मीड, जेम्स एडवर्ड : (२३ जून १९०७ – ).सुविख्यात ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ. आंतरराष्ट्रीय व्यापार व भांडवल हालचाली यांसंबंधीच्या सैद्धांतिक लेखनामुळे १९७७ मधील अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचे बर्टिल ओह्लिन या स्वीडिश अर्थशास्त्रज्ञांबरोबरीचे मानकरी. महायुद्धकाळातील ब्रिटिश अर्थव्यवस्थानीतीवर मीड यांच्या विचारांचा फार मोठा प्रभाव पडल्याचे दिसून येते. दोन खंडांत प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या द थिअरी ऑफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक पॉलिसी (१९५५) या ग्रंथासाठी त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले.
मीड यांचा जन्म ग्रेट ब्रिटनच्या डॉर्सेट परगण्यातील स्वानिज येथे झाला. ऑरिएल महाविद्यालयातून प्रथम श्रेणीत पदवी संपादन केंब्रिज येथे पदव्युत्तर शिक्षण (१९३०–३१). तेथे सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स यांच्या ट्रीटिज ऑन मनी या ग्रंथावरील चर्चासत्रात भाग घेण्याची संधी मीडना मिळाली. त्यानंतर ते ऑक्सफर्डच्या हर्टफर्ड महाविद्यालयात अधिछात्र म्हणून काम करू लागले (१९३०–३७). येथेच त्यांचे ॲन इंट्रोडक्शन टू इकॉनॉमिक ॲनलिसिस अँड पॉलिसी हे पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले (१९३६). त्यात त्यांनी साकलिक अर्थशास्त्र व अपूर्ण स्पर्धा यांचे सुस्पष्ट विवेचन केले. केन्सप्रणीत संकल्पनांची पद्धतशीर मांडणी करणारे पहिले पाठ्यपुस्तक म्हणून ते विशेष गाजले. यापुढील दहा वर्षांचा काळ (१९३७–४७) मीड यांनी राष्ट्रसंघाच्या ‘वित्तविभाग व आर्थिक गुप्तवार्ता सेवे ’ चा सदस्य म्हणून तसेच त्या संस्थेच्या जागतिक अर्थसर्वेक्षणांचा संपादक म्हणून (१९३८–४०) आणि नंतर मंत्रिमंडळ कार्यालयाच्या अर्थविभागाचा सदस्य (१९४०–४५) व संचालक (१९४६–४७) म्हणून घालविला. या काळात त्यांनी निरीक्षिलेल्या आंतरराष्ट्रीय आर्थिक समस्या व दुसऱ्या महायुद्धोत्तर काळातील आर्थिक पुनर्रचना कार्यक्रम या सर्वांचे प्रतिबिंब मीड यांच्या १९५१–५५ दरम्यान प्रसिद्ध झालेल्या द थिअरी ऑफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक पॉलिसी (१९५१–५५) या महत्त्वाच्या द्विखंडीय ग्रंथात–द बॅलन्स ऑफ पेमेंट्स (१९५१) व ट्रेड अँड वेल्फेअर (१९५५)–पडल्याचे आढळते. अर्थशास्त्रीय सिद्धांतांमधील मौलिक ग्रंथ म्हणून त्याला मान्यता मिळाली आहे.मंत्रिमंडळ कार्यालयात असताना मीडनी रिचर्ड स्टोन या अर्थशास्त्रज्ञासमवेत आरंभीच्या राष्ट्रीय उत्पन्न लेख्यांबाबत काम केले व त्याचाच परिपाक म्हणजे नॅशनल इन्कम अँड एक्स्पेंडिचर (१९४४) हा दोघांनी संयुक्तपणे लिहिलेला ग्रंथ होय. याच काळात ‘नियोजन आणि सार्वजनिक उपक्रमनीती’ यांबाबत मीड यांचे संशोधन व लेखन चालू होते त्याचे फलस्वरूप त्यांच्या १९४८ मधील प्लॅनिंग अँड द प्राइस मेकॅनिझम या ग्रंथात दिसते.
लंडन अर्थशास्त्र संस्थेमध्ये वाणिज्य विषयाच्या अध्यापनात त्यांनी १९४७ ते १९५७ पर्यंतचा घालविलेला काळ हा मीड यांच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा कालखंड मानावा लागेल. या ठिकाणी त्यांनी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र व कल्याणकारी अर्थशास्त्र यांमध्ये मोठे योगदान केले. या काळात मीडनी प्रसिद्ध केलेल्या पुस्तकांत द थिअरी ऑफ कस्टम्स युनियन्स (१९५५) हा महत्त्वाचा ग्रंथ समजण्यात येतो. यानंतर मीडनी केंब्रिज विद्यापीठात अर्थशास्त्राचा प्राध्यापक (१९५७–६९), नफील्ड जेष्ठ संशोधन अधिछात्र-क्राइस्ट्स महाविद्यालय (१९५७–७४), अधिशासक-लंडन अर्थशास्त्र संस्था (१९६०–७४), अनेक महाविद्यालयांचा सन्मान्य अधिछात्र अशी पदे भूषविली. अनेक विद्यापीठांनी (बाझेल, हल्, ऑक्सफर्ड, ग्लासगो इ.) त्यांना सन्माननीय डॉक्टरेट दिली.
