मिशिगन : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील उत्तरेकडील एक राज्य. पंचमहासरोवरांच्या प्रदेशातील या राज्याच्या भूभागाचे क्षेत्रफळ १,५०,७७९ चौ.किमी. आहे. जलाशयांनी ९९,९०९ चौ. किमी. प्रदेश व्यापला असून सुपीरिअर सरोवरातील रॉयल, ह्यूरन सरोवरातील ड्रमंड व मिशिगन सरोवरातील बीव्हर इ. मोठ्या आणि त्यांच्या जवळच्या लहान बेटांचाही समावेश या राज्यात होतो. राज्याची लोकसंख्या ९२,६२,०७८ (१९८०) असून लॅनसिंग (१,३०,४४४) हे राजधानीचे ठिकाण आहे. मॅकिनॅक सामुद्रधुनीमुळे या राज्याचे उत्तर व दक्षिण द्वीपकल्प असे दोन भाग झाले आहेत. उत्तर द्वीपकल्पाच्या पश्चिमेस व उत्तरेस सुपीरिअर सरोवर, दक्षिणेस विस्कॉन्सिन राज्य व मिशिगन सरोवर, पूर्वेस कॅनडातील आँटॅरिओ राज्याच्या सरहद्दीवर सेंट मेरी नदी आहे. दक्षिण द्वीपकल्पाच्या दक्षिणेस इंडियाना, ओहायओ ही राज्ये, पश्चिमेस मिशिगन सरोवर, उत्तरेस मिशिगन व ह्यूरन सरोवरांना जोडणारी मॅकिनॅक सामुद्रधुनी, पूर्वेस ह्यूरन व ईअरी सरोवरे व त्यांना जोडणाऱ्या डिट्रॉइट व सेंट क्लेअर नद्या आहेत.

भूवर्णन: राज्याचा बराचसा भाग जलाशयांनी व्यापलेला आहे. भूरचनेच्या दृष्टीनेही या दोन द्वीपकल्पांत भिन्नता आढळते. दक्षिण द्वीपकल्पाच्या समावेश देशाच्या कमी उंचीच्या व गाळाच्या प्रदेशात होतो. हा प्रदेश भूखंड हिमवाहांमुळे बनलेला असून या भागात गाळाचे संचयन मोठ्या प्रमाणात झालेले दिसून येते. तसेच नद्यांच्या खोऱ्यांचा सुपीक प्रदेश शेतीसाठी फार महत्त्वाचा आहे. हा भाग जिप्सम, चुनखडक, वाळूचे दगड, मीठ, खनिज तेल, वाळू व रेती इत्यादींच्या खाणींसाठी तसेच कारखानदारीसाठी प्रसिद्ध आहे.

उत्तर द्वीपकल्पाचा पश्चिम भाग प्रामुख्याने लॉरेन्शिअन पठाराचा, कँब्रियनपूर्व काळातील खडकांनी बनलेला आहे. हे द्वीपकल्प ‘सुपीरिअर हायलँड’ या नावानेही ओळखले जाते. याच्या पश्चिम भागात अनेक लहानलहान पर्वतरांगा असून त्यांपैकी ह्यूरन मौंटन्स, मनॉमनी, आयर्न रेंज, गोगीबिक रेंज, पॉर्क्युपाइन मौंटन्स व कॉपर रेंज या प्रमुख आहेत. राज्यातील सर्वोच्च शिखर (६१५ मी.) पॉर्क्युपाइन मौंटन्समध्ये आहे. हा भाग जंगलव्याप्त असून तांबे (कॉपर रेंज परिसर) आणि लोह यांच्या खनिजांसाठी प्रसिद्ध आहे. याच्या पूर्वेकडील कमी उंचीचा काही प्रदेश दलदलयुक्त असून त्याच्या पूर्वभागातून मिशिगन सरोवराला समांतर असा चुनखडकांचा ‘नायगारा डोंगर (क्वेस्टा)’ पसरलेला आहे.

हे राज्य महासरोवरांच्या प्रदेशात असल्याने येथील नद्या लांबीने खूपच कमी आढळतात. उत्तर भागातील नद्यांवर अनेक धबधबे व द्रुतवाह दिसून येतात. राज्यात ग्रँड, मस्कीगन, मॅनिस्टी, ह्यूरन, टक्वामनन, सेंट मेरी, डिट्रॉइट, सेंट क्लेअर इ नद्या महत्त्वाच्या आहेत.

