बिहार विद्यापीठ : बिहार राज्यातील एक विद्यापीठ. या विद्यापीठाची मुझफरपूर येथे १९५२ साली स्थापना झाली. विद्यापीठाच्या अधिकार क्षेत्रात पाटणा महानगरपालिकेचे क्षेत्र वगळता बिहार राज्यातील सर्व भागांचा अंतर्भाव होतो. पुढे १९६० साली बिहार विद्यापीठ, मुझफरपुर रांची विद्यापीठ, रांची व भागलपूर विद्यापीठ, भागलपूर अशी तीन विद्यापीठे वेगळी करण्यात आली. बिहार विद्यापीठाच्या या नवीन अधिकारक्षेत्रात मुझफरपूर, सारन, गोपाळगंज, वैशाली, सीतामढी, सिवान, पूर्व चंपारण्य व पश्चिम चंपारण्य हे जिल्हे येतात. सध्या विद्यापीठाच्या अखत्यारीत १८ अध्यापन विभाग, २० घटक महाविद्यालये व ४० संलग्न महाविद्यालये आहेत. (१९७९-८०). काही महाविद्यालयांतून अद्यापही शालान्त परीक्षेनंतरचे दोन वर्षांचे इंटरमीजिएट अभ्यासक्रम चालतात.

कुलपती १९७२ च्या विद्यापीठ कायद्याप्रमाणे राज्यशासनाशी विचारविनिमय करून कुलगुरूची नेमणूक करतो. अधिसभा (सीनेट) ही साधारणपणे ३० सभासदांची असते. विधिसभेची मुदत तीन वर्षांची असते. कार्यकारिणीत १९ व विद्वतसभेत ४९ सभासद असतात. विद्वतसभा शैक्षणिक बाबींचे नियंत्रण करते. १९७२ च्या कायद्याप्रमाणे या सर्वच मंडळाच्या प्रख्यापनेविषयी कायद्यातील कलमे स्थगित करण्यात आली आहेत. आता राज्यशासन या मंडळातील सभासदांची नेमणूक करते.

या विद्यापीठात प्राच्यविद्येचे प्रथम व द्वितीय पदवीचे अभ्यासक्रम असतात. ‘आचार्य’ आणि ‘फीजल’ या पदव्या असणाऱ्यांनाच वरील पदव्या मिळू शकतात. कला, शास्त्र व वाणिज्य या विद्याशाखांत प्रथम पदवीपर्यंत हिंन्दी हे माध्यम असून इतर विषयांना व पदव्युत्तर स्तरावर इंग्रजी हे माध्यम आहे.

राज्यशासनाच्या अधिनियमान्वये १९६० साली या विद्यापीठाची पुनर्रचना करण्यात आल्यावर पदव्युत्तर शिक्षण व संशोधन विद्यापीठाने प्रत्यक्ष चालविलेल्या महाविद्यालयांतून होऊ लागले आणि पदवी परीक्षेपर्यंतचे शिक्षण संलग्न महाविद्यालयांतून चालू राहिले. १ एप्रिल १९७२ रोजी विद्यापीठाचे नियंत्रण व व्यवस्थापन राज्य शासनाकडे आले. विद्यापीठाचे स्वरूप अध्यापनात्मक व संलग्नक आहे. प्राकृत आणि जैन संशोधन संस्था, वैशाली (मुझफरपूर) ही विद्यापीठाच्या सहकार्याने कार्यरत आहे.

विद्यापीठाच्या कला, वाणिज्य, शिक्षण, अभियांत्रिकी, विधी, वैद्यक व विज्ञान ह्या विद्याशाखा आहेत. पदव्युत्तर शिक्षण व संशोधन यांसाठी विद्यापीठातील सर्व प्रमुख विभागांतून सोयी उपलब्ध आहेत. विद्यापीठाने कला, वाणिज्य व विज्ञान या तीन विद्याशाखांत पाठनिर्देशनाची खास तरतूद केली आहे.

विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष १ जून ते ३१ मे असे असून त्यात २७ जून ते २७ सप्टेंबर, ३० ऑक्टोबर ते २३ डिसेंबर व २ जानेवारी ते ३१ मे अशी तीन सत्रे असतात. विद्यापीठात ३८,३०० विद्यार्थी आहेत (१९७९-८०). कला व विज्ञान शाखांतर्गत संशोधन-विद्यावेतन देण्याची तरतूद आहे. बिहार राज्यातील कोणत्याही विद्यार्थ्यांना परीक्षेस बहिःस्थ विद्यार्थी म्हणून बसण्याची विद्यापीठात सोय आहे.

विद्यापीठाचे आरोग्य केंद्र असून विद्यार्थ्यांना तसेच विद्यापीठीय कर्मचाऱ्यांना त्यामार्फत मोफत आरोग्यसल्ला व सेवा-सवलती उपलब्ध करून दिल्या जातात. विद्यापीठाच्या प्रत्येक घटक व संलग्न महाविद्यालयांत सुसज्ज व्यायामशाळांची सोय आहे. विद्यापीठाच्या आवारातच विद्यार्थ्यांची तीन वसतिगृहे आहेत त्यांपैकी दोन मुलांचे व एक मुलींचे आहे. विद्यापीठाच्या ग्रंथालयात ७७,६०० ग्रंथ आहेत (१९७९-८०). विद्यापीठाचे वार्षिक उत्पन्न ६.३५ कोटी रु. व खर्च ६.४१ कोटी रु. होत (१९७९-८०).

मिसार, म. व्यं.