भारतीय वनस्पति वैज्ञानिक सर्वेक्षण संस्था : भारतात आसपासच्या प्रदेशातील नवीन वनस्पती आणून त्यांची लागवड करणे आणि देशातील व आसपासच्या प्रदेशातील वनस्पतींचे शास्त्रीय दृष्टया संशोधन करणे यांसारखी उपयुक्त कार्ये १८९० मध्ये स्थापन केलेल्या भारतीय वनस्पतिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने सुरू केली. ह्या संस्थेचे प्रमुख कार्यालय सुरुवातीपासून कलकत्ता येथे आहे परंतु दुसऱ्या महायुद्धापूर्वी या संस्थेची व्याप्ती कलकत्त्यातील भारतीय वस्तुसंग्रहालयाच्या औद्योगिक विभागापुरतीच मर्यादित केली गेली व फारच थोडे कर्मचारी त्यात काम करीत. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातील वनस्पति-संपत्तीचे पुन्हा मूल्यमापन करण्याचे ठरले त्यानुसार १९५४ मध्ये सर्वेक्षण संस्थेची पुनर्रचना केली जाऊन तिचे मुख्य कार्यालय सुरुवातीपासून कलकत्ता येथे आहे परंतु दुसऱ्या महायुद्धापूर्वी या संस्थेची व्याप्ती कलकत्त्यातील भारतीय वस्तुसंग्रहालयाच्या औद्योगिक विभागापुरतीच मर्यादित केली गेली व फारच थोडे कर्मचारी त्यात काम करीत. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातील वनस्पति-संपत्तीचे पुन्हा मूल्यमापन करण्याचे ठरले त्यानुसार १९५४ मध्ये सर्वेक्षण संस्थेची पुनर्रचना केली जाऊन तिचे मुख्य कार्यालय कलकत्ता येथेच एका संचालकांच्या मार्गदर्शनाखाली चालू झाले आणि भारत सरकारच्या वैज्ञानिक धोरणानुसार या संस्थेच्या विविध कार्यांचा समन्वय करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविण्यात आले.
प्रथमतः वनस्पति-भूगोलाच्या तत्त्वावर पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशी चार प्रादेशिक मंडले स्थापून त्यांची मुख्य कार्यालये अनुक्रमे शिलाँग (आसाम-मेघालय), पुणे (महाराष्ट्र), डेहराडून (उत्तर प्रदेश) व कोईमतूर (तमिलनाडू) येथे ठेवण्यात आली. पुढे १९६२ साली मध्य मंडलाकरिता अलाहाबाद येथेही एक कार्यालय स्थापन केले गेले. ह्या पाच प्रादेशिक मंडलांशिवाय सर्वेक्षणाच्या या योजनेत कलकत्ता येथेच असणाऱ्या पुढील संस्थांचाही समावेश आहे द सेंट्रल बोटॅनिकल लॅबोरेटरी, भारतीय वस्तुसंग्रहालयाचा औद्योगिक विभाग, द सेंट्रल नॅशनल हर्बेरियम [⟶ वनस्पतिसंग्रह] व इंडियन बोटॅनिकल गार्डन [⟶ शास्त्रीय उद्याने]. यांखेरीज १९७९ मध्ये पोर्ट ब्लेअर येथे अंदमान व निकोबार मंडल आणि जोधपूर येथे रुक्ष विभाग मंडल यांची तेथील वैशिष्ट्यपूर्ण वनस्पतींच्या अभ्यासाकरिता स्थापना करण्यात आली. १९७७ मध्ये इटानगर येथे अरुणाचल क्षेत्रीय सर्वेक्षण केंद्र व १९७१ मध्ये गंगटोक येथे सिक्कीम हिमालय मंडल यांची स्थापना करण्यात आली.
