भागवत धर्म : हिंदू धर्माचा गाभा असलेला मोक्षप्राप्त्यर्थ एकेश्वरभक्तीला प्राधान्य देणारा धर्म. ‘भगवत्’ या संस्कृत शब्दाचा ईश्वर असा अर्थ असुन ‘भागवत’ हे त्या शब्दापासून बनलेले विशेषण आहे. त्यामुळे भागवत धर्म म्हणजे भगवंताने सांगितलेला धर्म असा अर्थ होतो. भागवतांचा म्हणजे भगवंताच्या भक्तांचा धर्म, असाही त्याचा अर्थ सांगितला जातो. शिव भागवत, देवी भागवत इ. संप्रदायही अस्तित्वात असले, तरी भागवत संप्रदाय हा प्रामुख्याने वैष्णव संप्रदाय म्हणूनच विख्यात आहे. यात ⇨विष्णु आणि विशेषतः त्याचा कृष्णावतार वासुदेव भगवान हाच उपास्य आहे.
भागवत धर्म वैदिक आहे की अवैदिक, तो वेदकाळी निर्माण झाला की वेदपूर्व आहे इ. प्रश्नांवर विद्वानांत मतभेद आहेत. वि. रा. शिंद यांच्या मते तो वेदपूर्व आहे, तर ज्ञानकोशकारांच्या मते त्याची निर्मिती उपनिषदांनंतर व बुद्धापूर्वी झाली आहे. ब्यूलरच्या मते इ. स. पू. नवव्या-दहाव्या शतकात हा धर्म रुढ होता. पाणिनीच्या अष्टाध्यायीत (४.३.९८) वासुदेव हे नाव आले असून त्यावरुन पाणिनीच्या काळी वासुदेवाची भक्ती करणारा भागवत संप्रदाय. अस्तित्वात होता, असे अनुमान रा. गो. भांडारकर यांनी केले आहे. स्वतःला भागवत समजणाऱ्या हीलिओडोरस या ग्रीक वकिलाने इ. स. पू. सु. २०० मध्ये वासुदेवाच्या स्मरणार्थ बेसनगर येथे गरुडस्तंभ उभारला होता. समुद्रगुप्तानंतरचे गुप्त राजे स्वतःला परम भागवत म्हणवून घेत असत. त्यांचा आश्रय हे पाचव्या शतकानंतर भागवत संप्रदाय लोकप्रीय होण्याचे एक महत्त्वाचे कारण होय.
भागवत धर्म सूर्योपासनेतून विकसित झाला, असे ग्रीअर्सन यांचे मत होते. या धर्माला मिळालेले ‘भागवत’ हे नाव बरेच उत्तरकालीन आहे. प्रारंभी याला नारायणीय, एकांतिक, पांचरात्र सात्वत इ. नावे होती. नारायण ऋषीने या धर्माची स्थापना केली, म्हणून त्याला नारायणीय धर्म असे नाव मिळाले. पुढे नारायणाचे विष्णूशी तादात्म्य मानले गेले व त्याला वैष्णव धर्माचे स्वरुप आले. परमेश्वर एकच व तो उपास्य असे मानल्यामुळे त्याला एकांतिक हे नाव मिळाले. पांचरात्र या नावाच्या व्युप्तत्ती वगैरेंविषयी विद्वानांत मतभेद आहेत. पाच दिवस चालणाऱ्या पुरुषमेधाला पंचरात्र म्हणतात. त्यातून भागवत धर्म निघाला, असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात. नारायणाने पंचरात्र सत्र केले आणि त्याद्वारे त्याने सर्वात्मभाव प्राप्त करुन घेतला, असे सांगितले जाते. [⟶ पांचरात्र]. कृष्ण ज्या सात्वत कुलात जन्मला होता, त्या कुलात भागवत धर्माचा प्रसार झालेला असल्यामुळे त्याला सात्वत धर्म असेही म्हटले गेले. वासुदेव कृष्णाने भागवत धर्माची स्थापना केली, की त्याचे फक्त पुनरुज्जीवन केले, याविषयी मतभेद असून उत्तरकालात ⇨ कृष्ण हा मुख्यतः भागवत धर्माचे उपास्य दैवत बनला. (१) एकेश्वरी भक्तीचे प्रतिपादन, (२) ब्राह्मण धर्म व भागवत धर्म यांच्यात देवघेव, (३) एकेश्वरी तत्त्व न सोडता इतर देवांना ईश्वरी अवतार मानणे, आद्य शंकराचार्यांच्या हल्ल्यामुळे आलेली उतरती कळा आणि (४) दक्षिणेत रामानुज वगैरेंनी आणि उत्तरेत रामानंद वगैरेंनी केलेले पुनरुज्जीवन, हे भागवत धर्माच्या इतिहासाचे चार भाग आहेत, असे ज्ञानकोशकारांनी म्हटले आहे.
