भिगू मिशमी मिशमी : भारतातील एक आदिम जमात. त्यांची वस्ती अरुणाचल प्रदेशातील मुख्यतः ईशान्य-सीमा प्रांताच्या लोहित जिल्ह्यातील नद्यांच्या खोऱ्यात तसेच मिशमी टेकड्या व दाट जंगलात आढळते. यांची लोकसंख्या १९७१ च्या शिरगणतीनुसार ८४० होती. मिशमी जमातीचे चार पोट विभाग आहेत : चुलिकट्टा, बिबिजिया, डिग्रू आणि भिगू किंवा मिदिह.

हे लोक बुटके असून गोरा वर्ण, रुंद चेहरा आणि बसके नाक ही त्यांची काही मंगोलॉइडसदृश शारीरिक वैशिष्ट्ये होत. मिशमी पुरुष कमरेभोवती एक कापड गुंडाळतात व मानेपासून गुडघ्यापर्यंत लांब जाकीटासारखा निळा, लाल किंवा पिंगट रंगाचा कोट घालतात. याशिवाय रंगबेरंगी चट्‌ट्यापट्‌ट्यांचे भरपूर कपडे ते वापरतात. लोकर, कापूस आणि खाजकुयलीच्या झाडापासून काढलेल्या धाग्यापासून ते स्वतःची वस्त्रे विणतात. पुरुषांच्या कोटाला नक्षीदार किनार असते. डोक्यावर ते वेताची सुरेख हॅटही घालतात. खाजकुयलीचा धागा आणि मानवी केस यांपासून बनविलेल्या अंगरख्याचा ते चिलखताप्रमाणे उपयोग करतात. स्त्रिया गुडघ्यापर्यंतच वस्त्र नेसतात आणि कशिदा केलेली चोळी वापरतात. अंगावर शाल घेण्याची प्रथा त्यांच्यात आहे. स्त्रिया कपाळावर चांदीची पट्टी लावतात कानात कर्णभूषण आणि गळ्यात काचमण्यांच्या माळा घालतात. पुरुषांच्या खांद्यांवर चामड्याचे पट्टे असून त्यांना लोकरीच्या पितळी चकत्या बसविलेल्या पिशव्या जोडलेल्या असतात. पाठीला ढाल, तिबेटी तलवार आणि भाला वा खंजीर ही हत्यारेही असतात. स्त्री-पुरुष दोघेही केस वाढवितात. केसांची गाठ पुढील बाजूस बांधतात. बहुतेक मिशमींना धूम्रपानाचे व्यसन लहानपणापासूनच असते.

  पर्वतमाथ्यावर झाडांच्या सावलीत बांधलेल्या झोपड्यांतून यांची वस्ती असते. झोपड्या बांबू व झाडपाला यांपासून बनविलेल्या असून आकाराने मोठ्या असतात. झोपडीच्या मागील खुल्या जागेत शिकार केलेल्या जनावरांची कातडी लावतात. तसेच प्रत्येक खोलीत एक चूल असते आणि तिच्यावर मांस वाळविण्यासाठी टांगलेले असते. यांची धान्याची कोठारे वस्तीपासून दूर व सहज न दिसणाऱ्या ठिकाणी असतात. हे लोक मुख्यतः मांसाहारी आहेत. याशिवाय त्यांच्या आहारात तांदूळ, मका, बटाटे हे पदार्थ असतात. 

यांचा प्रमुख व्यवसाय व्यापार असला, तरी शिकार व शेती हेही व्यवसाय त्यांच्यात आढळतात. डोंगरातील बचनाग, तीता, मेण इ. वस्तू गोळा करून ते विकतात आणि त्यांच्या बदल्यात आवश्यक त्या वस्तू घेतात. तसेच हे लोक कस्तुरी व कागदासाठी लागणाऱ्या साली गोळा करूनही विकतात. ते नेहमी आसाममधून जनावरे घेतात व त्यांच्या बदल्यात त्यांना डोंगरी बैल-मिथुन (मिथान) प्राणी देतात. जनावरे ही त्यांची संपत्ती असते. त्यांचा उपयोग ते शेती किंवा दूधदुभत्यासाठी करीत नाहीत. काही खास समारंभात मात्र ते मिथुनचे मांस खातात.

  या जमातीत बहुपत्नीत्वाची चाल असून जास्त बायका असणे ही प्रतिष्ठेची बाब मानतात. क्रयविवाह रूढ आहे. वधूमूल्य एका डुकरापासून वीस मिथुनांपर्यंत दिले जाते. सर्व स्त्रियांना वारसाहक्क प्राप्त होतो. विवाहात मुलीच्या पसंतीचा विचार केला जातो. प्रसूतिकाळात स्त्रीस वेगळ्या झोपडीत ठेवतात.

मिशमी जडप्राणवादी असून त्यांचा भुताखेतांवर विश्वास आहे. ते त्यांची पूजाही करतात. एखादी घटना घडली अथवा कोणी आजारी पडल्यास भुताखेतांचा प्रकोप झाला असे समजतात व त्यांना कोंबडे, बकरे इ. बळी देऊन संतुष्ट करतात. हे लोक अनेक देवदेवतांनाही पूजतात.

यांच्यात जमातप्रमुख नसतो. ते आपले तंटे आपापसांतच मिटवितात. एखाद्या गुन्ह्याबद्दल दंड पशूच्या रूपात वसूल करतात. व्यापारासाठी कस्तुरीमृगाची शिकार किंवा वनस्पती औषधे गोळा करण्यासाठी त्यांना बऱ्याच दुर्गम स्थळी, डोंगरात नद्यानाल्यांतून जावे लागते. तेव्हा ते नद्यांवर झुलते पूल उभे करतात. लोहित नदीच्या उगमस्थळास (परशुरामकुंड-तेझूपासून १० किमी.) ते तीर्थक्षेत्र मानतात व माघ पौर्णिमेस तेथे जातात.

हे लोक मृतास घराजवळच पुरतात. तेथे स्मृतिशिला उभी करतात आणि त्याच्यावर छप्पर घालतात. मृताबरोबर त्याचे कपडे, कप इ. भांडीही ठेवतात. एखादी प्रतिष्ठित व्यक्ती मेल्यास पशू मारतात व त्यांच्या कवट्या थडग्याभोवती ठेवतात. मद्य, शिजवलेले मांस व शस्त्रास्त्रे स्मृतिशिलेजवळ ठेवतात. अशा व्यक्तींचा अंत्यसंस्कार पुरोहित करतो. गरीब व्यक्ती मृताचे दहन करते. दफन केल्यानंतर ते नृत्य करतात.

संदर्भ : 1. Hamilton, A. In Abore Jungles of North East India, Delhi, 1983.

           2. Karotemprel, S. The Tribes of North East India, Calcutta, 1984.

शेख, रुक्साना