भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था : भारतातील भूवैज्ञानिक संशोधनासंबंधीची ही आद्य संस्था असून वयोमानाने जगातील तिसऱ्या क्रमांकाची आहे. भारताचा भूवैज्ञानिक नकाशा तयार करणे व तदनुषंगाने औद्योगिकीकरणास मूलभूत असणाऱ्या खनिज संपत्तीचा शोध घेणे, हे या संस्थेचे प्रधान कार्य आहे. १८२०-४५ या काळात कोणी छंद म्हणून तर कोणी दगडी कोळशासाठी भारतात काही ठिकाणी भूवैज्ञानिक पाहाणी केली. या तुरळक पाहाणीचा परिणाम म्हणून ईस्ट इंडिया कंपनी सरकारने १८५१ मध्ये डब्लिन येथील भूविज्ञानाचे प्राध्यापक व आयर्लंड भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेचे प्रमुख ⇨ टॉमस ओल्डॅम  यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेची स्थापना केली. तेव्हापासून संस्थेचे कार्य अव्याहत चालू आहे. बराच काळपर्यंत केवळ थोडेच परदेशी भूवैज्ञानिक या संस्थेत काम करीत होते. स्वातंत्र्योत्तर काळात वाढत्या गरजांनुसार कार्याचा विस्तार वाढल्याने या संस्थेत १९८० च्या सुमारास जवळजवळ १,५०० भारतीय भूवैज्ञानिक संशोधक व तदनुषंगिक अंदाजे १४,००० मदतनीस कार्य करीत होते.

भारत सरकारच्या पोलाद व खाणकाम खात्याच्या नियंत्रणाखाली ही संस्था असून संस्थेच्या महासंचालकांची मुख्य कचेरी व अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज अशा विविध प्रयोगशाळा कलकत्ता येथे आहेत. विकेंद्रीकरण कल्पनेस अनुसरून दोन-तीन राज्ये मिळून हिच्या एकेक विभागाची स्थापना केली आहे. सध्या हिचे असे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, मध्य व ईशान्य हे सहा विभाग असून ते प्रत्येकी एका उपमहासंचालकांच्या नियंत्रणाखाली आहेत. या विभागांत भूविज्ञानातील अनेक विशिष्ट शाखा त्या त्या विषयातील तज्ञ संचालकांच्या हाती आहेत. याशिवाय राज्य-निहाय मंडले आहेत आणि जरूरीनुसार राजस्थान, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश इ. राज्यांत प्रत्येकी एकापेक्षा जास्त मंडले असून ती संचालकांच्या नियंत्रणाखाली आहेत. या संस्थेतील सर्व भूवैज्ञानिक संशोधक पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेले असून त्यांची निवड भारतीय लोकसेवा आयोगातर्फे होते.

भूविज्ञानाचे सैद्धांतिक व अनुप्रयुक्त (व्यावहारिक) असे दोन भाग होतात. सैद्धांतिक भागात शास्त्रीय मूलभूत अभ्यासाला महत्व असून अनुप्रयुक्त भाग हा या अभ्यासाचाच परिपाक असतो. आपल्या भोवतालच्या बहुतांश वस्तूंचा कोणत्या न कोणत्या स्वरूपात खनिजाशी संबंध पोहोचतो. खनिजांचा शोध, त्यांचा आढळ, त्यांच्या साठ्यांचा प्रतवार अंदाज व शेवटी त्यांचे किफायतशीर उत्खनन ही खनिजांची व्यावहारिक बाजू झाली, तर त्या खनिजांची उत्पत्तीची कारणे शोधणे ही सैद्धांतिक विचाराची बाजू झाली. या दोन्ही बाजू एकमेकींवर अवलंबून असल्याने भूवैज्ञानिकास त्याचा सर्वंकष अभ्यास करावा लागतो. खनिजाचा आढळ ही शास्त्रतत्त्वांनी नियमबद्ध असलेली एक नैसर्गिक गोष्ट असते. तो विशिष्ट खडकांशीच संलग्न असतो. अर्थातच खडकांचा सखोल अब्यास हा सैद्धांतिक चिकित्सेचा विषय ठरतो आणि त्यासाठी संपूर्ण देशाचा भूवैज्ञानिक नकाशा तयार करणे, ही एक प्राथमिक गरज बनते. १८८० साली एका इंचास चौसष्ट मैल (१ सेंमी. = सु. ४० किमी.) या प्रमाणाचा भारताचा भूवैज्ञानिक नकाशा या संस्थेने प्रथम तयार केला. दैनंदिन कामासाठी यापेक्षा मोठ्या प्रमाणाचा नकाशा पाहिजे म्हणून १ : ५०,००० किंवा अंदाजे २ सेंमी = १ किमी. या प्रमाणाचा नकाशा तयार करण्याचे काम चालू आहे. भारताच्या मोठ्या क्षेत्रफळाचा विचार करताना वरील प्रमाणाचा संपूर्ण देशाचा नकाशा तयार होण्यास बराच कालावधी लागणार आहे. भूवैज्ञानिक नकाशा जेवढा मोठ्या प्रमाणाचा तेवढा तो जास्त वस्तुस्थितिनिदर्शक असतो. खनिज साठे असलेल्या भूभागाचे निरनिराळ्या मोठ्या प्रमाणांचे नकाशेही तयार करण्यात येत आहेत.  

