मुंगी : मुंग्या माश्यांप्रमाणे सर्वांना परिचित असून जगातील सर्व देशांत आढळतात. फार पुरातन कालापासून मानवाच्या सन्निध राहिलेल्या या कीटकाबद्दलचे उल्लेख वेदादी प्राचीन ग्रंथांतून आपणास आढळतात. मुंग्या बहुतकरून जमिनीतील वारुळात राहत असल्याने त्यांचा रोजचा जीवनक्रम समजण्यास फार कठीण जाते. तसेच त्या बहुतकरून जमावाने राहतात म्हणून शेकडो मुंग्यांत एकाच मुंगीवर नजर ठेवून तिच्या हालचालीवर लक्ष ठेवणेही अशक्य होते. ह्या दोन प्रमुख अडचणींमुळे यांच्या निरनिराळ्या सवयींचा तपशीलवार अभ्यास अद्याप व्हावयाचा आहे. त्यासंबंधी निरनिराळ्या शास्त्रज्ञांचे संशोधन चालू आहे. मुंगीच्या बाह्य व आंतररचनेसंबंधी बरीच माहिती प्रसिद्ध झाली आहे. मुंग्यांच्या अभ्यासाच्या शास्त्राला ‘पिपीलिकाविज्ञान’ (मर्मिकॉलॉजी) असे म्हणतात.
वर्गीकरण: मुंगी हा कीटक हायमेनॉप्टेरा या गणाच्या फॉर्मिसिडी या कुलातील आहे. हायमेनॉप्टेरा या गणात मधमाश्या, गांधील माश्या, भुंगे इ. कीटकांचा समावेश होतो. मुंग्या इतरांपेक्षा जास्त उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय, कार्यतत्पर व हुशार समजल्या जातात. फॉर्मिसिडी या कुलातील मुंग्या फॉर्मिसिनी, डोरिलिनी, पोनेरिनी, मर्मिसिनी इ. सात उपकुलांत वर्गीकृत केल्या आहेत. जगातील मुग्यांच्या सु. १०,००० जातींची नोंद झाली असून भारतातच जवळजवळ १,००० जातींच्या मुंग्या आहेत. प्रत्येक जातीच्या मुंग्यांच्या सवयी आणि वर्तनक्रम यांत बराच फरक दिसून येतो. मुंगळा म्हणजे एक प्रकारची मोठ्या आकारमानाची मुंगीच असून त्याचे शास्त्रीय नाव कँपोनोटस काँप्रेसस (फॉर्मिसिडी कुल) असे आहे. नेहमी घरात आढळणाऱ्या मुंगळ्यांची रांग ही कामकरी प्रकारची असे.
तीन कोटी वर्षांपूर्वी मुंग्या वसाहती करून राहत असत व त्यांच्या वसाहतीत सामाजिक जीवनही अस्तित्वात होते. त्यावेळी मानवाचा पृथ्वीवर उदयही झाला नव्हता. मुंग्यांच्या सामाजिक जीवनात निरनिराळ्या जाती अस्तित्वात आहेत. प्रत्येक जात एक विशिष्ट काम करते. त्यांच्या सामाजिक जीवनात व्यक्तीस स्थान नसते. त्यांच्या समाजात एक प्रकारची शेती करणाऱ्या, प्राणिसंवर्धन करणाऱ्या, लढणाऱ्या, गुलामगिरी करणाऱ्या, चोरी करणाऱ्या व भीक मागणाऱ्या अशा सर्व प्रकारच्या मुंग्या असतात. मुंग्यांच्या वर्तनाचा खूप अभ्यास झाला असला, तरी अजूनही पुष्कळ संशोधनाची गरज आहे.
मुंग्या जमिनीत वारुळे करून वसाहती स्थापन करतात. एका वसाहतीत जास्तीत जास्त ५ लाख मुंग्या असतात. त्याच्यात श्रमविभाजन दिसून येते. तसेच एका वसाहतीत चार प्रकारच्या मुंग्या आढळतात : (१) कामकरी मुंग्या, (२) शिपाई मुंग्या, (३) मादी अगर राणी मुंग्या व (४) नर मुंग्या.
(१)कामकरी मुंग्या: या आकारमानाने लहान व बिनपंखाच्या असतात. त्यांचे डोळे बारीक असतात. त्या सगळ्या माद्या असल्यातरी अंडी घालू शकत नाहीत. त्यांचे काम वारुळे स्वच्छ ठेवणे, वसाहतीमधले बांधकाम करणे, अन्न गोळा करणे व परिचारिकांप्रमाणे पिलांचे संगोपन करणे हे होय. एका वारुळात अनेक विविध आकारमानांच्या कामकरी मुंग्या असू शकतात.
(२) शिपाई मुंग्या : हा कामकरी मुंग्याचाच एक प्रकार आहे. या आकारमानाने थोड्या मोठ्या असून त्यांचे डोके बरेच मोठे असते. जबडे मजबूत व तीक्ष्ण असतात. यांचे काम वसाहतीतील इतर मुंग्यांचे शत्रूपासून संरक्षण करणे हे होय.
(३) मादी अगर राणी मुंग्या: या आकारमानाने बऱ्याच मोठ्या व पंखयुक्त असून यांचे काम फक्त अंडी घालणे व नवीन वसाहती स्थापन करणे हे होय.
(४) नर मुंग्या: या मादी मुंगीपेक्षा आकारमानाने लहान व नाजूक पंख असलेल्या मुंग्या असून त्या फक्त मैथुनासाठी असतात. मुंग्यांच्या वसाहतीत पिल्लांची काळजी घेणे हे नराचे किंवा राणीचे काम नसून कामकरी मुंगी ते करते.
