व्यापारी क्रांती : सोळाव्या-सतराव्या शतकांत प्रामुख्याने युरोपातील काही देशांच्या अंतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापारांत झालेल्या अभूतपूर्व वाढीला उद्देशून ‘व्यापारी क्रांती’ ही संज्ञा वापरतात. ग्रेट ब्रिटनमध्ये अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात घडून आलेल्या औद्योगिक क्रांतीचे कारण तत्कालीन उद्योगक्षेत्रांतील उत्पादनतंत्रविषयक विविध शोध हे असले, तरी वस्तुत: तिचा पाया तत्पूर्वीच्या दोन शतकांमध्ये झालेल्या या व्यापारी क्रांतीने घातला, असे मानले जाते. या व्यापारी क्रांतीत ग्रेट ब्रिटन आपल्या इतर स्पर्धकांपेक्षा अग्रेसर असल्याने, त्याला औद्योगिक क्रांतीत महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले.

पंधराव्या शतकातदेखील युरोपमध्ये व्यापारी क्षेत्रात मोठी स्पर्धा होती. युरोपातील व्यापारी पूर्वेकडून प्रामुख्याने विलासी वस्तू आणत होते आणि पश्चिमेतील कातडी, कापड यांसारख्या वस्तू पूर्वेला पाठवीत होते पण पंधराव्या शतकाच्या अखेरीअखेरीस घडलेल्या महत्त्वाच्या घटनांनी पुढील दोन शतकांत युरोपीय व्यापाराचा प्रचंड विस्तार घडवून आणला. या घटनांमध्ये नव्या प्रदेशांचा व दळणवळणाच्या नव्या मार्गाचा लागलेला शोध सर्वांत महत्त्वपूर्ण होता. कोलंबसने १४८६ मध्ये ‘केप ऑफ गुड होप’ला वळसा घातला, तेव्हापासून पूर्वेस जाणारे सागरी मार्ग खुले होत गेले. १४९२ मध्ये कोलंबसने अमेरिकाही शोधली. परिणामत: पाश्चिमात्य व पौर्वात्य देशांमधील सागरी वाहतूक शक्य झाली आणि अमेरिकेच्या रूपाने नवा भूप्रदेशही ज्ञात झाला. याचे क्रांतिकारक परिणाम प्रथम प्रत्यक्ष व्यापारावर व नंतर अन्य आर्थिक क्षेत्रांवर झाले. सागरी मार्गांमुळे मालाची वाहतूक करणे सुलभ झाले. एकदा बोटीत माल भरला, की इष्ट बंदरावर तो  पोचेपर्यंत पुन्हा मालाची चढउतार करावी लागत नसे आणि मुख्य म्हणजे देशादेशांतील जकाती, त्यांच्यातील तंटे-बखेडे यांचा उपसर्ग होत नसे. सागरी वाहतूक व्यापारीवर्गाला अतिशय सोयीची वाटली. पुष्कळ माल एकदम आणता-नेता येऊ लागला आणि त्यामुळे व्यापाराचा विस्तार होऊन नफाही वाढला. नव्या प्रदेशांच्या शोधामुळे त्यांच्याशीही अनेकविध व अभिनव वस्तूंचा व्यापार सुरू झाला. उदा. दक्षिण अमेरिकेतून मौल्यवान धातूंची आयात होऊ लागली.

