सोलापूर विद्यापीठ : महाराष्ट्रातील एक विद्यापीठ. हे विद्यापीठ स्थापण्यामागे ग्रामीण भागातील जास्तीत जास्त मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देऊन वैश्विक घडामोडींविषयी जाणीव करून देण्याचा शासनाचा उद्देश होता. त्याची स्थापना महाराष्ट्र राज्य शासकीय अधिनियम यू.एस्.जी. १००४ (९४/२००४) यान्वये १ ऑगस्ट २००४ रोजी सोलापूर येथे झाली. तत्पूर्वी १९८४ पासून शिवाजी विद्यापीठाचे येथे पदव्युत्तर अध्ययन केंद्र होते. ह्याच्या कार्यक्षेत्रात सोलापूर जिल्ह्यातील महाविद्यालये अंतर्भूत होतात. विद्यापीठाकडे उपलब्ध असलेल्या सु. २०७ हे. जमिनीचे तीन भागांत विभाजन करण्यात आले असून ह्यावर प्रत्येक प्रशालेसाठी स्वतंत्र पायाभूत सुविधा निर्माण केलेल्या आहेत. या परिसरात विद्यापीठाच्या भौतिकी, रसायनशास्त्र, अनुप्रयुक्त रसायनशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, भूविज्ञान, संगणकशास्त्र, प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती आणि पुरातत्त्वविद्या अशा सात पदव्युत्तर अध्यापनाच्या विद्याशाखा (फॅकल्टीज) असून मास्टर इन कम्प्यूटर सायन्स, एम्.फिल् व पीएच्.डी. या पदव्यांच्या अध्यापनाची-मार्गदर्शनाची सोय आहे. विद्यापीठाद्वारे सोलापूर शहर व जिल्ह्यातील संशोधक आणि उद्योजकांना प्रयोग किंवा चाचण्या करण्यासाठी इन्स्ट्रूमेन्टेशन केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. तसेच अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थ्यांसाठी बीएआरटीआय् (पुणे) या संस्थेने दिलेल्या वित्तीय साहाय्याच्या आधारे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्या परीक्षांना बसणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी साधन सिद्धता वर्ग (कोचिंग क्लासेस) सुरू केलेले आहेत. विद्यापीठाने प्रशाला पद्धती (स्कूल सिस्टिम) या संकल्पनेबरोबरच श्रेयांक पद्धती (क्रेडिट सिस्टिम) सुरू केली असून ती विद्यापीठातील १८ विभाग व ७ प्रशाला अंतर्गत कार्यवाहीत आणण्यात येते. विद्यापीठाचे मूलभूत स्वरूप संलग्नक असून जिल्ह्यातील व शहरा-तील एकूण १२४ महाविद्यालये त्यास संलग्न आहेत. या सर्व महा-विद्यालयांतून सु. ८०,००० मुलेमुली अध्ययन करीत होती (२०११). सोलापूर विद्यापीठाने अल्पावधीत शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी केली असून विद्यापीठास वृक्षारोपण, मृदा व पाणी संवर्धन-साठवण आणि कार्बन श्रेयांकासाठी अनेक हरित पुरस्कार मिळाले आहेत.

देशपांडे, सु. र.