बॅलन्स ऑफ पेमेंट्स या ग्रंथातील दोन महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे सर्वसाधारण संतुलनावस्थेतील उत्पन्न व किंमत परिणाम या दोहोंचे समन्वय व धोरण ही होत. पूर्वीच्या सिद्धांतात उत्पन्न व किंमत यंत्रणा ही दोन्ही वेगवेगळी कार्ये करीत असलेली, तसेच आंतरराष्ट्रीय देवघेवींच्या ताळेबंदांचे समायोजन स्वयंचलित पद्धतींनी होत असल्याचे दाखविण्यात आले आहे. या ग्रंथाचा गाभा म्हणजे त्याचे धोरणविषयक प्रतिमान हे होय. अंतर्गत व बाह्य संतुलनांची सिद्धता, हे प्रधान उद्दिष्ट होय. या धोरणाचे दोन उपलब्ध प्रकार म्हणजे उत्पन्न समायोजन-उत्पन्न कमीजास्त करण्याची प्रक्रिया-हे राजकोषीय व चलनविषयक धोरणांच्या अवलंबनाने साध्य करता येते दुसरा प्रकार म्हणजे किंमत समायोजन-हे विदेश विनिमय दरांच्या बदलांमधून अथवा वेतन लवचिकतेमधून साध्य करता येते. वरील दोन्ही उद्दिष्टे एकाच वेळी साध्य करावयाची असतील, तर धोरणविषयक दोन चलांचा स्वीकार करावयास हवा. धोरणविषयक एकच चल वापरल्यास उद्दिष्टांमध्ये संघर्ष उद्भवण्याची शक्यता असल्याने मीडनी दाखवून दिले.
मीड यांच्या प्रतिमानाच्या योगे अंतर्गत व आंतरराष्ट्रीय संतुलनांचे नाते प्रथमच पद्धतशीरपणे शोधणे शक्य झाले. पूर्वी आंतरराष्ट्रीय देवघेवींच्या ताळेबंदाच्या सिद्धांतामध्ये भांडवल प्रवाहांचा विचार केला जात नसे. मीडनी आपल्या प्रतिमानामध्ये या भांडवल प्रवाहांचे प्रथमच समन्वयन केले. बॅलन्स ऑफ पेमेंट्स या ग्रंथात इष्टतम चलनक्षेत्रांचा सिद्धांत आणि सट्टाकारी भांडवल प्रवाह विश्लेषण यांची बीजे आढळून येतात. अवमूल्यन-विश्लेषणात प्रथमच अंतर्गत व्यापारी वस्तूंचा (होमट्रेड गुड्स) समावेश करण्यात आला. अंतर्गत संतुलन साध्य करताना, अवमूल्यनामुळे चलनवाढ होऊ नये, यासाठी खर्चातही तेवढ्याच प्रमाणात कपात करणे आवश्यक ठरते, असे या ग्रंथाचे प्रतिपादन आहे. या ग्रंथाचा ह्या क्षेत्रातील अधिकारी लेखकांवर व धोरण बनविणाऱ्या व्यक्तींवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येते.
ट्रेड अँड वेल्फेअर या ग्रंथातून व्यापार व घटकांचे नियंत्रण यांबाबतच्या युक्तीवादाचे पद्धतशीर विश्लेषण करण्यात आले आहे. घटकांचे नियंत्रण व त्यांचे स्थलांतर यांविषयीचे मीड यांचे विश्लेषण हे मौलिक असल्याचे मानले जाते. या विश्लेषणातून व्यापारदरांवर होणाऱ्या स्थलांतर परिणामांचे प्रतिमान तसेच इष्टतम लोकसंख्या सिद्धांत यांबाबत माहिती देण्यात आली आहे. या ग्रंथाला जोडलेल्या गणितीय पुरवणीमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करपद्धतींचे कार्यक्षम परिणाम तसेच करभाराचा सर्वसाधारण समतोल यांविषयी महत्त्वाचे विश्लेषण आढळते.