बाह्यरचना : मुंगीचा रंग तांबडा, तपकिरी, काळा व विटकरी असतो. तिच्या शरीराची लांबी १ मिमी. ते ४० मिमी. पर्यंत असू शकते. तिचे शरीर गुळगुळीत असून त्याचे डोके, वक्ष (छाती) व उदर असे तीन भाग पडतात. डोके गोल अगर लांबट असते. डोक्याच्या दोन्ही बाजूंना मिशा किंवा संस्पर्शक (सांधेयुक्त लांब स्पर्शेंद्रिये ) असतात व त्यांचा आकार मनुष्याच्या हातासारखा असतो. मनुष्याच्या हातास खांद्यापासून कोपरापर्यंतचा एक भाग व कोपरापासून पुढे दुसरा भाग असे दोन भाग असतात, तसेच मुंग्यांच्या मिशांचेही दोन भाग असतात. मनुष्याचा हात कोपराच्या सांध्यामुळे जसा वाकविता येतो, तसाच मुंगीलाही आपल्या मिशा मधे वाकविता येतात. मिशांचा शेवटचा भाग एकसंधी नसून मण्यासारख्या छोट्या भागांचा झालेला असतो. मिशांच्या एकूण भागांची संख्या बारकाईने पाहिल्यास ४ ते १३ असल्याचे आढळून येते. मिशांचा उपयोग स्पर्शज्ञानासाठी होतो. डोक्यावर तीन साधे व दोन संयुक्त पैलूदार डोळे असतात [ → डोळा]. साधे डोळे डोक्याच्या वरच्या भागावर असतात, तर संयुक्त डोळे डोक्याच्या बाजूंना असतात. प्रत्येक संयुक्त डोळ्यास शेकडो पैलू (नेत्रिका) असतात. त्यांची संख्या नियमित नसते. मोठ्या आकारमानाच्या मुंग्यांना डोळ्यात जास्त पैलू असतात, तर लहान आकारमानाच्या मुंग्यांना कमी असतात.
पोनेरा कॉन्ट्रॅक्टा या जातीतील मुंगीच्या डोळ्याला ४ किंवा ५ पैलू असतात परंतु फॉर्मायका प्रॅटेन्सिस जातीच्या मुंगीच्या डोळ्याला, तर १,२०० पर्यंतही पैलू असतात. तसेच टिफ्लोपोन या जातीच्या मुंग्यांना मुळीच डोळे नसतात. मुंगीच्या तोंडाजवळ दोन तीक्ष्ण व मजबूत जबडे असतात आणि अन्नाचे कण इतर जड पदार्थ या जबड्यात धरून मुंगी सहज उचलून नेते.
मुंगीच्या वक्षाचे तीन भाग असतात. प्रत्येक भागावर श्वसनासाठी छिद्रांची एक जोडी असते व पायांची एक जोडी असते. मुंगीचे वक्ष व उदर इतर कीटकांप्रमाणे एकास एक लागलेली नसतात. दोहोंच्यामध्ये बारीक कंबर असते व ह्या कंबरेचा आकार निरनिराळ्या जातींत निरनिराळ्या प्रकारचा असतो. त्यामुळे कंबर पाहून मुंगीची जात ओळखता येते.
मुंगीच्या उदराचे सहा खंड असतात. उदराच्या दोहो बाजूंवर श्वसनासाठी छिद्रांच्या चार जोड्या असतात. काही मुंग्यांच्या उदराच्या शेवटी नांगी असते व नांगीच्या जवळ दोन ग्रंथी असतात. त्यांतून जरूर पडेल त्या वेळी फॉर्मिक अम्ल हे दाहक द्रव्य बाहेर टाकले जाते. काही जातींच्या मुंग्यांस नांगी नसते फक्त ग्रंथी असतात. अशा मुंग्या तोंडाने चावून जी जखम होते तीमध्ये ग्रंथींतील दाहक द्रव्य ओततात. काही मुंग्या आकारमानाने लहान असल्या, तरी या दाहक द्रव्य ग्रंथीमुळे मोठमोठ्या बलाढ्य शत्रूलाही जुमानीत नाहीत. त्यांच्या उदराच्या शेवटच्या खंडावर गुदद्वार असते.
अंतर्रचना: मुंगीचा आहारनाल (अन्नमार्ग) तिच्या शरीरापेक्षा जास्त लांब असल्याने तो वेटोळी करून आत बसविला असता त्याचे तीन भाग पडतात : अग्रांत्र, मध्यांत्र व पश्चांत्र. अग्रांत्र अरुंद असून तोंडाजवळ सुरू होते. त्याच्यामध्ये मुंगीने खाल्लेले अन्न साठविले जाते. ते नंतर मध्यांत्रात येते. हा भाग रुंद असून पाचक द्रव्ये निर्माण करतो. ही पाचक द्रव्ये अन्नात मिसळली जातात व अन्नाचे पचन होते. पचलेल्या अन्नाचे मध्यांत्रातच अभिशोषण केले जाते. न पचलेले अन्न पश्चांत्रात ढककले जाते. येथे त्यातील पाण्याचा अंश शोषला जाऊन बाकी उरलेला भाग गुदद्वारावाटे बाहेर फेकला जातो. अग्रांत्राच्या दोहो बाजूंस लालोत्पादक पिंड असतात. तसेच मध्यांत्र ज्या ठिकाणी पश्चांत्राला मिळते तेथे अनेक बारीक नलिका असतात. त्यांना मालपीगी नलिका (मार्चेल्लो मालपीगी या इटालियन शरीररचनावैज्ञानिकांच्या नावावरून) असे म्हणतात. रक्तातील निरुपयोगी द्रव्यांचे या नलिका शोषण करून पश्चांत्रात आणून टाकतात व अन्नाच्या चोथ्याबरोबरच त्यांचे उत्सर्जन केले जाते.
मुंगीचे श्वसन वक्ष व उदर यांच्या बाजूंवर असलेल्या सूक्ष्म रंध्रांवाटे केले जाते. ही रंध्रे पाहिजे तेव्हा उघडता व बंद करता येतात. प्रत्येक रंध्रापासून एक श्वासनलिका निघून तिला लगेच अनेक शाखा फुटतात. या शाखांना अनेक उपशाखा फुटतात. अशा तऱ्हेने वारंवार शाखा उपशाखा फुटून शरीरात लहानमोठ्या नलिकांचे एक तंत्र (संस्था) तयार होते. या नलिकांत हवा खेळती राहून ती सर्व अवयवांना पुरविली जाते. उदराच्या वरखाली होणाऱ्या हालचालींवर हवेचे रंध्रावाटे नलिकांत शिरणे किंवा त्यांतून बाहेर जाणे अवलंबून असते.
