म्हैसूर विद्यापीठ : कर्नाटक राज्यातील एक विद्यापीठ. स्थापना म्हैसूर येथे (१९१६). म्हैसूर येथील तत्कालीन महाराजा कॉलेज व बंगलोर येथील सेंट्रल कॉलेज ही मद्रास विद्यापीठाची केंद्रे होती. १९१३ व १९३९ साली विद्यापीठ अधिनियमांत केलेल्या दुरुस्त्यांनुसार या विद्यापीठाची अधिसभा अधिक प्रातिनिधिक करण्यात आली तसेच विद्यापीठीय बाबींना जबाबदार अशा विद्यापरिषदेची स्थापना करण्यात आली. १९५६ मधील अधिनियमानुसार विद्यापीठाला स्वायत्ततेचा दर्जा लाभला. कर्नाटक राज्याच्या विद्यापीठ अधिनियमानुसार (१९७५) या विद्यापीठाचा कारभार चालतो. १९८० साली मंगलोर विद्यापीठाची स्थापना करताना विद्यापीठाच्या या अधिनियमात पुन्हा दुरुस्ती करण्यात आली.
विद्यापीठाच्या कक्षेत म्हैसूर, मांड्य, हसन, चिकमंगळूर, शिमोगा, चितळदुर्ग या सहा जिल्ह्यांचा अंतर्भाव होतो. विद्यापीठाची ६ घटक महाविद्यालये, ११७ संलग्न महाविद्यालये व ३९ पदव्युत्तर विभाग आहेत. कला, विज्ञान, वाणिज्य, विधी, शिक्षण, वैद्यक, अभियांत्रिकी इ. विद्यापीठाच्या विद्याशाखा आहेत. विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष ५ जुलै ते ३१ मार्च असून ते तीन सत्रांत विभागले आहे. अध्यापनाचे माध्यम कन्नड व इंग्रजी आहे.
अभियांत्रिकी व बी. एड्. या विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात अंतर्गत गुणांकन केले जाते. बी. एड्. तसेच बी. ई., एम्. ई. आणि एम्. एस्सी. (अन्नोद्योग तंत्रविद्या) या अभ्यासक्रमांत सत्र परीक्षा पद्धतीचा अवलंब केला जातो. प्रश्न पतपेढीची पद्धत विद्यापीठाने १९८३–८४ पासून सुरू केली आहे. विद्यापीठाची महाविद्यालयीन विकास समिती विविध महाविद्यालयांस भेट देऊन शैक्षणिक खंडाचे किंवा त्यांच्या अडीअडचणींचे निवारण करते. कन्नड भाषासहित्याच्या अभ्यासासाठी विद्यापीठात एक स्वतंत्र संख्या असून तीत संशोधन, पुस्तक-प्रकाशन, भाषांतर आदींचा विकासात्मक आढावा घेण्यात येतो. ‘प्रसरंग’ नावाचा विद्यापीठाचा विभाग विविध विषयांच्या विद्वानांनी लिहिलेली पुस्तके प्रकाशित करतो. विद्यापीठात स्वतंत्र संगणक केंद्र असून ते प्रशासन व संशोधन यांस मदत करते. पाठ्यक्रम व चर्चासत्रांचे आयोजन विद्यापीठात नियमितपणे केले जाते.
ग्रंथालयशास्त्र, भाषांतर (कन्नड-इंग्रजी), तौलनिक धर्माभ्यास, कृषियोजना, व्यवस्थापन, भारतीय साहित्य, लोकसाहित्य (प्राकृत, जैन धर्मशास्त्र), संगीत, फ्रेंच, जर्मन, रशियन भाषा इत्यादींचे एक वर्षाचे पदव्युत्तर अभ्यासक्रम आहेत. बी. ए. बी. कॉम्., एम्. ए. (कन्नड, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इंग्रजी, इतिहास) बी, एड्., बीजीएल्. ह्या पदव्या कन्नड, इंग्रजी ह्यांमधील पदविका व प्रमाणपत्र, वृत्तपत्रविद्या (प्रमाणपत्र परीक्षा) ह्यांसाठी विद्यापीठात पत्रद्वारा शिक्षणाची सोय आहे. विद्यापीठातील २५ महाविद्यालये प्रौढशिक्षणाचा व सायंकालीन शिक्षणाचा कार्यक्रम राबवितात. ‘कमवा व शिका’ ह्या तत्त्वावर विद्यार्थी कल्याण मंडळातर्फे विद्यार्थ्याना शिक्षण दिले जाते. आरोग्य केंद्रे, राष्ट्रीय सेवायोजना इ. योजनांद्वारा विद्यापीठ –कार्यक्रम राबविले जातात.
विद्यापीठाच्या ग्रंथालयात ५,१७,४७० ग्रंथ व २,१४५ नियतकालिके होती (१९८३–८४). ग्रंथालयाने गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी पुस्तक तारण सेवा उपलब्ध केली आहे. विद्यापीठात ७४,३६० विद्यार्थी व १८६ विदेशी विद्यार्थी होते (१९८३–८४). याच वर्षाचे विद्यापीठाचे उत्पन्न सु. ६·६ कोटी रु. व खर्च सु. ६·१५ कोटी रु. होता.
मिसार, म. व्यं.