याची नेमणूक हे त्याचेच निदर्शक आहे.

पहिल्या १७ वर्षांच्या कालावधीत विद्यापीठाची स्वतःची इमारत नव्हती. विद्यापीठाची कचेरी टाउन हॉलमध्ये होती. सीनेटच्या बैठका व पदवीदान समारंभही तेथेच होत. १८६९ मध्ये कावसजी जहांगीर रेडीमनो यांनी विद्यापीठास इमारतीसाठी एक लक्ष रुपयांची देणगी दिली. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ विद्यापीठाच्या पदवीदान सभागृहास ‘सर कावसजी जहांगीर हॉल’ असे नाव देण्यात आले. १८६४ मध्ये प्रेमचंद रायचंद यांनीही दोन लक्ष रुपयांची देणगी ग्रंथालयासाठी दिली. काही काळानंतर प्रेमचंद यांनी आपल्या मातोश्री राजाबाई यांच्या स्मरणार्थ मनोरा (टॉवर) बांधण्यास आणखी २ लक्ष रुपये दिले. विद्यापीठाच्या वाढत्या कार्यक्षेत्रामुळे जुनी जागा अपुरी पडू लागली. व विद्यापीठाच्या काही विभागांचे काम सांताक्रूझ येथील ‘विद्यानगरी’ येथून सुरू झाले. सध्या विद्यापीठाच्या एकूण ३४ इमारती आहेत. चार इमारतींचे बांधकाम चालू आहे व १२ इमारती बांधावयाची योजना तयार आहे.


संगणक (३ वर्षांचा अभ्यासक्रम), मत्स्यसंवर्धन व व्यवस्थापन (३ वर्षांचा अभ्यासक्रम), औषधी व्यवस्थापन (दोन वर्षांचा अभ्यासक्रम) विषाणुशास्त्र (२ वर्षांचा अभ्यासक्रम) हे अभ्यासक्रम विद्यापीठात १९८४ पासून नव्याने सुरू करण्यात आले. ऑक्टोबर १९८५ पासून विद्यानगरी येथे विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय-शिक्षण संस्थेची स्थापना झाली.

विद्यापीठांत खालील प्रमुख मान्यवर व्यक्तींनी कुलगुरू म्हणून काम पाहिलेः डॉ. रा. गो. भांडारकर (सप्टेंबर १८९३–ऑक्टोंबर १८९५), न्यायमूर्ती नारायण गणेश चंदावरकर (जानेवारी १९०९–ऑगस्ट १९१२), न्यायमूर्ती एम्. सी. छगला (एप्रिल १९४७–नोव्हेंबर १९४७), न्यायमूर्ती एन्. एच्. भगवती (नोव्हेंबर १९४९– नोव्हेंबर १९५१), प्राचार्य टी.एम्. अडवानी (मार्च १९५७–मार्च १९६०), डॉ. व्ही.आर्. खानोलकर (मार्च १९६०–मार्च १९६३), डॉ. आर्. व्ही. साठे (मार्च १९६३–मार्च १९६६), डॉ. प्र. बा. गजेंद्रगडकर (मार्च १९६६–ऑक्टोंबर १९७१), डॉ. टी. के. टोपे (ऑक्टोंबर १९७१–जानेवारी १९७७), प्राचार्य राम जोशी (जून १९७७–मे १९८३), आणि डॉ.मा. स.गोरे (जून १९८३–मार्च १९८६). मे १९८६ पासून डॉ. मेहरू बंगाली ह्या विद्यापीठाच्या १२९ वर्षांच्या इतिहासातील पहिल्या महिला कुलगुरू म्हणून काम पहात आहेत.

न्यायमूर्ती रानडे, फिरोजशहा मेहता, गोपाळकृष्ण गोखले, दिनशा वाच्छा, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, काळकर्ते शि. म. परांजपे, स्वातंत्र्यवीर सावरकर, रा. गो. भांडारकर, बाळशास्त्री जांभेकर, केरुनाना छत्रे असे अनेक देशभक्त, विद्धान व संशोधक हे मुंबई विद्यापीठातून शिक्षण घेऊन बाहेर पडले होते.

विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष १६ जून ते १४ मार्च असे असून अध्ययन व अध्यापनाचे माध्यम इंग्रजी आहे. पण मराठी, गुजराती, हिंदी या भाषा माध्यमांतून उत्तरपत्रिका लिहिण्याची अनुमती आहे. कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, मानवशास्त्र, वैद्यक, तंत्रविद्या, दंतवैद्यक इं १४ विद्याशाखा १९७४ च्या अधिनियमानुसार विद्यापीठात प्रस्थापित होत आहेत. हल्ली कला, विज्ञान, वाणिज्य, विधी, वैद्यक, आयुर्वेद, दंतवैद्यक, ललितकला व अभियांत्रिकी (तांत्रिक) विद्याशाखा कार्यान्वित आहेत. एकूण ५७ अभ्यास मंडळे असून ७ हंगामी स्वरुपाची आहेत. तसेच १६ तात्पुरत्या अभ्यास समित्या इतर अभ्यासक्रमांसाठी नेमलेल्या आहेत.

अनुप्रयुक्त रसायनशास्त्र या विद्याशाखेतील संशोधन केंद्राने कापड धाग्याचे रेणवीय व उच्च दर्जाचे स्वरूप याविषयी संशोधन केले. विद्यापीठात १९८३–८४ मध्ये १,६२,४१० विद्यार्थी शिकत होते. त्यांपैकी ३१३ विद्यार्थी विदेशी होते. विद्यापीठात ३४ शैक्षणिक विभाग असून १६७ संलग्न महाविद्यालये व ७२ मान्यताप्राप्त संशोधन संस्था आहेत. विद्यापीठाचे ग्रंथालय समृद्ध असून ते दोन ठिकाणी विखूरलेले आहे. दोन्ही ग्रंथालयांत मिळून एकंदर ५,०५,६०८ ग्रंथ व १,६७३ नियतकालिके आहेत. विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची संख्या एकूण १,५६९ असून अध्यापकांची ३४९ आहे. विद्यापीठाचे उत्पन्न व खर्च अनुक्रमे १०·१५ कोटी रूपये व ९·२४ कोटी रूपये आहे (१९८३–८४).

संदर्भ :  1. Dongerkery, S. R. History of Bombay University, Bombay. 1957.

               2. Narullah, Syed Naik, J. P. A students History Of Education in India, Calcutta, 1962.

               3. Tikekar, Aroon, The Cloister’s Pale: A Biography of the University of Bombay, Bombay, 1984.

               4. University of Bombay, Annual Report, 1983-84, Bombay, 1985

पेठे, म. प. राजर्षि, ग. म.