मिर्सिनेसी : (विडंग कुल). फुलझाडांपैकी द्विदलिकित [⟶ वनस्पती, आवृतबीज उपविभाग] वनस्पतींचे एक कुल. याचा अंतर्भाव ⇨ प्रिम्युलेलीझ गणात करतात मात्र जे. हचिन्सन यांनी मिर्सिनेलीझ या स्वतंत्र गणात केला आहे. जी. बेंथॅम व जे.डी. हूकर यांनी प्रिम्युलेलीझ गणात मिर्सिनेसीशिवाय ⇨ प्लंबॅजिनेसी (चित्रक कुल) व प्रिम्युलेसी [⟶ प्रिमरोझ] या कुलांचा समावेश केला आहे ए. एंग्लर व के. प्रांट्‌ल यांनी प्रिग्युलेसी, मिर्सिनेसी व थीओफ्रॅस्टेसी ही तीन कुले त्याच गणात ठेविली असून प्लंबॅजिनेसी स्वतंत्र गणात घातले आहे.

मिर्सिनेसी कुलात एकूण पस्तीस प्रजाती (ए. बी. रेंडेल यांच्या मते बत्तीस प्रजाती) व एक हजार जाती समाविष्ट केल्या असून त्यांचा प्रसार उष्ण व उपोष्ण खंडांत आहे दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड येथेही त्या आढळतात. त्या वृक्ष व झुडपे असून त्यांवर साधी, अखंड, चिवट, उपपर्णे नसलेली एकाआड एक पाने असतात पाने, भेंड आणि मध्यत्वचा यांमध्ये राळ-मार्ग किंवा ⇨ प्रपिंडे आढळतात. फुले एकलिंगी किंवा द्विलिंगी, सच्छदक (तळाशी उपांगे असलेली) नियमित, चारपाच भागी असून किंजदले कधी कधी पाचापेक्षा कमी व अर्धवट अधःस्थ असतात. संदले व प्रदले सुटी किंवा जुळलेली केसरदले अप्रिपदललग्न (पाकळ्यांस चिकटलेली) व त्यांच्यासमोर व स्त्रीपुष्पातील वंध्य केसरदले मोठी (पुं-पुष्पाप्रमाणे) असतात. ऊर्ध्वस्थ किंजपुटात एक कप्पा व बहुधा अनेक बीजके असतात बीजकविन्यास (मांडणी) तलस्थ किंवा मुक्त मध्यवर्ती (मधल्या सुट्या अक्षावर) असतो  [⟶ फूल]. फळ अश्मगर्भी (आठळी फळ) किंवा मृदू फळ पिकताना अनेक बीजके वांझ ठरतात. बियांतील पुष्क (गर्भाबाहेरचा अन्नांश) मांसल किंवा कठीण असतो. बीजे एक किंवा अनेक असतात. रॅपॅनिया, एंबेलिया, ऑर्डिसिया, मीसा, एजिसिरॅस इ. प्रमुख प्रजाती यात आहेत. त्यांतील अनेक जाती भारतात आढळतात. मिर्साइन आफ्रिकाना (हिं. चाप्रा) ही हिमालयी जाती बागेत लावतात. ⇨ वावाडिंग, ⇨ काजळा ह्या वनस्पती अनुक्रमे औषधांकरिता आणि टॅनीनकरिता उपयुक्त आहेत इतर प्रजातीतील वनस्पतीही भिन्न प्रकारे उपयोगात आहेत अटकी (मीसा इंडिका) मत्स्यविष आहे आंबटीही (एंबेलिया रोबस्टा) औषधी आहे.

परांडेकर, शं. आ.