भारतीय प्राणिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था : ही संस्था भारत सरकारने स्थापन केलेल्या वैज्ञानिक सर्वेक्षण संस्थांपैकी एक होय. या संस्थेची स्थापना १ जुलै १९१६ रोजी कलकत्ता येथे झाली. एशिअँटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेच्या निसर्गवैज्ञानिक सदस्यांनी सुरू केलेला प्राणिविज्ञानाचा अभ्यास भारतीय वस्तुसंग्रहालयातील निसर्गेतिहास विभागातील अधीक्षकांनी तसाच पुढे चालू ठेवला व त्यातूनच पुढे भारतीय प्राणिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेचा उगम झाला. सुरुवातीस या संस्थेत प्राणिविज्ञान व मानवशास्त्र या दोन शाखांचा समावेश केला गेला व नेल्सन अँननडेल यांची संचालकपदी नियुक्ती झाली. भारतीय वस्तुसंग्रहालयातील प्राणिविज्ञानाचे सहा विभाग आणि मानवशास्त्राचा एक विभाग या संस्थेकडे वर्ग करण्यात आले. पुढे १९४५ साली मानवशास्त्राचा विभाग या संस्थेतून अलग काढून नंतर त्यांचे मानवशास्त्र सर्वेक्षण संस्था असे नामकरण करण्यात आले. 

प्राणिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेवर पुढील कामे सोपविण्यात आली : (१) भारतातील प्रमाणभूत प्राणिसंग्रहाचे रक्षण करणे (२) सरकारी खात्याकडून, इतर संस्थांकडून किंवा व्यक्तींकडून आलेल्या प्राण्यांच्या नमुन्यांची ओळख पटवून देणे (३) भारतातील प्राण्यांच्या वर्गीकरणाची व भौगोलिक संबंधांची शक्य तेवढी सविस्तर माहिती मिळविणे (४) प्राणिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेच्या संचालकांनी भारत सरकारला प्राणिविज्ञानविषयक बाबीत सल्ला देणे (५) प्राणिविज्ञानविषयक नियतकालिके, व्याप्तिलेख व ग्रंथ प्रकाशित करणे (६) भारतीय वस्तुसंग्रहालयातील सहा प्राणिवैज्ञानिक विभागांचे व्यवस्थापन व देखभाल करणे.

या संस्थेचे मुख्य कार्यालय सुरुवातीपासून कलकत्ता येथे आहे. मधल्या १९४२-४८ या काळात दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी सुरक्षिततेच्या दृष्टीने ते बनारस येथे हलविण्यात आले होते. सध्या या संस्थेच्या कलकत्त्यात सहा इमारती आहेत व प्रत्येक इमारतीत निरनिराळ्या शाखा आहेत. संस्थेची चौदा प्रादेशिक केंद्रे भारतभर पसरलेली असून ती पुढीलप्रमाणे आहेत : (१) उत्तर प्रादेशिक केंद्र, डेहराडून (२) पूर्व प्रादेशिक केंद्र, शिलाँग (३) पश्चिम प्रादेशिक केंद्र, पुणे (४) मध्य प्रादेशिक केंद्र, जबलपूर  (५) वाळवंटी प्रादेशिक केंद्र, जोधपूर (६) दक्षिण प्रादेशिक केंद्र, मद्रास (७) गंगाखोरे प्रादेशिक केंद्र, पाटणा (८) उच्च उंचीवरील प्राणिवैज्ञानिक क्षेत्रीय केंद्र, सोलन (९) सागरी जीववैज्ञानिक क्षेत्र, मद्रास (१०) अंदमान-निकोबार प्रादेशिक केंद्र, पोर्ट-ब्लेअर (११) गोडे पाणी जीववैज्ञानिक केंद्र, हैदराबाद (१२) सुंदरबन क्षेत्रीय संशोधन केंद्र, काकद्वीप (१३) नदीमुखीय जीववैज्ञानिक केंद्र, बेहरामपूर (१४) पश्चिम घाट क्षेत्रीय संशोधन केंद्र, कोझिकोडे (कालिकत). याखेरीज कोचीन येथेही एक तात्पुरते केंद्र आहे.

