लहान भारतीय मुंगूसमुंगूस : सस्तन मांसाहारी प्राण्यांच्या व्हायव्हेरिडी कुलातील हर्पेस्टिनी उपकुलात मुंगसांचा समावेश होतो. मुंगसांच्या बऱ्याच जाती आफ्रिकेतील उष्ण कटिबंधी प्रदेशात आढळतात. यांतील हर्पेस्टिस ही प्रजाती स्पेन व दक्षिण आशियात पसरली आहे. हिच्या सहा जाती भारतात आढळतात. ह. एडवर्डसी हे सामान्य मुंगूस व ह. ऑरोपंक्टॅटस हे लहान भारतीय मुंगूस भारतात सर्वत्र आढळते. हे प्राणी आकाराने लहान असून स्वतः तयार केलेल्या बिळात राहतात. आकाराने जरी लहान असले, तरी ते आपल्यापेक्षा कितीतरी पटींनी मोठ्या असलेल्या प्राण्यांवर हल्ला करतात. हे स्वभावाने हिंस्त्र आहेत. याचे मुस्कट निमुळते, कान लहान, पाय आखूड व शेपूट लांब असते. याचे केस कबरे असून त्यांचा रंग धूसर-तपकिरी असतो. मुंगूस खवळले म्हणजे त्याचे केस उभे राहतात व या अवस्थेत ते असेल त्यापेक्षा आकाराने मोठे दिसते याचे भक्ष्य लहान सस्तन प्राणी, उंदीर, पक्षी व त्यांची अंडी, साप, विंचू, बेडूक व कीटक हे असते. कधीकधी कंदमुळे व फळे यांवरही ते आपला निर्वाह करते. ते जरी शाकाहारी अन्न घेत असले, तरी मांसाहार त्यांना जास्त प्रिय आहे. त्यांचे दात मांसाचे तुकडे करण्यास व मांस खाण्यास जास्त सोयीस्कर आहेत. मुंगूस चपळ, सावधान व धीट असा प्राणी आहे. बहुधा तो आपले भक्ष्य पाठलाग करून जमिनीवर पकडतो. भक्ष्यावर उघड उघड हल्ला करताना जर भक्ष्य बिळात जाऊन लपले, तर आपल्या तीक्ष्ण नखाने बीळ उकरून तो शोधून काढतो. यांचे कान लहान असून ते बंद करता येतात त्यामुळे माती उकरताना कानात माती किंवा इतर कचरा जात नाही. अंड्यास भोक पाडून आतील बलक तो तोंडाने शोषून घेतो. सर्प हे त्याचे आवडते भक्ष्य होय. नागासारखे भयंकर विषारी सर्पही तो अत्यंत चपळाईने पकडतो. सापाचे किंवा नागाचे डोके तोंडात धरून चटकन त्याची कवटी फोडून त्याला मारणे व असे करताना सापाचा विषारी दात आपणास लागणारा नाही याची दक्षता तो घेतो. सापाचे विष मुंगसास घातक नसते, ही समजूत निराधार आहे. सापाचे विष मुंगुसास भिनले, तर मुंगुस एका विशिष्ट प्रकारच्या (मुंगूसवेल) झाडाची मुळे खाते व यामुळे या विषाचा काही परिणाम होत नाही, अशीही एक समजूत आहे. मुंगसाच्या जिभेची पृष्ठभाग खडबडीत असतो व यात सापाच्या विषावर तोडगा असतो, अशी ब्रह्मदेशात समजूत आहे. फार तर एवढे म्हणता येईल की, काही डुकरे व मांजरे या प्राण्यांप्रमाणे मुंगूसही सर्पविषाबाबत कमी संवेदनाक्षम आहे. मुंगसाचे तोंड पहाणे शुभ असते, असाही एक समज आहे. जमेका व मार्तीनीक या प्रदेशांत व्हापर जातीच्या सापांचा नाश करण्याकरिता साप मारण्यात पटाईत असे ह. आरोपंक्टॅटस या जातीचे मुंगूस सोडले. तेथे या मुंगसाने सापाचा तर नाश केलाच पण कोंबड्यांवरही हल्ला केला. तेव्हा त्यांची संख्या कमी करण्याचे उपाय योजावे लागले. वर निर्देश केलेल्या दोन जातींव्यतिरिक्त आणखी चार जाती भारतात आढळतात.