भारतातील दिवसानुदिवस वाढत्या औद्योगिकीकरणास लागणाऱ्या तातडीच्या गरजा लक्षात घेता संपूर्ण नकाशा तयार होईपर्यंत वाट पाहता येणार नाही म्हणून संस्थेने पुढीलप्रमाणे अनेक शाखोपशाखा स्थापन केल्या आहेत. भूवैज्ञानिक नकाशा तयार करण्याची जबाबदारी मुख्यतः राज्य-निहाय मंडळांवर असून त्यांच्या प्राथमिक पाहणीनंतर विशिष्ट खनिजांचा सखोल अभ्यास करण्यासाठी ‘खनिज शाखा’, धरणे-बोगदे-पूल रस्ते वगैरे मोठ्या प्रकल्पांतील खडकांची मजबुतीच्या दृष्टीने पाहणी करून कमजोर खडकांच्या मजबुतीसाठी उपाय योजण्याकरिता ‘अभियांत्रिकीय भूविज्ञान शाखा’, निरनिराळ्या जलवायुमानांच्या (दीर्घकालीन सरासरी हवामानांच्या) आणि विविध खडकांच्या खंडप्राय देशातील भूमिजलाचा अभ्यास करण्याकरिता ‘भूमिजल शाखा’, खनिजांच्या जमिनीखालील आढळासंबंधी पक्की माहिती मिळविण्यासाठी तेथे वेधन करण्यासाठी व खोलभागातील नमुने मिळविण्याकरिता ‘वेधन शाखा’, वाढत्या ओद्योगिकीकरणात उत्पन्न होणाऱ्या प्रदूषणाच्या अभ्यासासाठी ‘परिसर-भूविज्ञान शाखा’, खडकात आढळणाऱ्या जीवाश्मांचा (जीवांच्या शिळारूप अवशेषांचा) अभ्यास करून खडकांच्या कालनिर्णयासाठी व जैव क्रमविकासाच्या (उत्क्रांतीच्या) अभ्यासासाठी ‘पुराजीवविज्ञान व पुरावनस्पतिविज्ञान शाखा’, समुद्रातील खनिजांचे साठे शोधण्यासाठी ‘सागरी भूविज्ञान शाखा’ आणि वरील सर्व शाखांना अद्ययावत तंत्रांचा वापर करता यावा म्हणून ‘हवाई खनिज सर्वेक्षण व समन्वेषण शाखा’, खडकांच्या वयोमानाचा अभ्यास करण्यासाठी ‘भू-कालमापन शाखा’, हवाई छायाचित्राच्या साहाय्याने भूसंरचनेचा भूवैज्ञानिक अभ्यास करण्याकरिता ‘प्रकाश-भूविज्ञान शाखा’ अशा अनेक शाखोपशाखा संस्थेत असून त्या एकमेकींत पूरक कामे करीत आहेत. वरील सर्व संशोधनांस अनेक प्रकारच्या प्रयोगशाळांची जरूरी असते आणि त्यासाठई शिलावैज्ञानिक प्रयोगशाळा, रासायनिक प्रयोगशाळा, पुराजीवविज्ञान-पुरावनस्पतिविज्ञान प्रयोगशाळा, खनिजांच्या सूक्ष्म अभ्यासासाठी क्ष-किरण विश्लेषण प्रयोगशाळा अशा या संस्थेतील विविध प्रयोगशाळा अद्ययावत उपकरणांनी समृद्ध आहेत.


