भरतनाट्यम् नृत्य : एक अभिजात भारतीय नृत्यप्रकार. भरतनाट्यम् शैली ही मूळ तमिळनाडूमधील तंजावर जिल्ह्याची म्हणून प्रसिद्ध आहे. हे नृत्य प्रामुख्याने स्त्रिया करतात. शिलप्पधिकारम्
(इ.स.सु २रे-३रे शतक) या तमिळ ग्रंथामध्ये नृत्याचा उल्लेख सापडतो. तंजावरच्या चोल राजांच्या कारकिर्दीत ही नृत्यपद्धती रुढ होती. त्यांच्यानंतरचे नायक राजे हे या नृत्यकलेचे महान आश्रयदाते होते. त्यांनी शेकडो कलावंतांच्या योगक्षेमाची संपूर्ण व्यवस्था केली होती. तंजावरच्या भोसले घराण्यातील व्यंकोजीपासून (कार. १६७६-१६८४) ते शिवाजीपर्यंतचे (कार. १८३३-१८५५) राजे आज अस्तित्वात असलेल्या भरतनाट्याचे खरेखुरे आधारस्तंभ ठरले. आजच्या परंपरागत भरतनाट्यम् पद्धतीचे आद्यप्रवर्तक मानले जाणारे चिन्नया, पोन्नया, शिवनंदम् व वडिवेलू या चारही पिळ्ळै बधूंचा ‘अरेंगेट्रम्’ (प्रथम रंगमंच-प्रवेश) दुसरे सरफोजी महाराज (कार. १७९८-१८३२) यांच्या दरबारी झाला (सु. १८२५). या चार बंधूंनी तेलुगूमध्ये व काही तमिळमध्ये रचलेले नृत्यप्रकार परंपरागत नृत्यपद्धती म्हणून रुढ झालेले आहेत. हेच सध्या प्रचलित असलेले भरतनाट्यम् होय.
पूर्वी या प्रांतातील नृत्यप्रकाराला ‘कूत्तू’, ‘आट्टम्’ अशी नावे होती. कालांतराने ते ‘दासीआट्टम्’ म्हणून ओळखले जाऊ लागले. देवदासींनी या नृत्याचे जतन व जोपासना केल्याने त्यास हे नाव मिळाले असावे. तथापि दुसरे सरफोजीराजे भोसले यांनी आपल्या सदरेत किंवा दरबारात हे नृत्य करण्याची परंपरा रूढ करून त्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. तेव्हापासून या नृत्यपद्धतीला ‘सदरआट्टम्’ (दरबारी नृत्य) हे गौरवपूर्ण स्थान प्राप्त झाले.
तेलुगू साहित्यात नृत्यनाट्याचा ‘भरतशास्त्र’ असा उल्लेख आढळतो. भरताने आपल्या नाट्यशास्त्रात ‘नृत्य किंवा नाट्य यांच्या प्रयोगाला धुरेप्रमाणे जबाबदार असलेला तो भरत’, अशी व्याख्या केलेली आहे. भाव, राग व ताल यांचा जाणकार तो भरत, असेही मानले जाते. या सर्वाचा परिपाक म्हणून कालांतराने वरील सदरआट्टम् नृत्य हे भरतनाट्यम् म्हणून ओळखले जाऊ लागले.
प्रचलित भरतनाट्यम् नृत्यशैलीमध्ये नंदिकेश्वराचे अभिनयदर्पण हे पाठ्यपुस्तक म्हणून वापरतात. त्याच्याच नावावर गणले जाणारे भरतार्णव, शाङ्र्गदेवाचे संगीतरत्नाकर व भरताचे नाट्यशास्त्र यांचाही संदर्भग्रंथ म्हणून वापर केला जातो.
नृत्यशिक्षण : दक्षिण भारतात गायक, वादक व नर्तक या तिन्ही क्षेत्रांतील कलावंतांचा अरेंगेट्रम् मोठ्या थाटामाटाने करण्याचा प्रघात आहे. अरेंगेट्रम् करण्यासाठी कोणत्याही कलावंताला त्या त्या विषयात संपूर्ण पारंगत व्हावे लागते. त्यासाठी कमीत कमी एक तपाचा काळ जावा लागतो. नृत्याच्या अध्यापनाची सुरूवात सुमुहूर्तावर विधीयुक्त पूजेने केली जाते. सुरूवातीस शिकवले जाणारे पदाघात ‘अडवु’ या नावाने संबोधले जातात. अडवू म्हणजे ‘नृत्ता’ची (शुद्ध नर्तनाची) प्राथमिक हालचाल. अडू किंवा अडवू या तमिळ-तेलुगू संज्ञेचा अर्थ आहे पदाघात किंवा पदन्यास. हालचालींतील विविधतेनुसार अडवूंचे विशिष्ट गट बनले आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणेः (१) तट्टु अडवू – पाय आपटण्याचे प्रकार-७ (२) नट्टु अडवू – पाय रोवण्याचे प्रकार-९ (३) ता तै तै ता अडवू किंवा चतुरश्र हस्त अडवू-४ (४) वर्धमान हस्त किंवा शिखर हस्त अडवू-४ (५) तत् तै ता अडवू किंवा उत्तानवंचित हस्त अडवू ११ (६) तट्टु मेट्टु अडवू-५ (७) कुदित्तु मेट्टु अडवु – १० (८) चक्राधार अडवू किंवा सरणचारि अडवू-५ (९) पेरिय अडवू-५ (१०) जाति अडवु – हे तिश्र जातीनुसार ३ मात्रांत शिकवले जातात. त्यात एक पदन्यास असलेले २ प्रकार, दोन पदन्यासांचे ७ प्रकार व तीन पदन्यासांचे ६ प्रकार असतात (११) मंडि अडवू-४ (१२) गरूड स्थान अडवू-४ (१३) गिण तोम् अडवू-५ आणि (१४) तरि किट तोम् अडवू-५.