ह. एडवर्डसी या जातीचे मुंगुस सर्वत्र आढळते. गावाजवळील उघडी मैदाने, जंगले तसेच घराची छप्परे व आच्छादिलेली उथळ गटारे यांतही हे आढळतात. यांच्या पाठीवर एकाआड एक असे गडद व फिकट रंगाचे पट्टे असतात. ह. स्मिथी हे मुंगूस आकाराने मोठे व वर्णाने लालसर असते. ह. आरोपंक्टॅटस हे आकाराने लहान असलेले मुंगूस साप मारण्यात पटाईत आहे. हे सर्व भारत, अफगाणिस्तान, बलुचिस्तान व इराण येथे आढळते. ह. फ्युस्कस या जातीच्या मुंगसाचा रंग तपकिरी असतो. हे दक्षिण भारतातील पर्वत रांगांत ९०० ते १,८५० मी. उंचीवर आढळते. ह. व्हीटिकोलीस हे आकाराने मोठे मुंगूस आहे. याच्या गळ्याच्या बाजूस कानांपासून खाद्यांपर्यंत काळे पट्टे असतात. हे जंगलात आढळते. याच्या गुदद्वाराजवळ गंध ग्रंथी असतात. भारतात सह्याद्रीच्या रांगांत याची वस्ती आहे. ह. युर्‌व्हा हे खेकडे खाणारे मुंगुस आहे. ब्रह्मदेश, चीन, मलाया व आसाम येथे सु. १,९८० मी. उंचीपर्यंत याची वस्ती आहे. हे मुंगूस पोहू शकते.

गुदद्वाराजवळील दुर्गंध सोडणाऱ्या ग्रंथीचा उपयोग फक्त ह. व्हीटिकोलीसह. युर्‌व्हा या दोन जातींतील मुंगूस समूहातील इतर मुंगसांस संदेश देण्याकरिता करतात. मुंगूस बिळे करून समूहाने त्यात राहतात. मनुष्यवस्तीजवळ राहणाऱ्या दोन जातींत विणीचा असा ठराविक हंगाम नाही. मादीला प्रत्येक वेळी दोन किंवा तीन पिले होतात. जंगलात ही पिले बिळांत तर मनुष्यवस्तीत छपराच्या सांदीफटींत ठेवली जातात. पिलांचे संरक्षण मादी करते. सुमारे सात महिन्यांत त्यांची लैंगिक वाढ पूर्ण होते व ती स्वतंत्र जीवन जगू लागतात. प्राणीसंग्रहालयात ठेवलेल्या मुंगसाचे आयुष्य ७ ते १३ वर्षांपर्यंत असलेले आढळले आहे.

आकाराने सर्वांत मोठे (एकूण लांबी सु. १·५ मी.) ईजिप्शियन मुंगूस (ह. इक्न्युमॉन) हे आफ्रिका व यूरोपात आढळते, तर कमकुवत दाताचे व वाळवी खाणारे पांढऱ्या शेपटीचे मुंगूस (इक्न्युमिया अल्बीकौडा), दलदलीतील बेडकांसारख्या प्राण्यांवर उपजीविका करणारे मार्श मुगूंस (ॲटिलॅक्स पॅलुडिनोसस) व तांबूस रंगावर काळे पट्टे असणारे मुंगूस (मुंगुस मुंगुस) ही आफ्रिकेच्या पूर्व व पश्चिम भागांत आढळतात. मीरकॅट (सरिकेटा सरिकेट्टा) हे बसक्या नाकाचे मुंगूस एकाच बिळात खारीबरोबर गुण्यागोविंदाने राहते तसेच ते चटकन माणसाळतेही.

दातार, म. चिं. इनामदार, ना. भा.