मुंगीत रक्ताभिसरण तंत्र जवळजवळ नसते. हृदय नळीसारखे लांब असून ते शरीरात आहारनालाच्या वरच्या बाजूला असते. त्याचे मागील टोक बंद असून पुढील टोक उघडे असते. त्याचे अनेक खंड पडलेले असतात. त्या खंडांच्या बाजूला बारीक छिद्रे असतात. शरीराच्या पोकळीतील पाण्यासारखे रक्त या छिद्रांवाटे हृदयात शिरते व ते मागील बाजूकडून पुढील बाजूकडे ढकलले जाते. ही क्रिया हृदय वारंवार आकुंचन व प्रसरण पावल्याने होते.
मुंगीचे तंत्रिका तंत्र (मज्जा संस्था) पुढीलप्रमाणे असते : डोक्यामध्ये मेंदू असून त्यापासून डोळे, मिशा, जबडे इ. अवयवांकडे तंत्रिका गेलेल्या असतात. वक्ष व उदर यांच्या भागांत अनुक्रमे दोन व सहा गुच्छिका (तंत्रिका कोशिकांचे-पेशींचे-पुंज) असतात. मेंदू व गुच्छिका एकमेकांना एका जाड तंत्रिका तंतूने जोडलेले असतात. गुच्छिकांपासून बारीक तंत्रिका निघून त्या शरीरातील निरनिराळ्या भागांकडे जातात.
कामकरी मुंगीची प्रजोत्पादन शक्ती नष्ट झालेली असते त्यामुळे त्यासंबंधीचे अवयव तिच्या शरीरात नसतात. फक्त पंखयुक्त नर व मादी मुंग्यांत प्रजोत्पादनाचे अवयव असतात आणि वर्षातील ठराविक ऋतूतच ते कार्यक्षम होऊन संयोग होतो. नर मुंगी मादी मुंगीपेक्षा (राणी मुंगीपेक्षा) आकारमानाने लहान असते.
वसाहतीची स्थापना : सर्वसाधारणपणे पावसाळ्याच्या आरंभी प्रत्येक वारुळातून हजारो पंखयुक्त नर व मादी मुंग्यांचे थवे आकाशात उड्डाण करतात व तेथेच त्यांचा संयोग होतो. संयोगानंतर त्या पुन्हा जमिनीवर उतरतात. नर मुंग्या मरण पावतात व मादी मुंग्यांचे पंख गळून पडतात. अशा मादी मुंग्या मूळ वारुळाच्या आसपास उतरल्यास त्या पुन्हा त्याच वारुळात येण्याची शक्यता असते. त्यांनी तयार केलेल्या नवीन प्रजेमुळे वारुळातील मुंग्यांची संख्या जास्त होऊन वारुळाचा विस्तार वाढवावा लागतो, हे उघड आहे. ज्या राणी मुंग्या वृद्धावस्थेमुळे अंडी कमी घालत असतील त्यांना त्या वारुळातील कामकरी मुंग्या ठार मारतात.
राणी मुंगी ज्या वारुळातील असते त्याच वारुळात तिला प्रवेश मिळतो. यामुळे कधीकधी एका वारुळात दोन राणी मुंग्या असलेल्या आढळतात. ती आपल्या वसाहतीपासून दूरच्या भागात उतरल्यास ती स्वतः जमिनीत एक छोटेसे बीळ अगर घरटे बीळ अगर तयार करून त्या बिळाचे तोंड बंद करते व स्वतःला त्यात कोंडून घेते. तिच्या पोटातील अंड्यांची वाढ झाल्यावर ती अंडी घालते. या अंड्यातून बाहेर पडणाऱ्या डिंभांना (अळ्यांना) स्वतःच्या तोंडातील लाळेसारखा पदार्थ अन्न म्हणून खाऊ घालते. या डिंभांना नंतर कोशावस्था प्राप्त होऊन ठराविक मुदतीनंतर त्यांतून कामकरी मुंग्या बाहेर पडतात. त्या लगेच बिळाचे दार उघडून वारुळाचा विस्तार, त्याची दुरुस्ती इ. कामे करू लागतात. राणी मुंगी या वेळेपर्यंत काहीही खात नाही. तिच्या शरीरात तेलकट चरबीयुक्त पदार्थ पूर्वीच साठविलेले असतात. तसेच पंखांची हालचाल करणारे स्नायू शरीरात विरघळले जाऊन ते अन्न म्हणून वापरले जातात. पहिल्या कामकरी मुंग्या तयार झाल्यावर राणी मुंगी अनेक वेळा अंडी घालते. या अंड्यांची व त्यांतून बाहेर पडणाऱ्या डिंभांची सर्व व्यवस्था कामकरी मुंग्या बघतात.
काही राणी मुंग्या आपल्या मूळ वसाहतीच्या आसपास उतरल्या असता कामकरी मुंग्यांकडून घेरल्या जातात. ह्या कामकरी मुंग्या त्यांना दूर नेऊन त्यांच्या साह्याने नवीन वसाहती स्थापन करतात. असे होण्याचे कारण मूळ वसाहतीत मुंग्यांची संख्या जास्त झालेली असते.
जीवनवृत्त : अंडी लांबट, पांढऱ्या अगर पिवळट रंगांची असून ती हवेतील तापनाप्रमाणे १५ ते ४५ दिवसांत फुटतात. त्यांतून पांढऱ्या रंगाचे डिंभ बाहेर पडतात. ते लांबट असून त्यांच्या तोंडाकडील भाग निमुळता व शेवटचा भाग जाड असतो. त्यांना पाय नसतात. कामकरी मुंग्या त्यांना अन्न भरवितात. ही डिंभावस्था १ ते ४ महिने टिकते. त्यांना नंतर कोशावस्था प्राप्त होते. ही अवस्था १ ते ४ महिने टिकून नंतर पूर्णावस्थेतील मुंगी तयार होते. मुंग्या किती दिवस जगतात हे खात्रीने सांगता येत नाही. नर जातीच्या मुंग्या एकदा संयोग झाल्यावर लगेच मरतात, हे वर सांगितलेच आहे. कामकरी व राणी मुंग्याचे आयुष्य बरेच असते. कामकरी मुंग्यांचे आयुष्य सात वर्षे असू शकते. कित्येक जातींच्या राणी मुंग्या अदमासे १५ वर्षे जगतात, असे आढळून आले आहे. संयोगानंतर गर्भवती राणी मुंगीचे पंख गळून पडतात कित्येक राणी मुंग्यांचा कोळी मांसाहारी किटक व पक्षी संहार करतात, प्रतिकूल हवामानामुळे कित्येक नष्ट होतात, तर कित्येक शरीरात अन्नाचा भरपूर साठा नसल्याने मरण पावतात नैसर्गिक संहारामुळे मुंग्यांची संख्या आटोक्यात राहिली आहे.