यांपैकी शेवटचे दोन प्रकार हे ‘मुत्ताईपु’ किंवा तिहाईचे प्रकार बोल समेवर आणण्यासाठी वापरले जातात. याशिवाय ‘नडै अडवु’ म्हणजे चालण्याचे प्रकार व ‘मेय अडवु’ म्हणजे अंगांनी केले जाणारे प्रकार वेगळे शिकवले जातात. वेगवेगळ्या गुरूंच्या संप्रदायांनुसार शिकवल्या जाणाऱ्या अडवूंची संख्या कमी-अधिक असते.
हे अडवू व्यवस्थित शिकण्यासाठी किमान एक ते दोन वर्षाचा कालावधी लागतो. अडवू मध्ये वापरले जाणारे हस्त, पाद, स्थान, मंडल त्या त्या क्रमाने तिथे तिथे शिकवतात. असंयुक्त हस्त ३२ आहेत, संयुक्त हस्त २३ आहेत, पादभेद ६ आहेत, स्थाने ६ आहेत व मंडले १० आहेत. भरतनाट्यम्मध्ये नृत्य करताना जी मूळ नृत्यावस्था असते, तिला तमिळमध्ये ‘आरै मंडी’ किंवा ‘आयत मंडलम् ‘ असे म्हणतात. यालाच ‘चतुरश्र स्थान’ असेही म्हणतात. अडवू शिकवल्यानंतर प्रथम ‘अलारिपु’, ‘जातिस्वरम्’ यांसारखे सोपे नृत्यप्रकार शिकवले जातात. नंतर ‘शब्दम्’, ‘वर्णम्’, ‘पदम्’, ‘जावळि’, ‘तिल्लाना’, ‘श्लोक’ इ. नृत्य व अभिनय या घटकांवर प्रभुत्व प्रस्थापित करणारे प्रदीर्घ प्रकार शिकवले जातात. वर्णम्, पदम्, तिल्लाना इ. म्हणजे विशिष्ट रचनाप्रकारांच्या संज्ञा असून विविध राग, ताल व साहित्यविषय वापरून केलेले अनेकविध पदम्, वर्णम् इ. शेकडो रचना परंपरेत रूढ आहेत.
नृत्यप्रयोगाचे स्वरूप : भरतनाट्यम् नृत्यप्रयोगामध्ये जे पारंपरिक आणि विधीयुक्त प्रकार त्या त्या प्रकारांस अनुरूप अशा गीतगायनासह केले जातात, त्यांचा थोडक्यात स्थूल परिचय पुढे क्रमवार दिला आहे. प्रयोगास सुरूवात पुढीलप्रमाणे होतेः
(१)स्तुती : स्तुती म्हणजे ईशस्तवन. हा प्रकार बहुधा पडदा बंद असताना गायक जातो. नृत्यप्रयोग यशस्वी व्हावा म्हणून गणपती, सरस्वती, लक्ष्मी, नटराज इ. इष्टदेवतांची यात स्तुती केली जाते.
