अपपुष्टि : शरीरातील पूर्ण वाढ झालेल्या कोशिका (शरीरातील सूक्ष्म घटक). ऊतक (समान रचना व कार्य असणाऱ्‍या कोशिकांचा समुदाय) किंवा अवयव यांचा ऱ्हास होतो त्या अवस्थेला ‘अपपुष्टी’ म्हणतात. ही अवस्था म्हणजे अल्पविकसन म्हणजे किंवा ऊतकविनाशही नव्हे. अल्पविकसनात कोशिकांची वाढच पूर्ण  झालेली नसते व  ऊतकविनाशात रोगामुळे कोशिकांचा नाश झालेला असतो व त्यामुळे ऊतकाचा किंवा अवयवाचा आकार लहान होतो, हा ध्यानात घेण्यासारखा फरक असतो.

कारणे : अपपुष्टीची प्रमुख कारणे म्हणजे (१) वृद्धावस्था, (२) पोषणाचा अभाव, (३) चिरकारी (कायम स्वरूपाचा) कार्यनाश, (४) तंत्रिका (मज्जातंतू) तंत्रातील अवरोध व (५) अवयवावर पडणारा चिरकाल दाब, ही होत. रोगविषांमुळेही अपपुष्टी होत असावी.

वृद्धावस्थेत सर्वच इंद्रियांची अपपुष्टी होण्याची प्रवृत्ती असते. लसीकाभ (लसीके -सारख्या, → लसीका तंत्र) व अस्थिमज्जा (हाडांतील पोकळ्यांत असणारे संयोजी ऊतक) या ऊतकांत आणि स्त्रियांच्या गर्भाशय, अंडकोश (प्रजोत्पादक ग्रंथी), स्तन या अवयवांत ती विशेष दिसते.

पुष्कळ काळ उपवास घडल्यास वसा-ऊतक व स्नायु-ऊतक यांची अपपुष्टी होते. तसेच, शरीरातील एखादा अवयव काढून टाकावा लागल्यास त्या अवयावाकडे जाणाऱ्‍या तंत्रिकांच्या मेरुरज्जूच्या अग्रशृंगातील (पुढील शिंगासारख्या भागातील) कोशिकांची अपपुष्टी होते. एखाद्या ग्रंथीच्या स्राववाहिनीमध्ये रोध उत्पन्न झाल्यास जी ग्रंथीतील कोशिकांची अपपुष्टी झालेली दिसून येते ती याच प्रकारची असते.

विषद्रव्यांमुळे अपपुष्टी होते की नाही, हे निश्चित सांगता येत नाही. पण आंत्रज्वरासारख्या (टायफॉइडसारख्या) चिरकारी रोगांमध्ये रक्तातून रोगविषे जात असल्यामुळे अपपुष्टी होत असावी, असे मानतात.

अपपुष्टीच्या प्रकारांना कारणानुसारी नावे देण्यात येतात. वार्धक्य अपपुष्टी, चिरकारी-कार्यनाशजनित (फार काळ एखाद्या इंद्रियाचा वा अवयवाचा उपयोग न केल्यास होणारी) अपपुष्टी इ. ⇨बालपक्षाघातासारख्या रोगामुळे मेरुरज्जूच्या अग्रशृंगातील तंत्रिका-कोशिकांचा नाश झाल्यामुळे त्या तंत्रिकांतून ज्या स्नायूंना प्रेरणासंदेश मिळतात त्यांची अपपुष्टी होते व संबंध अवयवाचे संकोचन होते. ⇨रोहिणीविस्तार, अर्बुद (नवीन कोशिकांच्या वाढीमुळे निर्माण होणारी व शरीराला निरुपयोगी असणारी गाठ) वगैरे विकारांत त्यांचा दाब आजूबाजूच्या अवयवांवर पडल्यामुळे त्या अवयवांची अपपुष्टी होते. अस्थींसारख्या टणक ऊतकावरही असा दाब एकसारखा पडत राहिल्यास त्याचीही अपपुष्टी होते.

  

कापडी, रा. सी.