राणी मुंगीने घातलेल्या अंड्यांतून सर्वच कामकरी मुंग्या तयार होतात असे नसून काही नर व मादी मुंग्यासुद्धा तयार होतात. कामकरी मुंग्या काही डिंभांना वेगळ्या प्रकारचे पौष्टिक अन्न खाऊ घालतात व त्यांची जास्त काळजी घेतात. अशा डिंभाचे नर किंवा मादीत रूपांतर होते. ज्या डिंभांना निकृष्ट प्रकारचे अन्न दिले जाते व ज्यांची व्यवस्था चांगल्या प्रकारे ठेवली जात नाही अशांचे कामकरी अगर शिपाई मुंग्यांत रूपांतर होते. नर व मादी फक्त ठराविक काळीच तयार होतात.
वारुळात घालेल्या अंड्यांची व त्यांपासून निर्माण होणाऱ्या डिंभांची राणी मुंगी जोपासना करते व काळजी घेते. वारुळाची रचना पूर्ण झाल्यावर कामकरी मुंग्या हे काम करतात. कोणत्या हेतूने प्रेरित होऊन ही काळजी घेतली जाते यावर बरेच संशोधन झाले आहे. आपल्या पिलावरच्या प्रेमामुळे हे घडत नसावे असा निष्कर्ष निघतो कारण तशी वेळच आली व अन्नाचा अभाव असला, तर राणी मुंगी किंवा कामकरी मुंग्या डिंभ खाण्यास मागेपुढे पाहत नाहीत. असे आढळून आले आहे की, डिंभास जर जरूर ते अन्न मिळाले, तर ते त्यांच्या शरीरातील काही ग्रंथीचा स्त्राव बाहेर टाकतात व हा स्त्राव खाण्यास राणी मुंगी किंवा कामकरी मुंग्या उत्सुक असतात. डिंभांना अन्न देऊन त्या बदली हा स्त्राव मिळविणे अशी देवाणघेवाण चालू असते. या देवाणघेवाणीच्या आविष्काराला इंग्रजीत ट्रोफॅलॅक्सिस म्हणतात. या देवाणघेवाणीवरच मुंग्यांच्या वारुळाची रचना अवलंबून असते. जर यात फेरफार झाले, तर त्याचे परिणाम मुंग्यांच्या सामाजिक जीवनावरही होतात.
जर राणी मुंगी इतर कामकरी मुंग्यांच्या मानाने आकारमानाने खूप मोठी असली, तर तिला डिंभाची काळजी घेणे जमत नाही. कॅरेब्रा प्रजातीतील राणी मुंगी डिंभापेक्षा २,००० पटींनी मोठी असते. ही मुंगी जेव्हा मीलनाकरिता आकाशात उड्डाण करते तेव्हा काही कामकरी मुंग्या तिच्या पायाला आपल्या जबड्याने घट्ट धरून तिच्याबरोबर आकाशात उड्डाण करतात व राणी मुंगी जमिनीवर उतरून नव्या वारुळात अंडी घालू लागल्यावर त्या अंड्यांची देखभाल करतात.
ज्या मुंग्यांत ट्रोफॅलॅक्सिसचा आविष्कार आढळत नाही त्यांच्या वर्तनात खूपच बदल झालेला आढळतो. याचे ठळक उदाहरण म्हणजे ‘गुलाम-बनविणाऱ्या मुंग्या’ पॉलिएर्गस, फॉर्मायका, लेप्टोथोरॅकस इ. प्रजातींत आढळतात. यांच्या राणी मुंग्या अत्यंत भांडखोर असतात. त्या दुसऱ्या राणी मुंग्यांच्या वारुळात शिरतात व जर एखाद्या कामकारी मुंगीने प्रतिकार केला, तर तिला ठार मारतात. कामकरी मुंग्या माघार घेऊन आपल्या वारुळातील डिंभांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करतात पण ही आगंतुक राणी मुंगी त्यांना प्रतिकार करते आणि सर्व डिंभ व कोश आपल्या ताब्यात घेते. यथाकाल या कोशांतून ज्या कामकारी मुंग्या बाहेर पडतात त्या या नव्या आगंतुक राणी मुंगीसच आपली राणी मानतात. या वेळेपर्यंत वारुळाची राणी मुंगी तिची नीट देखभाल न झाल्यामुळे मरते किंवा या नव्या राणी मुंगीकडून मारली जाते व शेवटी सर्व वारूळावर या नव्या राणी मुंगीचा अधिकार चालतो पण हे वर्तन एवढ्यावरच थांबत नाही. या नवीन राणी मुंगीपासून तयार झालेल्या कामकरी मुंग्या दुसऱ्या वारुळात जाऊन तेथील राणीस मारून तिचे डिंभ व कोश आपल्या वारुळात घेऊन येतात व या कोशांतून बाहेर पडलेल्या कामकरी मुंग्यांकडून आपली कामे करून घेतात. या वर्तनात राणी मुंगी अगर तिच्यापासून झालेल्या कामकरी मुंग्या यांच्यात व डिंभात अन्नाची देवाणघेवाण होत नाही व डिंभापासून निघणारा स्त्रावही त्या ग्रहण करत नाहीत.
