भराल: गो-कुलातील स्यूडॉइस वंशातील प्राणी. इंग्रजी भाषेतील लौकिक नाव ब्ल्यु शीप (निळी मेंढी). याचे शास्त्रीय नाव स्पूडॉइस नेयॉर असे आहे. हा मूळ तिबेटातील असला तरी सिक्कीम, लडाख आणि नेपाळमध्ये सापडतो. ज्या ठिकाणी चांगले गवत मुबलक आढळते, अशा ३,६०० ते ५,००० मी. उंचीवरच्या प्रदेशात हा राहतो. झुडपाळ जंगलात तो कधीही शिरत नाही.
डोक्यासुद्धा शरीराची लांबी दीड मीटरपर्यंत, शेपटीची १३-२० सेंमी. व खांद्यापाशी उंची ७०-९० सेंमी. असते. शिंगे वाटोळी, गुळगुळीत आणि मागे मानेवर वळलेली असतात, त्यांची लांबी सरासरी ५८-६१ सेंमी. असते. नर आणि मादी या दोघांनाही शिंगे असतात. डोके व शरीराचा वरचा भाग तपकिरी करडा असून त्यात निळ्या रंगाची झाक असते. खालचा भाग आणि पायाची आतली बाजू पांढरी असते. ज्या निळ्या शेलच्या खडकाळ आणि तपकिरी गवताच्या प्रदेशात भराल राहतो. त्याच्याशी याच्या शरीराचा रंग जुळणारा असतो. शरीराची रचना आणि सवयी यांच्या बाबतीत मेंढी आणि बकरी यांच्यामध्ये बसणारा हा प्राणी असला, तरी तो बकऱ्यांच्या जास्त जवळचा आहे.
उन्हाळ्याचा भरालांचे साधारणपणे १०-१५ जणांचे कळप असतात, पण कधीकधी हे कळप सु. २०० प्राण्यांचेही असतात. कळपात नर आणि माद्या असतात. सप्टेंबर महिन्याच्या सुमारास मोठे कळप फुटून त्यांचे छोटे कळप बनतात आणि प्रत्येकात एक नर आणि काही माद्या असतात. पर्वताच्या उतरणीवर हे चरत असतात, थोडा वेळ चरावयाचे आणि थोडा वेळ विश्रांती घ्यावयाची असा यांचा क्रम दिवसभर चालू असतो. कळप चरत असताना किंवा विश्रांती घेत असताना धोक्याची सूचना देण्याकरिता ठिकठिकाणी खडकांच्या कड्यांवर काही भराल पहारा करतात. ज्या प्रदेशात भराल रहातात तेथे लपण्याकरिता जाग नसल्यामुळे व शरीराचा रंग संरक्षक असल्यामुळे संकटाच्या प्रसंगी यक्तिंचितही हालचाल न करता ते स्वस्थ पडून राहतात, पण आपण दिसलो आहोत अशी शंका आल्याबरोबर ते भराभर तुटलेल्या कड्यांवरील अतिशय कठीण आणि जेथे कोणी येऊ शकणार नाही अशा जागी जातात.
भरालांच्या प्रजोत्पादनाच्या सवयींविषयी विशेष माहिती नाही. सप्टेंबर महिन्यात माद्या माजावर येतात. मादीला वसंत ऋतूत एक किंवा दोन पिल्ले होतात. भराल सु. २० वर्षे जगतात.
भट, नलिनी
“