भातखंडे, विष्णु नारायण : (१० ऑगस्ट १८६०- १९ सप्टेंबर १९३६). हिंदूस्थानी संगीतक्षेत्रातील
एक थोर संशोधक, संगीतशास्त्रकार व संगीतप्रसारक. जन्म वाळकेश्वर, मुंबई येथे. मूळ गाव कोकणातील नागाव (जि. रायगड). त्यांचे वडील मुंबईतील एका धनिकाच्या जमीनजुमल्याचे कारभारी होते. त्यांना संगीताचा शौक असून ते स्वरमंडलही वाजवत असत. त्यामुळे गजानन ऊर्फ विष्णू यांस लहानपणापासून संगीताची गोडी लागली. भातखंडे हे लहानपणी बासरी व महाविद्यालयात शिकत असतानाच सतार वाजवण्यास शिकले. सुरुवातीस गोपाळ गिरी यांच्याकडे व नंतर अंध वादक वल्लभदास दामुलजी यांच्याकडे त्यांनी सतारवादनाचे धडे घेतले. ते १८८५ मध्ये बी.ए. व १८८७ मध्ये एल्. एल्. बी. झाले. मात्र तत्पूर्वीच ते १८८४ मध्ये काही पारशी संगीतप्रेमींनी चालविलेल्या ‘गायनोत्तेजक मंडळी’ मध्ये (स्थापना १८७०) दाखल झाले होते. तेथे त्यांना त्या काळातील नामांकित गायक-वादकांचे गायन-वादन ऐकण्याची संधी मिळाली. ही संस्था त्यांच्या व्यासंगाची गंगोत्रीच ठरली व तेथे त्यांच्या संशोधनाला चाल नाही मिळाली. ह्या संस्थेत त्यांनी कितीतरी वर्षे विनावेतन संगीत शिकविले आणि वेगवेगळ्या थोर कलावंतांकडून पारंपारिक धृपदे, ख्याल, होऱ्या, तराणे, ठुमऱ्या यांची माहिती व चिजा गोळा करण्यास सुरुवात केली. त्यातून त्यांना असे आढळून आले, की गायकांच्या चिजांमध्ये व्यक्त होणाऱ्या रागस्वरुपांचा प्राचीन ग्रंथातील रागविचारांशी व उपपत्तींशी नीट मेळ बसत नाही. शास्त्रीय स्वरलिपिपद्धतीचा प्रचार नसल्याने आणि उपपत्तींचे गायकांना ज्ञान नसल्याने ते पारंपारिक चिजांमध्ये बदल करीत आणि नवीनही चिजा बनवीत. त्यामुळे उपलब्ध रागरागिण्या व चिजा हाच संशोधनाचा व उपपत्तींचा पाया मानून भातखंड्यांनी आपल्या जन्मभर चालविलेल्या संगीतकलेच्या पद्धतशीर अभ्यासाला प्रारंभ केला. गायनोत्तेजक मंडळीच्या नियतकालिक बैठकांमध्ये ते वरील विषयासंबंधी पद्धतशीर विचार मांडू लागले. जुन्या ग्रंथांतील भाषा व विचार अस्पष्ट, संदिग्ध व शंकास्पद असल्याचे त्यांना आढळून आले. तद्वतच प्राचीन ग्रंथांर्गत संगीतशास्त्र व प्रत्यक्ष प्रचलित गानव्यवहार यांतील पूर्ण फारकतही त्यांच्या निदर्शनास आली होतीच. त्यातून संगीतशास्त्राची नव्याने आमूलाग्र फेरमांडणी करणे व प्रचलित संगीतव्यवहाराशी त्याची सांगड घालणे, हे त्यांना अत्यावश्यक वाटू लागले. आपला वकिलीचा व्यवसाय सोडून त्यांनी संगीतसंशोधनाला सर्वस्वी वाहून घेतले. त्यासाठी त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रंमती केली (१९०४ १९०७ व १९०८-०९). ठिकठिकाणच्या संगीतकेंद्रांना भेटी देऊन तेथील शास्त्रकार व कलावंत ह्यांच्यासमवेत त्यांनी चर्चा केल्या. संगीतावरचे दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखिते यांचा शोध घेऊन, त्यांतील तत्वविचारांची चिकित्सा केली. महत्वाची हस्तलिखिते नकलून काढली. हिंदूस्थानी संगीतातील स्वरलिपिरचना, रागविचार, त्याचे आरोहावरोह, श्रुतिविचार, थाटपद्धती, वादी-संवादी स्वर इ. विषयांसंबंधी तात्त्विक सांगोपांग चर्चा व त्या अनुषंगाने विविध उपपत्ती त्यांनी आपल्या ग्रंथांतून मांडल्या. तसेच एक खास स्वरलिपिपद्धती प्रस्थापित केली. पंडित भातखंडे यांच्या संगीतकार्याची त्रिसूत्री म्हणजे प्राचीन संगीतविद्येचे संशोधन, नव्या संगीतशास्त्राची नव्याने उभारणी आणि ह्या संगीतशास्त्राचा प्रचार व प्रसार होय. त्यासाठी त्यांनी संगीतविद्यालयाची स्थापना केली. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी आपली सरकारी संगीतपाठशाळा नव्या पद्धतीने चालवण्यासाठी भातखड्यांच्या हवाली केली (१९१६). ग्वाल्हेरचे महाराज माधवराव शिंदे यांनी त्यांच्या देखरेखीखाली ‘माधव संगीत महाविद्यालय’ नव्याने स्थापन केले (१९१८) आणि मुख्य म्हणजे भातखंडे यांनी लखनौला तेथील स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने ‘मॅरिज कॉलेज ऑफ हिंदुस्थानी म्यूझिक’ हे स्थापन केले (१९२६). या संस्थेचेच रुपांतर पुढे ‘भातखंडे संगीत महाविद्यालया’ मध्ये झाले. तसेच या संगीतविद्यालयांसाठी सुसूत्र असा अभ्यासक्रम त्यांनी आखला व त्यानुसार क्रमिक पुस्तकेही तयार केली. संगीतविषयक खुल्या चर्चा व विचारविनिमय यांद्वारे संगीप्रसार व्हावा, म्हणून संगीतपरिषदा भरवण्याची मूळ कल्पनाही त्यांचीच होय. त्यानुसार बडोदे (१९१६), दिल्ली (१९१८), वाराणसी (१९१९) व लखनौ (१९२४ व १९२५) येथे परिषदा भरवण्यात त्यांनी पुढाकार घेतला. शिवाय शास्त्रीय संगीताच्या प्रचारासाठी लक्षणगीतसंग्रहासारख्या ग्रंथरचनाही केल्या. बव्हंशी १९०८ ते १९३३ या कालावधीत त्यांनी आपली ग्रंथरचना केली. त्यांची प्रमुख ग्रंथसंपदा पुढीलप्रमाणे :
स्वनिर्मिती ग्रंथ : (१) श्रीमल्लक्ष्यसंगीतम् व अभिनव रागमञ्जरी (संस्कृत) (२) हिंदूस्थानी संगीतपद्धती (मराठी, भाग ४, पृष्ठे सु. २,५००) (३) हिंदुस्थानी संगीतपद्धती क्रमिक पुस्तकमालिका (मराठी, भाग १ ते ६, एकूण चिजा १,८५२) (४) अ शॉर्ट हिस्टॉरिकल सर्व्हे ऑफ द म्यूझिक ऑफ अपर इंडिया (इंग्रजी) (५) अ कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ सम ऑफ द लीडींग म्यूझिक सिस्टिम्स ऑफ द फिफ्टीन्थ, सिक्सटीन्थ, सेव्हन्टीन्थ अँन्ड एटीन्थ सेंचुरीज (इंग्रजी) (६) हिंदुस्थानी म्यूझिक (इंग्रजी) (७) लक्षणगीतसंग्रह (३ भाग) (८) गीतमालिका (२३ मासिक अंक प्रत्येक अंकात सु. २५ गीतांच्या बंदिशी) (९) पारिजात प्रवेशिका : पं. अहोबलकृत संगीतपरिजात ग्रंथाच्या स्वराध्यायावरील भाषा (मराठी) (१०) रागविबोधप्रवेशिका : पं. सोमनाथकृत रागवियोध ग्रंथाच्या स्वराध्यायावरील भाष्य (मराठी).
तसेच त्यांनी काही संगृहीत ग्रंथही प्रकाशित केले, ते असे : (१) पं. रामामात्यकृत स्वरमेलकलानिधी (संस्कृत) (२) पं. व्यकंटमखीकृत चतुर्दण्डिप्रकाशिका (संस्कृत) (३) रागलक्षणम् (कर्ता अज्ञात) (४) राजा तुळजेंद्रकृत संगीतसारामृतोद्धार (संस्कृत) (५) कवी लोचनकृत रागतरड्गणी (संस्कृत) (६) पुंडरीक विठ्ठलकृत सद्रागचन्द्रोदय रागमञ्जरी, रागमाला, नर्तननिर्णय (चारही ग्रंथ संस्कृतामध्ये) (७) हृदयकौतुककृत हृदयकौतुक व हृदयप्रकाश (संस्कृत) (८) पं. भावभट्टकृत अनूपसंगीतरत्नाकर, अनूपसंगीतविलास व संगीतअनूपांकुश (सर्व संस्कृतामध्ये) (९) पं. श्रीनिवासकृत संगीतरागतत्त्वविबोध (संस्कृत) (१०) श्रीकंठकृत संगीतकौमुदी (संस्कृत) (११) पूर्ण कविकृत नादोदधि (हिंदी) (१२) चत्वारिशच्छतरागनिरुपणम् (संस्कृत) (१३) अष्टोत्तरशतताललक्षणम् (संस्कृत ग्रंथकर्ता अज्ञात) (१४) पं. काशिनाथशास्त्री अप्पा तुलसीकृत संगीतसुधाकर, संगीतरागकल्पद्रुमड्कुर, संगीतरागचन्द्रिका (सर्व संस्कृतामध्ये) व संगीतरागचन्द्रिकासार (हिंदी).
यांपैकी काही ग्रंथाची रचना त्यांनी टोपणनावाने केली. उदा., लक्ष्यसंगीत ग्रंथासाठी ‘भरतपूर्वखंडनिवासी चतुर पंडित’ हिंदुस्थानी संगीतपद्धतीसाठी ‘पं. विष्णुशर्मा’ तर चिजांसाठी ‘चतुर’ व ‘हररंग’ ही नावे त्यांनी घेतली. शिवाय जुन्या संस्कृत ग्रंथांच्या प्रकाशनासाठी ‘भारव्दाजशर्मा’ हे नाव स्वीकारले. त्यांची ही ग्रंथसंपदा व मौलिक संशाधन संगीतशास्त्रज्ञांच्या व कलावंतांच्या पुढील पिढ्यांना मार्गदर्शक व प्रेरक ठरले. वाळकेश्वर, मुंबई येथे निधन झाले.
संदर्भ : रांतजनकर, श्री. ना. संगीताचार्य पं. विष्णु नारायण भातखंडे,मुंबई, १९७३.
मंगरुळकर, अरविंद गिंडे, कृ. गुं.
“