संस्थेच्या कलकत्ता येथील मुख्य कार्यालयात एक संचालक, दोन सहसंचालक व तीन उपसंचालक काम पाहतात. संस्थेचे एकंदर १८ विभाग आहेत. सर्व विभागांत एकूण ४३ उपविभाग असून प्रत्येक उपविभागात एक तज्ञ अधिकारी आणि इतर कित्येक विशेषज्ञ व साहाय्यक कर्मचारी आहेत. प्रादेशिक केंद्रावर एक उपसंचालक किंवा अधीक्षक प्राणिवैज्ञानिक व्यवस्था पाहतो.

संस्थेच्या व्यवस्थापनाखालील राष्ट्रीय प्राणिसंग्रहांत जवळपास साडेअकरा लाख प्राणी आहेत. या सर्व प्राण्यांची विभागणी सु. ५२,००० जातींत होते. यांत अतिसूक्ष्म आदिजीवांपासून ते मोठ्या हत्ती व देवमाशासारखे सर्व प्राणी आहेत. या संग्रहात काही जातींचे प्रारूपिक (नमुनेदार) स्वरूपाचे प्राणीही आहेत. १९५९-६३ या काळात संस्थेकडे दरवर्षी ४,७०० प्राणी ओळख पटविण्यास पाठविले जात. यांची संख्या १९७६-८० या काळात दरवर्षी ४९,००० झाली. यावरून संस्थेच्या कामाची व्याप्ती किती वाढली आहे याची कल्पना येईल.

संस्थेच्या ग्रंथालयात १९८२ मध्ये सु. ४६,००० ग्रंथ व ८७० नियतकालिके होती. हे ग्रंथ व नियतकालिके विविध भाषांतील असून त्यांचा संदर्भ म्हणून उपयोग होतो. काही नियतकालिके संस्थेच्या अनुदानातून विकत घेतली जातात, तर काही संस्थेस त्यांच्या नियतकालिकांच्या देवाणघेवाणीत मिळतात. या ग्रंथालयाचा उपयोग संस्थेतील संशोधकासच होतो असे नाही, तर विद्यापीठे, इतर शिक्षण संस्था, संशोधन संस्था व संशोधक व्यक्ती यांनाही होतो.

संस्था पुढील नियतकालिके प्रसिद्ध करते : (१) रेकॉर्डस ऑफ द झूलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया (पूर्वीचे नाव रेकॉर्डस ऑफ द इंडियान म्युझियम) : हे त्रैमासिक असून १९८२ पर्यंत त्याचे ७८ खंड प्रसिद्ध झाले होते. (२) मेम्वार्स ऑफ द झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (पूर्वीचे नाव मेम्वार्स ऑफ द इंडियन म्युझियम) : व्याप्तिलेखांच्या स्वरूपाच्या या नियतकालिकाचे १९८२ पर्यंत १६ खंड प्रसिद्ध झाले होते. (३) ऑकेजनल पेपर्स ऑफ द रेकॉर्डस ऑफ द झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया : भारतातील विविध प्राणिवैज्ञानिक अंगोपांगासंबंधीचे दीर्घ निबंध या प्रकाशनात प्रसिद्ध करण्यात येतात. १९७६ मध्ये सुरू झालेल्या या प्रकाशनाचे १९८२ पर्यंत २३ अंक प्रसिद्ध झाले. (४) फॉना ऑफ इंडिया (पूर्वीचे नाव फॉना ऑफ ब्रिटिश इंडिया) : यात प्राण्यांच्या संघांचे प्रत्येक खंडात एक संघ असे सर्वेक्षण व वर्गीकरण केले असून याचे १९८२ पर्यंत ९६ खंड प्रसिद्ध झाले होते. (५) टेक्निकल मोनोग्राफ्स : भारतातील विविध प्राणिवैज्ञानिक बाबींसंबंधी व्याप्तिलेख यात प्रकाशित करण्यत येतात. याचे १९८२ पर्यंत ५ खंड प्रसिद्ध झाले होते. (६) बुलेटिन ऑफ झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया : १९७८ मध्ये सुरू झालेल्या या प्रकाशनाचे वर्षातून तीन अंक प्रसिद्ध करण्यात येतात. (७) हँडबुक सीरीज : नवशिक्या संशोधकांना त्यांच्या क्षेत्रातील उपयुक्त अशी माहिती यात दिली जाते. याचा पहिला अंक १९८० साली प्रसिद्ध झाला.