काही जातींच्या राणी मुंग्या (उदा., फॉर्मायका प्रजातीतील) आकारमानाने लहान असतात. त्यांचे पंखही लहान असतात. त्यामुळे निषेचनानंतर (फलनानंतर) हे पंख गळून पडल्यावर त्यांच्या राहिलेल्या स्नायूंपासून जो स्त्राव तयार होतो तो डिंभांना अन्न म्हणून अपुरा पडतो. या लहान राणी मुंग्या त्यांच्या जातीच्या कामकरी मुंग्यांपेक्षाही लहान असतात यामुळे त्यांना राणी मुंग्या म्हणून ओळखणेही कठीण जाते. त्यांच्या लहान आकारमानामुळे नवीन वसाहतीत त्या सहजासहजी सामावल्या जातात. त्यांच्या स्वतःच्या शरीराच्या वासाचा लोप होईपर्यंत त्या या नव्या वसाहतीत विशेष हिंडत नाहीत, या सर्व दिव्यांतून पार पडून लहान राणी मुंगी जिवंत राहिली, तर या यजमान वसाहतीतील कामकरी मुंग्या तिच्या अंड्यांचे व डिंभांचे संगोपन करतात. याप्रमाणे या वारुळात जम बसविल्यावर ही लहान राणी मुंगी मूळ राणी मुंगीच्या अंगावर चढून तिला चावून तिच्या शरीराचा नाश करते व वारुळाचा ताबा घेते. काही वेळा स्वतःच्या गुणामुळे कामकरी मुंग्याचे दुर्लक्ष होते व परिणामी ती मरते. या नवीन लहान राणी मुंगीचे डिंभ तयार होऊन त्यांतून नवीन कामकरी मुंग्या तयार होईपर्यंत पूर्वीच्या कामकरी मुंग्या मरण पावतात व याप्रमाणे वारुळाची पूर्ण मालकी या लहान राणी मुंगीकडे येते. या प्रकारात राणी मुंगीस डिंभास अन्न देऊन त्याबदली डिंभाकडून दुसरा द्रव मिळविणे जमत नाही. ट्रोफॅलॅक्सिस या आविष्काराचा येथे अभाव असल्यामुळे परिणामी वर वर्णन केलेली परिस्थिती उद्भवते.
मुंग्यांच्या काही जाती भटक्या आहेत पण सर्वसाधारणपणे मुंग्या आपली घरे बहुधा जमिनीत बांधतात. त्यांना वारुळे म्हणतात. या वारुळांत अनेक लहानमोठ्या पोकळ्या असून त्या एकमेकींना बोगद्यासारख्या मार्गांनी जोडलेल्या असतात. वाळवी अगर मधमाशी या कीटकांच्या घरांत आढळणाऱ्या ‘राणीची कोठी’,’अंड्यांची कोठी’ इ. विशिष्ट पोकळ्या मुंग्या बांधीत नाहीत. अंडी, डिंभ व कोश वारंवार एका पोकळीतून दुसऱ्या पोकळीत हलविले जातात. मुंग्यांना स्वच्छता फार आवडते. त्या वारुळांतील बोगदे, पोकळ्या व रस्ते नेहमी स्वच्छ ठेवतात. मेलेल्या अळ्या, कोश, विष्ठा वगैरे घाण त्या तत्परतेने वारुळाबाहेर काढून टाकतात. वारूळे अंदाजे ५० ते ७५ वर्षे टिकतात, असे आढळून आले आहे.
कित्येक मुंग्या आपली घरे दगडाखाली, वाळलेल्या पालापाचोळ्यात, लाकड्याच्या बुंध्यात किंवा झाडांवरील पानांत बांधतात. उष्ण कटिबंधात आढळणाऱ्या इकोफायला स्मारॅग्डिना या मुंग्या आपली घरे झाडांवरील पाने एकमेकांत गुंतवून तयार करतात. घर बांधतेवेळी त्या आपले डिंभ जबड्यात धरून पानांवर फिरतात. डिंभ आपल्या शरीरातून रेशमासारखे धागे काढतात. या धाग्यांमुळे पाने एकमेकांना चिकटून एक घरटे तयार होते. त्यात या मुंग्यांची वसाहत होते.
कामकरी मुंग्या अन्न गोळा करण्यासाठी दूरवर फिरतात, त्या वेळी त्या जाण्याच्या वाटेवर एक विशिष्ट प्रकारचे रासायनिक द्रव्य पसरवतात. या रासायनिक द्रव्याला ⇨ फेरोमोन म्हणतात. या द्रव्यामुळे मुंग्या वारुळात परत येऊ शकतात. फेरोमोन हे रासायनिक संदेशवहनास उपयोगी पडणारे द्रव असून त्यामुळे कामकरी मुंग्यांना भक्ष्याच्या शोधार्थ जाणे सुलभ होण्याबरोबरच एक मुंगी दुसऱ्या मुंगीस धोक्याचा संदेश देऊ शकते. फेरोमोनाच्या साहाय्याने एकाच वारुळातील मुंग्या आपापले प्रकार (उदा., राणी मुंगी, कामकरी मुंगी, शिपाई मुंगी वगैरे) ओळखू शकतात. प्रजोत्पादनच्या वेळी फेरोमोनाच्या साहाय्याने नर मुंगी राणी मुंगीचा शोध घेऊन उड्डाणास जाऊ शकते, एका वारुळातील मुंग्यांचे फेरोमोन दुसऱ्या वारुळातील मुंग्यांच्या फेरोमोनापेक्षा वेगळे असते. एका वारुळातील मुंग्यांना दुसऱ्या वारुळात प्रवेश दिला जात नाही. मुंग्यांचे डोळे, स्पर्शेंद्रिये व घ्रार्णेद्रिये यांची उत्तम वाढ झालेली असते व त्यामुळे त्यांना अन्न चटकन सापडते.
मुंग्यांचे अन्न अनेक प्रकारचे असते. कित्येक जातींच्या मुंग्या बारीक किडे, झाडांचे बी, तृणधान्य, झाडांमधून स्रवणारा गोड पदार्थ, साखर, फुलांतील मध, बुरशी इ. पदार्थांवर उपजीविका करतात. आपण ज्याप्रमाणे घरी गाईम्हशी बाळगून त्यांचे दूध घेतो त्याप्रमाणे कित्येक मुंग्यां ⇨ मावा हे कीटक सांभाळतात व त्यांची काळजी घेतात. मावे आपल्या गुदद्वारातून मधासारखा गोड पदार्थ [→ मधुरस] सदैव बाहेर टाकत असतात. हा पदार्थ खाण्यासाठी मुंग्या त्यांच्याजवळ राहून त्यांचे रक्षण करतात. कित्येक मुंग्या मांसाहारी आहेत. त्या जिवंत भक्ष्य पकडून खातात अगर मरण पावलेले बारीक किडे खातात. तसेच मानवाच्या घरांत शिरुन गूळ, साखर इ. गोड पदार्थ पळवून नेण्यात मुंग्या पटाईत असतात.