(२)अलारिपु : हा भरतनाट्यम् नृत्यातील पहिला प्रकार होय. प्राचीन ग्रंथांतून ह्याचा ‘पुष्पांजलि’ म्हणून उल्लेख सापडतो. त्या विधीचे अलारिपू हे प्रतीकात्मक स्वरूप म्हणता येईल. पुष्पांजली म्हणजे फुलांची ओंजळ. नर्तकी रंगमंडपात आल्यानंतर तेथे असलेल्या भिन्न देवतांस पुष्पांजली वाहण्याचा हा प्रकार आहे. ‘अलारु’ हा शब्द तेलुगू भाषेतील असून त्याचा अर्थ उमलणे असा होतो. कमळ ज्याप्रमाणे हळूहळू उमलत प्रफुल्लीत होते, त्याप्रमाणे नर्तकी आपले डोळे, मान, भुवया, खांदे या उपांगांच्या नाजूक हालचालींनी सुरुवात करून वाढते अंगविक्षेप करीत असते. यात होणाऱ्या अंगप्रत्यंगाच्या मोहक हालचालींनी एक प्रकारचा व्यायाम होतो. त्यामुळे पुढील कार्यक्रम चपळतेने करण्यास चालना मिळते. या नर्तनप्रकारचा आणखी एक उद्देश आहे, तो म्हणजे नर्तकी आपल्या शिरोभागी, मुखासमोर व हदयावर अंजली हस्त ठेवून विघ्नहर्ता, रंगदेवता. गुरुजन व विद्वानांना आदराने नमस्कार करते व पुढील कार्यक्रम सफल होण्यासाठी आशीर्वाद मागते. तत् तै, तैयुम्, ताम् इ. वाचक बोलांची ही रचना असते. हे बोल रागदारीत म्हणजे प्राचीन शास्त्रीय ग्रंथानुसार ‘नटै’ किंवा नाट रागात गायले जातात. अलारिपू चतुश्रादी ॐकार भिन्न जातींत करतात.
(३)जतिस्वरम् : ⇨ जतिस्वरम् हा भरतनाट्यम् प्रयोगातील दुसरा प्रकार. हे शुद्ध नृत्य आहे. जति म्हणजे बोल व स्वरम् म्हणजे स्वर. तालांगांच्या विविध रचनेनुसार अवघड व गुंतागुंतीची बोलरचना केलेली असते, तिला ‘जति’ असे म्हणतात. या जतींना आधारभूत मानून त्यांवर एखाद्या विशिष्ट रागाची स्वररचना आवश्यक त्या विशिष्ट तालात केलेली असते. असे एकंदरीत तीन ते पाच स्वरसमूह असतात. प्रत्येक समुह ⇨ पल्लवी व ⇨ अनुपल्लवी अशा दोन विभागांचा असतो. पहिल्या पल्लविस्वराचा पूर्वार्ध अवरोही-आरोही रचनेचा असून तालाच्या दोन किंवा चार आवर्तनांचा असतो. दुसऱ्या स्वराच्या पहिल्या भागात रागाचा जीव वादीस्वर प्रामुख्याने दिसून येईल, अशी विलंबित लयीत स्वररचना केलेली असते. बहुधा त्याची दुप्पट करतात. स्वर-लय ज्ञानासाठी त्याचा उपयोग होतो. अशा प्रकारांच्या स्वररचनांवर विविध अडवूंनी रचलेले नृत्य करतात. काहीजण प्रथम मेय अडवू नावाचे शरीराच्या विशिष्ट प्रकारच्या लवचिक हालचालींनी युक्त असे अंगविक्षेप बहुधा करतात. मेय अडवूनंतर एका छोटयाशा जतीवर म्हणजे जतियुक्त लालित्यपूर्ण बोलावर नृत्य करतात. त्यानंतर प्रत्येक स्वराच्या जडणघडणीनुसार योग्य असे कौशल्यपूर्ण नृत्य केले जाते. पूर्वी जतीची पाटाक्षरे (मृदंगावर वाजवले जाणारे नृत्याचे बोल) प्रथम स्वरयुक्त गाऊन व नंतर फक्त स्वर गाऊन त्यावर नृत्य करत असत. हल्ली फक्त स्वरच गातात, जतिस्वरम् म्हणडे नर्तनपुष्पाने देवतांस नमस्कार करण्यासाठी बोलस्वरांची केलेली निबद्ध पद्यरूप रचना होय, असे म्हणता येईल.
(४) शब्दम् : हे नृत्य आहे. एका विशिष्ट शैलीनुसार गायले जाणारे, देवादिकांच्या नाट्यपूर्ण कथाप्रसंगांवर आधारित काव्य म्हणजे ‘शब्दम्’ होय. सुरुवातीस पाटाक्षर युक्त जती विशिष्ट रागानुसार स्वरयुक्त गाऊन त्यावर नृत्य करतात. याचे एकंदर चार चरण असतात. चरणांच्या आद्यन्ती रंगत आणण्यासाठी छोटयाशा जतीवर नर्तन केले जाते. कधीकधी ते चरण रागमालिकेनुसार वेगवेगळे गातात. शब्दम्च्या पहिल्या दोन ओळी मोठ्या असून दुसऱ्या दोन लहान असतात. यातील गीतसाहित्यामधील शब्द विविध नृत्याभिनय करण्यास पोषक असे रचलेले असतात. एकंदर शब्दसाहित्य मोजकेच असल्यामुळे यात भरपूर संचारीभाव (काव्यातील शब्दार्थाचे विविध प्रकारे स्पष्टीकरण करणारा अभिनय) करण्याचा प्रघात आहे. संपूर्ण चरणावर आवश्यकतेनुसार, इच्छेनुसार विविध अभिनय करून नंतर गीताचा उत्तरार्ध तेवढा पुन्हा पुन्हा गातात व त्यावर कथाप्रसंगांस अनुरूप असा, अमिधाशक्तीनुसार काव्याचे विविध भावार्थ प्रकट करणारा शब्दसंचारीयुक्त अभिनय करतात. प्रत्येक चरणाच्या शेवटी पाटाक्षरयुक्त जती गाऊन त्यावर नृत्य करीत पुढील पदांचा एकमेकांशी संयोग करतात. शब्दम्चा शेवट ‘गिणतोम्’ या पाटाक्षराने होतो. शब्दम्ची लय नेहमी एकच असते. बरेच शब्दम् तेलुगू भाषेत लिहिलेले असून ते बहुधा मिश्रचापू तालामध्ये करतात.
