मिनर्व्हा : एक रोमन देवता. ⇨ ज्यूपिटर, ⇨ ज्यूनो आणि मिनर्व्हा या रोमन देवतांच्या महान ‘त्रयी’ मध्ये तिचा समावेश होतो. ललित कला, विविध हस्तकौशल्याच्या कला, व्यापार, उद्योगधंदे, शाळा इत्यादींची संरक्षक असलेली ही देवी उत्तरकालात युद्धदेवताही बनली. संपूर्ण रोमन साम्राज्यात तिची पूजा होत असली, तरी प्रामुख्याने संगीतकार, शिल्पकार, कवी, चित्रकार, रंगारी, विणकर, सुतार, वैद्य इ. लोक तिची पूजा करीत असत. ‘स्मरण करणे’ या अर्थाच्या ‘मेन्’ या लॅटिन धातूपासून (संस्कृत मन्-मनन करणे) मिनर्व्हा हे नाव बनले आहे. मूर्तिमंत विचारशक्ती, शहाणपणाची व प्रतिमेची देवता इ. प्रकारची तिची वर्णने पाहता तिचे हे नाव सार्थ आहे.
रोमन लोकांच्या अगदी स्वतःच्या म्हणता येतील, अशा देवता कमी होत्या. त्यांनी अनेक देवता इतरांकडून स्वीकारलेल्या होत्या. त्यांपैकी मिनर्व्हा ही ग्रीकांकडून स्वीकारलेली देवता होय. अथीना नावाची ग्रीकांची महान देवी प्रथम इट्रुरियामध्ये परिचित झाली आणि तेथून तिचा रोममध्ये प्रवेश झाल्यावर तिचेच रोमन मिनर्व्हामध्ये रूपांतर झाले. अथीना ही जशी युद्धदेवता होती, तशीच कला व व्यवसाय यांचीही देवता होती. तिचे हे स्वरूप मिनर्व्हामध्येही आढळतेच. रोमन लोकांनी इ.स.पू. २४१ मध्ये फालीरिआई हे शहर जिंकले व तेथून मिनर्व्हाला आणून तिचे माउंट कोलियसच्या पायथ्याशी मंदिर बांधले. रोममध्ये या आधीपासूनच तिचे एक मंदिर ॲव्हन्टाइन टेकडीवर होते असे म्हणतात. हे मंदिर म्हणजे कलावंतांच्या – विशेषतः नाटककार व नट यांच्या – संघटनांचे केंद्र बनले होते.
रोमन साम्रज्यात १९–२३ मार्च हे पाच दिवस ‘क्विन्क्वाट्रस’ नावाने ओळखला जाणारा तिचा उत्सव होत असे. १३ जूनला बासरी वादक याच नावाचा आणखी एक उत्सव छोट्या प्रमाणात साजरा करीत असत. शुद्ध रोमन म्हणता येईल, अशी या देवीची मूर्ती आढळत नाही. इट्रुस्कन लोकांनी पंखयुक्त व हातात किंचाळणारे घुबड असलेली अशी तिची मूर्ती केली होती. अथीनालाही हाच पक्षी प्रिय होता.
साळुंखे, आ. ह.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..