काही मुंग्या आपल्या वारुळात इतर जातीच्या संधिपाद प्राण्यांस आसरा देतात व त्यांना अन्नही पुरवितात. सुमारे २,००० जातींचे कीटक असे पाहुणे म्हणून मुंग्यांच्या वारुळात आढळले आहेत. यात भुंगेरे, झुरळे, फुलपाखराचे डिंभ, कोळी वगैरे प्राण्यांचा समावेश आहे. मुंग्यांचे संदेशवहन रासायनिक व इंद्रियजन्य स्वरुपाचे असते. हे संदेश समजून भाषेत उत्तर देण्याची क्षमता ज्या संधिपाद प्राण्यांत असते, असे प्राणी अनाहूत पाहुणे म्हणून मुंग्यांच्या वारुळात राहू शकतात. या प्रकारचे प्राणी भुंगेरे, गांधीलमाशी, माशी वगैरे प्रजातीतील असतात. एटीमेलीस प्युबिकोलीस या भुंगेऱ्याचे डिंभ फॉर्मायका पॉलिक्टीना या मुंग्यांच्या वारुळात सापडतात. हे डिंभ आपल्या शरीरातून एक प्रकारचा स्राव बाहेर टाकतात व मुंग्या या स्रावाकडे आकर्षित होतात. हा स्राव मुंग्यांच्या डिंभातून निघण्याऱ्या व प्रौढांत संगोपन वर्तन उद्दीपित करण्याऱ्या स्रावासारखा (फेरोमोनासारखा) असावा.
मुंगी या पाहुण्या डिंभास तोंडाने अथवा मिशांनी स्पर्श करते आणि या स्पर्शाची परतफेड म्हणून डिंभ मुंगीच्या शीर्षास स्पर्श करतो आणि पुढे मुंगीच्या तोंडास आपले तोंड लावतो. या इंद्रियजन्य संदेशवहनाने उत्तेजित होऊन मुंगी आपल्या तोंडातून ओकारीद्वारे अन्नाचा थेंब काढून डिंभास देते. भुंगेऱ्याचे डिंभ स्वजातभक्षी असतात त्यामुळे वारुळात भुंगेऱ्याचे डिंभ मुंग्यांच्या डिंभापेक्षा कमी असतात. या भुंगेऱ्यांच्या डिंभाचे कोश व त्यातून भुंगेऱ्यात रुपांतरण झाले म्हणजे हे भुंगेरे थंडीच्या हंगामात मर्मिका या प्रजातीच्या मुंग्यांच्या वारुळात जातात. जाण्यापूर्वी ते फॉर्मायका मुंग्यांकडून पुरेशा अन्नाची भीक मागतात व ओकारीच्या रूपात मुंग्यांपासून ते हे अन्न मिळवितात. मर्मिका मुंग्यांच्या वारुळात पोहोचल्यावर हे भुंगेरे आपल्या उदरावरच्या ग्रंथीतून एक स्राव बाहेर टाकतात. हा रासायनिक स्राव मुंग्यानी चाटल्यावर त्यांची लढाऊ वृत्ती एकदम थंड होते. ही लढाऊ वृत्ती थंड करण्याची शक्ती या ग्रंथींच्या स्रावात असल्यामुळे या ग्रंथीस क्रोधशामक ग्रंथी म्हणतात. भुंगेऱ्यांच्या उदरावरही काही ग्रंथी असतात. त्यांचा स्राव हुंगल्यावर भुंगेऱ्याचा आपल्या वारुळात समावेश करावा किंवा नाही हे मुंग्या ठरवितात. या दुसऱ्या ग्रंथींना अंगिकार ग्रंथी असे म्हणतात. भुंगेऱ्यांच्या वारुळात समावेश केल्यावर त्यास डिभंगृहातही प्रवेश मिळतो. ज्या भुंगेऱ्यांच्या जातीत एटीमेलीस प्रजातीच्या भुंगेऱ्याइतके संदेशवहन प्रगत नसते अशा भुंगेऱ्याना वारुळातल्या कचरा घरापर्यतच प्रवेश मिळतो.
विशेष अभ्यासित जाती : मुंग्यांच्या विविध जातींपैकी खाली नमूद केलेल्या उपकुलांतील जातींचा विशेष अभ्यास झाला आहे.
(१) डोरिलिनी : या उपकुलातील मुंग्यांना ‘लष्करी मुंग्या’ असे म्हणतात. या अमेरिकेतील उष्ण प्रदेशांत आढळतात. त्या एका ठिकाणी वारुळे अगर घरे करून रहात नाहीत. त्या भटक्या असून त्या एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना गटागटाने व रांगेने जातात. त्यांच्यातील राणी मुंगीला पंख नसतात. या मुंग्या मांसाहारी आहेत. यांच्या कामकरी मुंग्या विविध आकारमानांच्या असतात, काही कामकरी मुंग्यांचे जबडे मजबूत, लांब व तीक्ष्ण असतात, तर काहींचे फारच लहान व नाजूक असतात. त्यांना डोळे नसले, तरी त्यांची स्पर्शेद्रिये उत्तम असतात. या मुंग्या नियमितपणे इतर मुंग्यांवर अगर कीटकांवर धाड त्यांचे घालून त्यांचे भक्षण करतात. हरणासारख्या मोठ्या जनावरावर हल्ला करून त्याचे सर्व मांस या मुंग्यांनी भक्षण केल्याचे आढळले आहे.
(२) पोनेरिनी : या उपकुलातील मुंग्या २ ते ४ मिमी. लांब असून कुजक्या झाडांमध्ये अगर दगडाखाली जमिनीत घरे बांधतात.