(५) वर्णम् : भरतनाट्यम्मध्ये ⇨ वर्णम् हे चवथ्या क्रमाचे नृत्य म्हणजे अभिनयाचा मानबिंदू समजला जातो. हे ‘पदवर्ण’ वा ‘चौकवर्ण’ या नावांनीही संबोधले जातात. कोणी ‘तानवर्ण’ नावाचा गानप्रधान प्रकारही नाचतात. दाक्षिणात्य संगीतपद्धतीत संगीतप्रधान तानवर्ण गाण्यासाठी योजतात. पदवर्ण किंवा चौकवर्ण अभिनयप्रधान असतो. त्याचे प्रत्येक स्वर-साहित्य हे भाव, राग व ताल यांस अनुरूप असे रचलेले असते, म्हणून अशा वर्णम्चा समावेश अभिनयात करतात. वर्णम् हे पल्लवी आणि अनुपल्लवी या स्वरूपाचे साहित्य असते. त्याचे प्रत्येकी दोन-दोन विभाग पडतात. यांनाच वर्णाच्या पहिल्या चार ओळी म्हणून संबोधतात. पल्लवीच्या साहित्यावर प्रथम एकपट-दुप्पट पाय वाजवून तोड घेतात. नंतर तीन लयींत येणाऱ्या ‘तीर्मान’वर (नृत्तबोलावर) नृत्य करतात. तीर्मान ठरलेल्या ‘ग्रहा’वर (ग्रह म्हणजे तालाच्या आवर्तनामध्ये गाण्याची ओळ जिथून सुरू होते ती जागा) आणतात व पुन्हा ‘अरुदि’ नावाचा छोटा तिह्या करून तालागांच्या ठराविक ठिकाणावर आणून सोडतात (तीर्मानम् म्हणजे शेवटी ‘तिहाई’ असलेला नृत्ताचा तुकडा किंवा बोल). नंतर नर्तकी रंगमंचाच्या मध्यभागी जाऊन उभी राहते व पल्लवीचा योग्य तो अभिनय करते. तालास अनुसरून पदक्षेप करीत कधी उजव्या तर कधी डाव्या बाजूस अभिनय करते. रंगत आणण्यासाठी म्हणून साहित्यास पोषक असे जतियुक्त पदाघात करून साहित्याच्या अंती तोड घेऊन विषय व समाघात पदक्षेप करून दुसरा तीर्मान किंवा पहिल्या तीर्मानचा शेवटचा द्रुत भाग नृत्तरूप करते व पुन्हा सर्व क्रिया पूर्वीप्रमाणे करून रंगमंचाच्या मध्यावर येऊन उभी राहते. येथे पहिली ओळ संपते. याचप्रमाणे तीन ओळी करून चवथ्या ओळीनंतरदेखील तीर्मान केला जातो. असे एकंदर पाच तीर्मान नृत्यकौशल्य दाखवण्यासाठी आणि अभिनयात रुचिरता वाढविण्यासाठी करण्याचा प्रघात आहे. नंतर येणाऱ्या प्रत्येक साहित्यस्वरापूर्वीदेखील तीर्मान करण्याचा प्रघात काही संप्रदायांतून रूढ आहे. यानंतर येणाऱ्या स्वरास ‘मुत्तायिस्वर’ म्हणतात. हे स्वर विलंबित आणि मध्य लयींत निबद्ध केलेले असतात. वर्णम्मध्ये येणाऱ्या प्रत्येक स्वरावर प्रथम नृत्त करून नंतर साहित्यावर सार्थ अभिनय केला जातो. मुत्तायीच्या स्वरसाहित्यानंतर वर्णचा पूर्वार्घ संपतो, म्हणून पल्लवी हा वर्णचा पहिला चरण घेतला जातो. मुत्तायीच्या स्वरात पल्लवीच्या साहित्याची सुरूवात नीट जुळून येईल, अशीच त्याची बांधणी केलेली असते.