प्लॅनिंग अँड द प्राइस मेकॅनिझम (१९४८) तसेच द इंटिलिजंट रॅडिकल्स गाइड टू इकॉनॉमिक पॉलिसी (१९७५) या मीड यांच्या दोन्ही ग्रंथांमध्ये साधनांच्या वितरणामधील बाजारयंत्रणेचे महत्त्व व प्रभावी स्पर्धेला चालना देणारे शासन या दोन्ही विषयांचे सविस्तर विवरण करण्यात आलेले आहे. या दोन्ही ग्रंथांचा ग्रेट ब्रिटनमधील आर्थिक नियोजनावरील विचारांवर फार मोठा प्रभाव पडला होता. अर्थातच मीड यांचा बाजारयंत्रणेतील घटकांवर तसा विश्वास आहे, तेवढीच उत्पन्नाच्या फेरवाटपाबाबत त्यांना वाटणारी कळकळ व आस्था महत्त्वाची आहे. वरील दोन्ही ग्रंथांत आर्थिक विषमता कमी करण्यासाठी शासनाने हस्तक्षेप करावा, असे त्यांनी ठामपणे म्हटले आहे. इफिशन्सी, इक्वॉलिटी अँड द ओनरशिप ऑफ प्रॉपर्टी (१९६४) या त्यांच्या ग्रंथात भांडवल संचयामागील घटक आणि अर्जित उत्पन्ने यांमधील संबंध, यांबाबत विस्तृत विवरण आढळते. ग्रेट ब्रिटनमध्ये या ग्रंथामुळे या प्रकारच्या विषयाबाबत मोठे कुतूहल निर्माण झाले होते. मीडनीही द इनहेरिटन्स ऑफ इन्इक्वॉलिटिज (१९७४) व द जस्ट इकॉनॉमी (१९७६) या दोन ग्रंथांमधून या विषयाबाबतची प्रतिमाने विकसित केल्याचे दिसून येते. याशिवाय त्यांनी प्रिन्सिपल्स ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी या ग्रथांचे-द स्टेशनरी इकॉनॉमी (१९६५), द ग्रोइंग इकॉनॉमी (१९६८), द कंट्रोल्ड इकॉनॉमी (१९७१) व द जस्टइकॉनॉमी (१९७६) – असे चार खंड प्रसिद्ध केले आहेत.
मीडनी शासननियुक्त विविध समित्यांची धुरा सांभाळलेली आहे. मॉरिशसच्या ‘आर्थिक सामाजिक पाहणी समिती’चे ते अध्यक्ष (१९६०) होते. ग्रेट ब्रिटनच्या प्रत्यक्ष करपद्धतीची रचना आणि सुधारणा समितीचे अध्यक्ष (१९७५–७७) म्हणूनही त्यांनी काम केले. दोन्ही समित्यांच्या अहवालांवर मीड ह्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता तसेच साहित्यिक अंकगणितीय शैली यांचा विशेष प्रभाव पडल्याचे जाणवते.
बर्टिल ओह्लिन व जेम्स मीड यांची १९७७ च्या नोबेल अर्थशास्त्र पारितोषिकासाठी निवड करताना स्वीडिश अकॅडेमी ऑफ सायन्सेसने असे म्हटले आहे की, ओह्लिन व मीड यांच्या योगदानाची व्याप्ती आणि महत्त्व १९६० व १९७० पर्यंत एवढे स्पष्ट होऊ शकले नाही. कारण तोपर्यंत आर्थिक पद्धतीचे आंतरराष्ट्रीयीकरण जलद गतीने वाढत नव्हते. परंतु त्यानंतर मात्र साधनसामग्रीचे वाटप, व्यापारचक्रे व उत्पन्नाचे वितरण वा वाटप यासंबंधीच्या समस्या वस्तुतः आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्याच आहेत, असे निर्विवाद सिद्ध झाले. याचाच अर्थ असा की, विदेश व्यापार, आंतरराष्ट्रीय किंमत आंदोलने, आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारे आर्थिक क्रियांचे वितरण तसेच साधनांचे स्थलांतर आणि आंतरराष्ट्रीय देवघेव पद्धती या गोष्टी म्हणजे अर्थविश्लेषण व अर्थनीती यांमधील अत्यंत प्रभावी घटक ठरल्या आहेत.
बर्टिल ओह्लिन यांच्या विचारांच्या आधारे मीडनी अंतर्गत आर्थिक धोरणाचा परदेशी व्यापारावर काय परिणाम होतो, हे दाखविले आणि खुल्या अर्थव्यवस्थांमधील (ओपन इकॉनॉमीज) स्थिरीकरण धोरणांच्या समस्यांचे निराकरण केले. आंतरराष्ट्रीय देवघेवींच्या ताळेबंदांवर करकपातींचा किती प्रतिकूल परिणाम होतो आणि चलन-विषयक नीती तसेच विनिमय दर या दोहोंचा आर्थिक स्थैर्यावर कसा परिणाम होतो ते मीडनी प्रभावीपणे दाखवून दिले, असा नोबेल पारितोषिक निवड समितीने त्यांच्याविषयी अभिप्राय व्यक्त केला आहे.
गद्रे, वि. रा.
“