(३) मर्मिसिनी : या उपकुलातील मुंग्या सर्वत्र आढळतात व त्यांच्या संबंधी बरीच माहिती गोळा झाली आहे. या मुंग्या शत्रूवर कधीही आपणहून चाल करीत नाहीत. शत्रूच जर त्यांच्यावर चाल करून आला, तर या मुंग्या आपल्या शरीराचा गोळा करून स्वस्थ पडून राहतात. त्यांच्या अंगाची त्वचा जाड असल्याने शत्रूने शरीरावर कितीही प्रहार केले, तरी त्यांना काही इजा होत नाही. शत्रूने वारुळात प्रवेश करू नये म्हणून त्यांच्या वारुळाची दारे फार लहान असतात व तेथे एक शिपाई मुंगी पहारेकऱ्यासारखी हजर असते. शत्रूची जराशी चाहूल लागली, तरी ती चटकन दरवाज्यास आपले डोके लावून वाट बंद करते व शत्रूस वारुळात प्रवेश करु देत नाही. या मुंग्यांच्या अंगास एक प्रकारची घाण येते. त्यामुळेही त्यांच्या वाटेस कोणी जात नाही.
फायडॉल प्रजातीच्या मुंग्या ‘शेतकरी मुंग्या’ या नावाने ओळखल्या जातात. त्या शेतात आढळणारे गवताचे बी गोळा करून आपल्या वारुळात साठवून ठेवतात. बी जर जड असेल ,तर शिपाई मुंग्यांकडून त्याचे बारीक तुकडे करुन घेतले जातात. ॲटा प्रजातीच्या बुरशी खाणाऱ्या मुंग्यांना खऱ्या अर्थाने ‘शेतकरी मुंग्या’ म्हणता येईल कारण या मुंग्या आपल्या वारुळातील पोकळीत ‘बुरशीच्या बागा’ तयार करतात. पोकळीमध्ये कुजकी पाने, विष्ठा इ. घाण पदार्थ साठवून त्यांवर बुरशीची लागवड केली जाते. बुरशी वाढल्यावर डिंभ व मुंग्या ती अन्न म्हणून भक्षण करतात.
(४) फॉर्मिसीनी : या उपकुलातील मुंग्या सर्वत्र आढळतात. फॉर्मायका रूफा जातीच्या मुंग्या फार शूर आहेत. शत्रूवर चाल करून जाताना त्या एकट्या दुकट्या कधीही जात नाहीत. नेहमी जमावाने जातात. फॉ. एक्सेटा या मुंग्या आकारमानाने लहान पण युद्धकलेत निपुण आहेत. शत्रू आपल्याहून मोठा आहे असे समजल्यावर त्या चटकन त्याच्या अंगावर उडी मारून त्याचे चावे घेतात.
पॉलिएर्गस : या प्रजातीच्या मुंग्या इतक्या धाडसी आहेत की, आपला शत्रू कितीही बलाढ्य असो त्या त्याच्या अंगावर एकदम चाल करून जातात व शत्रूचा पाडाव केल्याशिवाय कधीही माघार घेत नाहीत. त्यांना ‘ॲमेझॉन मुंग्या’ असेही म्हणतात.
फॉर्मायका सँग्वीनिया : या जातीच्या मुंग्या नियमितपणे इतर मुंग्यांच्या वारुळावर हल्ले करून त्यामधील कामकरी मुंग्यांचे कोश पळवितात. त्यातील कित्येकांचे भक्षण करून कित्येक आपल्या वारूळात तसेच ठेवून देतात. या कोशातून बाहेर पडणाऱ्या कामकरी मुंग्यांना नंतर कैद्यासारखे वागवून त्यांच्याकडून आपल्या वारूळातील सर्व कामे करून घेतात. या मुंग्यांना ‘गुलाम बनविणाऱ्या मुंग्या’ असेही म्हणतात.
दक्षिण अमेरिकेत कॅपोनोटस या प्रजातीच्या मुंग्या आढळतात. त्यांच्या काही कामकरी मुंग्यांची पोटे शरीराच्या मानाने अवाढव्य असतात. त्या फार कमी हालचाल करतात. इतर साध्या कामकरी मुंग्या त्यांना बाहेरून मध आणून खाऊ घालतात व त्याही मिळेल तेवढा मध पिऊन घेतात. त्यांची पोटे मोठी असल्याने बराच मध त्यांच्या पोटात साठून राहतो. त्याचे पचन होत नाही. एखादे वेळी वारूळातील मुंग्यांना पुरेसे अन्न खाण्यास मिळाले नाही म्हणजे या लठ्ठ पोटाच्या कामकरी मुंग्यांना ठार मारतात व त्यांची पोटे फाडून त्यांत साठविलेला मध खाऊन आपली भूक भागवितात. अशा मोठ्या पोटाच्या मुंग्यांना ‘मधाची पात्रे’ असेही म्हणतात.
प्रकारांची निर्मिती : एकाच राणी मुंगीपासून चार प्रकारच्या मुंग्या कशा निर्माण होतात, यासंबंधी विविध मते प्रचलित आहेत. काही शास्त्रज्ञांच्या मते मुंग्यांचे प्रकार बाह्य कारणांमुळे होतात. १८९७ मध्ये वी. ग्रास्सी व ए. सांडीयस या शास्त्रज्ञांनी असे दाखवून दिले की, ज्या डिंभांना राणी मुंगीकडून लाळेसारख्या पौष्टिक पदार्थांचा आहार मिळतो अशांचे नर किंवा राणी मुंग्यांसारख्या प्रजोत्पादन करणाऱ्या मुंग्यांत रूपांतर होते. ज्या डिंभांना लाळेव्यतिरिक्त निकृष्ट प्रकारचा आहार मिळतो त्यांचे कामकरी आणि शिपाई मुंग्यांत रुपांतर होते. १९०२ मध्ये एफ्. सिल्व्हेस्ट्री या शास्त्रज्ञांनी वरील विधानास पुष्टी दिली आहे.
जी. ब्रूनेली या शास्त्रज्ञांनी १९०५ मध्ये असे दाखवून दिले की, काही डिंभांच्या शरीरात विशिष्ट प्रकारचे सूक्ष्मजंतू तयार होऊन ते प्रजोत्पादन करणाऱ्या ग्रथींची वा़ढ होऊ देत नाहीत. अशा डिंभांचे कामकरी व शिपाई मुंग्यांत रूपांतर होते.