उत्तरार्धातील पहिला चरण फक्त साहित्ययुक्त असतो. यालाच कोणी ‘येत्तीकडै’ असे म्हणतात. चरणसाहित्यानंतर तीन-चार किंवा अधिक असे ‘चिट्टस्वर’ (चिट्टस्वर म्हणजे तालाच्या एक किंवा दोन आवर्तनांत बांधलेली सरगम. ही सरगम म्हणजे त्यापुढे येणाऱ्या काव्यपंक्तीचे स्वरलेखन-नोटेशन-असते) व त्याचे साहित्य असते. यातील पहिला स्वर विलंबित लयीत, दुसरा व तिसरा मध्य लयीत आणि नंतरचे द्रुत लयीत असतात. चिट्टस्वरान्त रागाच्या पकडीप्रमाणे मध्यमान्तीय, पंचमान्तीय, धैवतान्तीय, निषादान्तीय यांपैकी एक असतो. हा स्वरान्त नंतर उत्तरार्धातील पहिला चरण किंवा पूर्वार्धातील पहिला चरण म्हणजे पल्लवी यांना मिळणारा पाहिजे, किंवा निदान अगदी निकटचा तरी असावा, हे अभिप्रेत आहे.वर्णम्मधील साहित्यात नायिकेचे वियोग-शृंगारात्मक वर्णन आल्यास अभिलाषा, मरणादी दश दशांचे किंवा क्वचित कमी दशांचे वर्णन असते आणि संयोग-शृंगारात्मक साहित्यरचनेमध्ये ‘लीला-विहृत’ इ. अलंकारांची मांडणी केलेली असते.
(६) स्वरजति : ⇨ स्वरजतीमध्ये विशिष्ट ताल व राग यांनुसार रागाचा उपयुक्त संचारक्रम आणि तालांच्या विभिन्न जातींचा सुंदर समन्वय केलेला असतो. परंपरागत स्वरजतीमधील साहित्य वर्णम्प्रमाणे असते. पण मुत्तायिस्वरावर बोल म्हणजे ‘सोल्लु’ अथवा ‘सोलकटटु’ आणि साहित्य असते. स्वरान्ती ‘तर्दी गिण तोम्’ येतो. उत्तरार्धातील पहिला चरण किंवा येत्तीकडै स्वर-साहित्य रुपात असतो.त्यानंतर तीन किंवा चार चरण वर्णलप्रमाणेच अलतात. काही इतर स्वरजतींमध्ये सुरुवातीपासूनच बोलांऐवजी स्वर-साहित्य असते. स्वरावर नृत्त व साहित्यावर अभिनय वर्णम्प्रमाणेच करतात. कोणी वर्णम्प्रमाणेच प्रत्येक ओळीच्या पूर्वी तीर्मानदेखील करतात. ह्याचा विषयदेखील वर्णम्प्रमाणेच असतो.
(७) पदम् : ⇨ पदम् म्हणजे पद. ह्यात पल्लवी, अनुपल्लवी व ⇨चरण असा क्रम असतो. देव, राजा यांच्यावर ही पदे रचलेली असतात. किंवा नायक-नायिकाभावांसह शृंगाररसात ही पदे करण्याचा प्रघात पूर्वीपासून चालत आलेला आहे. जयदेवाच्या गीतगोविंदमधील अष्टपदी व क्षेत्रय्याने तेलुगू भाषेत लिहिलेली ‘क्षेत्रज्ञ पदम्’ म्हणून ओळखली जाणारी पदे आज भरतनाट्यम्मध्ये मान्यता व प्रतिष्ठा पावली आहेत. यातील बहुतेक पदे तिश्र-त्रिपुट तालात गातात.’मिश्रम्’, ‘मिश्रचापु’ किंवा फक्त ‘चापु’ ही सर्व तिश्र जाती-त्रिपुट तालाचीच परंपरागत नावे आहेत. ही पदे अत्यंत विलंबित लयीत गाण्याचा प्रघात आहे. यातील रागाची निवड प्रामुख्याने भाव व्यक्त करण्यासाठी केलेली असते. भरतनाट्यम्मधील पदांतून चित्रित केल्या गेलेल्या नायक-नायिकेच्या संयोग किंवा वियोगपर शृंगारामधून नायिकारूपी जीवात्मा गुरुरूपी सखीच्या मदतीने नायकरूपी परमात्म्याशी तादात्म्य पावण्याचा प्रयत्न करीत आहे, हाच गूढार्थ असतो आणि म्हणूनच शृंगारात्मक वर्णने पराकोटीची असली, तरीही सात्विक असतात. हीच नृत्यकलेची आध्यात्मिक पार्श्वभूमी होय.
