मीश्ले, झ्यूल : (२१ ऑगस्ट १७९८–९ फेब्रुवारी १८७४). फ्रेंच इतिहासकार. जन्म पॅरिसमध्ये. त्याचे बालपण गरिबीत आणि कष्टात गेले. त्याच्या बापाच्या मालकीचा एक छापखाना होता. आपल्या धंद्यात तो आपल्या मुलाची मदत घेत असे. झ्यूलला उच्च शिक्षण देण्यासाठी त्याच्या आईवडिलांनी सतत धडपड केली. झ्यूलनेही शाळेत विश्वविद्यालयात भरघोस यश मिळविले. १८२७ मध्ये प्रशिक्षण विद्यालयात (एकॉल नॉर्माल स्युपेरियर) प्राचीन इतिहास आणि तत्त्वज्ञान ह्या विषयांचा प्राध्यापक म्हणून त्याची नेमणूक झाली. यथावकाश त्याने स्वतःला पूर्णपणे मध्ययुगीन व आधुनिक इतिहासाला वाहून घेतले आणि फ्रान्स देशाच्या समग्र इतिहासाच्या लेखनास सुरुवात केली. १८३१ मध्ये राष्ट्रीय पुराभिलेख खात्याच्या ऐतिहासिक विभागाचा प्रमुख म्हणून त्याची नेमणूक झाली. त्याचमुळे त्याचे संशोधनकार्य सुलभ झाले. त्याच्या इस्त्वार द् फ्रांस (इं. शी. हिस्टरी ऑफ फ्रान्स, ६ खंड १८३३–४३) ह्या ग्रंथात मध्ययुगापर्यंतचा फ्रान्सचा इतिहास आहे. हा ग्रंथ आत्मनिष्ठ शैलीने लिहिला गेला असला, तरी त्यात झालेले इतिहासाचे पुनरुज्जीवन व त्यातील श्रेष्ठ साहित्यिक मूल्ये यांमुळे या ग्रंथाला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे. मीश्लेच्या मते भौगोलिक परिस्थितीचा इतिहासावर लक्षणीय प्रभाव पडतो. याच तत्त्वानुसार मीश्ले आपल्या इतिहासाच्या दुसऱ्या खंडात फ्रान्स देशाच्या विविध प्रांतांचे भौगोलिक वर्णन करून भौगोलिक परिस्थितीनुसार रहिवाशांच्या स्वभावात कसा बदल घडून येतो ते विशद करून सांगतो.
१८३८ पासून मीश्लेने ‘कॉलेज द् फ्रांस’ या सांस्कृतिक संस्थेचे इतिहासाचे अध्यासन भूषविले. त्याच्या व्याख्यानातून त्याची प्रजातंत्रवादी वृत्ती प्रतीत होत असे. ला रेव्होल्युसियाँ फ्रांसेझ (७ खंड, १८४७–५३, इ. शी. द फ्रेंच रेव्हल्यूशन) हा त्याचा दुसरा महत्त्वाचा ग्रंथ. १७८९ ते १७९४ या कालखंडातील व्यक्ती, प्रसंग आणि वातावरण यांचे रेखांकन अत्यंत वाचनीय अशा शैलीने ह्या ग्रंथात केले गेले आहे. त्याच्या इतर दोन उल्लेखनीय कृती म्हणजे द्यु प्रॅत्र द ला फाम एद् ला फामीय (१८४५, इं. शी. धर्माधिकारी, नारी आणि कुटुंबसंस्था) आणि ल् पप्ल (१८४६, इं. शी. द पीपल). दुसऱ्या साम्राज्याच्या प्रस्थापनेनंतर (१८५१) मीश्लेने सम्राटाला एकनिष्ठ राहण्याची शपथ घेण्याचे नाकारल्यामुळे त्याला पुराभिलेख संग्रहालय आणि ‘कॉलेज द् फ्रान्स’ मधील आपल्या हुद्यांना मुकावे लागले. आयुष्याची अखेरची वर्षे त्याने खेड्यात घालविली व आपला फ्रान्सचा इतिहास पूर्ण केला. उपर्युक्त फ्रेंच क्रांतीचा इतिहास लिहिण्यासाठी त्याने ह्या इतिहासाचे लेखन काही काळ थांबवले होते. प्रबोधनकालापासून फ्रेंच राज्यक्रांतीपर्यंतचा भाग त्याने ह्या इतिहासात आणला. (११ खंड, १८५५–६७) तसेच धर्मांच्या इतिहासावरील ला बिब्ल द ल्युमानिते (१८६४, इं. शी. रिलिजन ऑफ ह्यूमॅनिटी) हा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्याने काही निसर्गविषयक पुस्तकेही लिहिली आहेत. इयॅर येथे तो निधन पावला.
सरदेसाय, मनोहरराय