ए. एल्. पिकन्स या शास्त्रज्ञांनी १९३२ मध्ये असे मत प्रतिपादिले की, नर व राणी मुंग्या आपल्या शरीरातून एक विशिष्ट रस बाहेर टाकतात. हा रस जे डिंभ खातात त्यांच्या प्रजोत्पादनाच्या ग्रंथीची वाढ होत नाही आणि त्यांचे कामकरी व शिपाई मुंग्यांमध्ये रूपांतर होते.
ए. लेडू या शास्त्रज्ञांनी १९५० मध्ये असे दाखवून दिले आहे की, राणी मुंगी काही लहान व काही मोठी अंडी घालते. लहान अंड्यापासून कामकरी व शिपाई मुंग्या तयार होतात, तर मोठ्या अंड्यामधून नर मुंग्या बाहेर पडतात व ही दोन्ही प्रकारची अंडी निषेचित झालेली नसतात.
एकूण मुंग्यांचे चार प्रकार कोणत्या कारणाने होतात हे निश्चितपणे सांगणे अद्यापही कठीण आहे.
शत्रू : मुंग्या जशा हजारो कीटकांना खातात, तसेच मुंग्यांना खाणारेही हजारो कीटक आहेत. मुंग्यांच्या वारूळात शिरून त्यांच्या अंड्यांचा, डिंभांचा व मुंग्यांनी साठविलेल्या अन्नाचा फडशा पाडणारे शेकडो किडे आहेत. त्यांचे तीन प्रमुख प्रकार आहेत.
(१) लुटारू कीटक : स्टॅफिलिनिडी कुलातील भुंगेऱ्यांचा यात समावेश होतो. ते लुटारू असून अंडी, डिंभ व कोश खातात.
(२) घाण खाणारे कीटक : भुंगेरे, विविध माश्या, नाकतोडे इ. कीटक वारुळातील घाण खातात.
(३) पाहुणे कीटक : कित्येक भुंगेरे आपल्या शरीरातून विशिष्ट प्रकारचा रस बाहेर टाकतात. हा रस मुंग्या आवडीने खातात. हे भुंगेरे जरी मुंग्यांची अंडी खात असले, तरी त्यांच्या शरीरातून पाझरणाऱ्या रसाच्या लोभाने मुंग्या त्यांची पाहुण्यासारखी बडदास्त ठेवतात.
स्वसंरक्षण : मुंग्या स्वसंरक्षण निरनिराळ्या प्रकारांनी करू शकतात. डोलिकोडेरिनी व फॉर्मिसिनी या उपकुलांतील मुंग्यांशिवाय इतर मुंग्यांना उदराच्या शेवटच्या खंडावर एक विषारी नांगी असते. काही मुंग्यांचे जबडे मजबूत व तीक्ष्ण असतात आणि त्यामुळे त्या शत्रूच्या शरीराचा जोराने चावा घेऊ शकतात, तर डोलिकोडेरिनी उपकुलातील मुंग्यांच्या शरीरात गुदद्वाराजवळ विशिष्ट ग्रंथीची एक जोडी असते. या ग्रंथीत एक प्रकारचा दुर्गंधयुक्त रस तयार होतो. आणि जेव्हा या मुंग्यांना शत्रूपासून भीती निर्माण होते त्या वेळी हा रस जोराने गुदद्वारावाटे शरीराबाहेर फेकला जातो. या दुर्गंधयुक्त रसामुळे शत्रू त्यांच्या वाटेला जात नाही. मर्मिसिनी या मुंग्यांच्या शरीराला दुर्गंध येतो व त्यामुळे त्यांना शत्रूपासून संरक्षण मिळते. काही मुंग्यांच्या डोळ्यांची उत्तम वाढ झालेली असते व त्या शत्रूवर नीट लक्ष ठेवू शकतात. शत्रूची जराशी चाहूल लागली, तर त्या चटकन पळून जातात. काही मुंग्यांना डोळे अजीबात नसतात. अशांची स्पर्शेद्रिये व घ्रार्णेद्रिये फार तीक्ष्ण असतात.
उपद्रव : मुंग्या या समाजप्रिय, कष्टाळू, हुषार व शिस्तप्रिय असल्या, तरी त्या मानवाच्या दृष्टीने फार उपद्रवी असतात. घरातील गूळ व साखरेचे गोड पदार्थ व धान्य, गुदामांत साठविलेले धान्य, शेतात पेरलेले बी व उगवणारी कोवळी रोपे यांचा मुंग्या नाश करतात. मुंग्यांचा नाश करावयाचा असेल, तर त्यांची वारूळे नष्ट करावी लागतील पण हे काम अवघड आहे कारण पुष्कळशा जातींच्या मुंग्यांची वारुळे जमिनीच्या आत असतात. लिंडेन, डिल्ड्रीन, क्लोरडान, गॅमेक्झिन वगैरेंसारखी विषारी कीटकनाशके वापरूनही त्यांचा नाश करता येतो.
मुंग्या ३ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीतलावर अवतरल्या व त्यांचे ३० ते ४० लक्ष वर्षांपूर्वीच्या जीवाश्म (शिळारूप झालेले अवशेष) आढळले आहेत. इतक्या दीर्घ काळातही त्यांचा विशेष असा विकास झालेला नाही. मुंग्यांचे सामाजिक जीवन फार पुरातन काळापासून अस्तित्वात आहे आणि ते इतके पूर्णत्वास पोहोचले असल्याचे कारण त्यांची परस्परांस संदेश पोहोचविण्याची पद्धती व श्रमविभागणीवर आधारलेल्या सामाजिक जाती, हे आहे.
पहा : कीटकविज्ञान प्राण्यांचे सामाजिक जीवन प्राण्यांमधील संदेशवहन फेरोमोने वारूळ.
संदर्भ :1. Holldobler, B. Communication Between Ants and Their Guests, Scientific American, March, 1971.
2. Larson, P. Larson, M. All About Ants, Cleveland, 1965.
3. Maeterlincki, M. Life of the Ant, New York, 1930.
4. Morley, D. W. The Ant World, Baltimore, 1964.
5. Shuttlesworth, D. E. The Story of Ants, New York, 1964.
6. Wheeler, W. M. Ants, New York, 1960.
रानडे, द. र. इनामदार, ना. भा.
“