  हवामान : येथील हवामान खंडीय प्रकारचे असले, तरी सरोवरांच्या सान्निध्यामुळे स्थलपरत्वे हवामानात फरक आढळतो. येथील हिवाळे थंड असतात. उत्तर द्वीपकल्पाच्या उत्तर भागात जानेवारीतील तपमान −१२ से., तर दक्षिण द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात −३° से. असते. उन्हाळे कडक असतात. जुलै महिन्यांचे सरासरी तापमान १५° ते २१° से. पर्यंत असते. आग्नेय भागातील डिट्रॉइट या शहराचे तापमान जानेवारीत −४०° से., तर जुलैमध्ये २३° से. असते. उत्तर भागातील सू सेंट मेरी येथे जानेवारीतील तापमान −११° से., तर जुलैमधील तापमान १७° से. असते. उत्तर द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात व दक्षिण द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात वार्षिक सरासरी ७५ ते ८८ सेंमी. पाऊस पडतो, तर दक्षिण द्वीपकल्पाच्या उत्तर व उत्तर द्वीपकल्पाच्या पूर्व भागात ६० ते ७५ सेंमी. पाऊस पडतो.

वनस्पती व प्राणी : राज्याच्या पश्चिम भागातील पर्वतप्रदेश तसेच संपूर्ण उत्तर भाग जंगलांनी व्यापलेला आहे. येथील जंगलांत प्रामुख्याने मॅपल, व्हाइट पाइन, हेमलॉक, ओक, बर्च, एल्म, स्प्रूस, बासवुड इ. वृक्षप्रकार तसेच वेगवेगळी फुलझाडे आढळतात. यांशिवाय जंगलात ब्लॅकबेरी, रासबेरी, ब्लूबेरी, गूजबेरी, जंगली द्राक्षे इ. फळांचे प्रकारही मुबलक दिसून येतात. थंड हवामान व विपुल जंगले यांमुळे फरधारी प्राणी भरपूर आहेत. एकोणिसाव्या शतकात फर व्यापाऱ्यांनी येथील प्राण्यांची बेसुमार कत्तल केली, तसेच खनिज उत्पादनासाठी व शेतीसाठी बहुतेक जंगले साफ करण्यात आली. येथील जंगलांत हरणे काळी अस्वले, मूस, एल्क, ससे, बीव्हर, कायोट, स्कंक, चिचुंदरी, वीझल, ऊद मांजर, रॅकून, ऑस्पॉस्सम, वीझू, बॉबकॅट इ. प्राणी आढळतात. बहुतेक पक्षी इतर राज्यांतून येतात. फेझंट, वुडकॉक, तितर, जंगली हंस, वेगवेगळ्या प्रकारची बदके इ. पक्षी सर्वत्र आढळतात. नद्या, सरोवरांत प्रामुख्याने पर्च, ट्राउट, बास, क्रॅपी, पाइक इ. मासे सापडतात. जंगली श्वापदांची व सरोवरांतील वेगवेगळ्या प्रकारच्या माशांची शिकार करणे हा येथील लोकप्रिय खेळ आहे. अलीकडच्या काळात जंगले वाढविण्याच्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

चौंडे, मा. ल.


