मिन नदी : (१) आग्नेय चीनमधील फूक्येन प्रांतातील एक प्रमुख नदी. लांबी सु. ५७७ किमी. फूक्येन व ज्यांगशान पर्वतप्रदेशात हिचा उगम असून तेथून ती आग्नेयीकडे वाहत जाऊन दक्षिण चिनी समुद्राला फूचाऊजवळ मिळते. तिचे शीर्षप्रवाह आणि उपनद्यांमुळे बनलेली जाळीदार नदीप्रणाली मिन या नावाने ओळखली जात असली, तरी मुख्यतः नानपिंगच्या नंतरचा प्रवाह मिन नदी म्हणून ओळखला जातो. नानपिंगच्या वरच्या भागात पूर्वीपासून नदी थोड्याफार प्रमाणात जलवाहतुकीस उपयुक्त आहे. १९५० नंतर तिचा समुद्रापासून फूचाऊपर्यंतचा खालचा प्रवाह लहान बोटींच्या वाहतुकीस खुला करण्यात आला. नानपिंगजवळ नदीतून आणलेला माल रेल्वेने पुढे फूचाऊपर्यंत पाठविण्यात येतो. येथे सागरगामी बोटी येऊ शकतात. मिन नदीचे ज्येन, फूटुन, शा हे प्रमुख शीर्षप्रवाह होत.
जाधव, रा. ग.