भारतीय सर्वसाधारण विमा निगम : भारतातील सर्वसाधारण व्यवसायांचा विमा व्यवहार (आग विमा, सागरी विमा व अन्य विमा योजना) करणारी संस्था. १ जानेवारी १९७३ रोजी सर्वसाधारण विमा व्यावसायाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. सर्वसाधारण विमा व्यवसाय (राष्ट्रीयीकरण) अधिनियम, १९७२ या अन्वये देशातील सर्वसाधारण विमा व्यवसायाचे अधीक्षण, नियंत्रण व तो चालू ठेवणे ही कार्ये पार पाडण्याच्या हेतूने भारतीय सर्वसाधारण विमा निगमाची स्थापना करण्यात येऊन १९७३ च्या प्रारंभापासून त्याचे कार्य सुरू झाले. राष्ट्रीयीकृत सर्वसाधारण विमा व्यवसायाचे कार्य भारतीय सर्वसाधारण विमा निगम ही सूत्रधारी कंपनी व तिच्या चार गौण कंपन्या –नॅशनल इन्शुअरन्स कंपनी लि. (कलकत्ता), द न्यू इंडिया इन्शुअरन्स कंपनी लि. (मुंबई), द ओरिएंटल फायर अँड जनरल इन्शुअरन्स कंपनी लि. (नवी दिल्ली) व द युनायटेड इंडिया इन्शुअरन्स कंपनी लि. (मद्रास) – यांद्वारे चालते.

भारतीय सर्वसाधारण विमा निगम ही सूत्रधारी कंपनी असल्याने तिच्याकडे मुख्यतः पर्यवेक्षण व सल्लागारी सेवा ही कामे असतात. यांशिवाय हवाई वाहतूक विमा व पीक विमा ही दोन क्षेत्रे या निगमाच्या अखत्यारीखाली येतात. पीक विम्याचे कार्य निगमाद्वारा प्रायोगिक स्वरूपात राज्यशासनांच्या सहकार्याने पार पडले जाते.

निगमाच्या गौण कंपन्यांद्वारा सर्वसाधारण विम्याचे सर्व प्रकार हाताळले जातात. या द्वारे प्रत्येक गौण कंपनीची प्रधान कार्यालय, प्रादेशिक / क्षेत्रीय कार्यालये, विभागीय कार्यालये आणि शाखा कार्यालये, अशी चौपदरी रचना असते. ३१ डिसेंबर १९८० रोजी या कंपन्यांची एकूण २२ प्रादेशिक / क्षेत्रीय, ३६८ विभागीय व ८८२ शाखा कार्यालये होती तर ३१ डिसेंबर १९८१ रोजी त्यांची संख्या अनुक्रमे २८ ३९९ व ९७६ झाली. अन्य २८ देशांपमध्ये या कंपन्यांच्या शाखा / अभिकरणांमार्फत विमाव्यवसायाचे कार्य चालू असते.

नॅशनल इन्शुअरन्स कंपनीची १९७९ अखेर ४ प्रादेशिक / क्षेत्रीय, ७६ विभागीय व १६९ शाखा कार्यालये होती. या कंपनीचे विक्रीस काढलेले व भरणा झालेले भांडवल 8 कोटी रुपयांचे आहे. प्रत्येकी 5 रु. चे 160 लक्ष भाग असून त्यापैकी 1,59,94,980 भाग म्हणजे 99.97% भाग भांडवल भारतीय सर्वसाधारण विमा निगमच्या मालकीचे आहे. द न्यु इंडिया ॲशुरन्स कंपनीची 8 क्षेत्रीय, 78 विभागीय, 296 शाखा कार्यालये होती. या कंपनीचे विक्रीस काढलेले व भरणा झालेले भांडवल ११ कोटी रुपयांचे आहे. प्रत्येकी ५ रुपयांच्या २२० लक्ष पूर्ण भरणा झालेल्या भागांपैकी २,१९,05,२४४ भाग म्हणजेच ९९.५ % भाग भांडवल निगमाच्या मालकीचे आहे. द ओरिएंटल फायर अँड जनरल इन्शुअरन्स कंपनीची ४ प्रादेशिक/क्षेत्रीय, ९६ विभागीय व १७१ शाखा कार्यालये होती. या कंपनीची सिंगापूर व नेपाळ येथे शाखा कार्यालये, तर दुबई, कुवेत, हाँगकाँग व मॉरिशस येथे अभिकरणे (एजन्सीज) आहेत. युनायटेड इंडिया इन्शुअरन्स कंपनीची १०६ विभागीय व २०६ शाखा कार्यालये होती. या कंपनीचे विक्रीस काढलेले व भरणा झालेले भांडवल ११.६० कोटी रुपयांचे आहे.