 इतिहास व राज्यव्यवस्था : उत्तर मिशिगन द्वीपकल्पातील इंडियन लोकांची वस्ती सु. ३,००० वर्षांपूर्वीपासूनची असावी. तेथील खाणींतून ते तांब्याचे उत्पादन घेत असत. दक्षिण द्वीपकल्पातील होपवेल इंडियन जमातीची वस्ती नंतरची असावी. यूरोपियनांच्या आगमनापूर्वी या प्रदेशात अल्गाँक्वियन भाषा बोलणाऱ्या इंडियन जमाती राहत होत्या. सतराव्या शतकाच्या प्रारंभी कॅनडातून फ्रेंच संशोधक, व्यापारी आणि मिशनरी या प्रदेशात आले. त्यांत एत्येन ब्र्यूले हा संशोधक (१६१८), झां नीकॉले हा नैर्ऋत्य प्रदेशाचा समन्वेषक आणि रॉबेर काव्हल्ये यांचा अंतर्भाव होता. त्यावेळी मॅकिनॅक बेट हे फर उद्योगाचे केंद्र होते. १७०१ मध्ये सध्याच्या डिट्रॉइट शहराची फोर्ट पाँचरट्रेन नावाने स्थापन करण्यात आली. आंत्वान कादेयाक हा त्याचा संस्थापक. १७५४–६३ दरम्यान झालेल्या युद्धात फ्रेंचांचा पराभव होऊन हा प्रदेश ग्रेट ब्रिटनच्या ताब्यात आला. स्थानिक इंडियन लोकांचा ब्रिटिशांना विरोध होता, म्हणून त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध मोठा उठावही केला (१७६३). १७६६ पर्यंत हा उठाव मोडण्यात आला. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात येथील इंडियनांनी ब्रिटिशांना पाठींबा दिला. पॅरिसच्या तहानंतरदेखील (१७८३) डिट्रॉइट व मॅकिनॅक शहरांवर काही वर्ष ब्रिटिशांचा ताबा राहिला. १७८७ च्या अध्यादेशानुसार मिशिगन हा वायव्य प्रदेशाचा (नॉर्थ-वेस्ट टेरिटरी) एक भाग बनला. पुढे १८०५ मध्ये मिशिगन प्रदेश अस्तित्वात आला व डिट्रॉइट ही त्याची राजधानी करण्यात आली. १८१२ सालच्या युद्धात तेथील इंडियन जमात ब्रिटिशांच्या बाजूनेच लढली. अमेरिकेचा या युद्धात पराभव होऊन मॅकिनॅक व डिट्रॉइट ही दोन्ही शहरे ब्रिटिशांच्या ताब्यात आली. नंतर मात्र जनरल विल्यम हल व विल्यम हॅरिसन यांनी ब्रिटिशांचा पराभव करून या शहरांवर पुन्हा अमेरिकेचा अंमल बसविला. १८१३–३१ या काळात मिशिगनचा गव्हर्नर जनरल ल्यूइस कॅस यांच्या प्रयत्नामुळे इंडियन जमातींना पश्चिमेकडे हुसकण्यात आले व त्यांच्याकडील जमिनी विकत घेण्यात आल्या, त्याचप्रमाणे लष्करी महामार्ग बांधण्यात आले. ईअरी कालवा वाहतुकीस खुला करण्यात आला (१८२५) व महासरोवरातून वाफेवर चालणाऱ्या बोटींनी वाहतुक सुरू झाली. शेतीचा विकास होत गेला, नदीकाठच्या परिसरात लाकूड कापण्याच्या गिरण्या उभ्या राहिल्या.

  मिशिगनला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात ओहायओ व इंडियाना राज्यांनी प्रादेशिक लोभाने विरोध केला. गुलामगिरीचा पुरस्कार करणाऱ्या दक्षिणेकडील राज्यांचाही त्यास विरोध होता. परिणामतः संघशासनाच्या संमतीशिवायच लोकांनी स्वतंत्र शासनयंत्रणा उभी केली. प्रादेशिक देवघेवीचा प्रश्न पुढे काहीसा मिटविण्यात आला व डेमॉक्रॅटिक पक्षनेत्यांच्या संमतीने १८३७ मध्ये संघराज्यातील सव्विसावे राज्य म्हणून मिशिगन अस्तित्वात आले. १८४७ पर्यंत डिट्रॉइट व नंतर लॅनसिंग ही या राज्याची राजधानी झाली.

राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर अनेक दिशांनी राज्याचा नियोजनपूर्वक विकास करण्यात आला. सडका, लोहमार्ग, कालवे बांधण्यात आले. १८३७ मध्ये राज्यातील नैसर्गिक साधनसंपत्तीचे सर्वेक्षण करण्यात आले. लाकूडउद्योगाचाही विकास झाला. १८५४ मध्ये राज्यात रिपब्लिकन पक्षाची शाखा स्थापन करण्यात आली. यादवी युद्धात हे राज्य संघशासनाच्या बाजूने लढले. १८८० नंतरच्या काळात या राज्यात शेतकऱ्यांची चळवळ उदयास आली. भरमसाट वाहतूक खर्च व अन्नधान्य साठवणाचा जाचक दर, तसेच भूसुधारणांची निकड ही तिची कारणे होत. ‘ग्रेंजर मूव्हमेंट’ व ‘ग्रीनबॅक पार्टी’ या राजकीय संघटनांचा तीतून उदय झाला. खाण व लाकूड उद्योगांतील कामगार आणि शेतकरी यांच्या पाठिंब्याने १८८२ मध्ये डेमॉक्रॅटिक पक्षाचा राज्यपाल निवडून आला. कामगारविषयक अनेक सुधारणा-कायदे नंतरच्या काळात करण्यात आले. पुढे लाकूड उद्योगास अवकळा आली आणि मोटार उद्योगास-विशेषतः मिशिगन आणि डिट्रॉइट शहरांतून-फार मोठी चालना मिळाली. १९०३ मध्ये हेन्री फोर्ड याने ‘फोर्ड मोटार कंपनी’ स्थापन केली. मागोमागच जनरल मोटर्स आणि क्राइस्‌लर कॉर्पोरेशन यांचीही स्थापना झाली. मोठ्या प्रमाणावरील औद्योगिक उत्पादनाला सुरुवात झाली. दुसऱ्या महायुद्धकाळात या राज्यात रणगाडे, विमाने व इतर युद्धसाहित्य यांचे प्रचंड उत्पादन करण्यात आले. १९५९ मध्ये सेंट लॉरेन्स समुद्रमार्ग खुला झाला व निर्यात व्यापारास चालना मिळाली.


डिट्रॉइट शहरात १९६७ मध्ये हिंसक वांशिक दंगली झाल्या. १९७१ मध्ये शाळांतील वांशिक पृथक्‌वासनाच्या प्रश्नावरून तसाच उद्रेक झाला. १९७१ मध्ये फेडरल कोर्टाने वांशिक पृथक्‌वासनाच्या विरुद्ध निर्णय दिला. डिट्रॉइट शहरातील पहिला कृष्णवर्णीय महापौर कोलमन यंग (१९७३) हा होय. राज्यात कामगारांचे लढे, वांशिक संघर्षाचे आणि औद्योगिक परिसरातील प्रदूषणाचे प्रश्न वरचेवर निर्माण होतात. यांबाबत कायदेशीर उपायही योजण्यात येत आहेत.

राज्याचे विद्यमान संविधान १ जानेवारी १९६४ पासून अंमलात आले. द्विसदनी विधिमंडळापैकी सिनेटमध्ये ३८ सदस्य (मुदत ४ वर्षे) व प्रतिनिधिगृहात ११० सदस्य (मुदत २ वर्षे) आहेत. गव्हर्नर व लेफ्टनंट गव्हर्नर हे ४ वर्षांसाठी निवडण्यात येतात. १८ वर्षावरील सर्व नागरीकांना मतदानाचा हक्क आहे. संघराज्याच्या काँग्रेसवर या राज्यातर्फे २ सिनेटर व १८ प्रतिनिधी निवडले जातात. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत (१९८४) रिपब्लिकन पक्षाला अधिक मते या राज्यात पडली. राज्यात ८३ परगणे आहेत.

राज्याच्या संविधानानुसार धर्म, वर्ण किंवा मूळ राष्ट्रीयत्व या कारणांसाठी कोणत्याही नागरिकास नागरी व राजकीय हक्कांपासून वंचित करता येत नाही. राज्यात गेल्या शतकाच्या उत्तरार्धापासूनच नागरी हक्कांसंबधी वेळोवेळी अधिनियम करण्यात आले. या दृष्टीने १८८५, १९४१ या वर्षातील अधिनियम महत्त्वाचे आहेत. या सर्व कायद्यांचा उद्देश निवासस्थाने व रंजनकेंद्रे, शासकीय सेवा, शैक्षणिक संस्था, विमा कंपन्या इ. क्षेत्रांत धर्म, वर्ण राजकीय विचारप्रणाली यांसारख्या कारणांनी कोणत्याही नागरिकाच्या बाबतीत भेदाभेद करण्याच्या वृत्तीस आळा घालण्याचा आहे. १९५१ साली या राज्यात एक-सदस्य ज्यूरी पद्धत पुन्हा सुरू करण्यात आली.

