मिन्युएत : पश्चिमी युग्मनृत्याचा प्रकार. फ्रान्समध्ये सतराव्या शतकाच्या मध्यावधीत, चौदाव्या लूईच्या कारकीर्दीत हे नृत्य एका फ्रेंच लोकनृत्यातून उगम पावले व साधारणपणे १६५० ते १७५० या शतकात फ्रेंच दरबारात अत्यंत लोकप्रिय ठरले. ‘मिन्युएत’ (फ्रेंच उच्चार मन्युयॅ) या संज्ञेचा अर्थ लघु पदन्यास. छोट्या छोट्या पदन्यासांचा, जोडप्यांनी करावयाचा हा एक सामाजिक प्रतिष्ठा लाभलेला भारदस्त नृत्यप्रकार होता. अलगपणे एकमेकांच्या अवतीभवती छोटे, सुबक व लयबद्ध पदन्यास टाकत सरकण्याच्या या नृत्यात प्रणयातील अनुनयाचा भाव सूचित होतो. त्यात स्त्री-पुरुष त्यांच्या मूळ स्थानापासून फारसे लांब जात नसत. त्यात दरबारी रीतिरिवाजानुसार वारंवार मुजरे व जोडीदारास अभिवादन केले जात असे. ‘ल् मन्युयॅ द् दोफॅं’ (राजकुमाराचे लघुनृत्य), ‘ल् मन्युयॅ द् ला रॅन’ (राणीचे लघुनृत्य), ‘ल् मन्युयॅ द् ला कूर’ (दरबारी लघुनृत्य), ल् मन्युयॅ देक्सो दॅ हे काही उल्लेखनीय मिन्युएत प्रकार होत. फ्रान्समधून अल्पावधीतच हे नृत्य यूरोपभर पसरले. या नृत्यप्रकाराशी सुसंवादी अशा संगतीरचनाही तयार करण्यात आल्या. झां बात्तीस्त ल्यूली, आलेस्सांद्रो स्कारलात्ती, हायडन, मोट्सोर्ट, बेथोव्हन प्रभृती संगीतकारांनी मिन्युएत धर्तीच्या संगीतरचना केल्या आहेत.
वडगावकर, सुरेंद्र