याव्यतिरिक्त बिब्लिओग्राफी ऑफ इंडियन झूलॉजी, ॲन्युएल रिपोर्ट ऑफ द झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, झेड एस आय न्यूज यांसारखी अहवालवजा प्रकाशने, तसेच सामान्यविज्ञान वाचकांसाठी अर्ध-तांत्रिक स्वरूपाच्या भाषेतील लेखांचा समावेश असलेले झूलॉजियाना (स्थापना १९७८) हे द्विवार्षिक प्रसिद्ध केले जाते. संस्थेच्या प्रेरणे घडविलेले परिसंवाद किंवा उजळणी पाठ्यक्रम यांचे अहवालही संस्थेमार्फत प्रसिद्ध केले जातात.


भारत सरकारचे प्राणिवैज्ञानिक सल्लागार व भारतीय वन्य पशुपक्षी मंडळाचे सदस्य या नात्याने ही संस्था भारतीय प्राणिजातीच्या संरक्षणाचेही कार्य करते. सरकारच्या विज्ञान व तंत्रविद्या खात्याने हाती घेतलेल्या काही प्रकल्पांत ही संस्था सहभागी झाली आहे. या प्रकल्पांत टोपीवाले माकड, सिंहसदृशपुच्छ असलेले माकड, निलगिरी लंगूर, ऱ्हीसस माकड, हनुमान माकड, हूलॉक माकड यांसारख्या दुर्मिळ प्राण्यांचे व भारतातील रूक्ष प्रदेशांतील दुर्मिळ व निर्वंश होण्याच्या मार्गावर असलेले पक्षी व सस्तन प्राणी यांचे परिस्थितिविज्ञान (सजीव व त्यांचा परिसर यांच्यातील परस्परसंबंधांचा अभ्यास) व त्यांची संख्या यांवर संशोधन चालू आहे. या संशोधनाच्या आधारावर या दुर्मिळ व निर्वंश होण्याच्या मार्गावर असलेल्या पशुपक्ष्यांचे रक्षण कसे करता येईल, हेही संस्थेकडून सुचविले जाते.

विद्यापीठे व इतर वैज्ञानिक संस्थांशी या संस्थेचा निकट संबंध आहे. १९८० सालात या संस्थेकडून ३,००० प्राण्यांचे नमुने तपासले गेले व त्यांची १,००० जातींत वर्गवारी केली गेली. तसेच या एकाच वर्षात सु. १५० प्राणिविज्ञानविषयक चौकश्यांना उत्तरे दिली गेली. यावरून विद्यापीठे व इतर वैज्ञानिक संस्थांना या संस्थेची उपयुक्तता किती आहे, याची कल्पना येईल. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पुष्कळदा संस्था त्यांच्या सर्वेक्षण कार्यक्रमात सहभागी करून घेते. यात मिळालेल्या माहितीचा या विद्यार्थ्यांना त्यांच्या डॉक्टरेट पदवीकरिता लिहाव्या लागणाऱ्या प्रबंधात उपयोग करता येतो. संस्था दरवर्षी एक सहा महिन्यांचा ⇨चर्मपूरण या विषयावरील प्रशिक्षण अभ्यासक्रम आयोजित करते. यातील उच्च प्रशिक्षण अभ्यासक्रम दर तीन वर्षांनी आयोजित केला जातो. असा अभ्यासक्रम असणारे हे देशातील एकमेव स्थान आहे व याचा फायदा भारतातील सर्व भागातील प्राणिशास्त्रज्ञांना होतो. आंतर-विद्यापीठीय मंडळाने संस्थेस एम्.एस्सी. व पीएच्.डी. या पदव्यांकरिता विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यास मान्यता दिली आहे. इतर बऱ्याच भारतीय विद्यापीठांनी पदव्युत्तर संशोधनासाठी व त्यांच्या विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी देण्यासाठी संस्थेस केंद्र म्हणून मान्यता दिली आहे.