येथील उच्च न्यायालयात ८ वर्षे मुदत असलेले ७ न्यायाधीश असतात. त्याखेरीज अपील न्यायालये, जिल्हा न्यायालये इ. असून राज्यातील ‘जस्टिस ऑफ द पीस’ च्या पद्धतीऐवजी स्थानिक न्यायालये निर्माण करण्यात आली आहेत.

आर्थिक स्थिती : राज्यातील एक-तृतीयांश भूमिक्षेत्र शेतीखाली आहे. दक्षिण द्वीपकल्पाच्या दक्षिणार्धातच शेती व्यवसाय एकवटलेला असून पशुपालन आणि त्यासाठी आवश्यक असलेली कुरणे हेही राज्याचे वैशिष्ट्य आहे. १९८२ साली राज्यात १०,११,७०० हे. क्षेत्र शेतीखाली होते. त्या वर्षीचे शेतीचे उत्पादन मूल्य १६८·७६ कोटी डॉ., तर पशुधन आणि पशु-उत्पादने ११७·५० कोटी डॉ. होते. मका, गहू , सोयाबीन, वैरण ही महत्त्वाची उत्पादने होत. १९८४ साली देशातील पशुधनाची आकडेवारी पुढीलप्रमाणे (आकडे हजारांमध्ये) : मेंढ्या ११० दुभत्या गायी ४०२, तर बदके, कोंबड्या आणि टर्की यांची संख्या अनुक्रमे १,२५० ७,५०० व ३८ (१९८३) होती. त्याच वर्षीचे लोकरीचे उत्पादन ९,०२,००० पौंड होते.

राज्याचे निम्मे क्षेत्र हे जंगलव्याप्त असून त्यापैकी ७०,७१,९०० हे. क्षेत्रातील जंगलांपासून व्यापारी उत्पादन घेतले जाते. राज्यातील २०% क्षेत्र राज्यशासनाच्या मालकीचे, १४% क्षेत्र संघराज्याच्या मालकीचे व उर्वरित खाजगी मालकीचे आहे. मॅपल, ओक, बर्च इत्यादींचे लाकूड जंगलातून मिळते. तथापि लाकूड उद्योग आता मागे पडलेला आहे. तसेच दक्षिणेत फार मोठी जंगलतोड झाल्याने तेथे शेती व पशुपालन हे व्यवसाय वाढले आहेत. ख्रिसमस वृक्षही (फर) येथील जंगलात वैपुल्याने आढळतो.

उद्यान-उपवने या बाबतीत हे राज्य अग्रेसर आहे. राज्यात एकूण ७९ उद्याने, ३३ प्रांतिक अरण्ये, ३ राष्ट्रीय अरण्ये व ३ राष्ट्रीय उद्याने आहेत. यांशिवाय सहली-शिकारीची केंद्रेही अनेक आहेत.


राज्यातील मत्स्योत्पादनही कमी झाल्याचे दिसून येते. व्हाइट फिश, छब आणि ट्राउट इ. जातीचे मासे सरोवरातून मिळतात.

निर्मिती उद्योग हा या राज्याचा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. बहुसंख्य कामगार निर्मिती उद्योगात गुंतलेले आहेत. १९८३ मध्ये एकूण कामगारसंख्या ४२,१६,००० असून त्यांपैकी ९,३२,०८० कामगार निर्मिती उद्योगांत होते. मोटार उद्योगातील कामगारांची संख्या मोठी असली, तरी ती राष्ट्रीय अर्थव्यवस्थेनुसार वरचेवर कमीअधिक होत रहाते. दुसऱ्या महायुद्धानंतर निर्मिती उद्योगांची वेगाने वाढ झाली. त्यांची विद्यमान संख्या सु. १५,००० आहे. महामार्गाच्या व इतर दळणवळणाच्या वाढत गेलेल्या सुविधांमुळे उद्योगधंद्यांचे हळूहळू विकेंद्रीकरण होऊ लागले आहे. राज्याचा दक्षिण भाग औद्योगिक दृष्ट्या प्रगत आहे. डिट्रॉइटचा परिसर मोटारगाड्या, यंत्रे, पोलाद, धातु-उत्पादने, औषधे, रसायने इ. उद्योगधंद्यांसाठी प्रसिद्ध आहे. राज्याची राजधानी असलेल्या लॅनसिंगचा परिसर मोटारगाड्या, फर्निचर, एंजिने, गृहोपयोगी वस्तू इ. उद्योगधंद्यांनी गजबजलेला आहे. कॅलामाझू-जॅक्सन शहरांच्या परिसरात मोटारींचे सुटे भाग, कागदवस्तू, औषधे, अन्नप्रक्रिया इ. उद्योग विकसित झालेले आहेत. याशिवाय छपाई आणि प्रकाशन, सिमेंट, काचसाहित्य, कागद, रबर, प्लॅस्टिक, तयार कपडे इ. उद्योगधंदेही राज्यात सुस्थिर झालेले आहेत.