सागरी मार्गांच्या लगत वा तोंडाशी असलेल्या देशांना आंतरराष्ट्रीय व्यापारात महत्त्वाचे स्थान प्राप्त होऊन त्यांच्यात तीव्र स्पर्धाही सुरू झाली. या स्पर्धेत इंग्लंडला विशेष यश मिळून पुढील काळात ते आर्थिक दृष्ट्या प्रबळ होत गेले. व्यापारी क्रांतीचा फायदा उठविण्याचा पहिला मान पोर्तुगालला मिळाला कारण सागरी मार्गांचा शोध व सागरी दळणवळणातील सुधारणा करण्यात पोर्तुगालच्या हेन्री राजाने (१३९४–१४८०) पुढाकार घेऊन फार मोठी कर्तबगारी दाखविली. सोळाव्या शतकात पोर्तुगाल व त्याबरोबरीने स्पेन यांचीच व्यापाराच्या बाबतीत मक्तेदारी होती. १५८१ मध्ये पोर्तुगालचा प्रदेश स्पेनमध्ये आल्यानंतर स्पेनचे व्यापारातील महत्त्व वाढत गेले. पण सोळाव्या शतकाच्या अखेरीस स्पेनच्या पीछेहाटीस प्रारंभ झाला आणि सतराव्या शतकात स्पेनऐवजी हॉलंडने व्यापारात आपले श्रेष्ठत्व प्रस्थापित केले.पोर्तुगाल-स्पेनप्रमाणे हॉलंडला त्यात आपली मक्तेदारी मात्र प्रस्थापित करता आली नाही. हॉलंडच्या व्यापारी प्रभुत्वाला शह देण्याचा प्रयत्न फ्रान्स व इंग्लंड करीत होते. या झगड्यात सतराव्या शतकाच्या अखेरीस हॉलंड मागे पडले आणि नंतर फ्रान्स-इंग्लंड यांतील संघर्ष दीर्घ काळ चालू राहिला. शेवटी इंग्लंडने फ्रान्सला मागे टाकले आणि जगाच्या मोठ्या भागावर आपली प्रथम व्यापारी व नंतर राजकीय पकड बसविली. सोळाव्या-सतराव्या शतकांत व्यापारी श्रेष्ठत्वासाठी युरोपीय सत्तांमध्ये संघर्ष चालू असतानाच त्याचा परिणाम व कारण म्हणूनही, व्यापाराचा अतिशय वेगाने विस्तार होत गेला आणि त्यातील अभूतपूर्व गतिमानतेमुळे त्याला क्रांतीचे स्वरूप प्राप्त झाले.

व्यापारी क्रांतीमुळे व्यापाराचा विस्तार होऊन व्यापारिवर्ग श्रीमंत झाला. या प्रक्रियेला त्या काळात दक्षिण अमेरिकेतून करण्यात आलेल्या मौल्यवान धातूंच्या आयातीनेही मोठा हातभार लावला. या आयातीमुळे संबंधित देशांत वस्तूंचे भाव वाढले, पण आनुषंगिक खर्चात त्या मानाने वाढ न झाल्यामुळे व्यापारिवर्गाचा फायदा अतोनात वाढला. व्यापारिवर्गाचे महत्त्व जसजसे वाढत गेले, तसतसे सरंजामशाही अर्थव्यवस्थेचे दिवस भरत गेले. अर्थात ही प्रक्रिया सर्वत्र एकसारखेपणाने व सुकरतेने तडीस गेली, असे मात्र नाही. काही देशांत सरंजामशाही सत्ताधार्यां नी व्यापारावर नियंत्रणे बसविण्याचा व व्यापारातील फायद्यावर आपला दावा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. अशा देशांत व्यापारिवर्गाला सरंजामशाही अर्थव्यवस्थेच्या पुरस्कर्त्यांशी झगडा द्यावा लागला. फ्रान्समध्ये हे घडले. अशा प्रकारच्या झगड्यांत शेवटी व्यापारिवर्गाचा विजय झाला. इंग्लंडमध्ये व्यापारिवर्गाला फार मोठा संघर्ष न करता आणि इतर देशांच्या तुलनेने लवकर आर्थिक स्थान व महत्त्व प्राप्त झाले. स्थूलमानाने १६४१–५१ या दशकात इंग्लंडमध्ये व्यापारिवर्ग प्रभावी होत गेला आणि या वर्गाच्या हितसंबंधांच्या दृष्टीने आर्थिक धोरणे ठरत गेल्यामुळे तेव्हापासून व्यापारी व औद्योगिक क्षेत्रांत इंग्लंडचे श्रेष्ठत्व प्रस्थापित होत गेले. व्यापाराला ग्रेट ब्रिटनने आपल्या उद्योगधंद्यांचे पाठबळही प्राप्त करून दिले. अंतर्गत उद्योगांवर बाह्य व्यापाराचा परिणाम पूरकच होईल, अशी दक्षता ग्रेट ब्रिटनने नेहमीच घेतली. व्यापारी क्रांतीमुळे ग्रेट बिटनमध्ये प्रथम व्यापारी भांडवलशाहीचा व नंतर औद्योगिक भांडवलशाहीचा पाया घातला गेला.