(८) जावळि : ⇨जावळी हा बहुधा मध्यलयीत उडत्या चालीत गायला जाणारा प्रकार आहे. यातील साहित्य शृंगाररसप्रधान असते. बहुधा नायिका किंवा तिची सखी जावळीतून आपल्या भावविकारांना प्रकट करते. ह्यातील शृंगारभावाचे स्वरूप हलकेफुलके, लौकिक व काही वेळा उत्तान असते. ह्याची पल्लवी, अनुपल्लवी व चरणीदी रचना असते. कधी एकाहून अधिक चरण देखील असतात. बहुधा जावळी प्रचलित रागात साध्या उडत्या तालात रचलेली असल्यामुळे जास्त लोकरंजक असते.
(९) तिल्लाना : ⇨तिल्लाना म्हणजे हिंदुस्थानी संगीतातील तराणा. ह्या नृत्यप्रकाराचा शुद्ध नृत्तामध्ये समावेश होतो. ह्यात ‘तिल्लीलाना’, ‘दिरना’, ‘तोम् दिरना’, ‘तननम्’ अशा प्रकारचे बोल एकत्र करून त्यांची रागात व तालात बैठक योजलेली असते. पल्लवी, अनुपल्लवी व चरण अशी त्याची मांडणी असते. सुरुवातीस पल्लवीवर मेय अडवूचे प्रकार केले जातात व नंतर निरनिराळ्या जातींनुसार याच पल्लवीच्या ओळीवर आवश्यक तेवढया कौशल्यपूर्ण रचना केलेल्या असतात. भरतनाट्यम्मधील नृत्ताचा जणू मापदंड असे हे नृत्य समजले जाते. त्यानंतर बोलयुक्त अनुपल्लवी येऊन आश्रयदाता राजा किंवा देव यांच्या स्तुपिपर एक चरण घेतला जातो व पुन्हा शेवटी बोलांचा एक छोटासा चरण केला जाऊन तीर्मानयुक्त रचनेने याचा शेवट होतो.
(१०) विरुत्तम, चूर्णिका व श्लोकम् : हे तीनही प्रकार एकमेकांना अतिशय मिळतेजुळते असून अनुक्रमे तमिळ, तेलुगु व संस्कृत भाषांमध्ये केले जातात. भक्तिभावाच्या उत्कटतेसाठी, तालाशिवाय निश्चित धून न ठेवता कल्पकतापूर्ण भावपरिपोष करीत व रागाचा कल्पनाविलास करीत गाऊन ईश्वरस्तुतिपर साहित्याचा आविष्कार घडवला जातो. अनिर्बंध व मुक्तस्वरालापयुक्त अशा प्रकारे ह्यात मूळ अर्थाला अनुरूप असे अर्धसंचारी भाव व्यक्त करून अभिनय करतात.
(११) कौतुकम् : पूर्वीच्या काळी हा प्रकार फक्त देवळातूनच पहावयास मिळत असे. हल्ली शहरातून रंगमंचावर प्रयोगाच्या सुरुवातीस अलारिपूपूर्वी करण्याचा प्रघात आहे. प्राचीन ग्रंथांमधून याचा उल्लेख ‘कौत’,’कउत्त’ असा आढळतो. कौतुकम् ही पद्यरुप असूनही ती गद्यरुप म्हटली जातात. अनेक पाटाक्षरे व छोट्या छोट्या सुंदर शब्दांच्या रचनांमध्ये देवताविषययुक्त साहित्य गुंफलेले असून नानाविध बोलांच्या विस्तारात मधून-मधून डोकावणारे साहित्य मोठे अकर्षक वाटते. यातील बोलांवर योग्य ते नृत्य व साहित्यावर अभिनय केला जातो. हा छोटासाच परंतु चित्तवेधक असा स्तुतिपर प्रकार आहे.
(१२) मंगळम् : प्रयोगाच्या शेवटी गाण्याचा हा प्रकार आहे. यावर नृत्य करीत नाहीत पण नर्तकी फक्त पदाघात करीत राहते. यातील साहित्य ईश्वराच्या गुणवर्णनात्मक आणि स्तुतिपर असते. प्रयोगात झालेल्या गीत, वाद्य, नृत्य यांतील चुकांबद्दल देवाकडे क्षमायाचना करणे, ही या प्रकारातील आंतरिक भावना होय. मंगळम् म्हणजे ‘सारे मंगल होवो, शुभ होवो’, हीच देवाला केली जाणारी प्रार्थना होय. क्षमायाचना म्हणून मंगळम्चे महत्व आहे. हाच प्रयोगाचा शेवट असतो.
