मीन : भारतीय राशिचक्रातील बारावी म्हणजे शेवटची रास. या राशीत पूर्वाभाद्रपदाचा चौथा चरण, उत्तराभाद्रपदा व रेवती अशी सव्वा दोन नक्षत्रे येतात. मत्स्यजोडी अशी या राशीची आकृती मानलेली आहे व हिच्यात ठळक असा एकही तारा नाही. ही रास स्त्री, द्विस्वभावी, जलतत्त्वाची, आर्द्र व बहुप्रसव अशी आहे. गुरू हा या राशीचा स्वामी असून शुक्र या राशीत उच्चीचा असतो. बुध, मंगळ व शनी हे या राशीत निर्बल मानतात. या राशीच्या व्यक्तींना गायन प्रिय असते. या सायन (संपात चलन लक्षात घेतलेल्या) राशीत सूर्य २१ फेब्रुवारी ते २१ मार्च असतो, भारतीय व पाश्चात्य पद्धतींत मीन राशीच्या मर्यादेत फरक आढळतो. उदा., पूर्वाभाद्रपदा व उत्तराभाद्रपदा या चार ताऱ्यांचा पेगॅसी चौकोन, पाश्चात्य पद्धतीत वेगळा मानतात म्हणजे तो मीनेमध्ये नाही परंतु भारतीय पद्धतीत तो मीनेत आहे. हा चौकोन फार मोठा असून वरवर पाहता आकाशात अगदी मोकळा दिसतो परंतु यात १६२ तेजोमेघांचा (तेजोमय अभ्रिकांचा) एक संघ दहा कोटी प्रकाशवर्षे अंतरावरून जात आहे. त्यातील एकेक तेजोमेघ हे विश्वच आहे.
या राशीच्या क्षेत्रातील सर्वांत तेजस्वी तारा चौथ्या प्रतीचा [→ प्रत] आहे. या राशीत वसंत संपात व क्रांतिवृत्ताचा मोठा भाग येतो. V आकाराची ही मंद पेगॅसी चौकोनाच्या खाली दिसते. हिचा मध्य होरा ० ता. ३० मि. व क्रांति + १५° या ठिकाणी आहे [→ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति]. चांगल्या दुर्बीणीतून यात काही द्वित्त तारे (ताऱ्यांच्या जोड्या) दिसतात. सूर्य या राशीत असताना २१ मार्च हा विषुवदिन येतो. या राशीत झीटा हा ५·४ प्रतीचा मंद तारा होरा १ ता. ११ मि. ०·३६ से., क्रांति +७° १८′ २″ या ठिकाणी आहे त्याला ‘जयंती तारा’ म्हणतात आणि येथून राशिचक्रारंभ किंवा नक्षत्रचक्रारंभ होतो, असे काही पंचांगकर्ते मानतात. ही रास नोव्हेंबरच्या मध्याला रात्री नऊ वाजता मध्यमंडलावर असते.
पहा : राशिचक्र.
ठाकूर, अ. ना.