भारतीय वनस्पतिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेची मुख्य उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत : नवीन वनस्पति-उद्गमांसाठी पाहणी न केलेल्या वा कमी प्रमाणात पाहणी झालेल्या प्रदेशांची पाहणी करणे राष्ट्रीय व प्रादेशिक पादपजात ग्रंथ (विशिष्ट प्रदेशातील वनस्पतींच्या नावांची यादी व प्रत्येक वनस्पतींचे वर्णन देणारे ग्रंथ) तयार करणे पादपजातीय आणि वर्गीकरणवैज्ञानिक संशोधन करणे आणि विद्यापीठे व संशोधन संस्था यांना बिनचूकपणे वनस्पती ओळखण्यास मदत करणे व त्यांना अधिकृत वनस्पतींचा पुरवठा करणे वनस्पतीच्या विविध प्रकारांचे व इतर प्रमाणित नमुन्यांचे परिरक्षण करण्यासाठी वनस्पतिसंग्रह, वस्तुसंग्रहालये यांची स्थापना करणे आणि भारतातील व परदेशातील वनस्पतींच्या नमुन्यांची देवघेव करणे. आर्थिक दृष्टया महत्त्वाच्या, दुर्मिळ व लक्षवेधक वनस्पतींचे जननद्रव्य अभ्यास, परिरक्षण व शिक्षण या दृष्टींनी शास्त्रीय उद्यानांत योग्य अवस्थेत राखणे वनस्पति-भूगालाचा आणि परिस्थितिवैज्ञानिक (सजीवांचे आपआपसांतील संबंध आणि सजीव व त्यांच्या परिसर यांचे परस्परसंबंध यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राच्या दृष्टीने होणाऱ्या) बदलांचा पादपजात (ज्यातील वनस्पती फक्त त्यांच्या नामनिर्देशाने ओळखण्यात येतात असा वनस्पित समुच्चय) व वनश्री (एखाद्या प्रदेशातील वनस्तपतींचा एकूण समुच्चय) यांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे पादपजाती व त्यांचे निवास क्षेत्र यांना असणारा संभाव्य धोका आणि परिस्थितीविज्ञानीय तंत्रांचे [व्यूहांचे ⟶ परिस्थितीविज्ञान] परिरक्षण यांचा अभ्यास करणे. देशातील वनस्पति-उद्गमांच्या संदर्भातील सर्व बाबींविषयी सरकारला सल्ला देणे.
या संस्थेतील कर्मचाऱ्यांची संख्या १९८२ मध्ये सु. १,५०० होती आणि त्यांपैकी सु. १५० वैज्ञानिक अधिकारी आणि सु. १५० वैज्ञानिक व साहाय्यक-तांत्रिक कर्मचारी होते. वनस्पतिविज्ञान विषयातील बी. एस्सी., एम्. एस्सी, व पीएच्.डी या पदवीधारकांना या संस्थेत निरनिराळ्या पातळ्यावर सेवायोजनाची आणि संशोधन शिष्यवृत्तिधारी व सहयोगी म्हणून काम करण्याची संधी मिळते.
संस्थेचे कलकत्ता येथील मुख्य कार्यालय सरकारी धोरणानुसार व संस्थेतील ज्येष्ठ शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने संस्थेच्या सर्व शाखांतील शास्त्रीय व तांत्रिक कार्यांची योजना आखणे, मार्गदर्शन करणे व समन्वय साधणे ही कामे करते. तसेच देशातील इतर संशोधन संस्थांशी (उदा., भारतीय कृषी संशोधन संस्था, विविध विद्यापीठांतील संशोधन विभाग) संपर्क ठेवते.