या संस्थेने १९८२ सालापर्यंत प्राणि-सर्वक्षणाचे ९०० प्रकल्प हाती घेतले. सबंध भारतातील निरनराळ्या राज्यांच्या व केंद्रशासित प्रदेशांच्या ३३५ जिल्ह्यांपैकी ४८ जिल्ह्यांचे निरनिराळ्या प्राण्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. संस्थेने ज्यांत सक्रिय भाग घेतला अशा मोहिमा पुढीलप्रमाणे : डेली मेल हिमालय मोहिम-यतीच्या शोधार्थ (१९५४) चो-ओयू नेपाळ मोहिम (१९५८) हार्‌व्हर्ड-बेल सिक्कीम व दार्जिलिंग मोहीम (१९५८) इंडो-जर्मन आसाम, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, हिमालय प्रदेश व पश्चिम भारत मोहीम (१९५९) भारत-स्विस वायव्य व ईशान्य हिमालयी मोहीम (१९५८-६१) भारतातील विविध प्रदेशांतील कीटकांकरिता रॉस मोहिम (१९६१-६२) अरुणाचल प्रदेशातील देफाभूम व सुबनसिरी येथील बहुविध विषयासंबंधित वैज्ञानिक मोहीम (१९६९) उत्तर प्रदेशातील रूपकुंड व तोन्स खोरे मोहीम (१९७२) वायव्य व दक्षिण भारतातील भारत-जपानी कीटकवैज्ञानिक मोहिम (१९७८-७९). यांखेरीज संस्थेने सागरी सर्वेक्षणात आणि बंगालचा उपसागर,  हिंदी महासागर व अरबी समुद्र यांच्या मोहिमांतही भाग घेतला आहं. नेपाळ (१९४७-५४), भूतान (१९६६-७३) आणि ब्रह्मदेश (१९४५-४७) ह्या देशांचे प्राणिवैज्ञानिक सर्वेक्षणही संस्थेने केले आहे.

संस्थेने १९८२ पर्यंत प्राणिविज्ञानातील विविध शाखोपशाखांवर सु. ५,००० संशोधनात्मक निबंध व व्याप्तिलेख प्रसिद्ध केले आहेत व यामुळे तिला आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त झाली आहे. हे संशोधन कृषिविज्ञान, वनविद्या, मत्स्योद्योग, वैद्यक यांसारख्या शास्त्रांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले आहे. सुरूवातीच्या काळातील संस्थेत झालेले संशोधन केवळ प्राणिजात व त्यांचे वर्गीकरण यांवर आधारलेले होते. क्रस्टेशिया (कवचधारी), प्लॅटिहेल्मिंथ, मॉलस्का (मृदुकाय), कीटकवर्ग, मत्स्यवर्ग, पक्षी वर्ग व सस्तन प्राणी या निरनिराळ्या संघांतील व वर्गातील प्राण्यांचा (मुख्यत्वेकरून भारतात सापडणाऱ्या जातींचा) अभ्यास व वर्गीकरण संस्थेने प्रसिद्ध केलेल्या नियतकालिकांत व संशोधनात्मक निबंधांत आढळते. ऑनिकॉफोरा या संघातील आशिया खंडात आढळमारा टिफ्लोपेरिपॅटस ह्या एकमेव जातीचा प्राणी, तसेच सोनेरी लंगूर हे आसामात आढळणारे माकड हे संस्थेच्या संग्रहालयातील वैशिष्टयपूर्ण प्राणी होत.