भागवत धर्म भक्तिप्रधान आहे. ईश्वरभक्तीनेच मोक्ष मिळतो, किंबहुना ज्ञानापेक्षा भक्ती ही श्रेष्ठ आहे, असे या धर्माने मानले आहे. अनंत असा ईश्वर आपल्या प्रकृतीपासून जगाची निर्मिती करतो. तो अनेक वेळा जगाच्या कल्याणासाठी अवतारांच्या रुपाने प्रकट होतो. नारायण, विष्णू, कृष्ण, वासुदेव इ. नावांनी तो ओळखला जातो. वासुदेव (परमात्मा), संकर्षण (जीवात्मा), अनिरुद्ध (अहंकार) आणि प्रद्युम्न (मन वा बुद्धी) हे त्याचे चार व्यूह मानले आहेत. या धर्मात अहिंसेला प्राधान्य असून भूतद्या, सत्यवचन, परोपकार, आई-वडिलांची सेवा इ. नैतिक मूल्यांना अत्यंत महत्त्व देण्यात आले आहे. संत आणि गुरू यांच्याविषयी आदर बाळगावा, असे हा धर्म सांगतो.
गुप्त साम्राजाच्या काळात उत्तर भारतात भागवत धर्माचा प्रसार खूप झाला. तमिळनाडूंमध्ये ⇨ आळवार संतांनी (इ. स. सु. चवथ्या शतकापासून नवव्या शतकापर्यंत) वैष्णवभक्तीचे माहात्म्य वाढविले. नंतरच्या काळात ⇨ रामानुज, ⇨ मध्वाचार्य, ⇨ निंबार्क इ. आचार्यांनी भागवत धर्माचे महत्त्व वाढविले. उत्तरेत ⇨ रामानंदांनी कृष्णाच्या ऐवजी रामाला उपास्थ बनवून भागवत धर्माचे पुनरुज्जीवन केले.⇨ वल्लभाचार्या, ⇨ चैतन्य महाप्रभू, हितहरिवंश, हरिदास इत्यादींनी कृष्णभक्तीचा प्रभाव वृद्धिंगत केला. महाराष्ट्रातील प्रख्यात असा ⇨ वारकरी संप्रदाय हा भागवत संप्रदायातच अंतर्भूत होतो. ⇨ ज्ञानेश्वर, ⇨ नामदेव इत्यादींचे कार्य या संप्रदायाचे माहात्म्य वाढण्यास कारणीभूत झाले असून ⇨ तुकारामांना तर भागवत धर्माचा कळस मानले जाते.
⇨ भागवतपुराण आणि ⇨ भगवद्गीता हे या संप्रदायाचे प्रमुख आधारग्रंथ होत. त्याशिवाय महाभारताच्या शांतिपर्वातील नारायणीय उपाख्यान ⇨ हरिवंश, पंचरात्रसंहिता, सात्वत – संहिता आणि विष्णुपुराण या नावाचे विविध ग्रंथ, शांडिल्य व नारद यांची भक्तिसूत्रे, रामानुज वगैरे आचार्यांचे ग्रंथ, ज्ञानेश्वरादी संतांचे साहित्य इ. वाङमयाचा भागवत धर्मांच्या आधारग्रंथांमध्ये अंतर्भाव होतो.
महाभारताच्या मते भागवत धर्म हा लोकधर्म आहे. सामाजिक दृष्ट्या हीन मानलेल्या जातीतही साधू जन्माला येतात, केवळ स्त्री शूद्रांनाच नव्हे, तर पशूंनादेखील मोक्षाचा अधिकार असतो, भक्तीच्या क्षेत्रात कुळ, वंश, देश इत्यादींचे भेद मानू नयेत इ. प्रकारचे उदात्त विचार या धर्माने पुरस्कारिले. रुढ कर्मकांड आणि संकुचित आचारधर्म यांच्यापेक्षा त्याने नैतिक कर्तव्य श्रेष्ठ मानले. यवन, हूण, शक, किरात, चांडाळ इत्यादींनाही त्याने जवळ केले. पारमार्थिक क्षेत्रात सामाजिक समता आणली. भागवत धर्म हा इतिहासपुराणांच्या संस्कृतीचा प्राण आहे, त्याने परमार्थाला इहलोकात आणले आणि नीतिनिष्ठेला स्वयंश्रेष्ठता दिली, असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात. अस्पृश्यता व जातिभेदासारखे दोष दूर करुन सामाजिक क्षेत्रात समता आणण्याचे कार्य मात्र तो करु शकला नाही, ही त्याची मर्यादा होय.
पहा : भक्तिमार्ग : वैष्णव संप्रदाय.
संदर्भ : 1. Bhandarkar, R. G. Vaisnavism, Saivism and Minor Religious Systems, Varanasi, 1965.
२. उपाध्याय, बलदेव, भागवत संप्रदाय, काशी, १९५३.
3. जोशी, लक्ष्मणशास्त्री, वैदिक संस्कृतीचा विकास, वाई, १९७२.
४. पेंडसे, शं. दा. वैदिक वाड्मयातील भागवत धर्माचा विकास, पुणे, १९६५.
साळुंखे. आ. ह