मिमनर्मस : (इ. स. पू. सातवे शतक). ग्रीक भावकवी. आयोनियातील कोलोफॉन येथला हा रहिवासी. त्याची कविता त्रुटित स्वरुपात उपलब्ध आहे. एक श्रेष्ठ एलिजी रचनाकार म्हणून तो ओळखला जातो (उपलब्ध ग्रीक ‘एलिजी’ चे स्वरूप आजच्या ‘विलापिके’ पेक्षा वेगळे आहे. कवीच्या व्यक्तिगत भावनांचा आणि विविध विषयांवरील त्याच्या विचारांचा आविष्कार हे ग्रीक एलिजीचे प्रयोजन). त्याच्या एलिजी ह्या प्रकारातील काही रचना त्याची प्रेयसी ‘नान्नो’ हिचे नाव शीर्षकासाठी देऊन संगृहीत करण्यात आल्या होत्या. प्रेम, यौवनावस्थेतील सुखे, तारुण्याची क्षणभुंगरता आणि वृद्धत्वाचे दुःख हे विषय ह्या विलापिकांतून येतात. युद्ध ह्या विषयावरील त्याच्या विलापिकाही उत्तम आहेत.
कुलकर्णी, अ. र.