मिश्रपीकपद्धत : वेगवेगळी पिके वेगवेगळ्या शेतांत लावण्याऐवजी एकापेक्षा जास्त पिके एकाच शेतात लावण्याच्या पद्धतीला मिश्र पीक पद्धत असे नाव आहे. या पद्धतीत बहुतांशाने तृणधान्याची पिके व कडधान्याची पिके यांचे मिश्रण असते परंतु इतर पिकांचाही या पद्धतीत अंतर्भाव करतात. सर्वसाधारणपणे या पद्धतीत एकावेळी दोन पिके लावतात परंतु काही वेळा तीन, चार अगर त्यापेक्षाही जास्त पिके घेतली जातात.
या पद्धतीचा जिरायती, बागायती, व कायम स्वरूपाच्या पीक-मळ्यांमध्ये अवलंब केला जातो. ही पद्धत फार प्राचीन काळापासून चालत आली आहे. तिचे प्रमुख उद्देश पुढीलप्रमाणे आहेत : (१) उपलब्ध शेतीच्या क्षेत्रातील जागा, पाणी, खते आणि मजूर यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेणे (२) अवर्षण आणि रोग व किडीसारख्या प्रतिकूल परिस्थितीत होणारे संपूर्ण पिकांचे संभाव्य नुकसान वाचविणे (३) जमिनीची सुपीकता वाढविणे (४) शेतकऱ्यांच्या दैनंदिन गरजेची पिके एकाच शेतातून घेणे (५) शेतकऱ्याच्या रोजच्या खर्चासाठी लागणारा पैसा दुय्यम पिके विकून उभा करणे (६) रोग व किडींचे काही प्रमाणात नियंत्रण.
पद्धतीचे स्वरूप व प्रकार: या पद्धतीत एक मुख्य पीक असते व एक अगर जास्त दुय्यम पिके असतात. मुख्य पीक व दुय्यम पिकांचे परस्परांशी प्रमाण सर्वत्र सारखे नसते. काही ठिकाणी दुय्यम पिके मुख्य पिकांत अगदी तुरळक प्रमाणात पेरली जातात, तर काही ठिकाणी ते दुय्यम पिकाखालील क्षेत्र १५–२०% अगर त्याहून जास्त असते. सर्वसाधारणपणे दुय्यम पीक (१) तूर, उडीद, मूग, मटकी, हरभरा वा कुळीथ या कडधान्याच्या पिकांपैकी (२) भुईमूग, एरंडी यांसारख्या तेलबियांपैकी (३) कापूस, अंबाडी यांसारख्या धाग्याच्या पिकांपैकी अथवा (४) भाजीपाल्याच्या पिकांपैकी असते.
मिश्र पीक पेरण्याच्या एका पद्धतीत मुख्य पिकाच्या बियांत दुय्यम एक अथवा जास्त पिकांचे बी विशिष्ट प्रमाणात मिसळून पाभरीने ओळीत अथवा फोकून पेरतात. या पद्धतीचा वापर मर्यादित प्रमाणात केला जातो. सर्वसाधारणपणे मुख्य पिकात दुय्यम पीक स्वतंत्र ओळीत पेरतात. या पद्धतीला ‘आंतर पीक पद्धत’ असेही नाव आहे. बागायती पिकांत मुख्य पिकाच्या पाण्याच्या पाटाच्या बाजूला अथवा वाफ्यात ठराविक अंतरावर दुय्यम पिकाची लागण करतात.
फळबागांतून मिश्र पीक पद्धत सर्वत्र आढळून येते. काही ठिकाणी नारळ, सुपारी, फणस, आंबा, पेरू व संत्रे यांची झाडे एकाच बागेत लावलेली आढळून येतात परंतु पुष्कळ ठिकाणी झाडे पद्धतशीरपणे लावलेली नसतात. काही बागांतून पद्धतशीरपणे केळी, सुपारी, पानवेली, वेलदोडे अशा तऱ्हेने लावतात की, बागेतील जागेचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो. तसेच कॉफीच्या मळ्यात संत्रे अगर मिरवेलीची पद्धतशीरपणे लागवड केली जाते.