राज्यात १९८० मध्ये पक्क्या सडका १५,२८८ किमी. व लोहमार्ग ९,९०२ किमी. लांबीचे होते. त्याच वर्षी राज्यातील अधिकृत विमानतळांची संख्या २०५ होती.

लोक व समाजजीवन: या राज्यातील आद्य यूरोपीय वसाहतकार म्हणजे फ्रेंच मिशनरी होत. त्यांची वस्ती डिट्रॉइट शहराभोवती होती. एकोणिसाव्या शतकात जर्मन वसाहतकार मोठ्या संख्येने येथे आले. यादवी युद्धकाळात आयरिश आणि डच, नंतर लाकूड व खाणकामाच्या उद्योगांसाठी यूरोपीय आणि कॅनडियन लोक या प्रदेशात आले. डिट्रॉइटच्या औद्योगिक विकासकाळात पोलंड, इटली, रशिया येथूनही कामाच्या शोधात लोक येत राहिले. दोन महायुद्धांच्या काळात औद्योगिक क्षेत्रात मनुष्यबळाची गरज होती. त्यासाठी दक्षिणेकडील संस्थानांतून कृष्णवर्णीय निग्रो लोक राज्यात आले. १९८० च्या सुमारास राज्यात कृष्णवर्णीय निग्रोंची संख्या एकूण लोकसंख्येच्या १२% होती. त्यांची वस्ती मुख्यतः डिट्रॉइट व मिशिगन या शहरांभोवती आहे. स्पॅनिश भाषिक लोकही या राज्यात आहेत.

रोमन कॅथलिक पंथीयांची संख्या सर्वांत जास्त होती. (२०,०४,२८८–१९७९). त्याखालोखाल ल्यूथरपंथीय (५ लक्ष), युनायटेड मेथडिस्ट (२,७८,२४५), युनायटेड प्रेसबिटेरियन (१,५५,८६४) इ. पंथाचे लोक आढळतात. ज्यू आणि कृष्णवर्णीय मुस्लिम लोकही, विशेषतः डिट्रॉइट शहराच्या परिसरात एकवटलेले आहेत. राज्यात ६ ते १६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी सक्तीचे शिक्षण आहे. १९८२–८३ मध्ये राज्यात प्राथमिक व माध्यमिक शाळांची एकूण संख्या ५७३ होती व त्यांत १७,४२,८३१ विद्यार्थी व ७८,८१४ शिक्षक होते.राज्यात एकूण ९ विद्यापीठे आहेत. त्यांत तंत्रविद्येचे विद्यापीठही अंतर्भूत होते. याशिवाय अनेक मोठी महाविद्यालये राज्यात आहेत. सबंध अमेरिकेत संगीत, नाटक व तत्सम ललित कला यांच्या शिक्षणासाठी मिशिगन विद्यापीठाचा ‘नॅशनल म्यूझिक कँप’ प्रसिद्ध आहे. आधुनिक तंत्रविद्येतील अत्यंत प्रगत शिक्षणाचे केंद्र म्हणून मिशिगन जगप्रसिद्ध आहे. मोटार उद्योगातील संशोधन विशेष महत्त्वाचे आहे. राज्यातील फोर्ड (डिअरबॉर्न), जनरल मोटर्स (डिट्रॉइट), पार्क डेव्हीस (डिट्रॉइट) या प्रसिद्ध कंपन्यांची तांत्रिक ग्रंथालये उल्लेखनीय आहेत.