भूवैज्ञानिक शोधकाने केलेल्या कामाचा तपशील त्यात दरवर्षी संस्थेला द्यावा लागतो. त्यासाठी चित्रे, आलेख, चित्रपत्रे, नकाशे वगैरेंची मोठ्या प्रमाणावर गरज असते. ती भागविण्यासाठी नकाशा चित्रण शाखा, भूवैज्ञानिक नकाशे अनेक रंगांत छापून प्रसिद्ध करण्यासाठी छापखाना, अनेक उपकरणे, वाहतुकीची साधने, वेधन यंत्रे वगैरेंच्या दुरुस्ती-निर्मितीसाठी कर्मशाळा अशा अनेक शाखा संस्थेच्या दैनंदिन कार्यात महत्त्वाचा वाटा उचलीत आहेत. भूविज्ञानविषयक ग्रंथांचे, संदर्भ ग्रंथांचे, जगातील अशाच कार्याबद्दलच्या माहितीसाठी देशी-परदेशी नियतकालिकांचे नित्य परिशीलन आवश्यक असल्याने कलकत्ता येथे फार मोठे मध्यवर्ती ग्रंथालय असून १९८१ मध्ये तेथील ग्रंथाची संख्या सु. ४,१२, ०६० इतकी होती. विभाग व मंडले यांनाही लहान लहान ग्रंथालये जोडलेली आहेत. 

 भूवैज्ञानिकांनी केलेल्या कामाची माहिती जनतेस करून देणे आश्यक असल्याने दरवर्षीच्या कामाचा धावता आढावा रेकॉर्डस विभागा-निहाय प्रकाशनाद्वारे प्रसिद्ध करण्यात येतो. एखाद्या प्रदेशाचा भूवैज्ञानिक नकाशा व तेथील खडकांचा अभ्यास किंवा एखाद्या खनिजाचा सर्वंकष अभ्यास पूर्ण झाल्यावर त्याची सविस्तर माहिती मेम्वार्स या प्रकाशनात प्रसिद्ध होते. पुराजीवविज्ञान शाखांचे संशोधन पेलँटॉलॉजिका इंडिका यातून प्रसिद्ध करण्यात येते. याव्यतिरिक्त खनिजे, अभियांत्रिक प्रकल्प, भूमिजल प्रकल्प इ. पूर्ण झालेली संशोधने बुलेटीन्स म्हणून प्रसिद्ध होतात. इंडियन मिनरल्स हे त्रैमासिक व जी एस आय न्यूज नावाचे मासिक प्रसिद्ध होते. खनिजाच्या उपयोगाबाबत संस्थेमार्फत कोणासही विनामूल्य सल्ला देण्यात येतो. शाळा, विद्यापीठे, राष्ट्रीय प्रयोगशाळा यांना लागणारी खनिजे किंवा खडकांचे नमुने विनामूल्य पुरविले जातात. निरनिराळ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय भूविज्ञानविषयक परिसंवादांतून आपापल्या संशोधन कामावर आधारित लेख वाचून त्यांवर चर्चा करण्यासाठी संस्थेतर्फे सर्व भूवैज्ञानिकांस प्रोत्साहन देण्यात येते. 

जागतिक महत्त्वाचे मूलभूत संशोधन करून संस्थेने भूवैज्ञानिक प्रगतीत महत्त्वाची भर घातली आहे. उदा., (१) खंडविप्लव विस्थापनेच्या सिद्धांतात [⟶ खंडविप्लव] पोषक असे, गोंडवनभूमी, तिच्यातील समकालीन हिमयुगे, ग्लॉसोप्टेरीस नावाची पुरातन वनस्पती यांचा शोध (२) भूकंप संशोधनात कंपनांच्या तीन प्रकारच्या तरंगांचा सिद्धांत मांडून पृथ्वीच्या अंतरंगाच्या संरचनेच्या अभ्यासात घातलेली भर (३) हिमालय पर्वताची उत्पत्ती व संरचना यांविषयी केलेले संशोधन(४) मानवाच्या क्रमविकास सिद्धांतात अतिशय महत्त्वाचे शिवालिक टेकड्यांतील इतिहासपूर्व कालीन सस्तन प्राण्यांच्या अवशेषांचे शोध व त्यांचे कालनिर्णय इत्यादी. वाढत्या औद्योगिकीकरणास लागणारा खनिजांचा कच्चा माल देशात्ल्या देशात आता मोठ्या प्रमाणावर मिळू शकतो. बोकारे, भिलाई व राउरकेला येथील पोलादाचे कारखाने, राजस्थानातील खेत्री, बिहारमधील सिंगभूम, आंध्र प्रदेशातील अग्निगुंडला, मध्य प्रदेशातील मलंजखंड वगैरे ठिकाणचे तांबे, जस्त, शिसे यांचे स्वातंत्र्योत्तर काळात मोजण्यात आलेले प्रचंड साठे, याच काळात दगडी कोळशाचे हजार कोटी टनांचे मोजण्यात आलेले साठे इ. अनेक उदाहरणे संस्थेच्या यशाचे बोलके पुरावे आहेत.

सहस्त्रबुद्धे, य. शि.