शेतीच्या लहान क्षेत्रात मिश्र पीक पद्धत विशेष फायद्याची ठरते. कारण स्वतःच्या लहान लहान गरजेपुरती पिके शेतकरी लहानशा क्षेत्रातून काढू शकतो. गुजरातेत बाजरीबरोबर तूर, मूग, अंबाडी, भेडी, एरंडी अशी पाच अगर सहा पिकांचे थोडे थोडे बी मिसळून पेरतात. यामुळे त्या पिकांचे शेतकऱ्याच्या गरजेपुरते उत्पन्न एकाच शेतातून मिळते. डोंगराळ भागात जंगल तोडून व जाळून शेती करतात [→ फिरती शेती]. तेथेही भात, मका, टॅपिओका, अळू, तीळ, घेवडे, गोराडू यांसारखी आवश्यक पिके मिश्र पीक पद्धतीने लावतात.
तृणधान्ये व कडधान्याची पिके यांच्या मिश्रणामुळे जमिनीची सुपीकता वाढते व इतरही उद्देश साध्य होतात. दख्खन भागात बाजरीच्या तीन ओळींबरोबर तुरीची एक ओळ लावतात. विदर्भात कापूस व तूर हे मिश्र पीक घेण्याची पद्धत आहे. कापूस व बाजरी लवकर तयार होत असल्याने ती काढून घेतल्यावर तुरीच्या झाडांना त्यांचा विस्तार करण्यास भरपूर जागा मिळते. तुरीच्या झाडांच्या मुळ्यांवरील नायट्रोजनयुक्त गाठींमुळे जमिनीला नायट्रोजनचा पुरवठा होतो व जमीन सुधारते. बाजरी आणि तूर मिश्रणात जमिनीच्या वेगवेगळ्या थरांतून अन्नांश घेतला जातो, कारण बाजरीची मुळे जमिनीच्या वरच्या थरांतून अन्नांश घेतात व तुरीची मुळे खोल जात असल्यामुळे ती जमिनीच्या खालच्या थरातून अन्नांश घेतात. अलीकडे केलेल्या प्रयोगांवरून आढळून आले आहे की, की तूर व बाजरी यांचे स्वतंत्र पीक म्हणून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा त्यांच्या मिश्र पिकाचे उत्पन्न जास्त मिळते. भाताच्या पिकात वालाचे पीक घेतात. भाताची कापणी केल्यावर वालाचे पीक जमिनीतील ओलीवर वाढते व ते कडधान्याच्या वर्गातील पीक असल्यामुळे जमीन सुधारते. ज्वारीच्या पिकात उडीद पेरतात, त्यात दोन उद्देश साध्य होतात. उडदाच्या पिकामुळे जमीन सुधारते व ज्वारीपेक्षा ते पीक लवकर तयार होत असल्यामुळे ते विकून खर्चासाठी पैसा मिळतो.
बागायती पिकात जी दुय्यम पिके लावतात त्यांपासून खेतकऱ्याला अधूनमधून पैसे मिळतात. कोबी, नवलकोल, फुलवर, सालीट व बीट यांच्या मिश्र पिकात प्रथम नवलकोल, नंतर क्रमाने कोबी, बीट व फुलवर असे तोडे निघतात. यामुळे रिकामी पडली असती अशी जागा वापरली जाऊन पिकाच्या विक्रीमुळे अधूनमधून थोडी थोडी रक्कम शेतकऱ्याला मिळते.
वैरणीच्या पिकात द्विदल वनस्पती (उदा., मक्याच्या पिकात चवळी, जोंधळ्यात गवार, जवामध्ये वाटाणा) पेरल्यास वैरणीची चव सुधारते व तिच्यातील प्रथिनांच्या प्रमाणात वाढ होते. गवताच्या कुरणात द्विदल वनस्पती वाढू दिल्यास हाच फायदा होतो.
पंजाबात कापसाच्या पिकावरील मूळकूज रोगाचे अंशतः नियंत्रण करण्यासाठी कापसामध्ये मटकीचे पीक घेण्याची शिफारस करण्यात येते. मटकीच्या पिकामुळे जमीन झाकली जाते व त्यामुळे जमिनीचे तापमान कमी राहून मूळकूज रोगाचे अप्रत्यक्ष रीत्या नियंत्रण होते.