राज्यात कल्याणकारी सेवेचा स्वतंत्र शासकीय विभाग आहे. त्याच्यामार्फत ६५ वर्षे वयावरील वृद्धांना आर्थिक साहाय्य देण्याची तरतूद करण्यात येते. निराधार किंवा परावलंबी मुलांनादेखील समाजकल्याण कार्यक्रमाचा भाग म्हणून आर्थिक मदत देण्यात येते. राज्यात १९८१ साली २३६ रूग्णालये होती व त्यांत ४१,००० खाटांची सोय होती. याखेरीज ११ मनोरुग्णालये, तेवढीच अपंगांच्या उपचाराची केंद्रे आणि मनोरुग्ण मुलांसाठी ५ केंद्रे आहेत. १९५७ सालापासून काही विशिष्ट रुग्णांसाठी मोफत वैद्यकीय सेवा व रुग्णालयीन उपचार कार्यक्रम सुरू करण्यात आला. १९६६ साली वैद्यकीय मदतीचा अधिक व्यापक व मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला. वैद्यकीय खर्चासाठी गरजूंना त्यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक साहाय्य देण्यात येते.

डिट्रॉइटमधील संग्रहालयातील ऐतिहासिक कागदपत्रांचा संग्रह प्रसिद्ध आहे. राज्यात सु. ५० दैनिके प्रसिद्ध होतात. २० दूरचित्रवाणी केंद्रे व २०० नभोवाणी केंद्रे राज्यात आहेत. नौकानयन, पोहणे, पाण्यावरील स्कीइंग, मासेमारी, शिकार, गोल्फ, टेनिस इ. खेळ व छंद राज्यात लोकप्रिय आहेत. बर्फावरील अनेक प्रकारचे खेळही प्रचलित आहेत.

राज्यातील सण व उत्सव यांचा वसाहतकालीन दंतकथांशी (उदा., पॉल बन्यन आणि हाइआवाथा यांच्या दंतकथा) निगडीत आहेत. जुलै महिन्यातील ‘नॅशनल चेरी’ आणि मे महिन्यातील ‘ट्यूलिप टाइम’ हे विशेष महत्त्वाचे व लोकप्रिय उत्सव होत. मिशिगन राज्य मोटारगाड्यांच्या निर्मितीसाठी जगप्रसिद्ध आहे. या उद्योगातील जगप्रसिद्ध प्रवर्तक हेन्री फोर्ड, जनरल मोटर्सचे विल्यम ड्युरँट, क्राइस्लर कॉर्पोरेशनचे वॉल्टर क्राइस्लर इत्यादींनी या राज्याला मोटारवाहन उद्योगात जागतिक आघाडी मिळवून दिली. या उद्योगात गुंतलेली राज्यात अनेक शहरे आहेत. लॅनसिंग हे राजधानीचे व औद्योगिक केंद्र, तर डिट्रॉइट (लोकसंख्या १२,०३,३३९–१९८०) हे राज्यातील सर्वांत मोठे शहर आहे. वाहने तयार करणारी जगाची राजधानी म्हणून हे शहर प्रसिद्ध आहे. यांशिवाय ग्रँड रॅपिड्‌स (१,८१,८४३), वॉरन (१,६१,१३४), फ्लिंट (१,५९,६११), डिअरबॉर्न (९०,६६०), वेस्टलंड (८४,६०३), कॅलामाझू (७९,७२२), पाँटिॲक (७६,७१५) इ. शहरे औद्योगिक व व्यापारदृष्ट्या प्रसिद्ध आहेत. दक्षिणेकडील मिशिगन सरोवराच्या काठावरील पुळणी निसर्गरमणीय आहेत.

राज्यात शासकीय अखत्यारीतील ८० उद्याने आहेत. उत्तरेकडील पडीक जमीन सहलीची व मनोरंजनाची केंद्रे म्हणून विकसित करण्यात येत आहे. राज्यातील ऑइल नॅशनल पार्क प्रसिद्ध आहे. सरोवरे व त्यांच्या काठावरील पुळणी या विविध प्रकारच्या खेळांची तसेच सहलीची केंद्रे आहेत.

जाधव, रा. ग.