पहिल्या जागतीस युद्धानंतर परत आलेल्या लष्करी फौजांत फैलावलेला ⇨खंडीतकायी-कृमिरोग(शिस्टोसोमियासिस) या रोगाचे सर्वेक्षण संस्थेमार्फत झाले. मत्स्योद्योगाच्या दृष्टीने ब्रह्मदेशातील काही नद्यांची पाहणी, ऑयस्टरसारख्या कवचधारी प्राण्यांची अंदमान व निकोबार येथे पाहणी, कलकत्ता महानगरपालिकेच्या पाणीपुरवठ्यात विविध सजीवांमुळे निर्माण होणारे अडथळे, दुसऱ्या महायुद्धात स्क्रब टायफस नावाच्या आसाम व ब्र्हमदेशात उद्भावणाऱ्या रोगाची पाहणी, भारताच्या निरनिराळ्या राज्यांतील मत्स्योद्योग वगैरे प्रकल्पही संस्थेने हाती घेतले व पूर्ण केले.

सध्या चालू असलेल्या व पूर्ण होण्याच्या स्थितीत असलेल्या प्रकल्पांची यादी व व्याप्ती खूपट मोठी आहे. यात विविध कीटकांवर निरनिराळे प्रयोग व संशोधन चालू आहे. याचबरोबर मत्स्यवर्ग, बेडूक, पाली, कासवे वगैरे उच्चवर्गीय प्राण्यांवरही प्रायोगिक स्वरूपाचे संशोधन चालू आहे. सध्याच्या संशोधनाचा भर विशेषेकरून परिस्थिति-विज्ञान, प्राणिसंख्या यांसारख्या दृष्टीकोणावर आहे.

संस्थेने सरकारच्या विज्ञान व तंत्रविद्या खात्याच्या मानव व जीवावरण राष्ट्रीय समितीच्या साहाय्याने इतर काही प्रकल्प हाती घेतले आहेत. यांपैकी काही महत्त्वाचे प्रकल्प पुढीलप्रमाणे : सस्तन प्राणी, पक्षी, सरीसृप (सरपटणारे प्राणी) व उभयचर (जमिनीवर आणि पाण्यात वास्तव्य करणारे) प्राणी यांच्या समृद्धतेवर किंवा दुर्मिळतेवर मनुष्यनिर्मित प्रकल्पांचे (उदा. कॉरेबेट राष्ट्रीय उद्यानातील राम-गंगा बहूद्देशीय विद्युत् निर्मिती प्रकल्प धरण) होणारे परिणामः दक्षिण भारतातील माकडांची संख्या व परिस्थितिविज्ञान रुक्ष प्रदेशांतील नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले काही सस्तन प्राणी व पक्षी यांचा अभ्यास जमिनीच्या सुपीकतेचा व काही सूक्ष्मजीवांचा संबंध भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था (इझ्झतनगर, उत्तर प्रदेश) व भारतीय कृषी संशोधन संस्था (नवी दिल्ली) यांच्या सहकार्यानेही काही प्रकल्प चालू आहेत.

यापुढील काळात प्राण्यांच्या निरनिराळ्या संघांतील अस्तित्वात असलेल्या व नवीन सापडलेल्या जाती निर्देशित करून फॉना ऑफ इंडियाचे खंड प्रसिद्ध करण्याचे काम संस्थेतर्फे चालूच राहणार आहे. ही संस्था आता नवीनच स्थापन झालेल्या पर्यावरण खात्याच्या कक्षेत गेल्यामुळे यापुढील संशोधनात नुसत्या प्राणि-वर्गीकरणास प्राधान्य न मिळता प्रायोगिक स्वरूपाचे संशोधन जास्त प्रमाणात हाती घेतले जाईल, असे दिसते.

  

इनामदार, ना. भा. जमदाडे, ज. वि.