निगमाने आपल्या चार गौण कंपन्यांसमवेत १९८१ मध्ये ग्रामीण भागातील दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी व फायद्यासाठी नवीन विमायोजना अंमलात आणल्या. बिहार राज्य शासनाच्या सहकार्याने एक नवीन प्रकारची वैयक्तिक अपघात विमायोजना गटरूपाने निगमाने कार्यवाहीत आणली या योजनेच्या अंतर्गत असंघटित क्षेत्रातील ६६ लक्ष लहान शेतकरी व शेतमजूर यांना अपघाताने कायम स्वरूपाने अपंगत्व वा मृत्यु आल्यास प्रत्येकाला २,००० रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येते. दुसऱ्या एका योजनेच्या अंतर्गत आंध्र प्रदेश राज्यातील नगरपालिकीय क्षेत्रात राहणाऱ्या झोपडपट्टीतील लोकांनाही निवासाचे संरक्षण देण्यात आले आहे. या योजनेनुसार या राज्याच्या विविध जिल्ह्यांत पसरलेल्या १.५ लक्ष झोपडपट्ट्यंना प्रत्येकी २,००० रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे.

निगमाचे गुंतवणूक धोरण शासकीय कायदे व मार्गदर्शक तत्त्वे यांनी सीमित झालेले असते. विमा अधिनियमानुसार निगमाच्या गुंतवणयोग्य निधीमध्ये प्रतिवर्षी होत जाणाऱ्या अर्थवृद्धीपैकी २५ टक्के रक्कम निगमाने केवळ केंद्र सरकारच्या रोख्यांमध्ये १० टक्के रक्कम राज्य सरकारच्या रोख्यांत व विविध सरकारी उपक्रमांनी वेळोवेळी विक्रीस काढलेल्या बंधपत्रांमध्ये व ऋणपत्रांमध्ये ३५ टक्के रक्कम राज्य सरकारे (२० टक्के) आणि हडको (गृह व नागरी विकास निगम) (१५ टक्के) यांना घरे बांधण्यासाठी (सामाजिक घरबांधणी कार्यक्रम) कर्जस्वरूपात आणि उर्वरित ३० टक्के रक्कम शेअरबाजारांतील भाग व रोखे यांच्यामध्ये गुंतविणे आवश्यक आहे.

निगमाची एकूण गुंतवणूक ३१ डिसेंबर १९८० अखेर ८९२ कोटी रु.होती, ती ३१ डिसेंबर १९८१ रोजी १.०८३ कोटी रु. झाली. या एकूण गुंतवणुकीपैकी समाजाभिमुख क्षेत्रांमध्ये निगमाने केलेली गुंतवणूक १९८० व १९८१ या दोन वर्षांच्या अखेरीस अनुक्रमे ७० कोटी व १०८ कोटी रु. एवढी होती.

निगमाकडून कार्यवाहीत आणल्या जाणाऱ्या पीक विमा योजना ह्या प्रायोगिक स्वरूपाच्या व मर्यादित प्रमाणावर असतात. सांप्रत पीक विमा योजना गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व तमिळनाडू या राज्यांतू चालू असून कापूस, भुईमूग व भात या पिकांच्या विविध जातींना विमा संरक्षण लाभले आहे.

शेतकी पंप विमा योजना अशी एक नवीन प्रकारची योजना निगमाने कार्यान्वित केली असून त्या योजनेखाली मोडतोड, चोरी, आग वा वीजप्रवाह खंडित झाल्याने होणारा बिघाड इत्यादींच्या हानीपासून संरक्षण मिळू शकते. जून १९८१ पर्यंत सु. ४३,००० पंपसंचांचा सु. ३५.२ लक्ष रुपायांचा विमा उतरविण्यात आला होता.

निगमाच्या चारही गौण कंपन्यांद्वारा गुरांचा विमा उतरविण्यात येतो. अर्थात या चारही कंपन्या हा विमा व्यवसाय करीत असल्या, तरी विमा हप्त्याचे दर, विम्याच्या अटी व कार्यपद्धती यांमध्ये एकसूत्रता ठेवण्यात आली आहे. १ एप्रिल १९७६ रोजी यासंबंधी एक करार करण्यात आला. १९८० मध्ये १३ कोटी रुपयांचा सु. ४४ लक्ष गुरांचा विमा उतरविण्यात आला.

पहा : विमा.

गद्रे, वि. रा.