वेशभूषा : पूर्वीच्या नर्तकीच्या पोशाख म्हणजे सैलसा चुडीदार, रंगीत पैजामा. तो पायाच्या घोट्यांपर्यंत पोहोचत असे. त्यावर ऑरगंडी कापडाची नऊवार सफेद सकच्छ साडी नेसत. नृत्यातील उठण्या-बसण्याच्या मुलभतेसाठी ती घोटा व गुडघा यांच्या मध्यापर्यंत पोहोचेल, एवढी उंच नेसत. डाव्या खांद्यावरून पदर घेऊन तो उजव्या कुशीकडून पुढे आणून डाव्या बाजूस कमरेस खोचत. या साडीला पाव इंच रुंदीच्या सोनेरी जरी (तूया) आडव्या शिवलेल्या असत. त्यामुळे या साडीला ‘तूया सेलै’ असे म्हणत. कापडाच्या कडकपणामुळे निऱ्या फुगून पोटाकडील भाग भारी ओंगळ दिसे. त्यावरून ‘माजा’चा पट्टा (कंबरपट्टा) बांधला जाई. वर चोळी किंवा रंगीत ब्लाउज तसेच त्यावर नर्तकीच्या ऐपतीप्रमाणे सोन्यामोत्याच्या रत्नजडित माळा, तसेच बाजूबंद किंवा वाक्या घालीत. केसांची लांबसडक वेणी सोडून त्यावर वेणीच्याच आकाराची रत्नजडित वेणी घालीत. भांगात सोन्याची किंवा रत्नांची बिंदी घालून भांगाच्या दोन्ही बाजूंस सूर्य-चंद्र नामक अलंकार, नाकात फुलीच्या जागी बेसर घालून नाकाच्या मध्ये लटकत राहील असा ‘बुलाक’ नावाचा दागिना असे. हातांत सोन्यामोत्याच्या पाटल्या, बांगड्या, तोडे व पायांत प्रत्येकी शंभरपासून दोनशेपर्यंत घुंगुर बांधत.
हल्ली हा पोशाख बराच सुटसुटीत झाला आहे. आतील पैजामा पूर्वीप्रमाणेच रंगीत, बहुधा त्याच रंगाचा ब्लाउज, अंगास नीट बसेल अशी कोणत्याही वसंतऋतू रंगाची सहावार साडी पूर्वीप्रमाणेच नेसतात किंवा विकच्छही नेसतात. सकच्छ नेसताना आतील पदरास जरीचा जोड देऊन कासोट्याचा आभास निर्माण करतात. सुटसुटीतपणासाठी कोणी ही साडी वेगवेळ्या आकृतिबंधांत (डिझाइन) शिवून तयार करवून घेतात. दागिने पुर्वीप्रमाणेच किंवा प्राचीन शिल्पांतील एखाद्या आकृतीबंधानुसार तयार करतात. वेणीवर वर उल्लेखिल्याप्रमाणेच पण फुलांची वेणी तयार करून घालतात व त्यावर अबोलीच्या फुलांचा जाडजुड हार दुमडून खोचतात.
दुसरा पोशाख म्हणजे कासोटा घालून नेसलेले पितांबर. त्याला मध्ये गुडघ्यापर्यंत पोहोचणारा दोन्ही बाजूंस अडकवलेला पंखा असतो. तो पाय वाकवून चतुरश्र नृत्यावस्था केली असता दोन्ही पायांमध्ये मोठा मनोहर दिसतो. त्यावर दोन्ही नितंबावरून येणारा त्याच कापडाचा कमरबंध शेला असतो. त्यालाही नाभीखाली येणारा एक छोटासा पंखा असतो. तसेच वर ब्लाउज व त्यावरून कुचबंधदेखील पंख्यासह असतो. इतर दागिने पारंपारिक पद्धतीत वर्णिल्यानुसार असतात.
वेळाच्या बचतीसाठी व वापरण्याच्या सुटसुटीतपणासाठी हाच पोशाख तुमानीप्रमाणे शिवून घेतात. आवडीनिवडीनुसार त्याला जुन्या साडीप्रणाणे सोनेरी जरीच्या किनारी तिरकस शिवतात. वर कुचबंधाऐवजी कमरेस खोवल्याप्रमाणे बांधलेला एक वेगळा पदर डाव्या खांद्यावर मागे सोडतात. माजाचा पट्टा अजूनही काही नर्तकी बांधतात. ह्या नृत्यातील रंगभूषा पूर्वापार साधी व नित्याची प्रचलित अशी असते.
रंगमंच : पूर्वी भरतनाट्यम् देवळात केले जात असे, तसेच लग्नासारख्या एखाद्या मंगल प्रसंगी होत असे. कालांतराने ते राजदरबारात होऊ लागले. हल्ली व्यावसायिक रंगमंचावर तसेच अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांतून नेहमी पहावयास मिळते.