संस्थेच्या नियंत्रणाखालील कलकत्ता येथील विविध संस्थांमध्ये करण्यात येणारे कार्य पुढीलप्रमाणे आहे. द इंडियन बोटॅनिकल गार्डन या उद्यानाने चहा, ताग, सिंकोना, साग, मॅहॉगनी यांसारख्या महत्त्वाच्या उत्पादनांच्या विकासात बहुमोल कामगिरी केलेली आहे [⟶ शास्त्रीय उद्याने]. द सेंट्रल नॅशनल हर्बेरियम या वनस्पतिसंग्रहाची पाच मजली इमारतीत मांडणी करण्यात आलेली असून तेथे १५ लक्ष वनस्पतींचे नमुने जतन करून ठेवण्यात आलेले आहेत [⟶ वनस्पतिसंग्रह]. द सेंट्रल बोटॅनिकल लॅबोरेटरीमध्ये शरीरक्रियाविज्ञान, परागविज्ञान [⟶ पराग], कोशिका-वर्गीकरणविज्ञान (कोशिकांच्या-पेशींच्या-संरचनेच्या अभ्यासावर आधारलेली वनस्पतींच्या वर्गीकरणांची योजना), आदिवासी जमातींत उपयोगात असलेल्या वनस्पतींचा अभ्यास करणारी विद्याशाखा इ. वनस्पतिवैज्ञानिक शाखांमध्ये जैव वर्गीकरणविज्ञानाच्या दृष्टीने अभ्यास करण्यात येत आहे. परिस्थितिविज्ञान विभागातर्फे उत्तर व दक्षिण कॅनरा, कूर्ग व समुद्रकिनारी प्रदेश यांचा अभ्यास हाती घेण्यात आलेला आहे. या विभागात जीवावरणातील [⟶ जीवावरण] वनस्पतींचे साठे आणि मूळच्या भारतातील व विनाशाचा संभाव्य धोका असलेल्या वनस्पतिगटांच्या अभ्यासावर विशेष भर देण्यात येत आहे.संस्थेच्या ⇨ औषधीस्वरूपविज्ञान विभागातर्फे वनस्पतींच्या सालींपासून मिळणाऱ्या औषधांसंबंधी अभ्यास करण्यात आलेला असून पूर्व हिमालयातील मिश्मिटिटा (कॉप्टिस टिटा) या महत्त्वाच्या औषधी वनस्पतीसंबंधी तपशीलवार सर्वेक्षण केले गेले आहे. अबीजी वनस्पतींविषयीच्या विभागात दक्षिण भारतातील नेचे, हिमालयातील हरिता [⟶ शेवाळी] व पश्चिम बंगालमधील शैवाक [⟶ शैवाक] यांचा तसेच वर्गीकरणाच्या दृष्टीने व सुधारणा करण्याच्या दृष्टीने काही वंशांचा अभ्यास करण्यात येत आहे. भारतीय वस्तुसंग्रहालयाच्या औद्योगिक विभागात आर्थिक दृष्टया महत्त्वाच्या वनस्पतींचा अभ्यास करण्यात येतो. येथे सु. १५,००० व्यापारी दृष्टया महत्त्वाच्या वनस्पतिजन्य वस्तू प्रदर्शित केलेल्या असून विद्यार्थी, संशोधक, औषधनिर्माते इत्यादींना त्यांचा फार उपयोग होतो.
विविध विकास व अन्य योजनांच्या परिस्थितिविज्ञानीय तंत्रावर होणाऱ्या परिणामांचे मूल्यमापन संस्थेतर्फे करण्यात येते. सायलेंट व्हॅली, सतलज व बियास यांना जोडणारा कालवा, टेहरी धरण, लालपूर धरण, इडिक्की धरण इ. योजनांबाबत त्याचप्रमाणे सर्व संभवनीय जीवावरण साठे, राष्ट्रीय उद्याने व वन्य जीवांची अभयारण्ये यांच्या बाबतीत संस्थेने आवश्यक ती माहिती पुरवून केंद्र व राज्य सरकारांना धोरणात्मक निर्णय घेण्यास मदत केलेली आहे. संस्थेचे संचालक दुर्मिळ वनस्पतींच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या नियंत्रणाबाबतही सरकारला सल्ला देतात.
