मिकिर भाषा : मिकिर भाषा बोलणारे लोक स्वतःला ‘आर्लेङ’ असे म्हणतात. आर्लेङ म्हणजे माणूस. मिकिर ही संज्ञा ती आदिवासी जमात, त्यांची भाषा आणि ते राहतात त्या आसाममधील टेकड्या यांपैकी प्रत्येकाला उद्देशून वापरतात. काही मिकिर लोक अरुणाचल प्रदेशातही आढळतात. यांचे शेजारी म्हणजे पश्चिमेला जैंतिया टेकड्यांमधील खासी लोक [→ खासी भाषा], दक्षिणेला बोडो किंवा कचारी लोक [→ बोडो भाषा], वायव्येला आसामी, कुकी, रेङमा, नागा आणि पहाडी कचारी भाषा बोलणारे लोक रहातात. १९७१ च्या जनगणनेप्रमाणे मिकिर भाषकांची एकूण संख्या १,९९,१२१ एवढी होती.
मिकिर ही भाषा ⇨ तिबेटो ब्रह्मी भाषासमूहातील कुकी नागा या गटात मोडते. काही विद्वान या भाषेला कुकी उपगटात धरतात, तर काही इतर कुकी भाषांपेक्षा ही वेगळी मानतात.
मिकिर भाषेत मूर्धन्य व सघोष महाप्राण ध्वनींचा अभाव आहे. भ, ध, ग हे ध्वनी असभियातून आलेल्या शब्दातच अर्थभेदास कारण होतात.
मिकिर भाषेत तिबेटो-ब्रह्मी भाषासमूहातील इतर भाषांप्रमाणे एकाक्षरी शब्दांची रेलचेल आहे. उदा.,‘पो’ (पिता) ‘पे’ (माता)‘ने’ (मी)‘मे’ (चांगला) ‘दम्’ (जाणे) ‘पु’ (बोलणे) इत्यादी.
संख्यावाचकांना जोडून येणाऱ्या शब्दांचा उपयोग हे मिकिर भाषेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. वस्तूंची मोजणी करताना यांचा वापर केला जातो. एका प्रकाराने हे शब्द वस्तूंची वर्गवारी करतात-जसे ‘पक’ या शब्दाचा वापर पाने, कपडे आणि छत्र्या यांच्या मोजणीच्या वेळीच केला जातो. उदा., ‘मुदेङ-ए-पक’ अर्थ : ‘छत्री + एक + वर्गवाचक’ म्हणजे ‘एक छत्री’. याचप्रमाणे अंडी इत्यादीं बरोबर ‘पुम’, झाडांचे करिता ‘रोङ’, घरांचे बाबतीत ‘हुम’ या शब्दांचा वापर केला जातो. (मराठीत अशा प्रकारची रचना क्वचित दिसते-‘तिघी-जणी मुली’, ‘चारी-ठाव-जेवण’).
मिकिर भाषेत लिंग व वचनाप्रमाणे नाम अथवा क्रियापदाचे रूप बदलत नाही. केवळ सजीव प्राण्यांच्या शब्दांच्या बाबतीतच लिंग निश्चित करता येते. उदा., ‘आर्लेङ’ (माणूस) ‘आर्लोसो’ (स्त्री), ‘सो-पो’ (मुलगा), ‘सो-पी’ (मुलगी). बहुवचनाकरता ‘आतुम’ हा शब्द नाम किंवा सर्वनामाला जोडला जातो. उदा., ‘ला’ (तो), ‘ला-आतुम’ (ते).
अनेक मिकिर भाषी असमिया वा आसामी बोलू समजू शकतात. असमियातील काही शब्द मिकिर भाषेने स्वीकारले आहेत. उदा., ‘पुथी’ (पुस्तक), ‘मोनित’ किंवा ‘मुनित’ (पुरुष-पुल्लिंग), ‘बेरी’ (घर आसामी ‘बाड़ी’) इत्यादी. आधुनिक काळातील शिक्षणाच्या प्रसाराने मिकिरमध्ये उसनवारीने घेतलेल्या शब्दांचे प्रमाण बरेच वाढत आहे. शिक्षणाचेही माध्यम असमिया आहे [→ असमिया भाषा]. मिकिर भाषेला स्वतःची अशी कोणतीही लिपी नाही. लोकवाङ्मय, लोकगीत व लोककथा यांतूनच तिचा आविष्कार उपलब्ध आहे.
संदर्भ : 1. Bulter, John, “A Rough Comparative Vocabulary of Some of the dialects spoken in Naga hills district,”Journal of Asiatic Society of Bengal (Calcutta) 42 : I : Appendix, PP. i- XXIX.
2. Grierson, G. A. Linguistic Survey of India, Vol. III, Part 2, P. P. 380-448, Calcutta, 1903.
3. Walker, George David, A Dictionary of Milir Language, Shillong, 1925.
शर्मा, सुहनुराम (हिं.) रानडे, उषा (म.)