अलीकडील संशोधन असे दर्शविते, की औद्योगिक उत्पादनाचे तंत्र बदलण्यास ग्रेट ब्रिटनमध्ये सोळाव्या शतकाच्या मध्यापासूनच सुरुवात झाली होती. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत- म्हणजे एक महान औद्योगिक राष्ट्र म्हणून ब्रिटनला दर्जा प्राप्त होईपर्यंतच्या काळात ग्रेट ब्रिटनची आर्थिक प्रगती सातत्याने चालू होती आणि ती होत असताना व्यापार व उद्योग यांचा परस्परांवर अनुकूल असा प्रभाव पडत होता. या देशात व्यापारी क्रांती व उद्योग क्रांती या परस्परपूरक ठरल्या, असेच म्हणावे लागेल. एवढे मात्र खरे की, सोळाव्या-सतराव्या शतकांत व्यापार क्षेत्रात व नंतर औद्योगिक क्षेत्रात झालेल्या घडामोडींमुळे राष्ट्र-राज्यांचा व पुढे मोठ्या साम्राज्यांचा पाया घातला गेला.

व्यापारी क्रांतीचे परिणाम : जलदगतीने, सुरक्षित व नियमित होणारी रेल्वे वाहतूक, वाफेवर चालणारी जहाजे यांमुळे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेची जागा जागतिक अर्थव्यवस्थेने घेतली. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे परावलंबित्व वाढले आणि काही देशांमध्ये शत्रुत्वही निर्माण झाले. वाहतुकीच्या यांत्रिकीकरणामुळे अनेक देशांचे महत्त्व वाढले. अमेरिकेबरोबरच आशिया व आफ्रिका खंडांतील अनेक देश जागतिक अर्थव्यवस्थेच्या प्रक्रियेत सहभागी झाले. ग्रेट ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादित वस्तूंची वाहतूक होऊ लागली. जहाजबांधणी उद्योगालाही चालना मिळाली. यांत्रिक वाहतूक व दळणवळणाची वेगवान साधने यांमुळे ब्रिटिशांना अनेक देशांत वसाहती स्थापन करणे शक्य झाले. या वसाहतींमधून कारखान्यासाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध झाला आणि वसाहतींच्या रूपाने तयार मालाला मोठ्या बाजारपेठा मिळू लागल्या. पूर्वी लहानसहान वस्तूंचा व्यापार होत असे त्याची जागा कोळसा, यंत्रसामग्री, खाद्यपदार्थ व कच्च्या मालाने घेतली. व्यापारातील स्पर्धेची तीव्रता कमी करण्यासाठी संयुक्तीकरणाचे (कॉंबिनेशन) उपक्रम करावे लागले. नवीन अर्थनीती उदयाला येऊन गुंतवणुकीच्या नवीन व विस्तारित संधी निर्माण झाल्या. दळणवळणाच्या साधनांच्या सुलभतेमुळे नवीन व्यापारी संघटना उदयाला आल्या आणि दुसरी व्यापारी क्रांती यशस्वी झाली.

कारखानदारीमुळे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. एक प्रकारे सामाजिक क्रांती होऊन सामाजिक गतिशीलता वाढली. ग्रामीण भागात राहणारे लोक नोकरीधंद्यांनिमित्त शहरांकडे जाऊ लागले आणि त्यामुळे शहरे झपाट्याने वाढू लागली. व्यावसायिकांची, व्यापार्यांदची व वाहतूक व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. लोकांच्या स्थलांतराबद्दलचे सरकारी धोरण आमूलाग्र बदलले. थोडक्यात, जागतिक पातळीवर आर्थिक, औद्योगिक, सामाजिक व अन्य क्षेत्रांत सतत बदल होत राहिल्याने व्यापारी क्रांती ही कधीही न संपणारी प्रक्रिया बनली.

पहा : औद्योगिक क्रांती भांडवलशाही वसाहतवाद व्यापार साम्राज्यवाद.

संदर्भ : Knowles, L. C. A. The Industrial and Commercial Revolutions, London, 1961.

सहस्रबुद्धे, व. गो.