संस्थेतील अनेक शास्त्रज्ञ नवीन भारतीय पादपजात ग्रंथासाठी विविध वनस्पतींची कुले व वंश यांसंबंधी संशोधन करीत असून या ग्रंथाचे सात भाग प्रकाशित झालेले आहेत आणि कित्येक छपाईच्या वा संपादनाच्या अवस्थेत आहेत.संस्थेच्या कार्याची माहिती तिच्या प्रकाशन विभागातर्फे बुलेटिन ऑफ द बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया (२२ वा खंड, १९८२), रेकॉर्ड्स ऑफ बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया (२१वा खंड, १९८२), वार्षिक अहवाल व वृत्तसमाचार यांसारख्या प्रकाशनांद्वारे प्रसारित केली जाते. १९५४ मध्ये संस्थेची पुनर्चना झाल्यानंतरच्या काळात संस्थेतील शास्त्रज्ञांनी सु. २,२०० संशोधनपर निबंध प्रसिद्ध केले आहेत. याखेरीज संस्थेतर्फे भूतपूर्व मुंबई इलाखा, मद्रास, बंगाल, बिहार व ओरिसा यांच्या पूर्वी प्रसिद्ध झालेल्या पादपजात ग्रंथात सुधारणा करून त्यांचे पुनर्मुद्रण, तसेच फायलॉलॉजिका इंडीका (श्रीनिवासन्, १९६९), डिक्शनरी ऑफ फ्लॉवरिंग प्लँट्स इन इंडिया (सांतापाव व हेन्री, १९७३), ए हँडबुक ऑफ फिल्ड अँड हर्बेरियम मेथड्स (जैन व राव, १९७७), ऑर्किड्स ऑफ इंडिया (ए. एस्. राव, १९७९), ग्लिम्पसेस ऑफ इंडियन एथ्नोबॉटनी (संपा. जैन, १९८१), मेडिसिनल प्लँट्स (जैन, १९८१) इ. विविध ग्रंथ प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. संस्थेचा लेखसंग्रह व ग्रंथालय विभाग संशोधन कार्याला उपयुक्त असे संदर्भ साहित्या पुरवितो. येथील ग्रंथालयात १९८१ मध्ये सु. ७५,००० ग्रंथ होते.
प्रादेशिक कार्यालये : डेहराडून येथील उत्तर मंडलात जम्मू व काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली व उत्तर प्रदेशातील काही डोंगरी जिल्हे यांचा समावेश होतो. येथील वनस्पतिसंग्रहात सु. ६०,००० नमुने आहेत. पौडी येथे एक प्रायोगिक उद्यान आहे. या मंडलाच्या कार्यात हिमाचल प्रदेशाच्या पादपजात ग्रंथाचे संकलन, विविध विकास योजनांतील परिस्थितिविज्ञानीय परिणाम, कॉर्बेट नॅशनल पार्क, नंदादेवी व इतर अभ्यारण्ये इत्यादींचा अंतर्भाव आहे.
शिलाँग येथील पूर्व मंडलाकडे आसाम, मेघालय, मिझोरम, त्रिपुरा, मणिपूर व नागालँड या राज्यांतील सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. येथील वनस्पतिसंग्रहात सु. १,१५,००० नमुने आहेत. शिलाँग येथील नॅशनल ऑर्किडॅरियममध्ये व बारापानी येथील प्रायोगिक उद्यानात अनेक दुर्मिळ व चित्तवेधक ऑर्किड [⟶ ऑर्किडेसी] व इतर वनस्पती आहेत. आसाम, मेघालय आणि नागालँड येथील ऑर्किडांचा नामदफा क्षेत्रातील परिस्थितिविज्ञानीय तंत्र व पूर्व भारतातील अबीजी वनस्पती यांचा अभ्यास या मंडलातर्फे करण्यात येत आहे.
