सौराष्ट्र विद्यापीठ : गुजरात राज्यातील एक विद्यापीठ. सौराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९६५ अन्वये डिसें. १९६५ मध्ये स्थापना. मुख्यालय राजकोट येथे. विद्यापीठाचे स्वरूप अध्यापनात्मक आणि संलग्नक असून अमरेली, जामनगर, जुनागढ, पोरबंदर, राजकोट, सुरेंद्रनगर, वडोदरा या जिल्ह्यातील महाविद्यालये त्याच्या कक्षेत येतात. येथे आजमितीस २८ विद्याशाखा असून ३२० महाविद्यालये त्यास संलग्नित आहेत. गुजरात राज्याचे राज्यपाल या विद्यापीठाचे कुलपती असतात. कुलगुरू हा विद्यापीठाचा सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी असतो. विद्वत परिषद, परीक्षा मंडळ, क्रिडा मंडळ, सामान्य प्रशासन विभाग विद्यापरिषद हे विभाग विद्यापीठातील दैनंदिन कार्याचे संचलन करतात. वृत्तपत्रविद्या, जैवरसायन, जीवशास्त्र, व्यवसाय प्रबंधन, रसायनशास्त्र, वाणिज्य, संगणकशास्त्र, अर्थशास्त्र, शिक्षण, विजतंत्री, भौतिकी, मानसशास्त्र, औषधीनिर्माणशास्त्र, इंग्रजी आणि तुलनात्मक साहित्य, गुजराती, हिंदी, ग्रंथालय व माहितीशास्त्र, कायदा, गणित, तत्त्वज्ञान, संस्कृत, सामाजिक कार्य, समाजशास्त्र, संख्याशास्त्र, गृहविज्ञान, शारिरिक शिक्षण या विद्याशाखांतर्गत येथे अध्यापनाची सुविधा उपलब्ध आहे. विद्यापीठाच्या केंद्रीय ग्रंथालयात १,६०,००० पुस्तके उपलब्ध असून अनेक नियतकालिके तेथे नियमित येतात.
भटकर, जगतानंद