वाद्यवृंद : रंगमंचाच्या उजव्या बाजूस वाद्यवृंद असतो. प्रेक्षकांच्या आसनांकडून प्रथम मृदंगवादक, नंतर घटम् वाद्य असल्यास ते वाजवणारा त्याच्या डावीकडे मागे, त्यानंतर मुख्य गायक नट्टुवनार हा ‘ताळम्’ (झालरा, मंजिरा ही त्याची अन्य नावे) वाजवीत संपूर्ण प्रयोगाचे धुरीणत्व करतो. त्याच्या पाठीमागे उजव्या बाजूस ‘मोरसिंग’ नामक वाद्य दाताओठांच्या मध्ये धरून श्वासाच्या मदतीने तोंडाने वाजविणारा वादक बसतो. नट्टुवनारच्या पाठीमागे डाव्या बाजूस तंबोरावादक असतो. नट्टुवनारच्या डाव्या बाजूस त्याचा मदतनीस गायक किंवा गायिका बसते. बहुधा पदे गायिकेकडून गायली जातात. कधीकधी संपूर्ण प्रयोगातील गाणी गायिका गाते व नट्टुवनार ताळ वाजवीत व सोल्लू (बोल) बोलत कार्यक्रमाचे संचालन करतो. त्यानंतर वीणा किंवा व्हायोलिन वाजवणारा वादक असतो. कधी वेणुवादक असल्यास तो दोन्ही गायकांच्या पाठीमागे बसतो. भरतनाट्यम्मध्ये दाक्षिणात्य संगीतपद्धती वापरली जाते.
मीनाक्षीसुंदरम् पिळ्ळै, मुत्तुकुमार पिळ्ळै, चोकलिंगम् पिळ्ळै, चंद्रशेखर पिळ्ळै, रामय्या पिळ्ळै, किट्टप्पा पिळ्ळै इ. भरतनाट्यम् मधील सुप्रसिद्द परंपरागत नृत्यगुरू होत. तसेच गौरी अम्माळ, ⇨ बालासरस्वती, ⇨ रुक्मिणीदेवी अँरंडेल, कालानिधी नारायणन्, ⇨ मृणालिनी साराभाई इ. प्रख्यात नर्तकी व ⇨ राम गोपाल हे प्रसिद्ध नर्तक होत. अलीकडच्या काळात प्रसिध्दी पावलेल्या भरतनाट्यम् नर्तकींपैकी प्रमुख म्हणजे ⇨यामिनी कृष्णमूर्ती व पद्मा सुब्रह्यण्यम् होत. नाट्यशास्त्रामध्ये वर्णन केलेल्या शिवाच्या नृत्यबंधाचा, करणां चा पद्धतशीर वापर भरतनाट्यम्मध्ये अलीकडच्या काळात पद्मा सुब्रह्मण्यम् यांनी संशोधनपूर्वक सुरु केला. यांखेरीज कमला, इंद्राणी रेहमान, सोनल मानसिंग, वैजयंतीमाला, हेमा मालिनी इ. नर्तकी प्रसिद्ध आहेत. भरतनाट्यम्चे खरे माहेरघर दक्षिणेत असले तरी स्वातंत्र्योत्तर काळात ही शैली उत्तरेतही बरीच लोकप्रिय होऊ लागली. मुबंईतील प्रसिद्ध नृत्यगुरु पार्वतीकुमार यांनी तंजावरच्या मराठी राजांनी भरतनाट्यम्साठी लिहिलेल्या मराठी रचनांवर संशोधन केले. त्यांच्या सुशिष्या व सुप्रसिद्ध महाराष्ट्रिय नर्तकी सुचेता भिडे चापेकर यांनी त्यांचे संशोधन पुढे सुरु ठेवले आहे. तंजावरच्या मराठा राजांच्या मराठी रचना प्रथम परंपरागत भरतनाट्यम्मध्ये सादर करण्याचे श्रेय या गुरुशिष्यांकडे जाते.
भरतनाट्यम्चे पद्धतशीर पदवीशिक्षण देणारी ‘कलाक्षेत्र’ ही विख्यात संस्था मद्रासमध्ये आहे. बडोदा येथील विद्यापीठाप्रमाणेच अलीकडच्या काळात मुबंई विद्यापीठानेही भरतनाट्यम् नृत्यास उच्च व अत्युच्च पदवीसाठी मुख्य विषय म्हणून मान्यता दिली आहे.
संदर्भ : 1. Bowers, Faubion, The Dance in India, New York, १९५३.
2. Ghurye, G.S.Bharata Natya and its Costume, Bombay, १९५८.
3. Kuppuswamy, Gowri Hariharan, M. Bharatanatya in Indian Music, New Delhi,१९८२.
4. Marg Publications, Marg Vol.xxxII, No.३: In Praise of Bharata Natyam, Bombay, June १९७९.
5. Sarabhai, Mrinalini, Understanding Bharata Natyam, Ahmedabad, १९८१.
6. Singha, Rina Massey, Reginald, Indian Dances, London, १९६७.
७. पार्वतीकुमार, संजावूर नृत्यप्रबंध, मुंबई, १९८२.
पार्वतीकुमार
“