अलाहाबाद येथील मध्य मंडलात मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशाचा काही भाग यांचा समावेश होतो. येथील वनस्पतिसंग्रहात सु. ५०,००० नमुने असून या कार्यालयाला एक प्रायोगिक उद्यानही जोडलेले आहे. या मंडलाच्या कार्यक्रमात प्रामुख्याने काही जिल्ह्यांच्या पादपजातींचा आणि मध्य भारतातील गवते व लव्हाळी यांच्या अभ्यासाचा अंतर्भाव आहे.
पुणे येथील पश्चिम मंडलासंबंधी थोडी तपशीलवार माहिती खाली दिली आहे.
कोईमतूर येथील दक्षिण मंडलात तमिळनाडू, आंध्र प्रदेश व केरळ या राज्यांचा समावेश होतो. येथील वनस्पतिसंग्रहात सु. २,००,००० नमुने आहेत. शेवराय टेकड्यांतील येरकौड येथे एक मोठे ऑर्किडॅरियम व प्रायोगिक उद्यान आहे. या मंडलातर्फे प्रामुख्याने तमिळनाडू, इडिक्की क्षेत्र, केरळ व सायलेंट व्हॅली येथील पादपजातींचा अभ्यास करण्यात येत आहे.
पोर्टब्लेअर येथील अंदमान व निकोबार मंडल या बेटांचा पादपजात ग्रंथ तयार करीत असून धानिखेरी धरणाजवळ एक प्रायोगिक उद्यान विकसित करण्यात येत आहे. येथील वनस्पतिसंग्रह व प्रयोगशाळा एका वातानुकूलित इमारतीत आहेत.
जोधपूर येथील रुक्ष विभाग मंडल राज्सथानचा पादपजात ग्रंथ तयार करीत आहे. इतर मंडले सर्वेक्षणाच्या कामाकरिता पायाभूत कार्य करीत आहेत.
संस्थेच्या पुनर्रचनेमुळे भारतातील पादपजातीय, वर्गीकरणवैज्ञानिक व इतर वनस्पतिवैज्ञानिक कार्याला मोठी चालना मिळाली आहे. पुनर्रचनेनंतरच्या काळात संस्थेने तीन लक्षांहून अधिक विविध वनस्पतींचे नमुने प्रत्यक्ष गोळा करण्याचे कार्य केलेले असून संस्थेच्या निरनिराळ्या वनस्पतिसंग्रहांत मिळून एकूण २० लक्षांहून अधिक नमुने आहेत. संस्थेतील शास्त्रज्ञांनी १५० हून अधिक नवीन वनस्पति-गटांची वर्णने तयार केली आहेत.
पश्चिम मंडल : या मंडलाचे कार्यालय ७, कोरेगाव रोड, पुणे येथे १९५५ च्या डिसेंबरात सुरू झाले असून त्याच्या कक्षेत गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक ही राज्ये आणि केंद्रशासित गोवा, दमण, दीव, दाद्रा व नगर हवेली, मिनीकॉय, लक्षद्वीप इ. येतात.