दुय्यम पिकाची निवड: मिश्र पीक पद्धतीतील दुय्यम पिकामुळे मुख्य पिकाच्या वाढीला अडथळा होता कामा नये शक्यतोवर ते कडधान्याच्या वर्गातील असावे व मुख्य पिकाच्या आधी अथवा मागाहून कापणीसाठी यावे. मुख्य व दुय्यम पिकांच्या वाढीच्या सवयी व पोषणाच्या गरजा वेगवेगळ्या असाव्यात तसेच मुळ्यांची खोली व त्यांचा बाजूचा प्रसार याबाबतीत दोन्ही पिकांत भेद असावेत.
मिश्र पीक पद्धतीतील दोष : मिश्र पीक पद्धतीचे वर नमूद केलेले फायदे आहेत तसेच काही तोटेही आहेत. त्यामुळे या पद्धतीचा सर्रास वापर करणे शक्य नसते. या पद्धतीत यांत्रिक अवजारांचा वापर करणे शक्य होत नाही. निरनिराळी पिके निरनिराळ्या वेळी कापणीसाठी येतात व कापणीच्या मजुरीचा खर्च वाढतो. कोरडवाहू शेतीत पिकाच्या कापणीनंतर जमिनीतील ओलीचा फायदा घेऊन लागलीच जमीन नांगरणे आवश्यक असते परंतु मिश्र पीक पद्धतीत सर्व पिके एकाच वेळी कापणीसाठी येत नसल्याने हे शक्य होत नाही. उशिरा तयार होणाऱ्या पिकांच्या कापणीपर्यंत अगोदरच्या पिकाच्या कापणीमुळे रिकामी झालेली जमीन वाळून तडकते आणि नांगरणीचे काम कष्टाचे होते. या पद्धतीतील पिकांची निवड काळजीपूर्वक न केल्यास रोग किडी यांच्या प्रमाणात वाढ होण्याचा संभव असतो.
ज्यांचे शेतीचे क्षेत्र मर्यादित आहे त्यांच्यासाठी मिश्र पीक पद्धत निश्चितच फायद्याची आहे.
महाराष्ट्रातील मिश्र पीक पद्धतीचे प्रमुख प्रकार : (१) विदर्भ, मराठवाडा व खानदेश (जिरायत) : ज्वारी व उडीद बाजरी आणि मटकी अथवा मूग कापूस (१०–१५ ओळी) व तूर (१ ते २ ओळी) व अधून मधून अंबाडी वा तीळ कापूस (८ ओळी) व ज्वारी (२ ओळी). (२) दख्खन भाग (जिरायत) : बाजरी (५–६ ओळी) व तूर (१ ओळ) व अधून मधून अंबाडी खरीप ज्वारी (३–४ ओळी) व तूर (१ ओळ) रबी जोंधळा (८ ओळी), करडई (४ ओळी) व हरभरा गहू व हरभरा ३:१ प्रमाणात व अधून मधून मोहरी. (३) बागायती पिके : भेंडी व जोंधळा (एकाआड एक ओळ) वाफ्यात कोबी व फुलवर (दोन्ही एकाच ओळीत अथवा एकाआड एक ओळीत) व पाण्याच्या पाटाच्या कडेने कोबी, नवलकोल, मुळा, बीट व सालीट आले वाफ्यात ओळीत आणि गोराडू दर ३·५ मी. अंतरावर ओळीत उसाच्या मुख्य पिकात बरंब्याच्या बाजूला भेंडी, जोंधळा, टोमॅटो, काकडी, मिरची, कांदा व भात हळदीच्या मुख्य पिकात मका, भेंडी, ज्वारी व मिरची.
संदर्भ : 1 . Aiyer, A. K. Y. N. Principles of Crop Husbandry in India, Bangalore, 1957.
2. Vaidya. V. G Sahasrabuddhe, K. R. Khuspe, V. S. Crop Production and Field Experimentation, Poona, 1972.
३. कुलकर्णी, कृ. सु. आमची शेती, पुणे, १९५०.
रहाटे, वि. ता. गोखले, वा. पु.
“