या मंडलातर्फे १९५६ पासून भिन्न प्रदेशांतील सर्व प्रकारच्या वनसप्तींची नोंद करण्याचे व पादपजात ग्रंथ प्रसिद्ध करण्याचे कार्य सुरू आहे व त्याबाबतीत उल्लेखनीय प्रगती झाली आहे. महाराष्ट्रातील निरनिराळे जिल्हे व गुजरात आणी कर्नाटक या राज्यांतील बरेचसे भाग यांच्या व्यापक पहाणीच्या कामाव्यतिरिक्त काही निवडक भागांच्या सखोल अभ्यासाचे कामही हाती घेण्यात आले आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष पादपजात ग्रंथांमध्ये देण्यात येत असून हे ग्रंथ वनस्पतिशास्त्रज्ञ व वनाधिकारी यांनाच नव्हे, तर निसर्ग व जंगल संपत्ती यांच्याविषयी जिज्ञासा असणाऱ्या सर्वानांच उपयुक्त ठरतील. या सर्व माहितीच्या आधारे उपयुक्त असे तिन्ही राज्यांचे पादपजात ग्रंथ लिहिण्यात येतील. तसेच वनस्पतींच्या कुलाच्या बाबतीत अंतर्बाह्य रचनेवरून केलेल्या वर्गीकरणाच्या आधुनिक पद्धतीप्रमाणे कॉमेलिनेसी या कुलाची पुनर्रचना केली जात आहे व त्यावरील ग्रंथ तयार होत आहे. पश्चिम भारतातील गवतांचा अभ्यास व सेरोपेजिया या वंशाची वर्गीकरण दृष्टया फेरतपासणी या योजनाही मंडलाने हाती घेतल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र गॅझेटियरच्या ‘वनस्पती विज्ञान’ खंडाची पुनर्रचना सुरु आहे. महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक यांच्या वनस्पतींच्या अद्ययावत याद्या सर्व उपलब्ध माहितीसह बनविण्याचे कार्य सुरू आहे. पश्चिम मंडलातर्फे वरील विषयावर १०० हून अधिक लेख प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
या मंडलाचे वैशिष्ट्य म्हणून तेथे उपलब्ध असलेल्या खालील साधनसामग्रीचा व सोयींचा उल्लेख करता येईल : (१) भरपूर वनस्पतींचा संग्रह (येथील वनस्पतिसंग्रहात १९८२ मध्ये सु. १,२५,००० नमुन होते) विसाव्या शतकाच्या प्रारंभी थिओडोर कुक यांनी जमविलेल्या वनस्पती व इंद्रजी ठाकूर यांचा कच्छमधील वनस्पतींचा संग्रह या दोन्ही संग्रहांच्या आधारे पादपजात ग्रंथ पूर्वी प्रसिदध झाले आहेत (२) अनेक जुन्या व नवीन वनस्पतिविषयक ग्रंथांचा आणि नियतकालिकांचा सुव्यवस्थित संग्रह (३) कोशिकाविज्ञान, परागविज्ञान, शारीर (शरीररचनाशास्त्र) वगैरे शाखांत कार्य करण्यासाठी अद्ययावत प्रयोगशाळा, (४) वनस्पतींच्या भागांचे व त्यांच्यापासून बनविलेल्या वस्तूंचे, खडकांचे वगैरे नमुने असलेले संग्रहालय (५) सु. ७०० च्या वर बीजांचे नमुने (६) काही निवडक व महत्त्वाच्या वनस्पतींवर प्रयोग करून पाहण्यास उपयुक्त असे मुंढवा येथील प्रायोगिक उद्यान (७) औषधी वनस्पतींचा रासायनिक विश्लेषणाकरिता पुरवठा, तसेच त्याबाबत संशोधन खाद्य व अखाद्य तेलांसंबंधी संशोधन (८) वनस्पतींचे व त्यांच्या भागांचे नमुने पुरविणे व मार्गदर्शन आणि सल्ला देणे (९) पदव्युत्र विद्यार्थ्यांस योग्य मार्गदर्शन (१०) संस्थेत चालू असलेल्या कार्यासंबंधी व्याख्यानांतून भिन्न पातळ्यांवरील जनतेस माहिती पुरविणे, फुलांच्या प्रदर्शनात भाग घेणे व अशा इतर उपक्रमांत भाग घेऊन वनस्पतिविज्ञानाचा प्रसार करणे ही कार्येही चालू असतात. येथील वनस्पतिसंग्रह, वस्तुसंग्रहालय व ग्रंथालय विद्यार्थी, संशोधक व इतरांस खुली असल्याने यांचा उपयोग सर्व गरजूंना होतो.
पहा : पादपजात वनस्पतिसंग्रह वृक्षोद्यान शास्त्रीय उद्याने.
संदर्भ : Jain, S. K. Botanical Survey of India, Everyman’s Science, Calcutta, April-May, 1982.
परांडेकर, शं. आ.
“